Get it on Google Play
Download on the App Store

किनारा

कोकणात वाढलो नसलो तरी कोकणाबद्दलची आपुलकी कधीच कमी नव्हती. माझ्या आई बाबांचं लव मॅरेज..! आई मुळची कोल्हापुरची आणि बाबा रत्नागिरीचे आहेत. हे कोकणात समीकरण कसं जमलं ते मलाही आज पर्यंत एक कोडं आहे. लव मॅरेज मुळे घरात आईचं वरचस्व होतं. आईच्या हट्टामुळे माझं सगळं शिक्षण कोल्हापुरात झालं. बाबा आणि माझी ईच्छा म्हणुन मी अॅग्रीकल्चर केलं आई जरा नाखुश होती पण आम्ही समजावलं. अाता बाबांच्या हट्टामुळे कोल्हापुरात आजोबांची अठरा एकर जमिन माझ्या नावावर असताना देखिल आम्ही कोकणात पाच एकर जमिन घेतली... समुद्रकिनाऱ्या पासुन सात-आठ किलोमीटर लांब.. वावळी गावात..! आम्ही शेतीसाठी ईथे जमिन घेतली तेव्हा सगळ्यांकडून एकच सल्ला आला.. कोल्हापुर सोडुन तिथे का जाताय ? पाणी धरत नाही सुपिकता तर लांबची गोष्ट त्यात दर ऊन्हाळ्यात पाणी नसतं आणि आईची सगळ्यात मोठी काळजी 

"अरे बाबांनो, दिवे गेले की बसा हातावर हात ठेऊन ६-६ तास नाही येत..!"

 बाबांचे मन थोडे चलबिचल होत होते  पण मी आई ईतकाच हट्टी होतो.कोकणाचं आकर्षण आणि शेती वरचं माझं प्रेम मला म्हणत होतं

"एक संधी देऊन बघ स्वतःला.. बाबांनी ईतक्य विश्वासाने तुझ्यासाठी तुझ्या आवडीला लक्षात ठेवुन ही जमीन घेतली आहे..." 

आम्ही बांधकाम आणि इतर गोष्टींना सुरुवात केली.. आधीच बाबांनी ताकीद दिली होती, 

"तु कितीही वेळ आणि पैसे दे कोकणातला मजुर त्याच्या आवडीने आणि सवडीने काम करणार...!!"

 त्यामुळे मी छोटी-छोटी कामं स्वतः करायला लागलो... अाधी कुंपण केलं त्यातच एक महिना गेला. सोबतीने एक टुमदार घर ही बांधायला घेतलेलं.. मस्त अगदी माझ्या आणि बाबांच्या स्वप्नातलं.. कौलारु.. ओसरी.. माजघर.. किचन.. बेडरुम.. देवघर.. आणि माळा..! घराचं काम होत होतं.. मी जवळंच एक घर भाड्याने घेतलं होतं.. माझा दिनक्रम कधी वर्षात बदलला ते कळंलंच नाही.. आमचं घर तयार झालं.. अाई आणि बाबा यांची निवृत्ती एक वर्षावर आलेली.. मी ठरवलेलं आई बाबा या घरी येई पर्यंत बरीच सुधारणा करायची.. आज तर हरितगृहाचं देखील काम झालं. आता वेळ आली होती इकडच्या लोकांना खोटं ठरवण्याची.. कोण म्हणतं पाणी टिकत नाही. मी दाखवतो कसं टिकवायचं असतं. जागा घेतल्या घेतल्या विहीर खणली होती. आता घराच्या कौलावरचं पाणी विहीरित सोडायचं,  रेन वॉटर हार्वेस्टिंग..!! काम चालु झालं आणि आता तो वास्तुशांतीचा दिवस उजाडला.

                अाई आणि बाबा दोघंही आनंदात होते. बाबा त्यांचं स्वप्न साकारलेलं बघुन आणि अवघ्या ३० व्या वर्षी मुलाला दिलेल्या पैश्यांचं अगदी चिज केलेलं बघुन अगदी सद्गदित झाले. पुजा संपन्न झाली. आता आमच्या घराची आणि जागेची सैर करायला बाबा त्यांच्या मित्रांना घेउन गेले. त्यांची लांबुन दिसणारी आकृती देखील गर्वाने सगळ्याचं वर्णन करत आहे हे कळत होत. ते पाहुन माझा ऊर भरुन आला. आई मात्र गप्प गप्प होती. 

"खुप छान केलं आहेस रे.. कसं जमतं रे चिन्मय तुला इतकं सगळं. कसं जमवलंस एकट्याने?" 

तिचे पाणावलेले डोळे मला आज बोचत आहेत. 

"आई अगं तुला माझ्यावर विश्वास होताच ना आणि तुच तर म्हणायचीस,  कि कोल्हापुरात असो किंवा कोकणात माझा चिनू आपलं घर मस्त बांधणार.. आणि तोच विश्वास मला नेहमी बळ देत राहिला". 

"उद्या किनार्‍यावर जाऊया का रे तु आणि मी फक्त माय लेक?"

मी जरा आश्चर्यचकित झालो.

 "आईला कोकण कधी पासुन आवडायला लागलं?? " 

तसं तर तिला कोकणातलाच माणुस आवडला पण तो पुण्यात. लग्नानंतर कधी फारसं येणं झालं नाही आणि आज अचानक किनार्‍यावर..? चला आईने पण अावडुन घेतलंच वाटंत..! दुसर्‍या दिवशी मी आणि आई माझ्या बाईक वरुन मांडवीत घेऊन आलो.. संध्याकाळचे सहा वाजले असतील. मस्त भरती होती आम्ही जरा समुद्राजवळ गेलो.. पाय पाण्यात बुडवले.. पायाला होणारा स्पर्श फार अल्लाददायी होता. आई म्हणाली

"बघ ना चिनू आपल्या पायाखालची वाळु किती वेगात निघुन जाते आपल्याला सावरायला हि वेळ मिळत नाही ! कसं घडतं रे हे ?"

 मी म्हणालो 

"अगं आई यात न कळण्यासारखं काय आहे? नैसर्गिक आहे, हे होतंच." " नाही ना रे होत बाळा असं !" 

हे म्हणुन तिने जो खुलासा केला तो माझ्यासाठी इतका धक्कादायी होता की खरंच सावरायच्या आधी पायाखालुन वाळु निघुन गेली असं वाटंलं..!! 

त्या दिवसानंतर आजही आई आणि मी त्या किनार्‍यावर येतो.

फरक फक्त इतकाच आहे कि मी आईला समुद्रातुन पाहतो आणि आई मला किनार्‍यावरुन…!

मीच सरकवतो अाता आईच्या पायाखालची वाळु आणि हळुच स्पर्श करतो तिच्या चरणांना, माफी मागतो तिला लवकर सोडुन गेलो म्हणुन मला अवघ्या 31 व्या वर्षी बळावलेला ४थ्या स्टेजचा कँसर सगळं अर्धवट सोडुन जायला लावेल हे मलाही वाटंलं नव्हत आणि आई बाबांनाही.

या वयातही मस्त सांभाळतात ते हे सगळं.. मी पाहत असतो त्यांना...

 हरितगृहात उमलणार्‍या झेंडुतुन..

 कधी मंद वाहणार्‍या वार्‍यातुन.. 

आणि त्या उन्मत्त लाटांतुन..!!

 मी येतो भेटायला त्यानां त्याच किनार्‍यावर आजही लाटांच्या रुपात..!

किनारा

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
किनारा