झोंबडी पूल
त्या दिवशी मी कॉलेज सुटल्यावर मित्रांबरोबर रेंगाळलो. तसा मी दुपारी दोनच्या एष्टिने घरी जायचो. पण त्या दिवशी तीनचा शोलेचा खेळ पहायला थेटरात जायचं ठरलं होतं. परंतु पंधरा मिनिट दिवे गेल्यामुळे सिनेमा सुरुच सव्वा तीनला झाला आणि सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये इतका गुंतलो की पाऊणे सहा वाजले ते कळलंच नाही. गब्बरसिंगला ठाकूर तुडवत होता नि पक्या बारटक्केने मला त्याच्या मनगटावरचं घड्याळ दाखवलं. मी चटकन ताळ्यावर आलो. तशीच थेटरातून तालुक्याच्या स्टँडकडे धूम ठोकली. मी बाजारपेठेच्या गर्दीतून वाट काढत स्टँडवर पोहचलो खरा पण मी फलाटावर पोचेस्तोवर झोंबडीची शेवटची बस सुटून गेली होती.
साधारण १९७८चा काळ असेल. त्यावेळेला आमच्या गावी म्हणजे झोंबडीला जाणारी शेवटची सहाची एष्टी चुकली की मग थेट सकाळी आठला. तीच सहाची एष्टी वस्तीला असायची. तालुक्याला जायला सकाळी सहा वाजता सुटे.
तसं झोंबडी तालुक्यावरुन बावीस किलोमीटर लांब…! त्यामुळे चालत जाण्याचा प्रश्नच नव्हता. तासभर वाट पाहिल्यावर मुंबई-तवसाऴ एष्टी फलाटावर लागली. सव्वा सात वाजले होते. ही एष्टी झोंबडीला जात नसे. आता बाहेर फाट्यावर उतरुन आठ कि.मी. चालत जावं लागणार आणि उशीर झाल्यामुळे आबा अंगण्यातच फोकलून काढणार ही मानसिक तयारी करुन गाडीत बसलो.
साडेआठ पावणेनऊला फाट्यावर उतरलो. तसं त्यावेळेला फाट्यावर कोणीच नसे. थंडीचे दिवस होते. मी मुख्य रस्त्यावरुन डाव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याला वळलो. रातकिडे किर्रकिर्र करत होते. अधूनमधून एखाद्या टिटवीची टीव-टिव ऐकू येत होती. झाडांच्या मधून जाणारी वाऱ्याची झुळूक झाडांना थरथरवत होती. हवेतला गारवा इतरवेळी आमच्या कोकणात जाणवतही नाही तोच आता बोचायला लागला होता.
तसं तर आम्ही बागेत रात्रपाळीला मुक्कामाला असायचो. तेव्हा सोबतीला चार पाच गडी असायचे. आम्ही घेरा करून बसायचो. कोकणात मचाण बिचाण असली काही भानगड नव्हती. आम्ही बांधावरच आडवं व्हायचो. हे सगळे विचार करत मी अंधारात झपाझप पावलं टाकत जात होतो.
आमच्या गावाकडच्या रस्त्याची खासियत आहे. अंधारात चालायला लागलं कि पावलं जड होतात, तुमचा कोणीतरी पाठलाग करताय असं वाटतं. मधेच मानेजवळ कुणीतरी फुंकर घातलानी कि काय...? असं वाटायला लागतं. हे सगळं वाटायला नको म्हणून मी अंधार पडायच्या आतआमच्या घराजवळच्या अण्णांच्या दुकानाजवळ असायचो. संध्याकाळला तीच काय ती बत्ती असायची आमच्या वाडीच्या वेशीवर. काळोखाने इतकी भीती बसवली होती मनात कि रस्त्यावर पडलेली दोरी सुद्धा साप वाटायची.
इतका वेळ होईल अस मला वाटलं नव्हतं. तरी मी बॅटरी घेऊन चालत होतो. फाट्यावर उतरलो तेव्हा समोर पडलेली काठी हातात घेतली होती. असाही या काठीचा उपयोग मानसिक समाधानासाठी. काही समोर आलं तर बोडक्याचा उपयोग होतोय. दुसऱ्या सेकंदाला माणूस गार पडतो.
