Get it on Google Play
Download on the App Store

५ चुनौती इन्स्पेक्टर सुधाकर कथा १-३

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

इन्स्पेक्टर सुधाकर या शहरात नुकतेच बदलून आले होते .सुधाकरचा अत्यंत शिस्तशीर वक्तशीर व  कडक इन्स्पेक्टर म्हणून लौकिक होता .थोडय़ाच दिवसांत त्यांनी शहरात आपला जम बसविला होता आणि दरारा निर्माण केला होता.

आज सुधाकर ऑफिसमध्ये जरा लवकरच आले होते. संगणकावर गेल्या दिवसांतील  निरनिराळ्या स्वरूपाच्या गुन्ह्यांची जंत्री व माहिती ते पहात होते. एक पोलीस त्यांच्यासमोर येऊन सॅल्यूट करून उभा  राहिला.सुधाकरानी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले .त्याने सुधाकरांच्या हातात एक बंद पाकीट दिले.त्या पाकिटाच्या स्पर्शावरून आंत काहीतरी कडक काटकोनी चौकोनी वस्तू असावी असे वाटत होते . त्यांनी ते पाकीट उघडले . पाकीट उघडता उघडता हे कुणी आणून दिले असे त्यांनी त्या पोलिसाला विचारले.दहा बारा वर्षांचा तो एक लहान मुलगा होता, असे तो पोलीस म्हणाला.त्याला तू कुठे पाहिले आहे काय? असे विचारता तो पोलीस म्हणाला,खात्री नाही तरी हा बहुधा बूट पॉलिश करण्यासाठी कोपऱ्यावर बसतो असे मला वाटते. जाऊन खात्री करून घेता येईल.त्यांनी त्या पोलिसाला मुलाला घेऊन येण्यास सांगितले .   

पाकिट उघडल्यावर त्यात एक खेळण्याच्या पत्यातील पान (प्लेइंग कार्ड) होते.तो बदामचा एक्का होता .एक्क्याच्या बाजूला एका मुलीचा फोटो चिकटवलेला होता.ती मुलगी खुर्चीवर बसलेली होती. तिचे हात खुर्चीला बांधले होते.तिचे पायही बांधले होते .एका दोराने तिला खुर्चीला बांधले होते.सुधाकरला त्या फोटोत काहीतरी विशेष आहे असे लक्षात आले .ज्या मुलीला अशा प्रकारे खुर्चीला बांधले आहे तिला अर्थातच गुंडानी पळविलेले असणार .स्वाभाविक तिला पळविताना तिचे कपडे केस मेकअप विस्कटला गेला पाहिजे .या मुलीचे केस कपडे मेकअप सर्व व्यवस्थित होते.ही गोष्ट आश्चर्यकारक होती .

त्यांना आणखी एक अाश्चर्यकारक गोष्ट आढळून आली.गुंडांच्या ताब्यात असलेली मुलगी घाबरलेली पाहिजे .ती रडत असली पाहिजे  किंवा रडवेली झालेली असली पाहिजे.ही मुलगी शांत दिसत होती. तिने आपला चेहरा कितीही गंभीर ठेवण्याचा प्रयत्न केला असला, कितीही घाबरलेला ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरी नीट निरखून पाहिल्यावर तिच्या चेहरर्‍यावर हास्य व मिस्किल भाव असल्याचा भास होत होता . सुधाकरानी मॅग्निफाइंग ग्लास काढून त्या फोटोचे नीट निरीक्षण केले.त्याना आलेली शंका बरोबर होती .या मुलीच्या संमतीने तिला बांधण्यात आले असावे .ही मुलगी आपणहून चालत जे कुणी होते त्यांच्याबरोबर आली असावी अशा निर्णयाला इन्स्पेक्टर आले .

त्यांनी त्या कार्डाची मागची बाजू पाहिली .त्या बाजूवर वर्तमानपत्रातील अक्षरे कापून चिकटवलेली होती.त्यामध्ये एक संदेश होता . संदेश पुढीलप्रमाणे होता.

"आम्ही तुम्हाला अगोदरच सूचित केल्याप्रमाणे या मुलीचे अपहरण केले आहे.तुम्ही खरेच हुषार असाल तर आम्हाला शोधून काढा.नाहीतर तुम्ही हरला हे वर्तमानपत्रात आम्ही सुचविल्याप्रमाणे जाहिरात देऊन मान्य करावे ."

