Get it on Google Play
Download on the App Store

DONE

दुपारची वेळ होती. टळटळीत उन्हात डोंबिवलीची गर्दी थोडी पांगली होती. गोग्रासवाडीच्या निलीगिरी अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर, तिनशे तीन नंबर देशपांडे याचं घर होतं. त्यांच्या फ्लॅटच्या दरवाज्याचं लॅच चावीने उघडून एक इसम घरात शिरला. हॉलमध्ये साठीला आलेली एक बाई शुभ्र पांढरी कॉटनची साडी नेसून झोपली होती. 

त्या इसमाने घरात इकडे तिकडे पहिले. बेडरूमचा दरवाजा बंद होता. हि बाई गाढ झोपेत घोरत पडली होती. तो हळुवार तिच्याजवळ गेला. त्याने त्या बाईचे तोंड दाबले. आपल्या काळ्या पिशवीतून मटन खाकटायचा सुर बाहेर काढला आणि तिच्या गळ्यावरून फिरवला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. 

एखादी कोंबडी हलाल केल्यावर जशी तडफडते, तशी ती तडफडत होती. पंधरा मिनिटं ती बाई आपल्याच रक्तात हात पाय मारत तडफडत होती. तिची हालचाल हळूहळू मंदावली. हालचाल पूर्ण बंद झाली आहे ह्याची खात्री झाली. त्या इसमाने आपला हात तिच्या तोंडावरून काढला. त्याने तो सुरा आपल्या काळ्या मफलरला स्वच्छ पुसला.

समोरच्या डायनिंग टेबलवर पाण्याचा जग भरून ठेवला होता. उन्हातून आल्यामुळे त्या इसमाला तहान लागली होती. तो जरा डायनिंग टेबलवर विसावला. त्याने जग हातातल्या रुमालाने पुसला आणि तोंडाला लावला. तो घाटाघट अधाश्यासारखे पाणी पिऊ लागला. पाणी पिऊन झाल्यावर त्याने रुमालाने जगाच्या कडा पुसल्या. त्याचं भिंतीवरच्या घड्याळाकडे लक्ष गेलं. दुपारचे तीन वाजले होते. 

तो लगबगीने उठला. त्याने समोरच्या भिंतीवर त्या बाईच्याच रक्ताने “DONE” असा शब्द लिहिला. त्याने दरवाजा हळूच उघडला. मजल्यावर कुणी नाही असे पाहून त्याने घरातून काढता पाय घेतला. त्याने घराला परत त्याच चावीने लॅच लाउन बंद केले. घर लॉक झाल्याची खात्री करून घेतली. तो झपाझप पाऊले टाकत खाली उतरला. तो पार्किंगला लावलेली सिल्वर गाडी  MH05DD9506 घेऊन निघाला. 

लोढा हेव्ह्नजवळ पोहोचला. त्याने आपल्या काळ्या पिशवीत सुरा, काळा मफलर, काळी टोपी, गॉगल टाकले. त्या पिशवीत आजूबाजूची माती आणि दगड भरले. अंगातला सगळा जोर एकवटून त्याने ती पिशवी शेजारच्या नदीत भिरकावली. त्याने गाडीला सेल्फ दिली. आता गाडी शिळफाट्याच्या दिशेने सुसाट पळवली. त्या शिळफाट्याच्या गर्दीत तो कुठे हरवला ते कळलंच नाही.