Get it on Google Play
Download on the App Store

भाग २

एकदा रात्री आळंदी हून पुण्याला आलो होतो. पाऊस चालू होता. रात्री उशीर झाला होता. रस्ते निर्जन.. त्यांवर फक्त पावसांच राज्य होतं. एका चौकात मात्र एक गाडा चालू होता. त्यावर चहा, वडा, पाव पाण्याच्या बाटल्या… लटकलेल्या होत्या. अजून बरचसंच काही बाही… पाणी घ्यावं म्हणून गाडी उभी केली. काही पोरं अडोसा पकडून सिगारेट ओढत होती. पाऊस रिमझिम चालूच होता. पलीकडं दोन चार पेताड. नुसते ओरडत होते. एक मुलगी चिंब भिजलेली… ती चहा पित असावी. ते पोरं तिच्याकडे पाहून आचकट-विचकट बोलत होती, ती केतकी सारखी दिसत होती. दिसत कसली ? ती केतकीच होती. "केतकी…!!"आतून आवाज बाहेर पडला. गाडी ही थांबवली. पाण्याचा चर्र… आवाज आला. साऱ्यांचचं लक्ष गाडीकडे खेचलं गेलं. तिचं लक्ष गाडीकडे गेलं. ती धावतच आली. आपण भिजलेल्या आहोत अन पळू नये याचं भान तिला कुठं होत ? आपली आंबट नजर तिच्या अंगभर रेंगाळली. ती जवळ आली. तिला ते जाणवलं. तिनं उगीच आपल शरीर दोन्ही हात गळया भोवती आवळून झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

"महाराज, या वेळी आपण इथं ?" लाजेत अन आंनदात माखलेले तिचे शब्द.

"हो आलो आळंदीवरून पण….. तू अशी पावसात…..?" आपला उगीचचं प्रश्न. तिनं चहाचा आग्रह केला.

"ऐ माम्या,… और दोन कटींग दे दो… मलाई मारके." ती ओरडली अन् पुन्हा गाडयाकड गेली. अशा रात्री ही पोरगी बाहेर काय करते ? इथं… ती पोरं तसली ? ते पेताङ…. एवढया रात्री तिचं काय काम असू शकेल ? याचा अंदाज नाही काढता आला. पावसात भिजल्यामूळे ती अधिकच सुंदर दिसू लागली होती. सुंदर नव्हे ! सेक्सी.. मादक..तिनं दोन्ही हातात दोन चहा आणले. ड्रायव्हर शिंदेला एक. मला एक. गाडयावरचा चहा मी घेईल की नाही याची शंका तिला नाही पण शिंदेला आली. कुणाचा प्रेमाचा आग्रह कसा नाकारावा ? राम आणि शबरी.. तिची उष्टी बोरं … प्रसंग आठवला. सच्चं प्रेम… आंधळ असतं. आपण मिटक्या मारीत चहा घेतला.

तिनं सिगारेटचं पाकिट पॅन्टीच्या पॉकेट मध्ये टाकलं. ते पाकिट कसे ठेवते हे मी बारकाईने पाहत होतो.

"तू, स्मोकिंग करतेस ?" आपला प्रश्न.

"छे ! छे…! नाही ओ महाराज, मी कशी करेल. वडिलांसाठी… असा पाऊस आला का त्यांना लागते सिगारेट. त्यांनीच पाठवल बाहेर. असा पावसाळा नाही सहन होत त्यानां."

"का..?"

"त्यांना दमा…?"

"दमा आणि पुन्हा सिगारेट…?"

"पप्पांच औषध हे… आता रात्रभर त्यांचा धुराडं चालू राहिल. अख्खं पाकिट लागतं त्यांना रात्रभर." ती सिगारेट दाखवत म्हणाली.

"पण तू, का सांगत नाहीस ? धूम्रपान त्यांना घातक. विष ते."

"थकले मी सांगून… हट्टी ते. मम्मी गेल्यापासून हट्टीपणा वाढलाय त्यांचा. वाढतोय अजून… मम्मी गेली आणि दारु आणि सिगारेट त्यांच्या सख्या झाल्यात."

"तुला मम्मी नाही…?"

"पाच वर्षाची असेन मी तेंव्हाच मम्मी क्षयानं वारली… आजीन वाढवलं मला. ती पण जाऊन सात वर्ष झाली. आता पप्पा आणि मी.. दोघांचीच टीम आमची."तिच्या ओठात थोडं लटक पण उदास हासणं उमटलं.

"….पण हे कधी सांगीतलं नाहीस… तरी प्रबंध करतेस."

"दु:ख उगळत बसायची सवय नाही मला…आणि दु:खाचं थोडचं कुणी सिलेब्रेशन करतयं?" तोंडावरून ओघळणारं पाणी सावरत ती म्हणाली.

"दु:खाचं सिलेब्रेशन नाही पण ते शेअर केलं जातं ना ? दु:ख दुसऱ्याला सांगितलं तर हलकं होतं."

"आपलं दु:ख हलकं होत असेल ही पण त्यांच ओझं दुसऱ्याचया डोई कशाला?"

