Get it on Google Play
Download on the App Store

असुरांचे बेट (काल्पनिक रोमांचक कथा)

आज लवकर निघायचं  ठरवून वीर आला होता. पण नेमकेच आजच परदेशातून काही मंडळी आली होती. वीर आर्किओलॉजिस्ट होता. दिल्लीमध्ये आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत होता. आज त्याच्या डिपार्टमेंटमधल्या त्याच्या समवयस्क मित्र-मैत्रिणींनी पार्टी करायचं ठरवलं होतं. अचानक मीटिंग जाहीर झाल्यामुळे सर्वांच्याच आनंदावर पाणी फिरलं होतं. त्यांना सगळ्यांना कॉन्फरन्स हॉल मध्ये बोलावलं होतं. वीर, समीर, राकेश , श्रेयस , नीना आणि रितू वैतागून एकमेकांकडे बघत होते. मग ते परदेशी पाहुणे आले. खरंतर ते भारतीयच होते पण अनेक वर्षे परदेशात राहिले होते. त्यांचे नाव होते प्रोफेसर गुप्ता.   प्रोफेसर गुप्ता बोलू लागले," आज मी अचानक आलो त्यामुळे तुमच्या अनेक प्रोग्रॅम्सवर पाणी फिरले असेल याची मला कल्पना आहे. " वीर आणि त्याचे मित्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहून हसायला लागले. "आता मी इथे येण्याचं कारण सांगतो. तुमचे बॉस राजे सर माझे मित्र आहेत. माझी भेट आधीपासूनच ठरली होती. गेली २० वर्ष मी एक जागेच्या शोधात आहे. ती अस्तित्वात आहे कि नाही याबद्दल पक्की खात्री नव्हती अगदी मी इकडे येईपर्यंत. पण आता असं काही झालं आहे ज्यामुळे ती जागा अस्तित्वात आहे याची खात्री मला पटली आहे." सर्वांच्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे बघून ते हसले आणि म्हणाले," मला माहित आहे कि मी खूप कोड्याच्या भाषेत बोलत आहे. आता नीट सांगतो. भारतच्या उत्तरेकडे असलेल्या एका बेटाविषयी हि माहिती आहे." "पण गुप्ता ! भारताच्या उत्तरेला हिमालय आहे. मग बेट? कसं शक्य आहे?" राजेंनी विचारले.  गुप्ता हसत म्हणाले," लाखो वर्षांपूर्वी हिमालयाच्या जागी समुद्र होता. जमिनीतील बदलांमुळे हिमालयाची निर्मिती झाली. हिमालयावर काही ठिकाणी समुद्र असल्याच्या खुणाही सापडतात. तर मी खूप वेळा हिमालयाचा ट्रेक केला आहे. हिमालय हे अतिशय गूढ अशी जागा आहे. त्यात अनेक ठिकाणे अशी आहेत कि जी सामान्य माणसांसाठी नाहीत, उदाहरण घ्यायचेच झाले तर शँग्रीला किंवा शंबाला हे ठिकाण हिमालयात आहे. तिथे अनेक सिद्ध पुरुष हजारो वर्षांपासून तप करत आहेत. असं उल्लेख आपल्या पुराणांमध्ये आढळतो. तसेच अनेक लोक तिथे जाऊन आल्याचे दावेही करतात. परंतु प्रत्यक्षात ती जागा उपग्रहसुद्धा दाखवू शकत नाहीत. काही जणांच्या मते ती दुसऱ्या मितीमध्ये आहे, तर काहींच्या मते फक्त पुण्यवान लोकच त्या जागेचे दर्शन घेऊ शकतात.  