Get it on Google Play
Download on the App Store

भाग ३

रात्रीचे साडेनऊ वाजले. जसाजसा वेळ उलटत होता, तशीतशी त्या घराच्या आजुबाजुची शांतता अधिकच गहन होत चालली होती. बाहेर कडाक्याची थंडी पडली होती. मी हॉलमधल्या जुन्यापुराण्या सोफ्यावर हातापायांची घडी घालून आखडून बसलो होतो. खूप वेळ निष्क्रिय बसल्यामुळे मला जाम वैताग आला होता आणि थोडी थोडी झोपही यायला लागली होती. आजी बसल्या बसल्या जपमाळ ओढत होत्या. शेवटी मी हताशपणे उठलो आणि हॉलमध्ये येरझाऱ्या मारू लागलो. नक्की काय असावी ही भानगड? या जुनाट पोपडे उडालेल्या वास्तूमध्ये काय पुरून ठेवलेलं असावं?? आणि ते आजींच्या केसालाही धक्का न लावता हस्तगत करण्याचा प्रयत्न करणारा विचित्र घुसखोर कोण असेल?? मी थोडा विचार केला. तो आजीबाईंचा नातेवाईक असावा कदाचित.. त्याशिवाय एवढा दयाळूपणा कोणी दाखवला नसता. अल्फा आजीबाईंच्या नातेवाईकांपासूनच का सुरूवात करत नाहीये? माझ्या मनात विचार चमकून गेला. आणि मग तो जे काही शोधत होता, ते नक्की होतं कुठे? आम्ही तर सगळं घर पालथं घातलं होतं. असंही असू शकतं, की त्याला हवं ते मिळालंही असावं!! तो जे काही असेल ते उचलून घेऊन गेला असला, तर साहजिकच आमच्या हातात काही पडणार नव्हतं. तसं असेल, तर मग पुढे काय करायचं?? माझी विचारशृंखला तिथून पुढे जाईनाशी झाली. डोळ्यांवर पट्टी बांधून कोणीतरी अंधारात सोडून द्यावं, अशी आमची गत झाली होती.

दहा वाजायला आले. आता माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी थोडी थोडी भीती उत्पन्न होत होती. घुसखोराला ठाऊक असेल का, की आजींसोबत त्यांच्या घरात आज आम्ही दोघेही आहोत ते? अल्फा यायच्या आत कोणीतरी घरात घुसण्याचा प्रयत्न केला, तर माझी चांगलीच पाचावर धारण बसणार होती. भलेही नियमितपणे जिमला जाऊन माझे बाहू चांगलेच बळकट झाले होते, पण कोणाशी हातापायी करण्याचा प्रसंग माझ्यावर कधी आला नव्हता. अल्फा लवकरात लवकर यावा अशीच मी प्रार्थना केली. अखेर सव्वादहाच्या सुमारास तो परत आला. मघाशी अगदीच मलूल झालेल्या त्याच्या चेहऱ्यावर आता थोडं तेज दिसत होतं.

"काय झालं? काही.. "तो आत येताच मी उत्सुकतेने विचारले. पण त्याने मला मध्येच तोडले.

"श् श् श्.. "तो तोंडावर बोट ठेवत म्हणाला, " आपण आता आपला आवाज या खोलीच्या बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. जर घुसखोराला कळाले, की आजींसोबत घरात कोणीतरी आहे, तर आज तो इकडे फिरकणारच नाही. ते जाऊदे. मला सांगा, या घरात काही खायला आहे का? मला सणकून भूक लागलीये. "

"हो तर. तुझी वाट पाहून आम्ही जेवून घेतलं बाबा. " आजी म्हणाल्या, " आणू का तुला जेवायला? "

"धन्यवाद. " अल्फा म्हणाला. तो हात धुवून आला आणि माझ्या बाजूला सोफ्यावर त्याने बसकण मारली.

"फारच बोअर झालो बुवा. " मी म्हणालो.

"सॉरी. माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. " अल्फा हसून म्हणाला, " मी गावकऱ्यांशी गप्पा मारायला बाहेर पडलो होतो. माझ्यासोबत तू असतास, तर त्यांना संशय आला असता. शिवाय आजींसोबत कोणालातरी थांबायला हवेच होते. "

आजींनी जेवणाचे ताट अल्फाला आणून दिले.

