Get it on Google Play
Download on the App Store

३ दृष्ट

दृष्ट लागेल दृष्ट पडेल दृष्ट घालील असे वाकप्रचार सर्वत्र वापरात असतात .काही लोकांची दृष्ट पडते अशी समजही प्रचलित असते .ज्याच्याजवळ किंवा जिच्याजवळ काही उल्लेखनीय  गोष्टी असतात, त्या व्यक्तीला दृष्ट लागते किंवा लागेल अशी समज असते.गुटगुटीत लहान मूल, सुंदर मुलगी ,हुशार मुलगा किंवा मुलगी, कर्तृत्ववान व्यक्ती,देखणा पुरुष , लग्न मुंज वाढदिवस ,अश्या समारंभातील उत्सवमूर्ती किंवा अश्या उत्सवमूर्तीच्या जवळील महत्त्वाच्या व्यक्ती अश्याना दृष्ट लागते असा समज प्रचलित आहे. दृष्ट काही न बोलताही लागू शकते पण बऱयाचवेळा अशा व्यक्तीने जर काय ही बॉडी, काय हे सौंदर्य ,वाह काय हा सुंदर समारंभ ,अशा प्रकारचे जर चांगले उद्गार काढले तर त्याच्या बरोबर उलट परिणाम होतो .म्हातार्‍या माणसाची तब्बेत नेहमीच मागे पुढे होत असते .त्यांना भेटायला आलेल्या माणसाने वरवर किंवा मनापासून अरे  तुमची तब्येत छान दिसतेय ,असे उद्गार काढले तर काही माणसे आता मला दृष्ट लागली असे सहज किंवा विनोदाने म्हणतात. (कौतुक करावेसे वाटले तरी परक्या माणसाचे फार कौतुक करू नये त्यातून अनिष्ट अर्थ काढला जाण्याचा संभव असतो असो ). ज्याला किंवा जिला दृष्ट लागते अशा व्यक्तीच्या प्रकृतीवर सौंदर्यावर यशावर अनिष्ट परिणाम होतो असाही समज आहे .हा अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी त्या व्यक्तीची दृष्ट ,वयाने मोठ्या, प्रेमाच्या व्यक्तीकडून काढली जाते. हातात मीठ मोहऱ्या घेऊन ती व्यक्ती ज्याची दृष्ट काढावयाची आहे त्याच्या भोवती त्या फिरवून काही विशिष्ट मंत्र म्हणते(त्याचा अर्थ भुताची खेताची आंतल्याची बाहेरच्यांची जवळच्याची दूरच्याची कोणाचीही इ.दृष्ट निघून जावो असा असतो .) व नंतर त्या मीठ मोहऱ्यांचा विनाश केला जातो .तापल्या तव्यावर टाकणे, जाळामध्ये त्या टाकणे किंवा पाण्यामध्ये सोडणे, अशा प्रकारे त्यांचा नाश केला जातो .पडलेली दृष्ट, लागलेली नजर ,त्या मीठ मोहऱ्या मार्फत निघून जाते, असा समज आहे .

समजा दृष्ट काढूनही दृष्ट जात नसेल व व्यक्तीवर वस्तूंवर अनिष्ट परिणाम दिसून येत असेल ,तर त्यावरही काही उपाय सुचवलेले आहेत .ज्या व्यक्तीची दृष्ट लागली असा संशय असेल त्या व्यक्तीच्या वापरातील कापडाचा  शक्यतो अंगात नेहमी घातल्या जाणाऱ्या कपड्याचा एखादा छोटा  भाग कापून घ्यावा व तो जाळून त्याची राख त्या व्यक्तीला किंवा वस्तूला लावावी .मात्र त्या व्यक्तीला याचा पत्ता लागता कामा नये .किंवा बिघडलेली वस्तू, प्रकृती, वगैरे सहजपणे त्या दृष्ट घालणाऱ्या माणसांच्या नजरेस पडेल असे करावे व तो किंवा ती जर सहजपणे असे उद्गारला/उद्गारली की अरेरे किती ही तब्येत बिघडली किंवा अरेरे काय हे या वस्तूंचे झाले तर त्या दृष्टीचा परिणाम निघून जातो व प्रकृती सुधारण्याला सुरुवात होते .!!बऱ्याच जणांचा या गोष्टींवर विश्वास नसतो .ताज महाल भेताळला नसता का? दक्षिणेकडील भव्य मंदिरे उद्ध्वस्त झाली नसती का ? सामाजिक   मनुष्यनिर्मित किंवा नैसर्गिक ,भव्य दिव्य आश्चर्य चकित करणाऱ्या गोष्टी पाहून, कुणीही अरे वाह काय हे सौंदर्य किंवा केवढी ही भव्यता,  अशा प्रकारचे उद्गार काढतो .त्या मनुष्यनिर्मित गोष्टींवर किंवा निसर्गनिर्मित नद्या पर्वत इत्यादीवर काहीही परिणाम होत नाही .

वैयक्तिक लहान गोष्टींवर परिणाम होतो व मोठ्या गोष्टींवर परिणाम होत नाही असे उत्तर यावर दिले जाते .

