Get it on Google Play
Download on the App Store

जोडीदार

रूमवर लोळत पडलो होतो. बाकीची पोरं लॉकडाऊनला कंटाळून घरी गेलेली . उन्हाळ्याची दुपार . गरमीने नुसता जीव चाललेला . वर  पंखा नावालाच फिरत होता . वारंच लागत नव्हतं .

एकटं पडल्यासारखं वाटत होतं .

पश्याचा फोन आला . लय जुना  रूममेट . त्याचं नाव स्क्रीनवर बघून जीवाला बरं वाटलं .

आणि मग डोकं फिरलं !...  

त्याने एक निरोप दिलेला. त्याचा एक मावसभाऊ याच शहरात राहायचा. त्याची आई गेलेली . मदतीला कोणी नाही अन अशावेळी कोणी येतही नाही . म्हणून मला जायला सांगितलं होतं .

आता आली का पंचाईत !

तसा मी स्मशानभूमीत बऱ्याचदा गेलेलो आहे . पण मुळात तिथे जायलाच नको वाटतं - ते काय कॉलेज कॅन्टीन असतं  का तरुण पोरा-पोरींनी भरलेलं  ? आणि आत्ता  या परिस्थितीत तर नकोच वाटतं . त्यात कोरोनाची भीती !

नाईलाजाने उठलो . मनात म्हणालो - पश्याचा  भाऊ म्हणजे आपली आवडती मैत्रीण आहे असं समजू .

खरं तर मी पश्याच्या भावाला कधी भेटलो नव्हतो की त्याचा नंबर माझ्याकडे  नव्हता . पश्याने माझा नंबर त्याला दिला होता .

परत पश्याचा फोन आला , ' डायरेक्ट स्मशान भूमीतच पोच . ते  अजून अर्ध्या-एक तासाने तिथे  येतील . ‘

आता थेट तिथेच जायचं तर मग मी कशाला पाहिजे ? तिथे माझी काय मदत होणार ? ... पण म्हणलं जाऊ दे . सध्या लोक मयतालाही येत नाहीत . जवळचेसुद्धा लोक टाळतात , घाबरतात जिवाला . काय करणार ? जो गेला तो सुटतो बाकीचेच अडकतात .

मी निघालॊ . रस्ते सामसूम . माणसंच नाहीत . रस्त्यांवर स्मशानशांतता .

स्मशानभूमी लांबूनच लक्षात येत  होती .साऱ्या परिसरात धूरच धूर ! साला ! किती बॉड्या जळत असतील ? ...

ते आत गेल्यावर कळलं .   

त्या वर वेटाळत पसरणाऱ्या धुराकडे पाहून डोक्यात काहीबाही वाटायला लागलं . स्पर्धा परीक्षांमुळे  डोक्यात इतिहास घोळत असतो . आपल्या देशात कधी काळी  सोन्याचा धूर निघायचा अन आता ? ...

आत गेलो तर हे गर्दी ! एकदम माणसात आल्यासारखं वाटलं . माणसात ? ... की ?

नकोसा वाटणारा  घाण आवाज करत , सतत येणाऱ्या अँब्युलन्स , त्यांचे फटाकफट  दार उघडण्याचे , स्ट्रेचर खाली ठेवण्याचे आवाज .

कुठे नातेवाईकांचे आक्रोश तर कुठे सुकलेले अश्रू . नातेवाईक कमी असले तरी  बॉड्याच एवढ्या  की स्मशानभूमी भरून गेलेली . लसीकरणाला वेटिंग तसं इथं  जाळून घ्यायलाही वेटिंग ! ... जे जिवंतपणी तेच मेल्यानंतरही ! ...

संध्याकाळ वाढत चाललेली . वर झाडांवर वटवाघळं . घराकडे परतणारी पाखरं . कावळ्यांची कावकाव . पण ती पाखरं स्थिर नव्हती . धुरामुळे त्यांना नको होत असावं . पण आपलं घरटं सोडून ती जाणार तरी कुठे ?

कोरोनामुळे माणसं घरात दडली होती . अन त्याच कोरोनामुळे ह्या पाखरांना घर सोडावं लागणार होतं .

मी एका जागी बसून कंटाळलो . हा पश्याचा भाऊ कुठं मेला  होता कोणास ठाऊक ? आपल्या तोंडात हे असे शब्द बसलेले असतात , कुठे मेलाय ? - पण त्या जागेत माझे ते शब्द मलाच आवडले नाहीत .

पुढे गेलो . एक तरुण मुलगी . एकटीच . रडणारी .तिला विचारलं, तर म्हणाली ," आई गेलीये . वडील दवाखान्यात आहेत . मदतीला कोणीच येत नाही . पण इथली व्यवस्था स्वयंसेवक बघताहेत . "

मी सुन्न होऊन पुढे गेलो . भिंतीवर रंगवलेले तुकाराम महाराज अन त्यांचे अभंग दोन्ही काळवंडलेले होते . पण माणुसकी अजून पूर्ण काळवंडलेली नव्हती . बऱ्याच संस्था कामासाठी पुढे सरसावलेल्या .

कट्ट्याला टेकून एक आजोबा एकटेच बसलेले. पांढरी गांधी टोपी. पांढरंच धोतर . नजर शून्यात , कसंतरीच झालं म्हाताऱ्याकडे बघून . आज्याचीच आठवण झाली .

मी जवळ गेलो , म्हणालो , " बाबा " .

त्याने नजर वर उचलली .

" काही मदत पाहिजे का ? "

" नगं , काय नगं ".  

" कोण  गेलंय तुमचं ? "

" आमची मंडळी गेली दादा, " त्यांनी लांबवर बोट दाखवलं, " संस्थेचे लोक करत्यात सगळं ” . त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं ," शेवटच्या टायमालाबी कोणच नाय ! "

मी म्हणालो , " बाबा, रडू नका , तुम्ही तरी आहात ना ! "

" मला तर यायलाच लागणार . माझी मंडळी म्हंजे जन्माची जोडीदार . शेवटपर्यंत साथ द्यायलाच हवी ना . "

मला पुढे काय बोलावं ते सुचेना .

तेच  पुढे म्हणाले , "आत्ता दोन आठवड्यांपूर्वी मी गेलो ,त्या टायमाला ती आली होती . आता ती गेली तर , मला तर यायलाच हवं ना ! " ...   

© बिपीन सांगळे
कृपया , शेअर करणार  असाल तर लेखकाच्या नावासहित शेअर करा , ही  विनंति .

जोडीदार

बिपीन सांगळे
Chapters
जोडीदार