पाण्याचा खळखळाट ऐकू आला. आनंदात स्वतःलाच बोललो “चासला... पोहोचलो वाटत वाडीच्या वेशीजवळ...!" दुसऱ्या सेकंदाला माझ्या अंगावरून सर्रर्रकन काटा गेला. मावळती नंतर आम्ही कधीच ओढ्यावर गेलो नव्हतो आणि आता मला तोच ओढा ओलांडून पलीकडे जायचं होतं.
माझ्या पावलांनी अवसानच सोडलं. पुढे चालवेना...! ओढ्यावरचा पूल ब्रिटिशांच्या काळी बांधलेला होता पण त्यालाही आता शंभरी होईल. जेमतेम एक एष्टी जाईल इतका अरुंद पूल होता. पावसाळ्यात पुलावरून पाणी जायचं, आणि उन्हाळ्यात कुणी पुलावरून पडलं तर कपाळ फुटेल इतके धोंडे वर दिसायचे.
मी आपला बॅटरी सांभाळत सांभाळत भीमरूपी म्हणत म्हणत पुलाच्या दिशेने हळू-हळू पावलं टाकत होतो. आत्ता माझ्या जागी पक्या बारटक्के असता तर अटॅकने सटॅक झाला असता. मैलाचा दगड दिसला "झोंबडी पूल". मी पुलावर पाऊल ठेवलं आणि समोरून माझ्या डोळ्यावर कुणीतरी बॅटरीचा लाईट मारला.
"कोण? कोणाय तिकडे?" माणसाचा आवाज ऐकून मला जरा हायसं वाटलं. पण इतक्या रात्री कोण असेल इथे असा मी विचार करत असताना माझ्या हातातल्या बॅटरीचा लाईट गेला. तेव्हा आजच्यासारखे मोबाईल वगैरे पर्याय नव्हते. मी बॅटरी दोन तीन वेळा डाव्या हाताच्या तळव्यावर आपटून पहिली. तरी ती पेटेना. माझी पाचावर धारण बसली.
तेवढ्यात परत आवाज आला "ए... बोलशील का ? कोण आहे?”
मी झपझप पावलं टाकत त्या अरुंद पूलाच्या एका टोकाकडून दुसरीकडे गेलो. आजूबाजूला बघितल नाही. एका ठिकाणी जरा पायाखाली काहीतरी आल्यासारखं वाटलं. जरा पाय सरकला माझा पण पुलाच्या काठाला पकडलं आणि मी सावरलो.
चालत मी जसा जवळ गेलो. तिथे दोन आकृत्या दिसत होत्या. बॅटरीला हात मारत मारतच चालत होतो. पटकन प्रकाश पडला आणि समोर दोन पोलीस हवालदार उभे होते.
"कुणाचा रे तू? इतक्या रात्री काय करतोयस?"
त्यांच्या आवाजावरून तरी ते वयाने जरा मोठे वाटत होते. साधारण पन्नाशीचे.
"मी-मी आबा खोताचा.. "
माझ वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी बोलायला चालू केलं.
“खोतांचा अरे वा... मोठा झालास... बऱ्याच वर्षात बघितला नाही तुला... जरा चेहरेपट्टी ओळखीची दिसते नाही काय रे मोरे...?" एकाने दुसऱ्या हवालदाराला विचारलं.
मी म्हणालो “अहो मी थेटरात गेलेलो शोले पाहायला. वेळ झाला तिथेच म्हणून नाहीतर मी कशाला फिरतोय इतक्या रात्रीचं?"
हवालदार म्हणाला, "बरं -बरं जा... ते घड्याळ आहे का तुझ्याकडे किती वाजले असतील?"
मी घड्याळाकडे बघितलं आणि म्हणालो, "साडे दहा...!" मी निघालो.