तर आपण आता मुख्य विषयाला हात घालूया ज्यासाठी मी इकडे आलो. गेल्या वर्षी जेंव्हा मी भारतात आलो होतो तेंव्हा दिल्लीच्या हॉटेल रॉयल मध्ये राहिलो होतो. हे हॉटेल जरा आडबाजूला आहे. म्हणून मला आवडते. जागा शांत आहे. शहरात असल्यासारखे वाटत नाही. असाच  मी रात्रीचा रस्त्यावर फेरी मारत असताना, मला कोणीतरी येऊन धडकले. मी पहिले तर तो एक साधू होता. जटाधारी. त्याच्या जटा थेट पायापर्यंत होत्या. तो अतिशय जखमी अवस्थेत होता. त्यानी मला त्याला लपवायची विनंती केली. मी त्याला जवळच्याच बंद दुकानाच्या मागे घेऊन गेलो इतक्यात काही लोक त्याचा पाठलाग करत आलेले दिसले. त्याला शोधत ते पुढे निघून गेले. ते गेल्यावर मी त्या साधूला डॉक्टरला बोलावतो असे सांगितले. परंतु तो खुणेनीच नाही म्हणाला आणि त्याने माझ्या हातात एक लॉकेट दिले जे त्याने गळ्यात घातले होते. थोड्याच वेळात त्याने प्राण सोडला. त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार मी त्याला तिथेच सोडले आणि हॉटेल मध्ये गेलो. दुसऱ्या दिवशी सगळे न्यूज पेपर पहिले. कोणत्याही पेपर मध्ये साधूच्या मृत्यूची नोंद नव्हती. मी ते लॉकेट लंडनला घेऊन गेलो. ते लॉकेट म्हणजे एका गुप्त जागेचा नकाशा आहे. ते एक बेट  असून भारताच्या उत्तरेकडे आहे. इतकीच माहिती मी इतक्या महिन्यात त्यातून जाणून घेऊ शकलो. म्हणून आज मला तुमची सगळ्यांची मदत हवी आहे.  तुमची संस्था संपूर्ण जगात नावाजलेली आहे. तुमच्याकडे पुरातन भाषांचे तज्ज्ञही आहेत. मला या लॉकेट चे रहस्य उलगडायचे आहे तरी कृपया तुम्ही या कामात मला मदत करावी अशी मी विनंती करतो. या शोधात जे  सापडेल ते भारत सरकारच्या सुपूर्द करीन. " गुप्ता बोलायचे थांबले.

नीना आणि रितू पुरातन भाषांच्या तज्ज्ञ होत्या. गुप्तांची गोष्ट ऐकून सगळे पार्टी विसरून गेले होते. नीना आणि रितुने ते लॉकेट मागून घेतले. तांब्यासारख्या धातूच्या साखळीत ते ओवलेले होते. रितुने ते लॉकेट प्रोजेक्टर समोर ठेवले. आता त्यावरच्या खुणा सगळ्यांना दिसत होत्या. त्यावर एक नकाशा होता आणि कोणत्यातरी अगम्य भाषेत काही सूचना होत्या. रितू बोलली," हि देववाणी आहे. संस्कृतच्या तोडीची भाषा पण ती फक्त काही जमातीतच बोलली जात असल्यामुळे ती लुप्त झाली. हा नकाशा एका जागेचा आहे जिथे अमरपुष्प फुलते. अमरपुष्प हे असुरांनी निर्माण केले आहे. हे पुष्प कधीच कोमेजत नाही. त्याचा रस प्रश्न केला असता चिरतारुण्य आणि अमरत्व प्राप्त होते. हे मी एका पुरातन ग्रंथात वाचले होते. ती जागा या भूतलावर नाही असाही त्यात उल्लेख होता. त्याचे रक्षण असुर करतात. त्या जागी कोणीही जाऊ शकत नाही. असेही मला त्यात लिहिले होते. हे मला देववाणी शिकवणाऱ्या शिक्षकांनी सांगितले होते. पण मी त्यावर विश्वास ठेवला नव्हता. आता प्रत्यक्ष पुरावाच समोर आहे. ते अमरपुष्प जिथे आहे तिथे जमिनीखाली पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा खजिना लपलेला आहे. सरांना भेटलेला साधू त्या रक्षण करणाऱ्या असुरांपैकी असावा. तो इकडे कोणाच्यातरी शोधात आला असताना मारला गेला आणि नशिबाने तो नकाशा सरांना मिळाला. या  लॉकेटवर हिमालयातून त्या जागी कसे जायचे ते सांगितले आहे. पण जसजसे आपण जाऊ तसा तो नकाशा प्रकट होत जाईल. सध्या हिमालयाच्या कोणत्या भागात जायचं इतकंच यात सांगितलं आहे. ते ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे. आपण त्याला मानससरोवर म्हणून ओळखतो.

