Get it on Google Play
Download on the App Store

भाग ४

त्या व्यक्तीने चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. त्यामुळे आम्हाला त्याचा चेहरा लगेच दिसला नाही. अल्फाने त्याच्या शर्टात लपवलेला दोर बाहेर काढला आणि झटक्यात त्या घुसखोराला बांधून टाकले. त्या घरातून एक चाळीशीतला माणूस धावतच बाहेर आला.

"क्.. कोण.. कोण आहात तुम्ही?? " त्याने धसकून विचारले. त्याच्या हातात दंडुका होता आणि तो आम्हा तिघांकडे घाबरून पाहत होता.

"शांत व्हा, शांत व्हा. आम्ही तुमची मदतच करायला आलोय. " अल्फा म्हणाला, " हा तुमच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला आम्ही जेरबंद केले आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाहीये. "

"हा.. हा कोण आहे?? आणि तुम्ही कोण आहात..?? " अजुनही त्याच्या बोलण्यात अविश्वास दिसत होता.

"मी डिटेक्टिव्ह अल्फा. आणि हा माझा मित्र प्रभव. आम्हाला सांगलीचे माजी पोलीस आयुक्त भालचंद्र प्रधान यांनी इथे पाठवलंय. " अल्फा कणखर आवाजात म्हणाला, " आणि हा कोण आहे, ते आता आपण पाहुयाच. "

त्याने त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा रुमाल खसकन ओढला.

तो एक गोल चेहऱ्याचा, किंचीत सावळ्या वर्णाचा, गटाण्या डोळ्यांचा माणूस होता. केस आखूड आणि थोडे काळे थोडे पांढरे असे होते. त्याला दरदरून घाम फुटला होता आणि थरथर कापतआहे तो आम्हा दोघांकडे पाहत होता.

"तू देशमुखांचा पुतण्या का रे?? " त्या घराचा मालक त्याच्याकडे दुरूनच वाकून पाहत म्हणाला.

"मला माफ करा.. माझी चूक झालीये.. प्लीज प्लीज मला जाऊ द्या.. " तो गयावया करू लागला.

"हो हो, नक्की जाऊ देणारे आम्ही तुला - पोलीस ठाण्यात!! " अल्फा आपला गाल चोळत म्हणाला.

"हा माझ्या घरात चोरी करत होता का? तुम्ही त्याच्या मागावर कसे? हे नक्की काय प्रकरण आहे मला काही कळेल का?? " त्या घराच्या मालकाने विचारले.

"सांगतो, सांगतो. तुम्ही एक काम करा. गावच्या पोलीस चौकीत फोन करा आणि त्यांना ताबडतोब इकडे यायला सांगा. तिथे सर्वकाही सविस्तर सांगेन मी. प्रभू, आपल्याला याला समोरच्या पाटीलबाईंच्या घरी न्यायचंय. मला थोडीशी मदत कर. "

आम्ही आमच्या कैद्याला आजींच्या घरात आणले आणि एका ठिकाणी बसवले. आजी हे सगळं पाहून थक्कच झाल्या होत्या आणि त्यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्या बावरून बांधलेल्या अवस्थेतील चोराकडे पहात राहिल्या. एव्हाना सगळी गल्ली जागी झाली होती. आमचे शेजारी आतमध्ये आले आणि त्यांच्यापाठोपाठ आणखी दोनतीनजण आले.

"कुठाय तो?? " एक भरगच्च मिशीवाला आत येत म्हणाला, " हा बघा.. काय रे रंज्या.. दरोडे घालायचं काम कधीपासून सुरू केलंस? आम्ही तर चांगला पोरगा समजलो की तुला!! थांब तुला चांगला बडवतो आणि मग तुझ्या काकाच्या हवाली करतो.. "

त्याला पकडून बडवण्यासाठी ती मंडळी पुढे सरसावली,  पण अल्फा त्यांच्या मध्ये उभा राहिला.

"थांबा. "अल्फा खणखणीत आवाजात म्हणाला, " आधी त्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि मग तुम्हाला जे काय करायचंय ते करा. "

"तू कोण रे पोरा? चल हो बाजूला!! " ते सर्वजण आपले हात मोकळे करायच्या उद्देशानेच आलेले होते, असं मला वाटलं.