आता मी बॅटरी सांभाळत सांभाळत भीमरूपी म्हणत पुलाच्या दिशेने हळू-हळू पावलं टाकत होतो. मैलाचा दगड दिसला "झोंबडी पूल". मी पुलावर पाऊल ठेवलं आणि समोरून माझ्या डोळ्यावर कुणीतरी बॅटरीचा लाईट मारला.
"कोण? कोणाय तिकडे?" माणसाचा आवाज ऐकून मला जरा हायसं वाटलं. पण इतक्या रात्री कोण असेल इथे असा मी विचार करत असताना माझ्या हातातल्या बॅटरीचा लाईट गेला. मी बॅटरी दोन तीन वेळा डाव्या हाताच्या तळव्यावर आपटून पहिली. तरी ती पेटेना. माझी भीतीने गाळण उडाली.
तेवढ्यात परत आवाज आला "ए... बोलशील का ? कोण आहे?”
मी झपझप पावलं टाकत त्या अरुंद पूलाच्या एका टोकाकडून दुसरीकडे गेलो. आजूबाजूला बघितलं नाही. चालत मी जसा जवळ गेलो. तिथे दोन आकृत्या दिसत होत्या. बॅटरीला हात मारत मारतच चालत होतो. पटकन प्रकाश पडला आणि समोर दोन पोलीस हवालदार उभे होते.
"कुणाचा रे तू? इतक्या रात्री काय करतोयस?"
आता आवाज ओळखीचा वाटत होता
"मी खोताचा मुलगा...!”माझ वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी बोलायला चालू केलं.
“खोतांचा अरे वा... मोठा झालास बऱ्याच वर्षात बघितला नाही तुला... जरा चेहरेपट्टी ओळखीची दिसते नाही काय रे मोरे...?"
एकाने दुसऱ्या हवालदाराला विचारलं हवालदार म्हणाला, "ते घड्याळ आहे का तुझ्याकडे किती वाजले असतील?"
मी घड्याळाकडे बघितलं आणि म्हणालो, “साडे बारा...!"
हे असं पुनःपुन्हा होत राहिलं आणि यावेळेस हवालदाराने विचारलं, "ते घड्याळ आहे का तुझ्याकडे किती वाजले असतील?"
मी घड्याळाकडे बघितलं आणि म्हणालो, “साडे चार ...!"
मी पुढे निघालो आणि वाट पायात अडखळली. माझ्या पायात आता गोळे येत होते. मी चालून चालून पुरता कंटाळलो होतो. थंडीने माझे डोक्यावरचे खोबरेल लावलेले केस एकदम कडक झाले होते.. कोण असतील हे दोघे माझ्या राशीला आलेले ज्यांनी मला रात्रभर इतकं छळलं. आता माझी हिम्मत होत नव्हती. मागे वळून बघितलं तर किर्रर्र अंधारात काहीच दिसत नव्हतं. माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि मी खाली कोसळलो नंतर काय घडलं ते मला आठवत नाही.
मी जागा झालो तो थेट आमच्या पडवीत! माझ्या गालावर कुणीतरी चापट्या मारत होतं. आईच रडणं पुसटसं ऐकू येत होत. माझ्या तळपायाला खाऊआजी काश्याच्या वाटीने चोळत होती. माझे डोळे जड झाले होते काही उघडायचं नाव घेत नव्हते. सारख्या वाफा येत होत्या अंगातून. कुणीतरी अंगावर कोलीत टाकलंय असं वाटत होतं. डोक्याच्या मागे मार लागल्यासारख्या कळा येत होत्या. माझ्या कानावर काहीस पडत होतं
"खोतानु, दादा माका अण्णा सरमळकराच्या दुकानाजवळ भेटले. अंग निखाऱ्यासारखं तापत होतं. काय घेतलानी होती काय कालच्याला थोडी??"
"नाय पण मी काय म्हंतो ते भुत्याच्या पुलावरून आले काय दादा काल?” बाबू गुराखी म्हणाला.