मग झालं तर त्या पुष्पाच्या शोधात ते निघाले. आवश्यक ती तयारी करून त्यांची २० जणांची टीम हिमालयाकडे रवाना झाली. मानससरोवर जवळ गेल्यावर रितुने ते लॉकेट काढले तेंव्हा त्यांना त्यावर पुढे जाण्याचा मार्ग आपोआप दिसू लागला. वीर थंडीने हैराण झाला होता. तो श्रेयसला म्हणाला," हा काय चमत्कार आहे कोणास ठाऊक! रितूला बहुतेक वेड लागलंय अशी जागा खरंच कुठे असणं शक्य आहे का ?" समोर एक मोठा डोंगर वाट आडून उभा होता. मग रितुने आरसा काढून  पूर्वेच्या दिशेने धरला. त्याचा कवडसा एका ठिकाणी पडला.श्रेयस म्हणाला," वीर बघ तिकडे." इतक्यात त्या डोंगरात कवडसा पडल्या जागेवर एक गुहा दिसू लागली. सगळे आश्चर्यचकित होऊन तिकडे जाऊ लागले.  राजे सर त्यांच्याबरोबर आले नव्हते. त्यांची कमी या सगळ्यांना फार जाणवत होती. समीर आणि राकेश यांची प्रत्यक्षात सहभाग घ्यायची हि पहिलीच वेळ होती. ते अजूनपर्यंत फक्त ऑफिसमधील काम सांभाळत आले होते. या वेळेस राजे सरांनी त्यांना आग्रहाने पाठवले होते. कारण ते दोघे हुशार आणि प्रसंगावधानी  होते. अचानक काही निर्णय घ्यायची वेळ आलीच तर ते उपयोगी पडणार होते. ते सावधपणे सगळीकडे बघत होते.गुहा इतकी मोठी होती कि ते चालून दमले. मग अचानक समोरचा रस्ता संपला. समोर काहीच नव्हते. लॉकेट तर तिथूनच  पुढे जायला सांगत होते.  गुहेत खूप काळोख होता. मग रितुने त्या गुहेच्या भिंतीवर प्रकाश पडायला सांगितला राकेशने हातातला फ्लॅश भिंतीवर मारला. तर त्यावर अगम्य भाषेत काही लिहिले होते. रितू म्हणाली," यावर असे लिहिले आहे कि इथून पुढे आपण दुसऱ्या मितीत प्रवेश करणार आहोत. ती जागा अतिशय गूढ अशी आहे. तिकडे अमरपुष्प फुलते आणि या जागी असुरांचा खजिना आहे. परंतु जर कोणी ते मिळवण्याच्या इर्षेने गेला तर त्यावर पहारा करणारे क्रूर रक्षक त्याला शासन केल्याशिवाय राहणार  नाहीत. त्यामुळे सावधान !"  मग रितू सगळ्यांकडे बघून म्हणाली," या ठिकाणी सगळ्यांना जाता येणार नाही. त्यामुळे काही जणांनीच पुढे जायचे आहे. इथून पुढे सातच जण बाहेर जाऊ शकतात बाकीच्यांना इथेच थांबावे लागेल. यापेक्षा जास्त जण गेलो तर काहीतरी अपघात होण्याची शक्यता आहे. अशी चेतावणी इथे लिहिली आहे." मग गुप्तांनी हे सहाजण आणि ते स्वतः असे पुढे जाण्याचे ठरवले. बाकीच्या टीमला गुहेतच सुरक्षित जागी थांबायला सांगितले. सगळी टीम मागे निघून गेल्यावर. तिथे असलेल्या असुराच्या चित्रातील डोळ्यात रितुने लॉकेट चावीप्रमाणे घालून फिरवले आणि काय आश्यर्य! ती भिंत एका दरवाजाप्रमाणे उघडली. त्यांनी बाहेर पाय टाकताच आपण एका समुद्राच्या काठावर उभे आहोत असे त्यांना जाणवले.  