"याला घुसखोरी करताना मीच पकडलेलं आहे. मी एक डिटेक्टिव्ह आहे. सांगलीचे माजी पोलीस अधीक्षक श्री. प्रधान यांनी मला हे प्रकरण हाताळण्यास पाठवले आहे. " प्रधानांचे नाव ऐकताच ते लोक जरा कचरले, " त्यामुळे मला यात हस्तक्षेप चालणार नाही. मागे व्हा सर्वजण. पटकन!! "

अल्फाचा कणखरपणा पाहून क्षणभर मीही चकितच झालो. शेवटी आमचे शेजारी बोलले,

"होय. हे खरं सांगताहेत. यांनीच त्याला माझ्या घरात घुसताना पकडलंय. "

ते ऐकताच जमलेली मंडळी थोडी शांत झाली. अल्फाने सर्वांकडे तीक्ष्ण कटाक्ष टाकला.

"धन्यवाद. आपलं नाव सांगाल का? " त्याने शेजारच्या काकांना विचारले.

"मी शिवराज उरणे. गावच्या एमएसइबीत काम करतो. "

"आणि हा कोण आहे? " त्याने आमच्या कैद्याकडे बोट दाखवित विचारले.

"हा रणजित देशमुख. वाडीतल्या अण्णा देशमुखाचा पुतण्या. "

"बरं. " अल्फा म्हणाला, " मंडळी, आता थोडं शांतपणे घ्या. बसा इकडे. मी आता या प्रकरणाचा खुलासा करणार आहे. हे प्रकरण तुम्हाला दिसतंय तसं साधंसुधं नाहीये आणि हा तुमच्या समोर दिसणारा कैदी काही साधासुधा घुसखोर नाहीये. फार मोठं षडयंत्र रचण्यात याचा सहभाग आहे. त्यामुळे याच्या तोंडून त्याचा गुन्हा वदवून घेणे महत्त्वाचे आहे. "

अल्फाचं ते बोलणं ऐकून आम्ही सर्वजणच बुचकळ्यात पडलो. त्याने बोलण्यास सुरूवात केली,

"या पाटीलबाई काल सांगलीतील आमच्या घरी आल्या होत्या. त्यांनी आम्हाला सांगितले, की त्यांच्या घरात कोणीतरी रात्री शिरत असल्याचा त्यांना भास होतो. त्याचा छडा लावण्यासाठी मी आणि माझा मित्र प्रभव काल सायंकाळी इथे आलो. थोडी तपासणी करताच माझ्या लक्षात आले, की त्यांना भास होत नसून खरेच कोणीतरी तिथे येऊन गेलं होतं. मग प्रश्नांची मालिका सुरू झाली. असं कोण आणि का करत असावं?? पहिला मला वाटलं, की पाटलांनी त्यांच्या घरात काहीतरी दडवून ठेवलंय आणि ते मिळविण्यासाठी कोणाचेतरी प्रयत्न सुरू आहेत. पण दोन गोष्टींनी माझी ही कल्पना फोल ठरवली. एक म्हणजे, मी जितकी माहिती काढली त्यातून स्पष्ट होत होतं, की परशुराम पाटील एक सरळमार्गी आणि गरीब माणूस होता. त्याच्याकडे लपवून ठेवण्यासारखं असं काहीच नव्हतं. आणि दुसरं म्हणजे, आम्ही घराचा कानाकोपरा तपासून पाहिला. पण आमच्या हाती  काहीच लागलं नाही. याचा अर्थ सरळच होता. पाटीलबाईंच्या घरी काही नव्हतंच. मग तो घुसखोर नक्की काय शोधत होता??

मग हळूहळू मला वाटायला लागलं, की यात निश्चितच काहीतरी मोठी गडबड आहे. सरळ विचार करून हा गुंता सुटणार नाही. मग मी थोडा मेंदूला ताण दिला आणि दुसऱ्या काय शक्यता असू शकतात, याचा विचार करू लागलो. पाटलांनी आपल्या घरात काही लपवले नसेलही, पण त्यांनीच लपवायला हवं असं कुठे आहे? जर दुसऱ्या कोणीतरी त्यांच्या नकळत त्यांच्याच घरात काहीतरी लपवून ठेवले असेल तर?? मग असे करण्याची वेळ कोणावर येऊ शकते, याचा विचार मी करू लागलो. एखाद्याने गैरमार्गाने मिळवलेले पैसे लपविण्यासाठी पाटीलबाईंच्या सुनसान घराचा आधार घेतलेला असू शकतो. तो गैरमार्ग म्हणजे काय, तर चोरी, दरोडा किंवा लूटमारीचे प्रकरण असणार अथवा कुणाचीतरी फसवणूक केली गेलेली असणार.