"नाय…! मग ते आंबोशी फाट्यावरच्या पिंपळाखालून आले असतील...!” म्हादू ने आपलं तोंड घातलंच.
"मी बघतो पोरगा कुठून आला ते. नारळ तेवढे उतरवून झाल्यानी असतील तर निघा. मधल्या वाडीच्या बुवांना सांगा खोतांनी बोलावलंय म्हणावं…!"
आबा त्यांना सोडायला म्हणून चक्क अंगण्यात गेले. तसे ते गड्यांशी मोजकच बोलायचे पण आज त्यांचा सूर विनंतीचा वाटला. आबांनी बांबू गेट लावलं आणि पडवीकडे येत होते. एव्हाना मला जरा शुद्ध आली होती. आता माझी काही खैर नाही. आबा फोकलणार. तेवढ्यात मी आडवा झालेलो त्या पडवीत एका बाजूला असलेल्या आरामखुर्चीत आबा बसले.
आईला म्हणाले," ऐकताय का? गंगा जमुना पुरे झाल्या जगबुडीला पूर यायचा… जरा घोटभर चहा टाका...! चिवडा आणा. जरा तुमच्या पोराला काय हवंय बघा...खिमट खातोय का म्हणून विचारा"
आबांचं असं बोलणं नेहमीचंच होतं. आज मात्र आबा रागात नव्हते. थोडे चिंतेचे आणि थोडे टोमण्याचे सूर वाटत होते.
आई आपल्या नऊवारीच्या पदराने तोंड पुसत, हमसत रडत आत निघून गेली. मी जरा उठून बसलो.
"आबा ते काल... म्हणजे मी निघालेलो... ती एष्टी गेली... “ मला बोलायचं काय ते कळत नव्हतं.
"बापाची चप्पल पोराच्या पायात बसायला लागली कि बापाने पोराला काही विचायचं नसतं...! त्यासाठी पोराने त्या लायकीच असावं लागतं... रात्री अपरात्री फिरत जाऊ नका... चिरंजीव.... आमच्यावर तुमचे तर्पण करण्याची वेळ आणू नका... "
आई चहा आणि चिवडा घेऊन आली. "अहो, तुम्ही काय अभद्र बोलताय...?”
"आबा, पुलावर ते दोघे भेटले तरीपण घरी पोहोचलो... नशीब समजा. नाहीतर होत या वर्षी माझं... “मी जरा रागातच बोललो.
आबा खुर्चीवरून ताड्कन उठले. मला वाटलं आता मी मेलो. चहाचा कप घेतला आणि माझ्या शेजारी येऊन बसले. आबांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले,
"चप्पल बघ जरा तुझी... लिंबू चिरडलं होतंस तू... चालताना खाली बघून चालायचं... आपण झोंबडीत राहतो... शहरात नाही... काय म्हणाले मोरे तुला?”
आबांच्या या प्रश्नाने मी जरा थबकलोच.
"आबा त्या पुलावर इतक्या रात्री कशाला त्या दोघांना उभा ठेवलाय? इतक्या थंडीवाऱ्याचं, पावसा पाण्याचं ते दोघे तिथेच असतात का??" मी आपलं सहजच विचारलं.
"ते हवालदार गावाच्या वेशीची रखवाली करायला नेमले होते." आबा बोलले
"आता कोण येतय या ओसाड गावात... काय ठेवलंय आपल्या गावात? चार डोकी ज्यांची बागायत आहे. बाकीच्यांची पोरं गेली मुंबईला कामाला... आणि आबा तुम्ही कधी सरपंच होता मला ते पण नाही आठवत ..!”
