Get it on Google Play
Download on the App Store

ठकास महाठक

एका गांवांत एक शेतकरी राहात असे. त्याचा मुलगा थोडा मंदबुद्धीचा होता. परंतु त्याची सून मात्र फार हुशार व शहाणी होती. एक दिवस मुलगा आपल्या घराबाहेर झाडाखाली बसून कुऱ्हाडीचा दांडा करीत होता.

तितक्यांत कोणी तिघे जण तेथे आले व म्हणाले-"तुला आमच्या राजाने बोलाविले आहे. आमचा राजा म्हणजे समुद्राचा राजा." समुद्राचा राजा म्हणजे देव. पण ह्याला बोलाविण्यास जी माणसे आली होती ती काळी कभिन्न होती.

ते बहुतेक राक्षसांचे दूत होते. पण ही गोष्ट त्या अर्धवटाच्या लक्षात आली नाही. त्याने विचारलें. "तुमच्या राजाचे माझ्याशी काय काम आहे ?"

“आमच्या राजाला एक फार महत्वाचे काम करवून घ्यावयाचे आहे. ते तुमच्या-कडूनच होणार असल्यामुळे त्यांनी तुम्हाला बोलावून आणण्यासाठी आम्हांला पाठविले आहे." ते म्हणाले.

"माझे वडील शेतावर गेले आहेत आणि अंधार होण्याच्या सुमारास परत येतील. त्यांना घेऊन जा." मुलगा म्हणाला.

"असें होय! मग तुम्ही दोघेहि चला. उद्या पर्यंत तुम्ही बंदरांत आलांत तर ठीक आमची नाव तेथें असेल.' असे सांगून ते निघून गेले.

वडील घरी आल्याबरोबर मुलानें राजाचा निरोप त्यांना कळविला. म्हणाला-"बाबा, आज समुद्री राजाकडून दोघे तिघे जण आले होते. त्या राजाला आमच्याकडून कांहीं काम करखून घ्यावयाचे आहे. जर आपण ते काम केले तर आपल्याला पुष्कळ मोठे बक्षीस मिळणार आहे."

"राजाचे चिन्ह वगैरे काही होतें का त्यांच्या जवळ?" शेतकऱ्याने विचारलें.

"तसे काही त्यांनी आणले नाही, ते म्हणाले, आमची नांव बंदरांत आहे. उद्या सकाळपर्यंत आलांत तर आम्ही घेऊन जाऊं." मुलगा म्हणाला.

“बंदरापर्यंत मी पायीं जाऊं? शक्य नाही. जर तें अंतर कमी झाले तरच मी येऊ शकेन." असे म्हणून म्हातारा झोपला.

मुलाने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली. म्हणाला- "समुद्राच्या राजानें आम्हांला बोलविले आहे. परंतु जो पर्यंत बंदरापर्यतचे अंतर कमी होणार नाही तों पर्यंत बाबा येणार नाहीत."

" एवढेच ना! मग त्यांत काय एवढे मोठे. सारी वाट सरेपर्यंत गोष्ट सांगत राहा आपल्या वडिलांना." बायकोने सांगितले.

बायकोचे म्हणणे त्याला पटले. दुसऱ्या दिवशी तो पाहाटे उठला. वडिलांना उठविलें म्हणाला-"बाबा उठा लवकर. तुम्ही म्हणाला होतात ना? रस्ता कमी केला तर येईन म्हणून ? चला मी कमी करतों वाट."

दोघे बापलेक निघाले बंदराकडे. वाटेत मुलगा बापाला सारखा गोष्टी सांगत चालला होता. शेवटी सूर्योदयाच्या सुमारास पोहोचले ते दोघे बंदरावर. तेथे ते तिघे राक्षस दूत आणि एक मोडकी नाव त्यांच्या दृष्टीस पडली.

ती पाहून शेतकरी म्हणाला- "ही कसली होडी, राक्षसी होडी दिसते आहे ही."

 

“आमच्या राजाजवळ जितक्या नावा आहेत त्यांत हीच जलद चालणारी आहे. म्हणून आम्ही ही होडी आणली आहे." ती काळी माणसें म्हणाली.

ते दोघे बापलेक त्या नावेत जाऊन बसले आणि होडी चालू झाले. थोड्याच वेळांत ती होडी एका बेटाला लागली. त्या वेटावर कोठे काही झाडपाला दृष्टीस पडत नव्हता. सर्व प्रदेश अगदी रूक्ष होता. तेथे उतरल्यावर त्या बापलेकांना कळले की तें बेट राक्षसांचे आहे. करतात काय? त्या राक्षस दूतांनी दोघांना आपल्या राजासमोर आणून उभे केले. त्याला पाहतांच दोघांची बोबडी वळल्यासारखीच झाली. कारण तो राजा आपल्या दूतांपेक्षा जास्त काळा आणि कुरूपहि होता.

"तुम्ही आम्हांला इतक्या दूर काशासाठी बोलाविले." शेतकऱ्याने विचारले.

"काही विशेष नाही. आमच्याकडे एक फार मोठे भांडे आहे. त्याच्या बुडापाशी विस्तव घालण्यासाठी तुम्हांला बोलावून आणले आहे. आमच्या लोकांना काही ते जमत नाही. जर का तुम्हांकडूनहि हे काम झाले। नाही तर जिवंतपणे तुम्ही परत जाऊ शकणार नाही. राजाने सांगितले.