"सावकाश जेव रे पोरा. "त्या म्हणाल्या. अल्फाच्या डोळ्यांत क्षणभर कृतज्ञतेची भावना प्रकट झाली. पुढच्याच क्षणी तो जेवणावर तुटून पडला. मला त्याच्या जेवणात व्यत्यय आणायची इच्छा नव्हती. पण मला शांतही बसवेना.

"काही नवीन कळालं?? "मी विचारले. त्याने नकारार्थी मान हलवली.

"एवढंच कळालं, की आपण याआधी चुकीच्या मार्गावरून जात होतो. " अल्फा तोंडात भाकरीचा घास कोंबत म्हणाला, " पाटील एक सरळमार्गी माणूस होता आणि दडवून ठेवावी अशी कोणतीच धनदौलत त्यांच्याकडे नव्हती. "

"तसे असेल, तर दुसरी काय शक्यता आहे? "

"हे जे काही दडवलेलं आहे, ते पाटलांनी दडवलेलंच नाहीये. " अल्फा उद्गारला.

"मग? त्यांनी नाही तर कोणी? " मी भुवया उंचावल्या.

"सध्या तरी असं समज, की पाटलांच्या पश्चात कोणीतरी तिसऱ्यानेच इथे काहीतरी दडवून ठेवलंय आणि आता त्याचा शोध घेणारा कोणीतरी चौथाच आहे. " अल्फा म्हणाला. मी काहीच न कळून त्याच्याकडे पाहत राहिलो.

"हे प्रकरण दिसतेय तसे साधे मुळीच नाहीये प्रभू. काहीतरी मोठा घोटाळा आहे याच्यामागे असं दिसतंय. " त्याने जेवण आवरले आणि हात धुवून परत हॉलमध्ये आला.

"पाटीलबाई मला सांगा, हे सगळे प्रकार कधीपासून सुरू झालेत?? " त्याने आजींना विचारले.

"अं.. आजपासून तीन दिवस आधी. म्हणजे शुक्रवारी. "

"हं, म्हणजे डिसेंबरच्या एकतीस तारखेला. " अल्फा विचारपूर्वक म्हणाला, " गुड. बरं, तुम्ही पेपर वाचता का? "

"हो. वाचते ना. "

"तुमच्याकडे गेल्या आठवड्यातले पेपर आहेत का? "

"हो, तिथे वरती ठेवले असतील पहा. " आजींनी वरच्या लॉफ्टकडे बोट दाखविले. अल्फाने वरती ठेवलेल्या वर्तमानपत्रांचा गठ्ठा खाली काढला आणि खाली अंथरलेल्या चटईवर टाकला.

"तो आजही रात्री येणार असं वाटतंय का तुम्हाला? " आजींनी बावरून विचारले.

"ठाऊक नाही पाटीलबाई. " अल्फा सुस्कारा सोडत म्हणाला, " त्याला जे हवंय ते अजुनही मिळालं नाही, असंच आपण गृहीत धरून चालतोय. तसं असेल, तर तो नक्की पुन्हा येईल. पण त्याला हवी असलेली वस्तू जर मिळाली असेल, तर आपले सगळेच मुसळ केरात गेलेत असं म्हणायला हरकत नाही. "

तिथे मिनिटभर शांतता पसरली.

"ठिकाय.. " हातांवर हात चोळत तो म्हणाला, " बी पॉझिटिव्ह.. आपला अनाहूत पाहुणा जर आलाच, तर कदाचित रात्री उशिरा येईल. तुम्ही झोपला तरी हरकत नाही. पण आवाज मुळीच करू नका. लाईट बंद करून टाकू, म्हणजे आजी झोपल्या, असे त्याला वाटेल. "

"आणि तू काय करणारेस? " मी त्या पेपर्सच्या गठ्ठ्याकडे आणि अल्फाकडे आळीपाळीने पाहत विचारले.

"मी मस्त पेपर वाचत बसणारे!! " अल्फाने घोषित केले.

माझ्या चेहऱ्यावर असलेलं छोटसं प्रश्नचिन्ह अल्फाचा हा कार्यक्रम पाहून भलंमोठं होऊन बसलं. त्याने माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले.