आबा म्हणाले एक गोष्ट सांगतो तुला,
"माझे आजोबा १९१२ सालापासून या गावचे खोत होते. आपला हा पिढीजात धंदा आहे. त्याकाळी १९२५-जेव्हा काकोरी लुटली तेंव्हा आपल्या गावचे दोन लोकं त्यात सामील होती. त्यांनी तिथून लुटलेला ऐवज आपल्या गावी आणला होता. त्याकाळी मोरे आणि शिर्के हे दोन हवालदार ब्रिटिशांची चाकरी करत होते. माझ्या आज्याने त्या हवालदाराच्या घरासाठी खूप काही केलं होत. त्यांना आपण कसायला जमीन दिली होती वरच्या वाडीची. तर मी काय सांगत होतो... ते दोन हवालदार माझ्या आजोबांच्या शब्दाबाहेर नव्हते. जसे काकोरीची लूट गावात आली तेंव्हा हा खजिना सांभाळून ठेवायला हवा म्हणून आजोबांनी त्यांना या गावाच्या वेशीची रखवाली करायला सांगितली...!”
“आबा अहो हे काय शोले आहे का? काहिहि सांगताय तुम्ही? कसला खजिना? कुठे आहे?या गावात आपल्याशिवाय श्रीमंत दुसरा कुणी नाही.. आणि ते हवालदारांची पुढची पिढी पण हवालदारच झाली मग?”
"तुला कळत नाहीये मी काय म्हणालो ते..!" ते दोघे तेच हवालदार आहेत त्यांना तुझ्या पणजोबांनी नेमलं होतं.
आपल्या गावात तेंव्हा ब्रिटिशांचे पोलीस आणि अधिकारी आले होते. त्यांना गावाच्या वेशीपाशी थोपवून धरलं. त्या चकमकीत मोरे आणि शिर्के यांचा जाग्यावर मृत्यू झाला. नंतर कितीतरी वेळा या पुलावरून ब्रिटिशांनी गावात यायचा प्रयत्न केला, परंतु कधी कुणी तो पूल पार करू शकला नाही."
"म्हणजे मला भेटले ते भुत होते ...!” माझी पाचावर धारण बसली.
मग मला लक्षात आलं कि त्यांनीच मला त्या पुलावर धरून ठेवलं होत रात्रभर.
च्यासला मलाच का?हैराण केल्यानी..पाय अजून दुखत होते. इतक्या दिवसात कधी त्या पुलावर कुणाला चकवा लागल्याचं ऐकलं नव्हतं. आबा तालुक्याला गेले कि कितीवेळा उशिरा यायचे पण त्यांना कधीच तस झालं नाही.
माझं विचारचक्र चालू होत तेवढ्यात आईने जेवायला हाक मारली. आम्ही जेवून ओसरीवर पांगलो होतो. माझ्या डोक्यात एकच विचार होता? खरंच खजिना असेल कि उगाच आबा गोष्टी सांगतायत? मी आमच्याकडे काम करणाऱ्या म्हादू ला विचारलं,
"काय मग म्हादू काय म्हणत होतास सकाळी?”
"नाय छोटे मालक काय नाय..काय नाय .! हे आपलं असंच...!"
"आता सांगतो कि आबांना सांगू तू सुपारी चोरून दिंडे वाण्याला विकतो ते?" आता त्याची तारांबळ उडाली होती.
"नाय मालक आओ तसा नाय म्हंजे पुलावर ते हवालदार आहेत ते आहेत पण पुलाच्या या बाजूला एक बिवलकरीण आहे"
"कोण? आता तू काहीतरी वेगळ नको सांगुस. चायला नीट सांग सकाळी सकाळी टाकून आलाय काय रे?”
"बगा मालक मी बोल्लेलो मला माहिती होत तुम्हाला खरा नाय वाटणार ते. तुमच्या पणजोबांच लफडं ..."
"म्हादू, काय बोलतोयस कळतंय का तुला...?”
"होय मालक, तुमाला चकवा लागल्यावर तुमी कुठे आले फिरून पुलाच्या सुरुवातीला ना? तुमच्या चपलेला लिंबू होता. चिरडलान तुमी म्हणून तिची नजर तुमच्याकडे गेली."
"मग तिने मला मारलं का नाही?”
"मालक ती बिवलकरीन जवान पोरांना नादाला लावते.... आपल्या भोवती फिरवते आणि मग त्यांची जवानी काढून घेते.” म्हादू एकदम रंगात आला होता. त्याने एक वेगळी गोष्ट सांगितली.
