Get it on Google Play
Download on the App Store

८ राजधानी एक्स्प्रेसमधील बॉम्ब २-२

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. यातील पात्रे काल्पनिक आहेत. साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा) 

ही केस स्पेशल ब्रँचचे प्रमुख म्हणून शामरावांकडे सोपवण्यात आली होती. येणारा प्रत्येक फोन शामरावांना ऐकता येईल अशी व्यवस्था अर्थातच करण्यात आली होती.

तो फोन फसवाफसवीचा असेल, गंमत म्हणून केलेला असेल,यातून काहीही निष्पन्न होणार नाही .अशी जरी एक शक्यता असली तरी पोलीस कुठलीही रिस्क घेण्याला तयार नव्हते . धमकी देणाऱ्या दहशतवाद्याच्या  सूचनेप्रमाणे पन्नास लाख रुपये एका बॅगेत ठेवण्यात आले होते.बॅगेच्या तळाला एका कोपऱ्यात अत्यंत सूक्ष्म असा ट्रान्समीटर बसविण्यात आला होता.त्यामुळे बॅग कुठे आहे ते पोलिसांना सतत  कळणार होते. पुढील सूचनेची सर्व वाट पहात होते . 

एवढ्यात फोनवर सूचना आली .ती बॅग बोरिवली स्टेशनच्या क्लोकरूममध्ये ठेवावी .त्याची रिसीट तिथेच बंद असलेल्या विंडोमध्ये  ठेवावी .रिसीट दाखवून  बॅग नेण्याची व्यवस्था आम्ही करू .पैशाची बॅग  अर्ध्या तासात ठेवण्यात यावी उगीच वेळकाढूपणा करू नये .जर कुणी पाठलाग करण्याचा प्रयत्न करील तर राजधानी एक्स्प्रेस रिमोटने लगेच उडविण्यात येईल .कुणीतरी गंमत करीत असेल अशी जरी शक्यता असली तरी पोलीस कुठलीही रिस्क घेण्याला तयार नव्हते .

राजधानी एक्स्प्रेस दिल्लीला पोहोचण्याअगोदर पैसे दहशतवाद्यांच्या हातात पडणे आवश्यक होते अन्यथा त्यांनी तो बॉम्ब रिमोट कंट्रोलने उडवला असता .

राजधानी एक्स्प्रेस सुटल्याबरोबर कमिशनरना फोन आला होता.कबीरला पकडून आणून सोडून देईपर्यंत एक तास वाया गेला होता. या सगळ्या स्कीमचे ज्यानी नियोजन केले होते त्यांची तशीच अपेक्षा असावी.त्यांना शोधून काढण्यासाठी पकडण्यासाठी जास्त वेळ मिळू नये अशी कल्पना असावी.

पैसे तयार आहेत असा मेसेज येताच शामराव  यांनी पुढीलप्रमाणे योजना तयार केली .  काही गुप्तचर क्लोकरूमवर  नजर ठेवून राहणार होते.कुणीही पैशाची बॅग घेऊन बाहेर पडताच ते त्याचा पाठलाग सुरू करणार होते. शामराव मोटारीत दूरवर बसून सर्व हालचालींचे नियंत्रण व वेळोवेळी सूचना करणार होते.

एक गुप्तचर पोलिसांच्या वेषात क्लोकरूम मध्ये बॅग ठेवण्यासाठी गेला.सांगितल्याप्रमाणे त्याने रिसीट शेजारच्याच बंद असलेल्या खिडकीवर ठेविली.आता काय होणार म्हणून सर्वजण उत्सुकतेने पाहात होते . तेवढय़ात  एक तेरा चौदा वर्षांचा लहान मुलगा तिथे आला.ती रिसीट घेऊन तो लगेच स्टेशन बाहेर पडला .बॅग न घेता तो तसाच बाहेर पडलेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले .एक रिक्षा करून तो मुलगा सरळ बोरिवली पूर्वच्या एका सोसायटीमध्ये गेला .चौथ्या मजल्यावरील एका ब्लॉकमध्ये त्यांने दरवाजावरील बेल दाबली व ती रिसीट दरवाजा उघडणार्‍याच्या हातात ठेवली.

