Get it on Google Play
Download on the App Store

झुंजूमुंजू

माझी आजी दररोज सकाळी सकाळी उठायची आणि  आंघोळ करून तयार व्हायची, मग नंतर विठ्ठल पूजेची तयारी सुरू करायची. मी असा एकही दिवस पाहिला नाही की आजी आमच्या आधी उठली नसेल. आधी आजी पूजेची तयारी करायची आणि मग मला उठवायची. ती म्हणायची,

“उठ बेटा, झुंजमुंजू झालं आहे.”

झुंजमुंजू या शब्दाचा अर्थ मला तेव्हा कधी कळला नाही. पण आजी पहाटेला झुंजमुंजू म्हणते हे समजण्यासारखे होते..

झुंजमुंजू हा शब्द लहानपणी कानाला ऐकायला वेगळाच नादमय वाटत असे. आई म्हणायची, सकाळ झाली. बाबा सुद्धा सकाळ झाल्याला सकाळ झाली असेच म्हणत असत. पण आजीला जाग येत असे तेव्हा मात्र ती ‘झुंजूमुंजू झालं’ असं म्हणत असे.

आजी उठली की मग मी उठायचो. आजी विठ्ठलाच्या पितळी टाकाला तांब्याच्या छोट्या घंगाळात स्नान घालत असे. मग ती अंगणातून चार तुळशीची पाने तोडून आणायची. ती पितळेच्या छोट्या वाटीत ठेवून ती त्यात कधी साखर तर कधी लोणी विठ्ठलासमोर ठेवायची.

मग मी हात जोडून विठ्ठलाकडे पाहत रहायचो की विठ्ठल आधी साखर खातोय की लोणी कि दोन्ही? विठ्ठलाने भले तुळशीची सगळी पाने खाल्ली तरी चालतील पण साखर आणि लोणी त्याने वाटीतच सोडावे असे माझ्या मनात रोज येत असे. आणि कदाचित त्यालाही ते ठाऊक असावेआजी मला डोळे बंद करायला सांगायची. मी डोळे बंद करायचो. पण लगेच हळूच उघडायचो. मला वाटायचं की विठ्ठलाने साखर आणि लोणी खाल्ल तर? झुंजूमुंजू झाल्यावर इतक्या लवकर मला उठण्याचा काय उपयोग?

मग आजी छोटीशी घंटा वाजवायची, किण किण किण... आणि मग त्यानंतर  अभंग, गवळण, भजन आणि मग आरती म्हणायची. मी जवळपास दहा वीस मिनिटे आजीसोबत विठ्ठलाच्या पूजेला उभा असे. आजीची पूजा संपायची आणि मग माझ्या तळहातावर लोणी आणि साखर याचा एक गोळा पडायचा. वेळेवर उठून वीस मिनिटे पूजेला उभे राहण्याचे ते बक्षीस आहे असे मला वाटत असे. त्या वेळचा हा दिनक्रमचं बनला होता.

तेव्हा झुंजमुंजू झाल्यावर उठण्याचा फायदा असा झाला की माझी आजी निवांतपणे पूजा करायची आणि मला लोणी साखरेचा प्रसाद हमखास मिळायचा. आजीने विठ्ठलाची पूजा एक दिवसही चुकवली नाही.

असो तर मग, आज मी आजीबद्दल सांगत नाहीये. मला कल्पना आहे की सगळ्यांच्या आज्या विठ्ठलाची पूजा करतात. प्रत्येकाच्या आज्या आपापल्या नातवाला लोणी साखर खायला देतात. पण सगळ्यांच्या आज्या आपापल्या नातवांना झुंजुमुंजू झाल्यावर उठवतात की नाही हे मला माहीत नाही पण माझी आजी मात्र उठवायची.

"उठ बाळा, झुंजमुंजू झालं आहे."

बरीच वर्षे उलटून गेली. आजी काही वर्षांपासून पुण्यात काकांकडे राहायला गेली होती. ती तिकडे तिच्या गुडघेदुखीवर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत होती. त्यावेळेस मी आजीला भेटायला पुण्याला गेलो होतो.

आजीला वेळेवर जाग आली. मग मी ज्या खोलीत झोपलो होतो, त्या खोलीत आजी आली आणि म्हणाली

“उठ बाळा, झुंजमुंजू झालं आहे."

अनेक दिवसांनी झुंजमुंजू हा शब्द कानावर पडला. मी लगेच अंथरुणातून उठलो. त्या दिवशी मी आजीला विचारले.

“आजी, झुंजमुंजू म्हणजे काय? सकाळ का? कि सूर्योदय?"

आजी गालातल्या गालात हसायला लागली. मग ती हळूवारपणे म्हणाली,

“बेटा, झुंजमुंजू होणे म्हणजे फक्त पहाट होणे असा अर्थ नाहीये, झुंजमुंजू ही एक शक्ती आहे, जिच्यामुळे डोळ्यांना सर्व काही दिसते. अंधार दूर झाला की मग झुंजमुंजू होतं. झुंजमुंजू सूर्य उगवायच्या आधी होतं. झुंजमुंजू म्हणजे जीवन! झुंजमुंजू हा सूर्योदयाचा संकेत आहे. झुंजमुंजू सूर्याच्या आगमनाचा मार्ग मोकळा करते. झुंजमुंजूच सूर्याला प्रकाश देण्यास प्रवृत्त करतो.हेच झुंजमुंजू नेहमी तुमच्या हृदयात ठसवून ठेवा. जेव्हा तुम्ही झुंजमुंजू तुमच्या हृदयात ठसवाल, तेव्हा तुम्ही तुमच्या मन:चक्षुंनीहि बघायला शिकाल. झुंजमुंजू ही एक अशी शक्ती आहे जिच्यामुळे डोळ्यांना दिसू लागते. मनात झुंजमुंजू नसेल तर डोळ्यांना काही दिसू शकत नाही....

तेव्हा मला या सगळ्याचा नक्की अर्थ कळला नव्हता पण शब्द मात्र जसेच्या तसे लक्षात राहिले आणि नंतर आयुष्याचा अर्थ उमगला.

धेनु चरती करती रानधावा

कोकीळ वाजवी सुरेल पावा

भल्या पहाटे झुंजूमुंजू झालं

सुवर्णमय मग जग हे झालं

©अक्षय मिलिंद दांडेकर

 

 

झुंजूमुंजू

अक्षय मिलिंद दांडेकर
Chapters
झुंजूमुंजू