Get it on Google Play
Download on the App Store

भाग ५

" क्काय?? " मी जवळपास उडालोच.

" श् श् श.. " अल्फा इकडेतिकडे पाहत म्हणाला, " ओरडू नकोस. कोणी ऐकले, तर इतका वेळ मी सर्वांच्या नकळत केलेल्या तपासाचा बट्ट्याबोळ होईल. "

" पण.. पण.. हे.. कसे काय.. "माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते.

" तुला सांगत बसलो तर प्रधान सर माझ्याआधी बाजी मारतील. आत्ता नाही!! "

" नाऽऽही!! " मी हट्टीपणे ओरडलो, " तू मला नेहमीच असे लटकवून ठेवतोस. आज मी तुला याचे स्पष्टीकरण दिल्याखेरीज जाऊच देणार नाही. "

" प्रभू, प्लीज रे. अगदी काही वेळाचेच काम शिल्लक आहे. आणखी थोडा धीर धरलास तर काही बिघडत नाही. माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे यार.. " अल्फा विनवणी करीत म्हणाला.

" हं.. प्रतिष्ठा बितिष्ठा काही नाही. आता मी तुला मुळीच सोडणार नाहीये!! " मी म्हणालो, " मला सांग, तुला कसं काय कळालं की काल रात्री इथे कोणीतरी होतं आणि हेही सांग की ते कोण होतं. "

"बरं. महाराज. सांगतो. तू काही सगळं सांगितल्याशिवाय शांत बसणार नाहीस." अल्फा अखेर कबूल झाला, " पण मी तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आत्ता अजिबात देणार नाही. ते सांगायला सुरुवात केली, तर रात्र होईल. पण तुझ्या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर मी नक्की देईन. चल माझ्यासोबत."

"आत्ता? कुठे?? "मी चक्रावून विचारले.

" तू जास्त प्रश्न विचारलेस तर मी काहीही सांगणार नाही हां! " अल्फाने मला तंबी दिली. मी चुपचाप मान डोलावली. आम्ही बंगल्याच्या समोरच्या वाटेवरून पुढे निघालो.

" तर, " अल्फाने सुरूवात केली, " आपण थेट या मुद्द्यावर येऊया, की काल रात्री खुन होण्याच्या सुमारास इथे खाली रस्त्यावर कोणीतरी उभे होते. हे मला माहीत झाले, यामागे बरीच मोठी तर्कश्रृंखला आहे. या अनुमानांवर येण्यासाठी मी चांगले पाच-सहा तास खर्ची घातले आहेत. तूर्तास तरी आपल्याला ही गोष्ट ठाऊक आहे, असे धरून चालूया. मी खाली येऊन दिव्याखालच्या जागेची थोडी तपासणी करताच मला माझ्या तपासाची दिशा अगदी योग्य असल्याची पावती मिळाली. तिथे मला एका तुटलेल्या चपलेचे ठसे मिळाले. एका तेरा-चौदा वर्षांच्या मुलाच्या चपलेचे ठसे. ओळख पाहू, ती व्यक्ती कोण असेल? "

" संजू? तो बागकाम करणारा पोरगा?? " मी काही क्षण विचार करून उत्तर दिले. त्या फार्महाऊसवर मला आत्तापर्यंत दिसलेली तेरा-चौदा वर्षांची संजू ही एकमेव व्यक्ती होती.

" अगदी बरोबर! "

" पण अल्फा.. संजूसारखा लहान पोरगा इतक्या रात्री भुतासारखा रस्त्यावर कशाला उभा राहिल? " मी डोके खाजवत विचारले.

" कारण त्याला तसे करण्यास खुद्द मिरासदारांनीच सांगितले होते. " अल्फा म्हणाला.

" काय?? " मला धक्काच बसला.

" होय. " अल्फा म्हणाला, " मला जेव्हा शंका आली, की रात्री खुनाच्या वेळी रस्त्यावर कोणीतरी असावे, तेव्हा मी या गोष्टीची अधिक खोलवर जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली.  तेव्हा मला समजले, की मिरासदारांना जेव्हा आपल्याला धोका आहे असे वाटायचे, तेव्हा ते असेच कोणालातरी पाळतीवर ठेवायचे. त्यांच्यासाठी हे काम गणपत व संजू दोघांनीही याआधी बऱ्याचदा केले होते. काल रात्रीही तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. नागेशबरोबर झालेल्या भांडणामुळे आपले काही बरेवाईट होईल, अशी भीती मिरासदारांच्या मनात उत्पन्न झाली आणि त्यांनी कालच्या रात्रीसाठी संजूला खाली रस्त्यावर उभे राहून पाळत ठेवायला सांगितली, जेणेकरून कोणीही त्यांच्यावर हल्ला केलाच, तरी त्याचा चेहरा संजूला दिसावा. अखेर माझी शंका खरी ठरली. संजू काल तिथे होता, याचा पुरावा आपल्याला मिळालाच. "