बिवलकरीन म्हणजे कांता बिवलकरीण. तिचा नवरा म्हणे ब्रिटीश सैन्यात होता नि त्याला ब्रिटीश लोकांनी मंडालेत धाडला होता.अनेक वर्ष तो घरी परतला नाही आणि सासू सासरे वारले मग तिच्या वाहिनीला हि जड झाली म्हणून त्याने तिला पुण्याच्या त्यांच्या वाड्यातून हाकलवून लावले. तेव्हा ती माहेरी आली.
कांताला मोठे खोत लहानपणापासून आवडत पण लग्नाचा योग जुळला नाही कारण गोत्र सारखे होते. भाऊ आणि भावजयीला तिचा त्रास व्हायला लागला कारण तिचा तोल तुमच्या पणजोबाना म्हणजे त्यावेळच्या खोताना पाहून ढळत होता. खूप प्रयत्न करून सुद्धा खोताने तिला उभि केलीन नाही. सोयरिक होऊ शकत नाही म्हणून शेवटी तिने विष खाऊन जीव दिला.
तिच्या पाठीमागे भावाची २ पोरं शिकून मोठी झाली नी इंग्लंडला निघून गेली ती पुन्हा परत आली नाहीत. भाऊ भावजय म्हातारे होऊन मेले नि शेवटी तुमच्या आजोबांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले
त्यांच्या लाकडी वाड्याच्या वाशांना आता वाळवी लागली आहे. भुरट्या लोकांनी जे काही नेता येईल ते नेलं. दारं, खिडक्यांची तावदानं, स्वयंपाक घराची फडताळ, विरहिवरचं रहाट सगळं नेलं. आत्ता त्या वाड्याच्या भिंतीही वाळवीने खाल्ल्या होत्या.
तो जीर्ण वाडा पाहून नेहमी वाटे कि हा असा उजाड का ठेवून दिलाय? मला नेहमी वाटे त्या वाड्यामध्ये आपल्या गावी हायस्कूल सुरु व्हावं किंवा एखाद छोटसं रुग्णालय तरी. ह्याबद्दल मी बाबांना बोललो सुद्धा होतो पण त्यावेळेस त्यांनी अनेक वेळा टाळाटाळ केली होती.
हि हकीगत ऐकून माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं. मी आईला याविषयी विचारलं तर ती म्हणाली,
“ हे बघ विश्वनाथा, मला याबद्दल अक्षरही विचारू नकोस. मी काही सांगायची नाही!”
मी खाऊ आजीचा लाडका होतो. खाऊ आजी म्हणजे माझ्या आजोबांची पाठची सख्खी बहिण कुसुम. तिला चिपळूणात दिली होती. पण तिचा नवरा कसल्याशा आजाराने गेला आणि तिला आजोबांनी माघारी आणली होती कारण सासरचे तिला केस भादरून लाल अलवण नेसून अंबू करणार होते. माझे आजोबा या प्रथेच्या विरुद्ध होते. त्यामुळे आजही खाऊ आज्जी रंगीत पातळात असे. गम्मत म्हणजे एवढे वय असून देखील तिच्या डोक्यावरचे केस अजूनही काळेभोर होते.
तिची खोली माजघराला लागुनच होती. मी खाऊ आजीच्या खोलीच्या दारावर टकटक केली.आजी जरा पहुडली होती. तिने डोळे किलकिले करून पिवळ्या बलच्या प्रकाशात मला पहिले ती अंथरुणातच उठून बसली. मी तिच्या बाजूला जाऊन बसलो.
शाळेत असताना माझा हा दिनक्रम असे. घरी परत आलो कि मी तिच्या बाजूला येऊन बसत असे. मग ती तिच्या उश्याशी ठेवलेल्या बटव्यातून काजूगर, तळलेला बिब्बा, शेंगदाणे वगैरे काहीतरी माझ्या हातावर ठेवत असे. आणि माझ्या डोक्यावर तिच्या जवळच्या वाटीतल खोबरेल लावत असे. आणि मग काश्याच्या वाटीने पाय कीट निघेस्तोवर रगडून देत असे. कॉलेजात जायला लागल्यापासून जरा शिंग फुटली होती त्यामुळे मी तिच्याकडे येणं जवळपास बंदच केलं होतं.