"अगोदर ते भांडे तरी पाहूं द्या. मग पाहूं काय करावयाचे तें." शेतकरी म्हणाला

राक्षस त्यांना एका खोलीत घेऊन गेला. तेथें मध्यभागी एक मोठे तांब्याचे भांड ठेवलेले होते. शेतकऱ्याने ते दुरून पाहिले. नंतर राक्षसांना बाहेर पाठवून देऊन खोलीला आंतून कडी लावून घेतली. मग सावकाश त्या दोघांनी चारी बाजूस हिंडून फिरून ते भांडे पाहिले. ते त्या शेतकऱ्याला ओळखीचे वाटले.

तो मुलाला म्हणाला “तुला या हंड्याविषयी काही माहीत आहे का ? हे अक्षय पात्र आहे. हे पूर्वी आपल्या राजाकडे होते. सध्याचा जो राजा आहे ना? त्याचे पंजोबा ह्यांत भात शिजवून जे कोणी येतील त्यांना जेवण देत असत. तोच हा हंडा, या राक्षसांनी चोरून आणला आहे इथे."

"पण बाबा, आपण येथून सुटणार कसे?" मुलाने विचारले.

"ते सर्व मी पाहातो. काढतों काही तरी मार्ग शोधून. शेतकऱ्याने दार उघडले आणि राक्षसांना बोलाविलें. ते मोठ्या घाईने आले.

त्यांनी विचारले "विस्तव घातला का?"

"विस्तव घालायला काहीं लाकडे सरपण पाहिजे की नाही. याला आंब्याची, जांभळाची, चिंचेची, वडाची, पिंपळाची, लिंबाची आणि बाभळीची लाकडे अशी नऊ तऱ्हेची लाकडे पाहिजेत. त्याशिवाय गारगोट्या, कापूस, वाळलेल्या काटक्या. हे सर्व सामान आणून द्या म्हणजे पेटवितो चूल."

राक्षस दूत शेतकऱ्याचा निरोप घेऊन राजाकडे गेले व त्याला तो निरोप सांगितला. राजा एकदम मोठ्याने ओरडून म्हणाला "तुम्हाला माहीत नाही काय? आमच्या बेटावर साधे गवत सुद्धा उगवत नाही. मग कोठून असणार एवढी लाकडे."

"तरी पण आमच्या देशांत आहेत ना. आपल्या दोन दूतांना पाठवा आणि मागवा आमच्या सुनेकडून. बरोबर आपल्या दोन मुलांना पाठवून द्या. नाहीतर तिचा विश्वास बसणार नाही.” शेतकरी म्हणाला.

"जोपर्यंत लाकडे येणार नाहीत तोपर्यंत तुम्ही दोघे याच खोलीत बसून राहा." असे सांगून राक्षसांच्या राजाने त्या दोघांना हंड्याच्या खोलीत बसवून ठेवून खोली बंद करून घेतली.

शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या दोन मुलांना नावाड्यांबरोबर शेतकऱ्याच्या गावी पाठवून दिले. तेथे पोहोचल्यावर राक्षसाचे मुलगे शेतकऱ्याच्या सुनेला म्हणाले "आम्ही राक्षस राजाचे मुलगे आहोत. तुझा सासरा व नवरा आमच्या देशांत आहेत. त्यांनी जांभळाची, आंब्याची, चिचेर्ची वडाची, पिंपळाची, बेलाची वगैरे लाकडे तुझ्याकडून मागून आणावयास सांगितली आहेत. राक्षसाचे म्हणणे ऐकल्या बरोबर सुनेला कळले, यांत काही तरी घोटाळा आहे.

ती राक्षस पुत्रांना म्हणाली-“तुम्हांला पाहिजे असलेल्या सर्व वस्तू त्या खोलीत आहेत. तेथून काय काय ते घेऊन जा." असे सांगून तिने एका अंधार कोठडीकडे बोट दाखविले.

दोघे राक्षस पुत्र आंत शिरतांच तिने बाहेरून दार बंद करून घेऊन कुलप लावून घेतले. बाहेर उभे असलेल्या राक्षसांना ती म्हणाली "तुमचे राजकुमार त्या खोलीत आहेत. परंतु त्या खोलीची किल्ली काही केल्या सापडत नाही. आमच्या घरवाल्यांनी किल्ली दिली म्हणजेच ते दार उघडेल, तो पर्यंत काही करणे शक्य नाही. जा आपल्या राजाला जाऊन सांगा."

राक्षस होडी घेऊन आपल्या राजाकडे गेले व सूनबाईंनी सांगितल्याप्रमाणे सांगितले. राक्षस राजा कावरा बावरा झाला. त्याचे आपल्या मुलांवर अतिशय प्रेम होते. त्याने शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला सोडून दिले व घरी जाण्यास सांगितले.

"असे कसे? आम्ही काम करून बक्षीस घेऊनच जाणार, आम्हांला घरी जायची काही घाई नाही." शेतकरी म्हणाला.

राक्षस राजाने त्यांना बक्षीस म्हणून दोन सोन्याच्या विटा दिल्या आणि एका नावेत बसवून घरी पाठवून दिले व त्याच नावेतून आपल्या मुलांना परत येण्यास सांगितलें. घरी आल्यावर त्यांनी राक्षस पुत्रांना त्यांच्या घरी पाठवून दिले.

ठकास महाठक

महाकाल
Chapters
ठकास महाठक