"आय नो, आय नो. खरंतर मी नक्की काय विचार करतोय, हे तुला सांगायला हवं." अल्फा स्मितहास्य करीत म्हणाला, " पण मीच अजून अंधारात आहे. माझ्या मनात फक्त एक पुसटशी कल्पना आलीये आणि ती कितपत योग्य असेल, याचा एक टक्काही अंदाज मला नाहीये. पण आता तेवढीच शक्यता आपल्यासमोर शिल्लक आहे आणि बाकी शक्यता जर खोट्या असतील, तर ती बरोबर असायलाच हवी. शिवाय आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. तुला सांगत बसलो तर त्यात बराच वेळ जाईल. त्यामुळे तू थोडी विश्रांती घे. मी एकेक काम करायला सुरुवात करतो. सगळं स्पष्ट झालं की तुला सविस्तर सांगेन की ही भानगड नक्की काय आहे ते. फक्त मला याची संपूर्ण शहानिशा करू दे. "

"बरं.. " मी हताशपणे उद्गरलो. अल्फाचा हा स्वभाव मला काही नवीन नव्हता. संपूर्ण माहिती असल्याशिवाय तो मला त्याच्या मनातलं तसूभरही काही सांगायचा नाही. त्यामुळे मी खांदे उडविले आणि माझा मोबाईल उघडून बसलो.

अल्फाने दिवे बंद केले आणि मोबाईलचा फ्लॅश सुरू केला. मग त्याने पेपरच्या गठ्ठ्याशेजारी येऊन बसकण मारली आणि वरील दोनतीन पेपर बाजूला ठेवून त्याखालचे पेपर काळजीपूर्वक वाचू लागला. अकरा वाजून गेले होते. मी मोबाईलवर एक मॅथेमॅटीक्सचं एक डॉक्युमेंट उघडून वाचत बसलो. थंडीमुळे माझ्या हालचाली मंदावल्या होत्या. डोळ्यांवर झापड येत होती. त्याउलट अल्फा मात्र उत्साहाने आणि बारकाईने पेपरमधल्या रकान्यांवरून नजर फिरवित होता. फ्लॅशच्या अंधुक प्रकाशात त्याच्या हालचाली मला दिसत होत्या. आजी बाजुच्या सोफ्यावर बसून पेंगत होत्या. वातावरणात इतकी शांतता होती, की अगदी पेपरची पाने पलटण्याचा आवाजही ढोल बनविण्याच्या आवाजाइतका मोठा वाटत होता. मधून मधून वाऱ्याच्या झुळुकेचा आणि त्याबरोबर मागच्या शेतात सळसळणाऱ्या उसाच्या पात्यांचा आवाज येत होता. मला आजीबाईंचे अप्रूप वाटले. अशा ठिकाणी त्या एकट्या कशा काय राहत असतील?

पंधरा मिनिटे झाली आणि एकदम आम्हाला कोणीतरी टाळी वाजविल्याचा आवाज ऐकू आला. मी दचकून आजुबाजुला पाहिले.

"येस..!! देअर यू गो अल्फा!! " तो अल्फाच होता. आम्ही त्याच्याकडे बघत असलेले पाहून त्याने जीभ चावली.

"सॉरी.. नकळत जरा जास्तच जोरात बोललो मी.. " तो म्हणाला.

"काय झालं? आला का तो?? " आजी एकदम घाबऱ्याघुबऱ्या होत म्हणाल्या.

"नाही नाही, पाटीलबाई. " अल्फा आपला मोबाईल हलवत म्हणाला, " मीच आहे. काळजी करू नका. मला आता अगदी प्रकर्षाने वाटायला लागलंय, की माझी शंका अगदी बरोबर आहे. ओके.. आता मला झपाझप हातपाय हलवावे लागणारेत. मी एक काम करतो. मी आता आतमध्ये जाऊन एक दोन फोन करतो. म्हणजे अचूकपणे काहीतरी ठरवता येईल. तुम्ही असेच बसून रहा. आवाज करू नका. "

त्याने पेपरचा गठ्ठा होता तसा वरती ठेवून दिला आणि तो आवाज न करता आतमध्ये गेला. त्याच्या मोबाईलचा फ्लॅश बंद झाल्यामुळे हॉलमध्ये अंधार पसरला. मी आजींकडे पाहिले. त्याही माझ्याकडे पाहत होत्या. मला खात्री होती, की माझ्या चेहऱ्यावर जे भाव होते, तेच त्यांच्या चेहऱ्यावरही असणार होते. आम्हाला आतून हलक्या कुजबुजण्याचा आवाज आला. तो आवाज साधारण तीन ते चार मिनिटे येत होता. मग तो थांबला. अल्फा आतल्या खोलीतून बाहेर आला आणि हॉलमध्ये येरझाऱ्या मारू लागला. हे आणखी दहा मिनिटं चाललं. मग त्याचा फोन व्हायब्रेट होऊ लागला. तो लगबगीने आत गेला आणि कुजबुज पुन्हा सुरू झाली. अल्फा ज्या गतीने ते सर्व करीत होता, ते पाहून मला खात्री झाली, की आज रात्री आपल्याला काहीतरी नाट्यमय पहायला मिळणार आहे. तो शक्य तितक्या लवकर या प्रकरणाचा रहस्यभेद करण्याच्या मागे होता. त्याच्या हालचालीच सांगत होत्या. फार काळ आपल्याला कोड्यात रहावे लागणार नाहीये, हा विचार मनात येताच मी सुखावलो.