मला पाहताच ती सवयीप्रमाणे बटवा काढण्यासाठी वळली. तिने माझ्या हातावर आटवलेल्या आमरसाचा गोळा ठेवला. आणि वाटीतले तेल माझ्या पायांना लावून काश्याच्या वाटीने हळुवारपणे मायेने घासू लागली..
“ खाऊ आजी, कांता बिवलकरीण कोण होती गं?”
आजीचा हात अचानक थांबला आणि तिने क्षणभर विचार केला आणि काहीच ऐकू न आल्याचे नाटक केले आणि पुन्हा पाय घासायला सुरुवात केली. मी पुन्हा आजीला तोच प्रश्न विचारला. तेव्हा आजी बोलू लागली.
“कांता बिवलकरीण म्हणजे वेशीजवळच्या बिवलकरांच्या वाड्यातले शेवटचे कन्यारत्न. आपल्याच दशातले ते बिवलकर. तिला लहानपणापासुनच अप्पा खूप आवडायचे. म्हणजे माझे वडील. त्यांच्यात चांगलं वीस एक वर्षाचं अंतर होतं अप्पा देखील त्यावेळी तीस पस्तीस वर्षाचे असतील. त्यांनाही कांता आवडायची. तेव्हा ती एकसारखी काही न काही कारण काढून आपल्याकडे यायची. ती अप्पांना भेटण्यासाठी येते हे तिच्या वडिलांनी ओळखलं होतं. सगोत्र लग्न, त्यांच्या वयातील मोठे अंतर आणि अप्पांची दुसरी बायको असे प्रकरण होऊ नये म्हणूनच घाईघाईने ती चौदा वर्षांची होताच पुण्याच्या कानिटकरांकडे तिची सोयरिक जुळवून तिला पाठवून दिले होते. पण पुढे तिचा नवरा म्हणे ब्रम्हदेशात युद्धात मारला गेला नि तिला माघारी यावे लागले. पहिले प्रेम समोर येताच तिच्या मनात साहजिकपणे अप्पांच्या बद्दल आकर्षण निर्माण झाले. पण विधवा झालेल्या कांतेला अप्पांनी नाकारले आणि याचाच राग तिने मनात धरला....”
खाऊ आजी पुढे काही सांगणार इतक्यात आबांचा आवाज आला.
“ विश्वनाथा, बाहेर ये बघू”
बुवा आले होते त्यांनी मला पडवीत त्यांच्या समोर सतरंजी वर बसण्यास सांगितले. मग माझ्या डोक्यावरचा एक केस उपटून काढला. डोळ्यासमोर धरला त्याच्याकडे बुवा एकटक बघू लागले. थोड्या वेळात त्यांनी डोळे मिटले आणि काहीतरी मंत्र पुटपुटु लागले. मग त्यांनी डोळे उघडले.
“ बिवलकरीणच आहे. मागल्या आठवड्यात मी एका पोराच्या अंगातून उतरून लिंबू दिलेल्न. ते तुमच्या पोराने चिरडल्यानि त्यामुळे तिला वाड्यातून बाहेर यायला वाट मोकळी झाल्ये. तो पोरगा वरच्या पाटातला कायतरी गम्मत म्हणून चिलीम फुकायला बिवलकरणींच्या वाड्यात गेलानी नि तिथे जाऊन काहीतरी उचलून घरी आला आणि आला तशी तापला. मी त्याच्या अंगावरून बिवलकरणीला लिंबात उतरवली होती आणि लिंबू तिठ्या वर टाकायला दिल होता आणि बहुतेक धाकट्या खोतानी ते पायाखाली घेतल्यानी. त्यामुळे ती आली. मोरे आणि शिर्के चा चकवा पुलावर लागला ते बरंच झालं नाहीतर रात्री ३ पर्यंत बिवलकरणीचा वाडा ओलांडला जरी असता तरी तिने धाकट्या खोताना खाल्ल्यानी असता.”