"भयंकर दु:ख उशाला घेऊन.. तू सुखाचे सुक्ष्म क्षण कसे वेचतेस ?"

"गुलाबाची फुलं कधी ही काटयाचं रडगाणं गात नाहीत. ते गंध सदैव उधळून देतात." थोडी रिलॅक्स झाली व म्हणाली, "महाराज, मी पण ना..? उगीच रडकथा सांगत बसले."

"कथा नाही ही… वास्तव हे…!! प्रत्येक जीवाला अनिवार्य केलेलं."

"कोणं करतयं जीवांना अनिवार्य ?"

"प्रारब्धच... आखत माणसाच्या जीवन रेषा. रेखाटून देते चकोऱ्या आयुष्याच्या. जीव गुरफटत फिरत राहतो जीवनभर."

"अनिवार्य संसार असतो. संसार दु:खाच मूळ."

"संसार दु:खाच मूळ आहे हे कळत पण.. वळत नाही जीवाला. ते जाऊ दे. भेटलं की झालं सुरू तत्वज्ञान. तू अशी पावसात उघडीच आलीस. छत्री नाही आणलीस ? पहिलं गाडीत ये बघू." काळजीच्या स्वरात मी म्हटलं.

"आवडत मला पावसात भिजायला. एंन्जॉय करते पाऊस मी. किती मस्त वाटतं." तिचं उत्तर. ही पोरगी  वेडी काय ? तिला कोणी विचारलं ? काय आवडत ते ?भिजलेली केतकी हासली की कमालीची सुंदर दिसत होती. केसावरून निथळणारे थेंब उजेडात मोत्यासारखे चमकत व खाली ओघळतं.

"नको इथं जवळच राहते मी. भेटलात. बरं वाटलं. ब्रम्ह आले भेटी."

"रात्र… पाऊस….?"

"रात्रीचं काय ? शहरातील बरीच माणसं निशाचार असतात. पाऊसात भिजण्याची  तर हौस असते कित्येकांना." पावसाचं पाणी तिनं हातावर झेलल. उंच फेकलं. त्या सोबत उडी मारली. चक्क गिरक्या घेण्याचा तिचा इरादा असावा पण जरा ती संकोचली. मी आणि शिंदे तिच्याकडं पाहत होतो. ती नुसती दात काढत बसली.

"पण किती उशीर झालाय ? तुला भिती नाही वाटतं ?"

"कसली भीती…?"

"तुझ्या वयाची पोरी किती घाबरतात ?"

"रात्रीला की वयाला घाबरतात पोरी ?"

"पुण्याच्या मुली नाही घाबरतं…? पण मला घर नाही दाखवत तुझं."

"माझं घर पाहयचं…? ते एका प्रसिद्ध चाळीत.नको."

"का चाळीत बाहेरचं माणसं येऊ नाही देत ?"

"असं काय नाही हो, महाराज. तुम्ही याल माझ्या घरी ?" आनंदाने एक उडी मारली.

"हो. तुला मला घरी सोडायचं. आता पावसात भिजू नाही दयायचं."

"इतकी काळजी माझी ? सॉरी हं…! मी विसरले होते. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती असतात.देह कष्टकविती परोपकारे……" हया सुंदर ओळी तिनं पूर्ण केल्या. खिदळत गाडीत बसली. ओल्या चिंब केसातून पाणी निथळतं होते. तिचे कपडे ओले फदफद झाले होते तरी थंडीने ती काकडली होती. ती फार खुष होती. का…? पावसात भिजायला मिळाल्यामूळे असेल का ? का आपली भेट झाल्यामुळे असेल ? कदाचित मी घर सोडवायला निघालो म्हाणून असेल !

गाडी सुरू झाली. तशी ती मोकार पोरं ओरडली, "आरे कॉल गर्ल रे…. धंदे वाली…." मी केतकीकडं पाहिलं. तिन आपलं नाक वर ओढून तुच्छता व्यक्त केली, "महाराज, जाऊ द्या. हे पुनं…"

"हे पुणे….? इतकं असंस्कृत…!!" मी चीडलो होतो.

"अशा गोष्टींची सवय करून घ्यावी लागते स्त्रियांना. हे निगलेट करा.करावचं लागतं." तिनं मला उपदेश केला की सूचना ? शिंदेला रस्ता सांगण्यात ती गर्क होती. अन् मी तिला पाहण्यात. आपली हावरी नजर नुसतं तिला पाहत होती. कधीच स्त्री न पाहिल्यावाणी… डोळे पण किती बदमाश असतात, नाही ? तिच्या ओल्या अंगावरून ढळतच नव्हते. स्त्रीचा ओला देह.. ते तारूण्याच्या खूणा... मी मोहाच्या कुठल्याशा डोहात पडलो होतो.चोरटी माझी नजर तिला कळली. ती सावरली. वरमली. मी ओशाळलो. डोळे हरामखोर तरी ति च्या देहावरून हालतच नव्हते.