सगळे अवाक होऊन पाहू लागले." हाच तो समुद्र जो हिमालयाच्या जागी होता. जो आपण लुप्त झाला असे समजतो. परंतु तो आजही अस्तित्वात आहे. दुसऱ्या मितीमध्ये." गुप्ता म्हणाले. त्या समुद्रात दूरवर एक बेट दिसत होते. "आपल्याला तिकडे जायचे आहे." राकेश म्हणाला. इतक्यात त्यांना समुद्रातून एक नाव त्यांच्या  दिशेने येताना दिसली. त्या नावेत एक सुंदर मुलगी बसली होती. नाव जवळ आल्यावर ती म्हणाली," थांबा! आज मी तुम्हाला या बेटाची कथा सांगणार आहे. जेंव्हा देव आणि असुर यांच्यात संद्रमंथन झाले तेंव्हा देवांनी कपटाने अमृत स्वतः घेतले. एक असुर देवाचे रूप घेऊन बसला होता. त्याला अमृताचे काही थेंब मिळाले. देवांच्या हे लक्षात येईपर्यंत तो तिथून पळाला. पळताना त्याने कल्पवृक्षाची एक फांदीही चोरली.  देवांनी जंगजंग पछाडूनही तो त्यांना मिळाला नाही. तो देवांचा शिल्पी मयासुराकडे गेला. त्याने एकदा मयासुराचा जीव वाचवला होता. त्याबदल्यात त्याने मयासूरला देवांनाही सापडणार नाही अशा स्थळी लपण्यास जागा मागितली. मयासुराने त्याच्यासाठी या स्थळाचे निर्माण केले. त्या असुराने या द्वीपावर ती कल्पतरूंची फांदी लावली व त्याला अमृत घातले. त्यामुळे अमरपुष्पाचा हा वृक्ष निर्माण झाला.  हि दुसरी मिती आहे. येथे असुर नांदतात. हि जागा देवांनाही सापडणे अवघड आहे. तुम्हाला सापडली कारण तुमच्यातला एक जण असुर आहे. तरीही त्या द्वीपावर जण्यापूर्वी एक सावधगिरीचा इशारा देण्यासाठी मी इथे आहे. अमरपुष्प मिळवण्याचा विचारही करू नका, हात लावायला गेलात तर तात्काळ पाषाण होऊन पडाल.  असुरांच्या खजिन्याचा मोह ठेऊ नका. नाहीतर याच जागी कायमचे अडकून पडाल. आता आपण एक अक्षरही न बोलता या नावेत चढा. जाताना द्वीपावर पाय ठेवेपर्यंत एक अक्षरही बोलू नका. जा. " असे बोलून ती गुप्त झाली.

मग कोणताही आवाज न करता ते नावेत चढले. नाव आपोआप त्या बेटाकडे जाऊ लागली. त्या सर्वांच्याच मनात एकाच विचार होता कि आपल्यात कोण असुर आहे ? इकडे रितू तो ग्रंथ आठवण्याचा प्रयत्न करत होती.ज्यात देववाणीत या अमरपुष्पाची माहिती लिहिली होती. आपल्यात जर एक असुर असेल तर आपण सगळे इकडे कसे येऊ शकलो? हा प्रश्न तिला सतावत होता.  नक्कीच इकडे आपल्या जीवाला काहीतरी धोका आहे याची जाणीव तिला होती. प्रोफेसर गुप्तांनी तिच्याकडून ते लॉकेट मागून घेतले होते. ते त्याचं निरीक्षण करत होते. समीर आणि श्रेयस आरामात सगळीकडे बघत होते. ते द्विपच्या जवळ आले. द्वीपावर उतरले आणि तिथले दृश्य पाहून हरखून गेले. इतकाही सुंदर जागा त्यांनी कधीच पहिली नव्हती. तिथल्या वृक्षांना सोनेरी फळे, हिऱ्यांची, मोत्यांची फुले लागली होती. झऱ्यांमधून सोनेरी पाणी वाहत होते. सुगंधी वारा वाहत होता. इतकी  सुंदर जागा असूनही त्या जागी मन भीतीने भरून  येत होते. ते असुरांचे राज्य होते .ते हळूहळू चालत निघाले. त्या द्विपच्या मध्यभागी गेले.   ती जागा अवर्णनीय होती जणू स्वर्गच तिथे अवतरला होता. तिथे होता एक दिव्य तेजाने झळाळणारा वृक्ष. त्यावर फुललेले अमरपुष्प शुभ्र प्रकाशाने झळाळणारे होते. त्याचे तेज सर्वत्र पसरले होते. इतक्यात प्रोफेसर गुप्ता पुढे निघाले. ते त्या वृक्षाच्या मागे असलेल्या एका पाषाणामागे गेले. सगळेजण त्यांच्या पाठी गेले. तिथे जमिनीत जण्यासाठी पायऱ्या होत्या. जमिनीखालून प्रकाश येत होता. ते आत गेल्यावर त्यांना दिसले कि पूर्ण द्वीप व्यापेल इतकी मोठी जागा होती ती आणि संपूर्ण सोने, चांदी, हिरे, माणिक अशा अमूल्य खजिन्याने भरली होती. पण हि जागा गुप्तांना कशी माहित ? समीरच्या मनात प्रश्न आला. ते परत निघाले. गुप्ता अमरपुष्पाच्या झाडाजवळ आले. त्यांनी अमरपुष्पाला हात लावला. आता काहीतरी होणार या कल्पनेने सगळे घाबरले.   पण त्यांनी सहजपणे ते पुष्प काढून ते खाऊन टाकले ,त्यांना काहीच झाले नाही. सगळेजण अवाक होऊन बघत होते . गुप्ता हसत म्हणाले," अजूनही तुम्हाला समजले नाही का तो असुर मीच आहे. ज्याने देवांकडून तो कल्पवृक्ष चोरला. मीच ह्या जागेचा राजा आहे. स्वतःच्या फाजील आत्मविश्वासामुळे मी या जागेतून बाहेर पडायची चूक केली आणि देवतांच्या शापाला बळी पडलो. मला मृत्यूला सामोरे जावे लागले. भूतलावर  पुन्हा पुन्हा जन्म घेत राहिलो . प्रत्येक जन्मात हि जागा शोधत राहिलो आणि अचानक त्या दिवशी रक्षक असुराची आणि माझी गाठ पडली. मी त्याला मारून त्याच्याकडून या जागेचा नकाशा घेतला. परंतु मला देववाणी येत नव्हती. म्हणून तुम्हाला इथे आणावं लागलं.  आता तुम्हाला माझं रहस्य समजलं आहे. आता मी तुम्हला इथून जाऊ देऊ शकत नाही. त्यांनी एक टाळी वाजवली आणि त्या द्वीपाचे रक्षण करणारे असुर तिथे प्रकट झाले. आता आपला मृत्यू निश्चित आहे याची त्यांना जाणीव झाली. इतक्यात समीरने चपळाई करून गुप्तांच्या हातून पडलेले ते लॉकेट आपल्या गळ्यात घातले. ते अतिशय महत्वाचे आहे याची त्याला जाणीव झाली होती. तो म्हणाला," तुम्ही वेगळे आहात हि जाणीव मला तुम्हला भेटल्यावरच झाली होती. जेंव्हा रितू देववाणीबद्दल सांगत होती तेंव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा असुरी आनंद मी पहिला होता. म्हणूनच मी रितूला त्या देववाणी ग्रंथाबद्दल विचारून तिला शिकवणाऱ्या गुरुजींना जाऊन भेटलो. तेंव्हा त्यांनी मला हि संपूर्ण कथा सांगितली आणि असुर ओळखण्याची लक्षणेही सांगितली.मी रितूला तेंव्हाच हे सगळे सांगू शकलो असतो. पण तुम्ही गैरमार्गाचा वापर केला असता. याचसाठी मी इकडे आलो. देवांनी तुम्हाला दिलेल्या शापानुसार तुमच्या शरीराचा अंश जर पृथ्वीवरच्या मानवाकडे राहिला तर तुम्ही त्या माणसाला काहीच करू शकत नाही हो ना ? म्हणूनच तुम्ही झोपल्यावर मी तुमचे केस काढून घेतले आणि ते आता या क्षणी राजे सरांकडे आहेत. जर आम्ही परत गेलो नाही तर काही दिवसांनी ते तुमचा अंश जाळून टाकतील आणि त्याच क्षणी तुम्ही इकडे नष्ट व्हाल. जरी तुम्ही अमरपुष्प खाल्ले असले तरी. त्यामुळे आम्हाला इथून जाऊन द्या." गुप्तांच्या रुपातला तो असुरराज चिडला. तो या मुलांना मूर्ख समजत होता.

इकडे मुले नावेतून परत त्या दरवाजाजवळ आली. गुहेत आल्यावर त्यांनी ते लॉकेट नष्ट केले. असुरराज काहीच करू शकला नाही. आता तो कायमचा त्याच्या राज्यात बंद झाला होता. समीरचे उपकार त्याचे मित्र कधी विसरू शकणार नव्हते.

समाप्त    

सौ. संपदा राजेश देशपांडे