या संदर्भात मी वडील माणसांच्या कडून ऐकलेल्या खात्रीशीर सत्य अशा दोन गोष्टी सांगणार आहे .गोष्टी कोकणातील आहेत 

माझ्या वडिलांच्या आजोळी मावळंगे गावी फणसाची झाडे खूप आहेत .निरनिराळे फणस निरनिराळ्या चवीचे व आकारमानाचे आहेत .लसण्या,(बारीक लसणीसारखे

किंचित तिखट चव)सांधण्या(मोठे पिवळे रसाळ गरे ज्यापासून सांधण नावाचे पक्वान सहज चांगले होते .)चवाळ्या (फणस एवढा मोठा की तो उचलण्यासाठी चार गडी लागतात.) इ.या चवाळ्याची गोष्ट .हा एवढा मोठा फणस नुकताच काढून अंगणात घरासमोर आणून ठेवला होता. तेवढ्यात शेजारच्या गावातील एक गृहस्थ  काही कामाने .भाऊंच्या(वडील ) मामांकडे आले. दृष्ट घालण्यात त्यांचे नाव  पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.ते सहज म्हणाले अरे बापरे केवढा हा फणस!!ऐकणार्‍यांच्या काळजात चर्रर्र झाले. कारण त्यांची ख्याती सगळ्यांना माहीत होती .ते गेल्यावर पाहतात तो काय फणसाला तडे गेले होते. तो फणस तर पिकला नाहीच परंतु झाडांवरील इतर फणसही सुकून काळे पडले !! दुसऱ्या वर्षांपासून फणस धरत नाहीसा झाला(फळे येईनात) .पाच सात वर्षांनी तो फणस धरू लागला परंतु फणसाचा आकार बारीक झाला .पूर्वीची चव राहिली नाही .तो फणस त्या गृहस्थाना दाखविण्यात आला परंतु त्यांच्या तोंडून हवे असलेले उद्गार काही आले नाहीत !त्यांच्या धाबळीचा त्यांच्या नकळत लहानसा तुकडा कापून त्याची राख  फणसाला लावण्यात आली .त्याचा विशेष काही उपयोग झाला नाही .किंवा थोडे फणस लहान फणस त्या उपायाने धरू लागले !!काही वेळा दृष्टीचा असर एवढा मोठा असतो की काहीही उपाय चालू शकत नाही .

दृष्ट परक्या माणसांवर व वस्तूंवर पडते त्याचप्रमाणे आपल्या माणसांवरही पडू शकते .डोरले गावातील भाऊंनी सांगितलेली गोष्ट पुढील प्रमाणे ---संध्याकाळची वेळ होती सूर्य मावळून बराच वेळ झाला होता .दहा बारा फुटावरील माणूस पुरुष आहे की स्त्री आहे हे ओळखत होते परंतु नक्की कोण ते ओळखत नव्हते .देवदर्शन करून दोन भाऊ दगडी बाकावर गप्पा मारीत बसले होते.एवढ्यात एक स्त्री तबक घेऊन देव दर्शनाला आली .त्या बंधूंपैकी एक बंधू म्हणाला की अरे दादा कोण रे ही नवीन गावात आलेली स्री,काय देखणी  आहे . कोणाची रे बायको .दादा म्हणाला अरे बाब्या तू ही गमतीशीरच आहेस ती तर वहिनी !!तुझी बायको नव्हे का?धाकटा भाऊ खजील होऊन  म्हणाला असे होय नाहीतरी मला हल्ली जरा कमीच दिसते !! हा बाब्या दृष्ट घालण्यात माहीर होता .दुसऱया दिवसांपासून त्याच्या बायकोला ताप येऊ लागला हळू हळू ती अशक्त होत गेली . अंथरुणाला खिळली व शेवटी मरण पावली .तिला वाचवण्याचे डॉक्टरी व इतर सर्व प्रयत्न विफलझाले .                                    .एक तरुण सुंदर बाई होत्या त्यांची मुले काही केल्या जगत नसत .त्यांची अशी दोन तीन मुले दगावली .त्यांच्या घरातील आजीने असे का होते यासंबंधी निरीक्षण केले .तिला असे आढळून आले की मुलाला पाजीत असताना ती आपल्या मुलाकडे टक लावून पाहत असे. तिच्या नजरेमुळे तिचे मूल खंगून बहुधा मरते असे आजीबाईंना वाटले .मुलांचा रोग काय हे कोणालाही कळत नसे परंतु मूल बारीक बारीक होऊन मरत असे.आजी बाईनी तिला  पुन्हा मूल झाले तेव्हा दोन गोष्टी करावयास सांगितले .एक मुलाकडे अजिबात बघायचं नाही दोन समोर एक दगडी पाटा ठेवला त्या पाट्याकडे टक लावून पाहात रहावयाचे.ते मूल वाचले व मोठे झाले आणि समोरचा दगडी पाटा मात्र झिजला  बारिक झाला व फुटला .हीही कथा भाऊंनी सांगितलेली आहे अशा कथा अनेक असू शकतात. कथा मागे माहीत असलेले व कदाचित माहित नसलेले काही शास्त्रीय कारण असू शकते .आपल्याला उलगडा होत नाही म्हणून ते खोटे आहे असे समजण्याचे कारण नाही .ज्या गोष्टी पूर्वी चमत्कार वाटत होत्या त्या मागची शास्त्रीय कारणे पुढील शास्त्रज्ञांनी शोधून काढली.काही कथा कदाचित खमंग असतील .कोणाला माहित देव जाणे !!!!!विश्वास ठेवा किंवा ठेवू नका जर दैवात असेल तर अशा दृष्टीपासून  तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही .दुसऱ्याची वाईट नजर व स्वत:चे प्रबळ दैव  यामध्ये  जो शक्तीमान असेल तो जिंकेल .शेवटी स्वत:चे भक्कम दैव म्हणून काही चीज असतेच ना !!!!

२९/६/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com