हा विचार मनात येताच मी झटपट कामाला लागलो एकतीस डिसेंबरच्या रात्री पाटीलबाईंना प्रथम शंका आली होती, की घराच्या आवारात कोणीतरी आहे. त्यावरून मी अंदाज लावला, की त्याआधीच्या दोनचार दिवसांतच हे चोरीचे किंवा फसवणूकीचे प्रकरण घडले असले पाहिजे. त्यानुसार मी थोडी वृत्तपत्रे चाळली आणि मग मला हवे ते सापडायला फार वेळ लागला नाही. ती घटना म्हणजे एकोणतीस डिसेंबरला सांगलीच्या पेठेतील सोन्याच्या दुकानात झालेली चोरी!! काय महाशय, काही चुकत तरी नाहीये ना माझं?? "

अल्फाने हेतूपूर्वक रणजितकडे पाहत विचारले. त्याने जी खाली मान घातली होती, ती वर काढलीच नाही.

"एकोणतीस तारखेच्या रात्री दुकान बंद व्हायच्या वेळी दोन दरोडेखोरांनी दुकानात शिरून बंदुकीचा धाक दाखवित जवळपास दीड कोटींचा माल लंपास केला. त्यांनी तो माल एका चारचाकीमध्ये भरला आणि तेथून पळ काढला. पोलिसांत ही खबर जाईपर्यंत ते सांगलीतून बाहेर पडून मिरजेत पोचले होते. सगळीकडून पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि टोल नाक्यांवरतीही खबर पोचवली गेली. पण पोलिसांना त्यांना पकडण्याचे कष्ट करावेच लागले नाहीत. कारण या गाडीला अर्जुनवाडपासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर भीषण अपघात झाला आणि त्यात त्या दोन्ही दरोडेखोरांचा अंत झाला. पण कोड्यात टाकणारी गोष्ट ही होती, की त्या गाडीत त्यांनी चोरलेला माल नव्हताच..!! पोलीस अजूनही त्या मालाच्या शोधात आहेत. त्या बिचाऱ्यांना ठाऊकच नाहीये, की यामध्ये एक पडद्याआडचा कलाकारदेखील आहे आणि आता सगळी सूत्रे तो सांभाळतोय.. "

तिथे जमलेल्या लोकांमधून कुजबुज ऐकू येऊ लागली. कुणालाच पटत नव्हतं, की हा वरून मिळमिळीत दिसणारा तरूण पोरगा एवढा मोठा हात मारू शकेल. तेथे येऊन पोचलेले अण्णा देशमुखही पुतण्याचा प्रताप ऐकून गारद झाले.

"हे.. हे खरं आहे का?? यात तुझाही सहभाग आहे का?? " त्यांनी अडखळत त्याला विचारले.

"होय. खरं बोलतायत हे.." शेवटी त्याने आपल्या तोंडातून शब्द बाहेर काढले, " हा कट रचण्यात मीही सहभागी झालो होतो."

"पण.. पण.. तू.. कसं काय.. " त्यांच्याकडे पाहून असं वाटत होतं, की त्यांचा अजूनही यावर विश्वासच बसत नाहीये.

"माझी चूक झाली अण्णा.. खरंच.. एका छोट्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मी खूप मोठं संकट स्वतःवर ओढवून घेतलं. मी काय करतोय याचं मला भानच राहिलं नव्हतं अण्णा.. मी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठीच हे सगळं करत होतो. "

"तू मला जसा दिसतोस त्यावरून आणि एकूण गावकऱ्यांच्या प्रतिक्रियेवरून मला असं वाटतंय की तू एक साधा सरळ माणूस आहेस. बरोबर ना?? " अल्फाने शांतपणे रणजितला विचारले, " मग इतका मोठा गुन्हा करण्यास तू का प्रवृत्त झालास?? काय कारण होतं यामागे?? "