" माय गॉड!! " मी प्रतिक्रिया व्यक्त केली, " म्हणजे संजूने काल रात्री खुनीला पाहिले आहे की काय?? "

" त्याची शक्यता खुपच कमी आहे. " अल्फा उद्गारला, " खुनी खुपच हुशार आहे, प्रभू. त्याने खुन करताना पुरेपूर काळजी घेतली आहे. मला तर वाटतंय, संजू खाली उभारलेला आहे, हे खुनीला आधीपासूनच ठाऊक होते..!!"

"देवा! अल्फा!! तू हे तर्क कसे करतोस खरंच मला समजत नाही बाबा!! कशावरून बोलतोयस तू हे?? "

" माझे उत्तर पुन्हा तेच आहे - हे मी आत्ता सांगणार नाही. थोडी वाट पहा. " अल्फा म्हणाला, " आपण आता संजूला लवकरात लवकर भेटणे महत्वाचे आहे. त्याच्याकडून माहिती काढून घेणे हे एक दिव्यच आहे खरे. पण आपण प्रयत्न करू. त्याच्या घरीच आपण निघालोय. हे पहा, आलेच त्याचे घर. "

आम्ही एका छोट्याशा झोपडीवजा घरापाशी येऊन पोहोचलो. हेच संजूचे घर होते. अल्फाने बाहेरूनच संजूला हाक दिली. तो बाहेर आला. आम्हाला पाहून तो थोडासा गोंधळल्यासारखा दिसला.

" हॅलो!! कसा आहेस संजू? " अल्फाने विचारले. त्याने थोड्या संभ्रमाने नुसती मान डोलावली.

" चल आमच्यासोबत. थोडंसं फिरून येऊया. " अल्फा म्हणाला. ते ऐकून संजू आणखीच बुचकळ्यात पडला. दोन अनोळखी लोकांनी अचानकच येऊन फिरायला चल म्हटलं, तर कोणीही गोंधळात पडेल. थोडं मागेपुढे करत तो तयार झाला आणि आमच्याबरोबर यायला निघाला. आम्ही तिघेही तसेच रस्त्यावरून पुढे चालत गेलो.

" काल जे झालं ते फारच वाईट झालं. " अल्फा म्हणाला, " मिरासदारसाहेब तुम्हा सगळ्यांनाच फार जवळ होते. त्यांच्यासोबत असं काही होईल, असं वाटलं नव्हतं. अतिशय निर्घृणपणे खुन झाला आहे त्यांचा. "

संजूने नुसती मान डोलावली.

" मला तुझ्या मालकांच्या खुनाबद्दलच बोलायचं आहे तुझ्याशी. अगदी खाजगी. मी जे काही सांगतो, ते अगदी शांतपणे ऐक आणि घाबरू नकोस. मी काही तुला खाणार नाहीये. "

हे ऐकून तो आणखीनच बावरला. त्याने पुन्हा एकदा मान डोलावली.

" मिरासदार साहेबांच्या खुनाबद्दल काही धक्कादायक गोष्टी माझ्या हाती लागल्या आहेत, ज्या कोणालाच ठाऊक नाहीयेत. " अल्फा म्हणाला, " त्यांचा खुन नागेशने केलेला नाहीये. "

ते ऐकून संजूचे डोळे विस्फारले गेले.

" होय. " अल्फा म्हणाला, " हे आपण तिघे आणि प्रधान सर सोडून कोणालाच ठाऊक नाहीये. मिरासदार साहेबांच्या खऱ्या खुनीला आपल्याला पकडायला हवे आहे. आणि ते करण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. मी आता तुला काही प्रश्न विचारणार आहे. तू फक्त 'हो' किंवा 'नाही' एवढेच बोल. आणि जे खरे असेल तेच बोल. तू मला जितका जास्त प्रतिसाद देशील, तितक्या लवकर आपण खुनीपर्यंत पोहोचू शकू. ठिकाय? "

संजूने भीत भीतच होकारार्थी मान डोलावली.

" तर मला सांग, काल रात्री दोन वाजता तू बंगल्याच्या समोरच्या रस्त्यावर उभा होतास, बरोबर? "

संजूचा चेहरा भीतीने भरून गेला. त्याने काहीच उत्तर दिले नाही.