एका चाळीत आलो. चाळच ती. दोन्ही साईडला घरं. नुसत्या बोळीच बोळी. रस्ता नव्हता. सारी पत्र्याची घरं… गटार तुंबलेली. पाणी ओसंडून वाहत होतं. वास येत होता. रस्ता अरुंद होता. आत कसली गाडी जाते ? गाडी थांबवावी लागली. तिनं घरी येण्याचा आग्रह केला. तिचा आग्रह औपचारिकता असेल ! मी थबकलो. पाऊस चालू होता. टपटप… डोळयावर पडणाऱ्या पावसाचे थेंब ती हाताने अडवीत ती मागं आली दोन पावलं.

"महाराज, याना. गरीबाचं घर पाहताय ना?" ती केसातील पाणी सावरीत म्हणाली. ते पाणी झटकणं सुद्धा सिंपल नव्हतं. दोन्ही हात केसात घातले. जोरात झटकले. ते तुषार अंगभर उडले. अंग शहारले माझे. त्या जलतुषारांना गंध होता. स्क्रिम.. पावडर पाण्यात मिसळल्यामूळे तो गंध दरवळला होता. तो आग्रह फक्त तिची औपचारिकता असेल. मी गाडीच्या खाली उतरलो.

"पाहिलं घर आता."

"घर नाही हे. चाळं ही."

"अजून शंभर किमी अंतर जायचं आहे." ते माघारी वळलो पण पाय ओढत नव्हते. डोळे तर पागल झाले होते. पाय ही त्यांना फितूर झाले.

"उंबरयाला लागू द्या पाय. धन्य होईल बिच्चारा…"

"कोण बिच्चारा ?"

"उंबरा… आमच्या घराचा." ती छानस हासली. मी मुकाट तिच्या मागं-मागं चालू लागलो. पाहण्यासारखं काय होतं तिच्या घरी ? रात्रीची दहा ही वेळ एखाद्या मुलीच्या घरी जाण्याची नक्कीच योग्य वेळ नाही. इंद्रिये मनाचं साम्राज्य कधी कधी झुगारून देतात.मेंदू बंद पडतो कधी कधी. माझे डोळे चटावले होते व पाय ही थांबत नव्हते. बोळीत बोळी. अरूंद रस्ता…. एक पत्र्याचं घरं… मोडक-तोडकं तिनं दार आत ढकलं. मला आत येण्याचा इशारा केला. भांडी कुंडी पडलेली… खरकट-मरकट.. सांडलेलं. पाऊस सुरूच होता. पत्र्यावर ताश्या वाजवत होता. तिचा बाप तर्राट होऊन पडला होता. आम्ही घरात आलेलो. त्याला अजिबात कळलं नाही. का त्याला उठून पाहता ही आलं नाही ? त्याला ओलांडू आम्ही पलीकडं गेलो. ती तुकोबाच्या गाथेवर प्रबंध लिहिणारी…. तत्वज्ञान सांगणारी… केतकी ही कशी असू शकेल ? तिची ही डम्मी असेल का ? गरिबीच्या छाताडावर नाचून आनंदाच्या वाटा स्वत: तयार करणारी.... केतकी खरचं किती महान होती !

तिनं गरिबीचं प्रदर्शन केल नाही. तसं ते तिनं कधी ही लपवलं नाही. समृद्धी पेक्षा माणसाला द्रारिद्रयच चांगलं तत्वज्ञान देऊ शकत असेल. ती पूर्ण ओली होती. तिला कपडे बदलणं आवश्यक होतं. ती आत गेली. बाथरूम मध्ये.... आपण तिच्याकड पाहत तर नाहीत ना याची खात्री करण्यासाठी बहूतेक ती डोकावली असावी. ते डोळे नव्हते वासनेचे निखारे होते. टॉवेल... विसरली का मुद्दामच विसरून गेली असेल. स्त्रिया फार नटखट असतात ? तिचा टॉवेल फेकण्याचा इशारा… क्षणच दुर्दैवी होता. संयमाचे बांध तुटले. वासना आंधळी असते काय ? तिचं घर, झोपलेला बाप. तिचं वय…. आपलं नावं…. यातलं आपल्याला काहीच का आठवलं नाही ? स्थळ,काल,वय अशी कृत्रिम परिमाण वासनेला नसतात का ? वासनेच्या आगीत आम्ही होरपळत गेलोत. त्या अरुंद जागेत…..पाऊस किती धूंद प्रणय गीत गातो, नाही ! वासनेच्या पाठीला चिकटवूनच प्रेमाचे कण येत असतील अन् मना मनांत विरघळत जात असतील का ? मनात विकारांच वादळ उठल्यावर ते थोपवणं सोप थोडं असते ? काही क्षणच दुर्दैवी असतात. पाय वाकडा पडला की माणूस  भरकटत जातो.

केतकी  व मी अनेकदा वासनेच्या आगीत होरपळत गेलोत. कधी पुण्यात, कधी साताऱ्यात.. कधी कधी मठात ही…. पेटलेली शरीरं…. मनं… तशी थोडीच विझत असतात ?

अवघे गरजे पंढरपूर

परशुराम सोंडगे
Chapters
भाग १ भाग २ भाग ३