पाचेक मिनिटांनी तो बाहेर आला आणि माझ्या बाजूला येऊन बसला. मला त्याच्या चेहऱ्यावरील भाव त्या अंधुक प्रकाशात दिसत नव्हते ; पण त्याच्या श्वासोच्छ्वासांच्या वेगावरून मी नक्की सांगू शकत होतो, की तो खूपच उत्तेजित झाला होता. त्याला हवा असलेला धागा त्याला गवसला होता.

"खूपच महत्त्वाची माहिती मिळालीये तुला. हो ना? " मी अधीरपणे त्याला विचारले," प्रकरण आता संपण्याच्या मार्गावर आहे, असं एकूण तुझ्या हालचालींवरून मला वाटतंय. "

" नव्वद टक्के मला हवं ते मी मिळवलंय . पण एक गोष्ट अजूनही अशी आहे, जी मला या शृंखलेत बसवता येत नाहीये. " त्याच्या आवाजात जितका उत्साह होता, तितकीच बेचैनीही होती.

"ओह नो..!! म्हणजे तू आत्ता मला काहीच खुलासा करणार नाहीयेस? " मी हळहळत विचारले.

"नाही. थोडं थांब प्रभू. मला जरासा विचार करू दे.. मी पोहोचलोच आहे जवळपास.. " अल्फा पुन्हा येरझाऱ्या घालू लागला. आजी बिचाऱ्या मघापासून आम्हा दोघांकडे आळीपाळीने टकामका बघत होत्या. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि अल्फा काय करतोय, हे पाहू लागलो.

"प्रभू, तुला नक्की खात्री आहे का, की आपल्याला इथे शोधताना एखादी लपविण्याची जागा अथवा कुठेतरी काहीतरी लपविल्याचे निशाण मिळाले नाहीत?? " त्याने मधुनच विचारले.

"निश्चितपणे नाही. " मी उत्तरलो.

"हं.. " तो चालता चालता हुंकारला. तो कुठे अडला होता, याचा मला अंदाज करता येत नव्हता. कदाचित मी त्याला काही मदत करू शकलो असतो. पण विचारुनही तो सांगणार नाही, याची मला खात्री होती.

एकदमच चालता चालता तो थबकला. मग अलगदपणे पावले टाकत तो दरवाजाच्या बाजुच्या खिडकीपाशी आला. खिडकीचे पडदे लावले होते.

"मला ठाऊक आहे, की खिडकीचा पडदा या क्षणी सरकवायला नाही पाहिजे. बाहेर आपल्या हालचाली दिसण्याची शक्यता आहे. पण मला एका सेकंदासाठी फक्त खात्री करून घ्यायची आहे. " तो पुटपुटला आणि सावकाशपणे त्याने खिडकीचा पडदा बाजूला सारून बाहेर काहीतरी पाहिले. पुढच्याच क्षणी त्याने तो पडदा झटकन लावला आणि पुन्हा माझ्या शेजारी येऊन बसला. त्याच्या अंगातून उत्साहाच्या लहरी बाहेर पडत असल्याचं मला जाणवलं.

"प्रभू, हे प्रकरण निकालात निघाल्यानंतर तू एक काम कर. माझ्या डोक्यात एक जोरात टपली हाण!! " अल्फा म्हणाला.

"का? काय झालं? " मी स्तिमित होऊन विचारले.