" हे बघ. जर तू काहीच बोलला नाहीस, तर आपण खुनीपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. मिरासदारांनी तुझी एवढी मदत केलीये. तू त्यांच्यासाठी एवढं तर करू शकतोसच ना!! " अल्फा त्याची समजूत घालत म्हणाला, "मला आता पटकन सांग पाहू, काल रात्री तू तिथे होतास की नव्हतास?"

त्याने होकारार्थी मान डोलावली.

"शाबास. "अल्फा खुष होऊन म्हणाला, " तुला मिरासदारांनीच तसे करायला सांगितले होते, बरोबर? "

पुन्हा 'हो'.

" त्यांनी सांगितल्यानुसार तू त्यांच्या खोलीच्या बरोबर समोर दिव्याखाली उभा राहिलास. तू तिथे बराच वेळ उभा होतास. अखेर रात्री दोनच्या सुमारास मिरासदारांच्या खोलीचे दार उघडले गेले. "

संजूने 'हो' करत अल्फाशी सहमती दर्शविली.

" तुला दरवाजाच्या बाहेर कोण होते, हे खालून दिसले का? "

संजूची प्रतिक्रिया - 'नाही '

" मला वाटलंच होतं. "अल्फा स्वतःशीच बोलला, " बरं, मग पुढे दार उघडल्यानंतर मिरासदार खाली वाकले आणि दिसेनासे झाले. "

संजू - 'हो'.

"त्यानंतर तू तिथे फार वेळ थांबला नाहीस, हे मी खात्रीशीरपणे सांगू शकतो. "अल्फा म्हणाला, "थोड्या वेळाने मिरासदारांनीच तुला तेथून जाण्यास सांगितले, हो ना?? "

संजूने पुन्हा होकारार्थी मान डोलावली.

" हे अगदी तसेच आहे, जशी मी कल्पना केली होती!! " अल्फा म्हणाला. तो खुपच रोमांचित झालेला दिसत होता, " आता मला सांग संजू, की मिरासदारांनी तुला तेथून जाण्यास नक्की कसे सांगितले? म्हणजे, एखादा इशारा अथवा आणखी काही?? "

संजूने हातानेच खिडकी दाखविली आणि 'जा' असे हातवारे केले.

" त्यांनी खिडकीत उभे राहून 'जा' अशी खूण केली? "

तो मानेने 'हो' म्हणाला.

" तू त्यांना पाहिलेस? म्हणजे, मला असे म्हणायचेय, की तुला जाण्यास सांगणारे मिरासदारच होते अशी तुझी खात्री आहे का? " अल्फाचा उत्साह दर प्रश्नागणिक वाढत चालला होता. त्या प्रश्नाला उत्तर म्हणून संजूने काही हातवारे केले, ज्याचा अर्थ आम्ही असा लावला -

'साहेबांना मी खिडकीत पाहिले नाही. पण त्यांचा हात पाहिला. त्यांनी नुसता हात बाहेर काढून मला जाण्यास सांगितले. त्यामुळे मी निघून आलो. '

"तुझी खात्री आहे, की तो हात मिरासदार साहेबांचाच होता? " अल्फाने पुन्हा प्रश्न केला.

संजूने गोंधळून मान डोलावली.

" असं तुला का वाटतं? तो हात साहेबांचाच आहे, हे तू कशावरून सांगू शकतोस?? "

संजूने शर्टाकडे बोट दाखविले आणि मनगटावरचे घड्याळदेखील दाखविले.

" त्या हातावरचा शर्ट आणि घड्याळ मिरासदारांचेच होते? नक्की?? "

संजूने पुन्हा एकदा जोराने मान डोलावली. ते ऐकताच अल्फाच्या चेहऱ्यावर विजयी भाव उमटले. क्षणात त्याचा नूर पालटून गेला.

" खुपच छान!! उत्तम!! " तो आनंदाने म्हणाला, " अखेर मासा गळाला लागलाच. संजू.. तुला ठाऊक नाहीये तू किती मोठं काम केलयंस ते!! माझे आधीपासून खुनी कोण असावा, याबाबत काही अनुमान होतेच. तुझ्यामुळे आता मी पुराव्यासह ते सिद्ध करू शकतो. खुप खुप धन्यवाद. "

अल्फाने संजूच्या पाठीवर थाप मारली. मी आणि संजू दोघेही काहीच न कळून अल्फाकडे पाहत होतो. त्याने आपल्या पाकिटातून काही पैसे काढले आणि ते संजूच्या हातांवर ठेवले.