"यामागचं कारण फक्त एकच. माझा मूर्खपणा!! " तो बोलू लागला, " माझे आईवडील मी लहान असतानाच वारले. लहानपणापासून माझा सांभाळ माझ्या काकांनीच केला. त्यांनी मला शिकवलं, बी कॉम केलं. माझं कॉलेज होऊन दोन वर्षे झाली. तसा मी अभ्यासात बरा होतो. पण माझा स्वभाव अबोल. त्यामुळे मला कुठे नोकरी लागेना. हळूहळू मला डिप्रेशन येऊ लागलं. काम नसल्यामुळे घरी बसणं असह्य होऊ लागलं. माझे गावातले काही मित्र होते. तेही माझ्यासारखेच बेरोजगार होते. त्यांनी मला पैसे कमविण्याचा एक वेगळाच मार्ग सांगितला - जुगार!! मी त्यांच्या संगतीने जुगाराच्या नादी लागलो. सुरूवातीला पैसे मिळू लागले. त्यामुळे मला त्याची चटकच लागली. पण नंतर मात्र मी चांगलाच बुडू लागलो. मी इकडून तिकडून पैसे उसने घेऊन जुगारात लावू लागलो-आपले गेलेले पैसे कधीतरी परत मिळतील, या आशेने. त्या नादात मी कधी कर्जबाजारी झालो, हे मलाच कळालं नाही. जेव्हा कर्जाचा आकडा दहा लाखांवर पोहोचला, तेव्हा मी भानावर आलो. इतकी प्रचंड रक्कम घरी न सांगता मला परत करायची होती. ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, त्यांनीही ते परत देण्यासाठी तगादा लावला होता. मी खूप घाबरलो. मला आत्महत्या करावी, असं वाटू लागलं. इतक्यात माझ्यासारख्याच जुगाराला बळी पडलेल्या एका मित्राने माझ्यासमोर एक कल्पना मांडली - दरोड्याची!!

मी तर आजपर्यंत मंदिरातून साधी चप्पलदेखील चोरली नव्हती. आणि हा पठ्ठ्या दरोडा टाकण्याच्या गोष्टी करत होता. त्याचा अजून एक मित्र होता, जो चोरी-लूटमारीच्या कामात मुरलेला होता. त्याला हाताशी धरून आम्ही योजना आखण्यास सुरूवात केली. माझ्यात खरे तर हे सर्व करण्याइतकी धमक नव्हती ; पण आत्महत्येपेक्षा हा मार्ग काय वाईट आहे, असा मी विचार केला. कदाचित यात यश मिळेल आणि सगळे प्रश्न सुटतीलही, कोण जाणे!! मग आमचा प्लॅन ठरला. मी या कामासाठी फारच लेचापेचा आहे, हे त्या दोघांनी ओळखले आणि मला दरोड्याच्या ठिकाणापासून दूरच ठेवायचे ठरवले. त्याऐवजी मला त्यांनी दुकानाची कणन् कण माहिती काढण्याचे आणि दरोडा यशस्वी झाल्यानंतर माल ताब्यात घेण्याचे काम दिले. ते दोघे तेथे जाऊन ही कामगिरी पार पाडणार होते. आम्ही ठरवले, की चोरीचा माल लगेच बाहेर काढायचा नाही. तो त्यांनी एका ठिकाणी लपवून ठेवायचा आणि मी तेथून तो माझ्या ताब्यात घ्यायचा. यासाठी वाडीच्या टोकाला शेतापाशी असलेले पांढऱ्या रंगाचे आजींचे घर हे ठिकाण ठरले. तेथे आजी एकट्याच राहतात, हे मला ठाऊक होते. त्यामुळे मीच हे ठिकाण त्यांना सुचवले होते. त्यामुळे त्या दोघांनी तेथे माल ठेवला, की इकडे मी लगेचच ते कोणालाही न कळता उचलू शकणार होतो.

ठरल्याप्रमाणे गोष्टी पार पडल्या. दरोडा यशस्वी झाला आणि ते दोघे माल घेऊन निघाले. मी त्यांच्या संपर्कात होतोच. त्यांनी आजींच्या घरात माल ठेवल्याचा मला मेसेज केला. मी मध्यरात्री तेथे जाऊन ते माझ्या ताब्यात घेणार होतो. पण रात्री बाराच्या सुमारास मला त्यांच्या गाडीला अपघात झाल्याचे आणि त्यात ते दोघेही ठार झाल्याचे समजले. मला खूप मोठा धक्का बसला. मी लपवलेला माल घेण्यासाठी बाहेरदेखील पडू शकलो नाही, इतका मी घाबरलो होतो. मला प्रथम वाटले, की पोलिसांना चोरीच्या मालाचा पत्ता लागेल आणि तो ते जप्त करतील. पण पुढच्या दिवसभरात असे काहीही घडले नाही. मग मला वाटू लागले, की पोलिसांना त्या मालाचा सुगावा लागण्याआधी धाडस करून आपल्याला तो हस्तगत केला पाहिजे. त्यानुसार मी दुसऱ्या रात्री आजींच्या घरात शिरलो. ठरल्याप्रमाणे तो माल आवारातील बागेत मिळेल, अशी माझी अपेक्षा होती. पण मी खूप शोधूनही मला काही मिळाले नाही. त्यापुढील रात्री मी पुन्हा शोध घेतला. पण माझ्या हाती काही लागेना. त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने तो माल घरात तर ठेवला नव्हता ना?? मी घरात घुसायचे ठरवले. हे करण्यात निश्चितच धोका होता.पण मी ती संपत्ती मिळविण्यासाठी काहीही करायला तयार झालो होतो. त्यामुळे मी घराच्या आतमध्ये प्रवेश मिळवला आणि सलग दोन रात्री ते घरही धुंडाळून काढले. पण मला तो माल कुठेही मिळाला नाही. "

"कारण सरळ होते. चोरलेला ऐवज या घरात नव्हताच!!" अल्फा म्हणाला .