पाचच मिनिटांत त्या ब्लॉकमधून एक व्यक्ती बाहेर पडली.तो ब्लॉक सदाशिव शिवरामे नावाच्या गृहस्थाचा होता.  पार्किंग लॉटमधून आपली मोटार घेऊन ती व्यक्ती रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाली.रिसीट दाखवून क्लोकरूम मधून त्याने ती पैशांची बॅग घेतली.मोटार बोरीवली पार्कच्या दिशेने निघाली .हा सदाशिव शिवरामे साधा माणूस वाटत होता.पैशाची बॅग क्लोकरूम मधून नेल्यामुळे आता राजधानी एक्स्प्रेसवरचे संकट बऱ्याच प्रमाणात टळले होते.आता ती बॅग परत मिळविणे  व दहशतवाद्याना पकडणे जरूर होते .हे सर्व करताना दहशतवादी बॉम्ब उडविण्यासाठी रिमोटचा वापर करू शकणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक होते . दहशतवाद्यांना अत्यंत कौशल्याने पकडणे गरजेचे होते .

हा शिवरामे बिनधास्त मनुष्य दिसत होता.आपला पाठलाग होत आहे की नाही याची त्याला बिलकुल चिंता दिसत नव्हती.किंबहुना आपला कुणी पाठलाग करीत असेल अशी त्याला शंकाही आली नव्हती असे वरकरणी दिसत होते. त्याच्या हालचालीवरून तो दहशतवादी असावा किंवा त्यांचा हस्तक असावा असे वाटत नव्हते. पार्कमध्ये ती बॅग त्याने एकशेतीन नंबरच्या झाडाखाली नेऊन ठेवली .तेथून त्याने कुणाला तरी फोन केला .तेथून लगेच तो निघाला.पार्कच्या बाहेर येताच त्याला अटक करण्यात आली .

बोरिवली पार्कमध्ये ठेवलेल्या पैशाच्या बॅगेवर लक्ष ठेवून मंडळी  होतीच.तेवढ्यात एक माणूस ती पैशांची बॅग नेण्यासाठी आला.रात्रीचे दहा वाजले होते .टॉर्चच्या प्रकाशात बॅग उघडून त्याने आत पैसे आहेतना हे पाहिले.तो पैसे घेऊन सरळ बहुधा  त्याच्या फ्लॅटवर गेला .

त्यांची एखादी गँग आहे का हे शामरावांना पाहायचे होते.तो त्याच्या बॉसला बॅग नेऊन देत आहे का? हे पाहायचे होते.जर त्याला अगोदर पकडला असता तर त्याच्या बॉसने रिमोटने बॉम्ब उडविला असता.त्या फ्लॅटमध्ये  बहुधा  बॉस असावा  असा शामरावांचा अंदाज होता .पोलिसांनी लगेच सर्व तयारीनिशी त्या फ्लॅटवर रेड टाकली .कुणालाही काहीही हालचाल करायला मिळू नये अशा जय्यत तयारीने  रेड टाकण्यात आली होती.अगोदर साध्या वेषातील गुप्तचर खात्यातील एका मुलीला पाठविण्यात आले.ती मुलगी कोणती तरी वस्तू विकण्याच्या बहाण्याने  आत गेली होती .आत काहीही धोकादायक नाही याचा अंदाज आल्यावर तिने ठरलेली खूण बाहेर दडून बसलेल्या आपल्या सहकाऱ्यांना केली . 

त्या फ्लॅटमध्ये कोणतीही टोळी आढळून आली नाही.खुर्चीला बांधलेल्या अवस्थेत एक तरुणी व बॅग अाणलेला तो तरुण एवढीच दोघे त्या फ्लॅटमध्ये होती .त्या दोघांनाही अटक करण्यात आली .

तो लहान मुलगा, शिवरामे, ती तरुणी व तो तरुण यामध्ये नक्की संबंध काय असावे याचा उलगडा चौघांचीही वेगवेगळ्या खोलीत चौकशी केल्यावरच लागणार होता .

कसून तपासणी केल्यावर पुढील प्रमाणे उलगडा झाला .राजधानी एक्स्प्रेसमधे  बॉम्ब किंवा बॉम्बसदृश्य कोणतीही वस्तू ठेवलेली नव्हती.पोलिसांना नुसती हूल  दिलेली होती .त्या तरुणाचे नाव प्रसाद राजे होते.ती बांधलेली तरुणी संज्ञा, सदाशिव शिवरामेची पत्नी होती.  