" हे घे. यातून नवे चप्पल घे. " अल्फा म्हणाला, " शाळेला जातोस ना? "

संजूने मघासारखीच 'हो' अशी मान डोलावली. ते पैसे घेताना त्याला भरून आले होते.

" गुड. " अल्फा म्हणाला, " आपल्याला आयुष्यभर इथे रहायचे नाहीये, हे लक्षात ठेव. शिकून मोठा हो. तुला जाण्याआधी मी माझा फोन नंबर देईन. काही लागले, तर मला फोन करायचा. समजलं? जा आता."

मी त्या प्रसंगी जास्त भावूक झालोय की जास्त उत्साही झालोय, हे मलाच ठरवता येईना. संजूने गहिवरून जाऊन हात जोडले. अल्फाने हसून त्याची पाठ थोपटली. तो निघून गेला. अल्फाने माझ्याकडे पाहिले.

" अखेर तुला कळाले, खुनी कोण आहे ते!!"मी म्हणालो,  "कोण आहे तो?"

"थांब जरा. एक महत्त्वाचे काम करतो आधी. "अल्फाने त्याचा मोबाईल काढला, " मी तुझ्या मोबाईलवर मेसेज टाकून घेतो. मी केस सोडविली, त्या वेळेचा पुरावा. प्रधान सरांचा अजून मेसेज आलेला दिसत नाहीये. त्यामुळे या वेळी मी पैज जिंकणार, हे नक्की."

त्याने मेसेज केला. मी हळूच माझा मेसेज बॉक्स उघडला आणि माझ्या भुवया उंचावल्या गेल्या. खुनीचे नाव समोर होते.

"अनबिलीव्हेबल!! हे कसे शक्य आहे?? " मला तर धक्काच बसला.

" शक्य तर आहेच, आणि सत्यही आहे. " अल्फा म्हणाला, " आता तू एक काम कर. बंगल्यावर जा आणि गणपतला खुन झाल्याच्या रात्री जे बंगल्यावर होते, त्यांना इथे बोलावून घ्यायला सांग. का विचारले, तर म्हणावं प्रधान सरांना मिरासदारांच्या खुनाबद्दल सर्वांशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. मी प्रधान सरांना शोधून घेऊन येतो. "

मी नुसती मान डोलावली. माझा मेंदू आता एकामागोमाग एक धक्के खाऊन सुंद पडला होता. अल्फा निघून गेला. मी बंगल्यात आलो आणि गणपतला शोधून परिस्थितीची कल्पना दिली. फोनाफोनी झाली आणि हळूहळू सर्वजण बंगल्यावर जमा होऊ लागले. अंधार पडू लागला आणि सर्वत्र दिवे लागले. मी सर्वांना हॉलमध्ये बसून वाट पाहण्यास सांगितले. थोड्याच वेळात अल्फा आणि प्रधान सर आले.

हॉलमध्ये सर्वजण आधीच येऊन बसले होते. महेश, विवेक, सचिन ही मिरासदारांची मुले, घरगडी गणपत, त्याच्या हाताखाली काम करणारा पोरगा संजू आणि आणि काल रात्री फार्महाऊसवर उपस्थित असलेले काही मोजके लोक तेथे उपस्थित होते. अल्फा आणि प्रधान सर येण्याआधी तेथे हलकी कुजबुज सुरू होती. प्रत्येक चेहरा गोंधळलेला आणि थोडासा भेदरलेला होता. ते दोघे येताच सर्वजण शांत झाले. आम्ही समोरील रिकाम्या सोफ्यावर जाऊन बसलो.

"आम्हाला इथे इतक्या तातडीने का बोलावले, श्री प्रधान? तुम्ही आम्हाला काय सांगणार आहात? " महेशने विचारले.

" आम्हाला माधव मिरासदारांच्या खुनाबद्दल बोलायचे आहे. " प्रधान म्हणाले, " किंबहुना, ज्याने खुन केला, त्याच्याबद्दल. "

" पण नागेशला तर पोलीस घेऊन गेले आहेत. " विवेक म्हणाला, " तुम्हीच त्याला गुन्हेगार घोषित केले, होय ना? सगळे तर स्पष्ट झालेय. आणखी काही बाकी आहे का? "

" होय. आणखी बरेच काही बाकी आहे. " प्रधान सर डोळे बारीक करीत म्हणाले. त्यांनी अल्फाला खूण केली. अल्फाने एक मोठा श्वास घेतला आणि बोलण्यास सुरूवात केली...