"मग कुठे होता?? " लोकांच्यातून आवाज आला.

"तो शेजारच्या उरणेंच्या घरात होता! "

ऐकून उरणे तर पार उडालेच.

"अॉँ.. माझ्या घरात.. करोडोंचा माल होता?? "

"होय. " अल्फा म्हणाला, " रणजितने त्याच्या दोन साथीदारांना वाडीच्या शेवटाला असलेल्या पांढऱ्या घरात चोरलेला माल लपवायला सांगितला खरा, पण त्यावेळी त्याच्या हे लक्षातच आले नाही, की आजींच्या घराच्या समोरील घराचा रंगदेखील पांढराच आहे!! ते दोघे त्या रात्री आले आणि गडबडीत त्यांनी आजींच्या घरात माल न लपवता उरणेंच्या घरात लपवला. त्यामुळेच तो सापडायला पाच दिवस गेले. हे जर रणजितच्या आधीच लक्षात आले असते, तर तो सगळा माल घेऊन केव्हाच पसार झाला असता. पण नशीब पहा. आजच त्याच्या ही गोष्ट लक्षात आली आणि उशीरा का होईना , मीही त्याच निष्कर्षाप्रत येऊन पोहोचलो. त्यामुळे बरोबर मासा गळाला लागला. "

रणजितच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. 'काका.. मला माफ करा' एवढेच तो म्हणू शकला. अर्जुनवाड पोलीस चौकीतून आलेले पोलीस तेथे हजर होतेच. त्यांनी रणजितला ताब्यात घेतले.

"उरणेंच्या घराच्या आवारात थोडा तपास करून पहा. मोठ्ठं घबाड लपवून ठेवलंय तिथे. " अल्फा हसून म्हणाला, "चोरीचा माल शोधण्यासाठी वणवण फिरणाऱ्या पोलीसांना ते पाहून खूपच बरं वाटेल."

आजींनी भरल्या डोळ्यांनी आमचे आभार मानले. भल्या पहाटे आम्ही आमच्या घरी जायला निघालो.

*

"मला सुरूवातीलाच खात्री झाली होती, की हा घुसखोर अर्जुवनवाडचाच राहणारा आहे. "अल्फा आमच्या रूमचे कुलूप काढत म्हणाला, " तो घुसखोरी मध्यरात्रीच का करत होता? कारण मागच्या शेतात काम करणारे मजूर त्याला ओळखत असणार आणि त्यामुळे दिवसाढवळ्या कोणाला शंका येईल असे काही तो करूच शकत नव्हता. पण या गोष्टीचा माझ्या तपासात काहीच फायदा झाला नाही. पण असो. वेळेवर माझी ट्यूबलाईट पेटली, हेही नसे थोडके!! "

पहाट झाली होती. पूर्व दिशेचे क्षितिज आपला रंग बदलू लागले होते. मी चालता चालताच पेंगत होतो, इतका मला थकवा आला होता. आम्ही आत शिरलो आणि मी अल्फाच्या डोक्यावर मागून जोरात टपली हाणली.

"आईगंऽऽ.. " तो डोके चोळत मागे वळला, " झोपेत आहेस का?? का मारतोयस?? "

"तूच मला मघाशी म्हणालास की हे प्रकरण झाल्यानंतर माझ्या डोक्यात एक टपली हाण म्हणून.. अतिशय कर्तव्यदक्ष मित्र आहे मी तुझा.. चल थँक्यू म्हण.. " मी फटाफट कपडे काढत बोललो. अल्फा मोठ्याने हसला आणि मला गुद्दा हाणायला माझ्या दिशेने धावला .

मला प्रचंड झोप आली होती आणि एक मिनिटही न दवडता मला माझ्या बेडवर झेप घ्यायची होती. अल्फा माझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच मी बेडवर आडवा झालो आणि माझे डोळे मिटलेही. त्यापुढचे मला काही आठवत नाही.