Get it on Google Play
Download on the App Store

अनुभव -1

वीस वर्षांपूर्वीची गोष्ट...मी नवीनच प्रॅक्टीस सुरू केली होती;मेहकर या तालुक्याच्या ठिकाणी.संध्याकाळी साधारण आठ साडेआठच्या सुमारास ,मी संध्याकाळची ओपीडी आटपून घरी जायच्या तयारीतच होते...एक वर्षाचा माझा मुलगाही आता कंटाळला होता...सासुबाई तेव्हा गावाकडे रहायच्या म्हणुन रमणला सोबतच ठेवावं लागायचं दिवसभर,कारण घर दूर होतं....
       मी रात्रीच्या सिस्टरला सुचना देत होते,तेव्हढ्यात बाहेर गोंधळ ,रडण्याचा आवाज ऐकु आला. बाजुच्या खेड्यावरून एक सिरियस पेशंट आल्याचं सिस्टरनी सांगितलं...प्रॅक्टीस सुरू करून दिडदोन महिनेच झाले होते...सिस्टर म्हणजे तिथलीच लिहितावाचता येणारी ,थोडी चुणचुणीत मुलगी(तेव्हा नर्सिंग केलेला staff मिळायचा नाही )....ती पार भांबावलेली!! कारण आडवा उचलून आणलेला बेशुद्ध पेशंटच तिने आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेला !
         घरी साधारण दोन  तीन तासांपूर्वी डिलिव्हरी झालेली ,वार पडायला उशीर लागल्यामुळे अति रक्तस्राव झाल्यामुळे बेशुद्ध झालेली पहिलटकरीण होती....
       पेशंटची कंडिशन अतिशय नाजुक होती.
शरीरातलं रक्ताचं प्रमाण अतिशय कमी झालेलं...नाडी लागत नव्हती...BP लागत नव्हतं ...जवळजवळ pulseless होती ती...
तीला तपासुन आत राहीलेले वारीचे तुकडे काढले....तिला higher centre ला जायला सांगितलं...कारण मेहकरसारख्या ठिकाणी ना रक्तपेढी न भूलतज्ञ ना proper ICU ची व्यवस्था....पेशंटची वाचण्याची शक्यताच अगदी कमी वाटत होती.नातेवाईकांना seriousness सांगितल्याबरोबर त्यांची रडरडी अजुनच वाढली....गाडीवाला जिल्ह्याच्याठिकाणी जायला तयार होईना...
इथून दुसरी गाडी करायची तर त्यांच्याकडे पैसे नाहीत....तेव्हा ambulance नव्हत्या सरकारी१०८ही नाही आणि खाजगीही नाही...सर्वात महत्वाचं म्हणजे वेळ अगदी कमी होता...तिला ताबडतोब treatment भेटणं गरजेचं होतं...तरच तिची वाचण्याची शक्यता होती....आईवडील हतबल...इथंच काही प्रयत्न करा....नाहीतर आमचं नशीब...या निर्णयावर आलेले...
      पाचसात मिनिटातच हा सगळा अंदाज मला आला आणि मी माझ्या कामाला लागले...तिला पटकन oxygen लावलं...IV line लावून सलाईन सुरू केलं...रक्तस्राव कमी करणारे injections ,antibiotic दिले...गर्भपिशवीतल्या जमा झालेल्या गाठी काढल्या...urinary catheter टाकलं...
रक्त देण्याची गरज होतीच कारण हिमोग्लोबिन होतं फक्तं ३!!!...रक्त आणायला सांगितलं जिल्ह्याच्या ठिकाणाहुन...तसं सोबतची गर्दी गायब झाली...मग पेशंटच्या वडिलांसोबत आमचा compounder दिला....बुलढाण्याला पाठवलं....दोन अडीच तासांच्या प्रयत्नानंतर BP लागलं....फक्त 40....50...जे की कमीतकमी100च्यावर पाहिजे...पण ते positive sign होतं...पेशंट ट्रीटमेंटला प्रतिसाद देत होती...अजुन एखाद्या तासाने तिने आवाजाला प्रतिसाद द्यायला सुरूवात केली...आणि आम्ही सगळेच relax झालो...
       जवळजवळ पाच तासांनी ती शुद्धीवर आली आणि आमचा थकवा एकदम नाहिसा झाला...काही वेळाने blood आलं....चार बाॅटल रक्त द्यावं लागलं....ईश्वरकृपेने आशा (पेशंटचं नाव)जगण्याच्या नविन आशेने ,गुटगुटीत बाळासोबत सातव्या दिवशी घरी गेली !!!शेवटी देव तारी त्याला कोण मारी!!!
    माझ्या हाॅस्पिटलमधली पहिली क्रिटीकल केस म्हणुन तर लक्षात आहेच...यात डाॅक्टर या नात्याने तर मी यशस्वी झालेच...पण रमण माझा मुलगा किती समजदार आहे याचा प्रत्यय आला...
     त्याला तिथेच माझ्या खुर्चीवर बसवलं होतं...कपड्याने बांधुन...म्हणजे झोपला जरी तरी खाली पडू नये म्हणुन कारण आम्ही सगळे पेशंटमधे गुंतलो होतो.मी डाॅक्टर म्हणुन तर सजग होतेच पण माझ्यातली आईसुद्धा जागृत होती कारण एक वर्षाचं लेकरू उपाशी होतं....मी अधुनमधून त्याच्याकडे पहायचे तो अपेक्षेने पहायचा...जणुकाही त्यालाही परीस्थितीचं गांभीर्य कळलं होतं....ना तो रडला ना झोपला...डोळे मोठे करून तो पाच सहा तास आमची घाई पहात होता....सकाळी बाॅटलमधे भरून आणलेलं दुधही नासलं होतं...सगळं झाल्यावर हातपाय धुवून त्याच्याजवळ गेले....नासलेलं दुध त्याने मधे भुक लागल्यावर कधीतरी पिऊन घेतलं होतं ...स्वत:च...अगदी समंजसपणे....तेव्हा मात्र त्याचा अभिमान,प्रेम,आई म्हणून कमी पडल्याचं दु:ख,राग ...अशा संमिश्र भावनांमुळे डोळे नकळत ओलावले....
       तो शांत राहिल्यानेच मी माझं काम व्यवस्थित करू शकले हे नक्की...!!
    रश्मी.
“वैद्यकीय सत्यकथा”या पुष्पमालिकेत share केलेला अनुभव

वैद्यकीय सत्यकथा

Rashmi Lahoti
Chapters
अनुभव -1