संज्ञा व प्रसाद यांचे लग्नापूर्वी  प्रेम होते.त्यांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या .प्रसादचा विचित्र स्वभाव हळूहळू लक्षात आल्यामुळे संज्ञाने त्याच्याशी लग्न करण्याचे साफ नाकारले .नंतर संज्ञाने शिवरामशी लग्न केले.लग्नानंतर प्रसाद संज्ञाला त्रास देऊ लागला .सदाशिवला सोडून माझ्याकडे ये माझी चूक झाली. वगैरे सांगून तो सारखा तिला त्रास देऊ लागला . तो वारंवार तिला फोन करीत असे .तिने लिहिलेली बरीच पत्रे प्रसाद जवळ होती.तू मी सांगितल्याप्रमाणे वागली नाहीस तर ती पत्रे मी सदाशिवला दाखवीन अशी धमकी तो देत असे.  ती पत्रे देण्याच्या बहाण्याने  त्याने तिला आपल्या फ्लॅटवर बोलाविले.व बंदिस्त करून ठेवले .त्यानेच कबीरच्या फोनवरून पोलिस कमिशनरना राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली.व नंतर पैसे अमुक अमुक ठिकाणी ठेवा वगैरे सर्व प्लॅन आखला .

त्याने सदाशिवला फोन करून सांगितले की त्याची पत्नी माझ्या ताब्यात आहे.जर तू मी सांगितल्या प्रमाणे वागणार नाहीस तर तिच्या जिवाला धोका आहे.तुला ब्लॉकवर एक मुलगा क्लोक रूमची रिसीट आणून देईल .ती रिसीट घेऊन तू बोरीवली स्टेशनच्या क्लोकरूममध्ये जायचे .तिथे तुला एक बॅग मिळेल .ती बॅग न उघडता बोरिवली पार्कमध्ये आणून एकशे तीन नंबरच्या झाडाखाली ठेवायची.नंतर मागे न बघता सरळ आपल्या फ्लॅटवर निघून जायचे .तासाभरात तुझी बायको तुझ्या फ्लॅटवर येईल .

सदाशिवने मी एका हाताने तुम्हाला ती बॅग देईन व दुसऱ्या हातात मला माझी  बायको परत मिळाली पाहिजे वगैरे सांगून पाहिले .परंतु त्याला तू आम्ही सांगितल्याप्रमाणे वाग तुला दुसरा पर्याय नाही .तुझ्या बायकोच्या जिवाला धोका आहे असे सांगून सांगितल्याप्रमाणे काम करण्यास तयार केले होते.सदाशिवचे संज्ञावर प्रेम असल्यामुळे तो हे बेकायदेशीर कृत्य करण्यास तयार  झाला होता .प्रसादने दम देऊन त्याला पूर्ण कह्यात घेतले होते. 

एका शाळकरी मुलाला शंभर रुपये देवून  बंद खिडकी मधील रिसीट शिवरामेच्या ब्लॉकवर नेऊन देण्यास सांगितले होते.प्रसादची योजना अशी होती की सदाशिवला ती बॅग घेऊन बाहेर पडताच पोलिस लगेच त्याला दहशतवादी म्हणून  पकडतील.त्याच्या वाटेतली कांटा दूर होईल.

यदाकदाचित पोलिसांनी त्याला पकडला नाही व तो पैशाने भरलेली बॅग घेऊन पार्कमध्ये आला.तर ती बॅग घेऊन फरारी व्हायचे.एवढ्या पैशात नाव बदलून कुठेही आरामात राहता येईल .

पण पोलीस सर्वांवर लक्ष ठेवून असतील व  सर्वांनाच पकडतील व आपले पितळ उघडे होईल याची त्याला कल्पना नव्हती.त्याने योजना आखताना ती मुळापासून कच्ची ठेवली होती .पोलिसांना तो  मूर्ख समजला होता .पोलिसांना त्याने उगीच घाबरवून सोडले होते .

*सदाशिव व संज्ञा यांना पूर्ण चौकशीअंती सोडून देण्यात आले.*

*प्रसादला अपहरण धमकी इत्यादी गुन्ह्याबद्दल पाच वर्षांची शिक्षा झाली .* 

*जे प्रकरण सनसनाटी निघेल असे वाटले होते तो एकदमच फुसका बार निघाला .*

( समाप्त)

९/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन