Get it on Google Play
Download on the App Store

दान

अगदी प्राचीन काळापासूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दान देण्याला फार महत्त्व दिले जाते.मनात कशाचीही अपेक्षा न ठेवता जे कार्य केले जाते त्याला दान म्हणतात.

' दा ' या धातुवरून ' दान ' या संस्कृत शब्दाची निर्मिती झाली.दान हे नेहमीच सत्पात्री असावे असे म्हणतात.सत्पात्री दान म्हणजे जिथे गरज आहे तिथेच दान करणे.

दान कशासाठी करावे? तर दान आपल्याला मन:शांती मिळावी म्हणून करावे.परंतु केलेल्या दानाचा केव्हाही गर्व बाळगू नये किंवा कोणाला दाखवण्यासाठीही ते करू नये. हे एक सत्कार्य आहे त्याने आपल्यालाच आनंद मिळणार आहे ही भावना मनात ठेवून दान करणे आपल्यासाठीच लाभदायक ठरेल.

आत्ताच्या काळात अनेक लोक फक्त प्रसिध्दी मिळावी म्हणून अशा गोष्टी करताना आपल्याला दिसतात.आपण केलेल्या छोट्याशा मदतीचा गाजावाजा कसा होईल यावरच त्यांचे सतत लक्ष असते.त्यामुळेच दुसऱ्याच्या चेहऱ्यावर खरंच आनंद आहे की त्यांच्या मदतीचे ओझे आहे याचा त्यांच्याशी काहीही संबंध नसतो.अशा दानाला खरंच काही महत्व नाही.

दानं बऱ्याच प्रकारची असतात.जसे की रक्तदान,अन्नदान,देहदान, इ. रक्तदानाने दुसऱ्याचा जीव वाचू शकतो.ज्यांना दोन वेळेचं देखील अन्न पुरेस मिळू शकत नाही त्यांना अन्नदान केलं तर त्यांचेही आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत.आणि ही भावना फक्त माणसांबद्दल नाही तर प्राण्यांबद्दलही आपल्या मनात असायला हवी.त्यांना देखील जीव आहे आपल्या प्रमाणेच त्यांना देखील अन्नाची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपल्या हयातीनंतरही आपण कोणालातरी जगण्यासाठी नवीन बळ देवू शकतो; आपले अवयव दान करून.नेत्रदान करून एखाद्या माणसाला जगण्याची नवीन दृष्टी आपण नक्कीच देवू शकतो.या सर्व गोष्टींबरोबरच आता अजून एक गोष्ट आपली मूलभूत गरज झाली आहे ती म्हणजे ' शिक्षण '. एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणाचा खर्च आपण करू शकत असू तर त्या मुलाचे कल्याण होईलच आणि त्याचे पुण्य अपणालही मिळेल.

अजून एक गोष्ट आहे की जी आपण खरतर सहज दुसऱ्याला देवू शकतो पण आपण त्या गोष्टीकडे कधी डोळसपणे बघितलच नाहीये ती म्हणजे ' वेळ '. आजच्या धकाधकीच्या जीवनात अगदी थोडासा वेळ आपण आपल्या प्रियजनांसोबत घालवू शकतो.त्यामुळे त्यांना होणारा आनंद आणि त्यातून आपल्याला मिळणारं सुख किती छान असतं याची आपण कल्पनाही करत नाही.आपल्याकडे अनेक अनाथाश्रम,वृद्धाश्रम असतात,कधीतरी त्या माणसांसाठी आपण आपला वेळ दिला तर आपलही कोणीतरी आहे ही भावनाच त्यांचे मन सुखावून टाकेल.' वेळ ' ही एक अशी गोष्ट आहे जी श्रीमंत-गरीब अगदी सहज दान करू शकतात.

जितकं आपण दुसऱ्याला देतो ते, किंबहुना त्याच्या दुप्पट पटीने ते आपल्याला परत मिळतं हा निसर्गाचा नियम कायम लक्षात ठेवायला हवा.आई - वडील जसे आपल्या बाळाला निरपेक्ष प्रेम देतात त्याच पद्धतीने आपणही निरपेक्ष दान करून पाहूया त्यातून मिळणारा आनंद बाकी कोणत्याही गोष्टीपेक्षा लहान नसेल हे निश्चित.

- अनुश्री केळकर