माझ्या अंगावर काटा आला. मी आतापर्यंत चकवा लागला म्हणून त्या दोघांना दोष देत होतो. पण त्यांनी तर माझा जीव वाचवला. नंतर बुवांनी एका आरशाला काजळ लावले नि त्या आरशामध्ये माझे प्रतिबिंब पाहून लगेच आरसा झाकला. नि पुडी बांधून आबांकडे दिला. सांगितले हा आरसा लवकरात लवकर खाडीत बुडवून टाका.
हा प्रकार घडून गेला आणि मी थेट पुन्हा माजघरात जागा झालो. मधल्या काळात आबांनी आरसा बुडवला असावा पण मला मात्र आता बरे वाटत होते. मी पुन्हा खाऊ आजीकडे गेलो. तिला माहित होते मी येणार ती म्हणाली,
“ये विश्वनाथा बैस “ तिने तळलेले चार गरे माझ्या हातावर ठेवले आणि मी काही पुढे बोलायच्या आत ती पुढे सांगू लागली.
“ तुझे पणजोबा अगदी तुझ्यासारखे दिसायचे.”
असं म्हणून तिने तिचे अंथरुणाची वळकटी केली. तिच्या गादीखाली जमिनीत एक लाकडी दरवाजा होता. तो तिने मला उघडायला सांगितला. आतमध्ये २ फुटाचा चिरे वापरून बांधलेला खड्डा होता. त्यामध्ये आबा म्हणत होते तो खजिना लपवलेला होता. त्यात एक जुनी फाईल होती ज्यामध्ये विश्वनाथ रामचंद्र बिवलकर यांचा एक फोटो होता.
तो आजीने समोर धरला आणि म्हणाली.
“ हे तुझे पणजोबा”
मी आश्चर्यचकित झालो. “ हे तर अगदी माझ्यासारखे दिसतात. मला मिशी आली कि मी सुद्धा आगदी असाच दिसेन.” इतके साम्य! मी तो फोटो पाहुन चक्रावून गेलो. मग आजीने तो फोटो पुन्हा त्या खड्डया मध्ये ठेवून ते दार लावायला सांगतिले. मग आजी म्हणाली
“ मिळाली का सगळ्या प्रश्नाची उत्तरे?”
मी मानेनेच होकार दिला आणि तिकडून निघून येऊन माझ्या माजघरातल्या अंथरूणावर येऊन पडलो.
त्या रात्री मला खूपच शांत झोप लागली आणि माझ्या स्वप्नात कांता बिवलकरीण आली. खूपच सुंदर, घारे डोळे, रेखीव भुवया, गोरीपान नितळ कांती, काळेभोर केस, सुबक ठेंगणी! माझ्या मनात लगेच विचार आला कि हिला पणजोबांनी का बरे नाकारले असेल. पण सगळ्या प्रश्नांची उत्तर नसतात. आणि असली तरी सगळी तुम्हाला माहित असायलाच हवीत असं नसतं.
पुढे काही दिवसांनी हे प्रकरण जुनं झालं. मी पदवीधर झालो. पुढच्या शिक्षणासाठी मला आबांनी त्यांची सूत्र हलवून अमेरिकेत पाठवून दिलं आणि नंतर मी अमेरिकेत असताना खाऊ आजी, आबा आणि आई तिघे दादरला शिफ्ट झाले.
गेल्या पंधरा वर्षांत मी फक्त चार पाच वेळा झोंबडीला गेलो आहे. दर वेळेस पुलावरून जाताना वाटतं हवालदार मोरे आणि शिर्के भेटतील. त्यांचे आभार मानता येतील. पण आता त्याची गरज पडत नाही. म्हणून असेल कदाचित ते पुन्हा मला कधीच दिसले नाहीत.
लेखक : अक्षय मिलिंद दांडेकर