"माझा मठ्ठ मेंदू!! साध्या साध्या गोष्टी नजरेआड केल्यामुळे इतका वेळ हे प्रकरण ताणलं गेलं. मी हा विचार पहिलाच केला असता, तर आपण हा विषय संपवून रात्रीच्या जेवणासाठी सांगलीत परतलो असतो. पण असो. देर आये, दुरुस्त आये!! आता या नाट्याचा शेवटचा अंक सुरू होणार आहे. आत्ता मला सर्व सांगण्याचा आग्रह करू नकोस. फक्त मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक आणि माझ्या सूचना पाळ. आपल्याला आता बाहेर पडावे लागणार आहे. "

"आत्ता? या वेळी?? " मला ते ऐकून धक्काच बसला.

"श् श् श्.. " त्याने मला चूप केले, " होय. आपल्याला आपल्या पाहुण्याचे स्वागत बाहेर जाऊन करावे लागणार आहे. "

"तो खरंच येणार आहे का? तुला खात्री आहे का?? "

"होय!! " अल्फा ठासून म्हणाला,  "आणि आता प्रश्न विचारू नकोस. कदाचित तो सहजरीत्या आपल्याला सापडेल. कदाचित हाणामारीही होण्याची शक्यता आहे. मला तुझी मदत लागेल. फक्त गडबडून जाऊ नकोस आणि घाबरू नकोस. माझ्या अंदाजाप्रमाणे तो आपल्याला इजा पोहोचवणार नाही; पण पळून जाण्याचा प्रयत्न मात्र निश्चित करेल. त्याला फक्त अडवून ठेवायचं आहे. समजलं? "

अल्फा ते सांगत असतानाच माझ्या छातीच्या ठोक्यांचा वेग हळूहळू वाढत असल्याचे मला जाणवले. अल्फाने खिडकीतून असे काय पाहिले , ज्यामुळे त्याने बाहेर पडण्याची तयारी सुरू केली, ते मला कळेना. हे सगळं मला एखाद्या अॅडव्हेंचर स्टोरीसारखं वाटू लागलं होतं. मी होकार म्हणून फक्त मान हलवली. आमचं बोलणं ऐकून आजीबाई मात्र एकदम बावचळून गेल्या होत्या.

"क्.. कुठे निघाला आहात??" त्यांनी विचारले.

"पाटीलबाई आम्ही थोड्या वेळात तुम्ही निश्चिंत रहा. आम्ही सहीसलामत परत येऊ. तुम्ही आतून दरवाजा लावून घ्या. आम्ही थोड्या वेळात येतो. "

"अं.. बरं बरं.. सांभाळून रे बाबांनो..!! " त्यांच्या आवाजात भीती स्पष्ट दिसत होती.

अल्फाने हळूवार दरवाजा उघडला आणि बाहेरचा अंदाज घेतला. दरवाजा उघडताक्षणीच थंडीची एक लाट आतमध्ये शिरली. माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला.

"आपल्याला जराही आवाज होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे प्रभू. तू माझ्या मागे चालत रहा. कान आणि डोळे उघडे ठेव." तो माझ्याकडे वळून पुटपुटला.आम्ही दरवाजा बंद केला आणि अलगदपणे पावले टाकत बाहेर पडलो.

चोहीकडे काळाकुट्ट अंधार होता. रस्त्यांवर दिवे नसल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला होता. आजुबाजुला असलेल्या वस्तूंच्या केवळ आकृत्या दिसत होत्या. अल्फाने मला आवाज न करता त्याच्या पाठीमागे येण्याची खूण केल्याचे मला जाणवले. आता तो मला कुठे घेऊन चालला होता, याचा मला काहीच अंदाज येत नव्हता. माझ्या सर्वांगाला कापरं भरलं होतं. पण ते थंडीमुळे होतं की समोर उभ्या ठाकलेल्या भीतीमुळे होतं, हे मात्र मला ठरविता आलं नाही.

अल्फाने हळूवारपणे गेट उघडले आणि आम्ही घराच्या आवारातून बाहेर पडलो. अल्फा काळजीपूर्वक पावले टाकत रस्त्यावर चालू लागला. क्षणातच आम्ही रस्ता ओलांडला आणि आजींच्या घरासमोर असलेल्या घराच्या गेटसमोर येऊन उभारलो. गेट आतून कुलूप लावून बंद केले होते.

"आपल्याला आत जायचंय. " अल्फा कुजबुजला. मी आजुबाजूला पाहून अंदाज घेतला. आवाराच्या भिंती उंच होत्या, पण थोडा प्रयत्न केल्यास त्यांवर चढून जाणे शक्य होते. मी त्या भिंतीकडे इशारा केला. आम्ही तिथे गेलो.

"मी आधी चढतो मग तुला हात देतो. " मी त्याला सांगितले. मी अल्फापेक्षा उंच असल्याने मला भिंतीवर चढणे सहज शक्य होते.

"ठिकाय. पण आवाज न करता. " त्याने मला बजावले. मी झपकन भिंतीवर चढलो आणि आतमध्ये पाहिले. त्या घरातील सर्व दिवे बंद होते आणि आतून कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती. मी अल्फाला हात दिला आणि आम्ही दोघेही अलगदपणे आत उतरलो.

"लपण्यासाठी एखादी जागा दिसतेय का बघ." अल्फा म्हणाला. मी काळोखात बुडालेल्या आवारावरुन नजर फिरवली. गेटला लागूनच शोभेच्या झाडांची एक ओळ होती. तिच्या मागे थांबल्यास बाहेरून येणाऱ्याला आम्ही दिसणे शक्य नव्हते. अल्फाने तिकडे इशारा केला. पायाखाली सुकलेली पाने सर्वत्र पसरलेली असल्यामुळे आवाज न करता चालणे कठीण होते. शक्य तितक्या शांतपणे आम्ही त्या झाडांमागे जाऊन पोहोचलो आणि वाट पाहू लागलो.

"तो इथे येणार आहे? " मी अल्फाला विचारले. अल्फाने फक्त तोंडावर बोट ठेवले आणि गेटच्या दिशेने लक्ष केंद्रित केले. अतिशय बोचरी थंडी होती आणि मला कुडकुडायला होत होतं. त्या ठिकाणी अतिशय नीरव शांतता होती. आमच्या श्वासांचा आवाज त्या शांततेत फारच मोठा भासत होता. कुठूनतरी रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. इतकं विचलित करणारं वातावरण असतानाही अल्फा शांतपणे एकटक आवाराबाहेर पाहत होता.

आम्ही जवळपास दीड तास एकाच ठिकाणी उभारून वाट पाहत होतो. मी थोडंसं जरी हलण्याचा प्रयत्न केला, तरी अल्फा मला चिमटा काढून स्थिर राहण्यास बजावत होता. बराच वेळ तिथे काढल्यानंतर मला कंटाळा यायला लागला. अखेर आम्हाला तेथे हालचाल जाणवली. रात्रीचे दोन वाजले असावेत. कोणीतरी आवाराच्या भिंतीमागे येऊन उभारलं होतं. तेथे असलेल्या शांततेमुळे त्याच्या पावलांचा होणारा हलका आवाज आम्ही टिपू शकत होतो. माझ्या छातीत पुन्हा धडधडायला लागलं. अल्फा अधिक सावध झाला आणि तिकडे निरखून पाहू लागला. ती व्यक्ती मिनिटभर बाहेर उभी असावी. मग पुन्हा पावलांचा आवाज आला. आता तो भिंतीवर चढत होता. पुढच्याच क्षणी आम्हाला त्याची आतमध्ये उतरणारी आकृती दिसली. त्याने आपल्याला कोणी पाहत नाहीये ना, याची खात्री करून घेतली आणि तो सावकाशपणे आमच्याच दिशेने चालू लागला. गेटपाशी येताच तो वळला आणि घराच्या मागच्या दिशेने जाऊ लागला. तो थोडा पुढे गेला आणि मला काय होतंय, हे समजायच्या आतच अल्फाने झाडांवरून उडी मारून त्याच्यावर पाठीवर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तो गडबडून गेला. पण लगेचच सावरून अल्फाच्या तावडीतून सुटण्याची त्याची धडपड चालू झाली. अल्फाला त्याने एक गुद्दा लगावला. पण अल्फाची पकड फारच घट्ट होती. त्याला काही हालचाल करता येईना. हे सगळं पहात असताना एकदम मला जाग आली. अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. मी धाडस करून बाहेर पडलो आणि त्या व्यक्तिच्या समोर जाऊन मी एक सणसणीत ठोसा त्याच्या तोंडावर लगावला.

"ओय.. ओय.. " तो जोरात ओरडला. रक्ताची चिळकांडी त्याच्या नाकातून उडाल्याचे मला जाणवले. अखेर त्याने शरणागती पत्करली आणि आपल्या गुडघ्यांवर तो बसला. आमच्या झटपटीमुळे आणि त्या घुसखोराच्या ओरडण्यामुळे त्या घराला जाग आली आणि आमच्या चोहोकडून दिवे लागले.