तो संदेश पाहून इन्स्पेक्टर सुधाकरना आठ दिवसांपूर्वी आलेल्या पत्राची आठवण आली.ते पत्र त्यांनी गंभीरपणे घेतले नव्हते .कोणीतरी त्यांची केलेली चेष्टा असे समजून  टेबलाच्या खणामध्ये ठेवून दिले होते .कार्डच्या पाठीमागील मजकूर वाचून मात्र इन्स्पेक्टर सुधाकरांचा चेहरा गंभीर झाला. सुधाकरनी ते पत्र खणामधून काढून पुन्हा वाचण्यास सुरुवात केली . आजच्या संदेशाप्रमाणेच ते पत्र वर्तमानपत्रातील अक्षरे कापून ती चिकटवून तयार केलेले होते . फक्त अक्षरे एका पांढऱ्या कागदावर चिकटवलेली होती .पत्र पुढील प्रमाणे होते.

"माननीय इन्स्पेक्टर सुधाकरजी,"

"तुम्ही या शहरात येऊन कामाचा नवीन चार्ज घेतला आहे .अत्यंत हुषार इन्स्पेक्टर, कोणत्याही कामाच्या मुळापर्यंत जाण्याची कला अवगत असलेला इन्स्पेक्टर,अशी तुमची ख्याती आहे .काही दिवसांपूर्वी, या शहरात आलात म्हणून तुमचा नागरी सत्कार करण्यात आला .त्यावेळी तुम्ही पोलीस शेवटी गुन्हेगाराला शोधून काढतातच.त्यांचे मार्ग त्यांचे त्यांनाच माहीत असतात .कायद्याचे हात लांब आहेत अाज ना उद्या गुन्हेगार त्यांच्या तावडीत सापडतोच.मी तुमच्या शहरातील गुन्हेगारी कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करीन वगैरे लंब्याचवड्या गप्पा मारीत होता .तेव्हाच आम्ही तुमची परीक्षा घेण्याचे ठरविले .तुमच्या तथाकथित कीर्तीप्रमाणे व तुमच्या भाषणाला अनुसरून तुम्ही किती सक्षम अधिकारी आहेत त्याची परीक्षा अाम्ही घेणार आहोत. मी पुढील काही दिवसांत एका मुलीचे अपहरण करणार आहे.तुम्ही त्या मुलीला व आम्हाला, अपहरण करणाऱ्यांना शोधून काढायचे आहे .  जर तुम्ही त्यात यशस्वी झाला तर तुम्हाला रुपये पंचवीस हजार इनाम म्हणून देण्यात येतील .अयशस्वी झालात तर तुम्ही जनतेची जाहीर माफी मागायची आहे ."

कुणीतरी आपली चेष्टा केली असे समजून त्यांनी ते पत्र त्यावेळी सीरियसली घेतले नव्हते .

आता त्यांनी ते पत्र आलेल्या कार्डवरील संदेशा शेजारी ठेवले. दोघांची तुलना करायला व  निरीक्षण करावयाला सुरुवात केली.तेवढ्यात पोलिसाने दरवाजावर टकटक केली .प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहता त्याने तुम्ही सांगितलेला मुलगा पकडून आणला आहे.त्याला आंत आणू का ?असे विचारले.इन्स्पेक्टर होय म्हणताच पोलिस त्याला आंत घेऊन आला.  

तो मुलगा थरथर कापत होता .साहेब मी काही केले नाही मला उगीच यांनी धरुन आणले आहे असे तो सांगू लागला. सुधाकरनी त्याला जवळ बोलावले. त्याच्या खांद्यावर हळुवारपणे थोपटून त्याला शांत केला .तो शांत झाल्यावर त्याला ज्या कुणी  तुला हे पत्र इथे देण्यास सांगितले त्याला तू ओळखू शकशील का ?असे विचारले.मुलाने होकारार्थी मान हलवली.तो मुलगा  पुढे म्हणाला त्याने मला शंभर रुपयांची नोट दिली व  हे पत्र येथे आणून देण्यास सांगितले .तो कोणत्या वाहनातून आला होता असे विचारता मुलगा म्हणाला ,तो होंडाच्या क्रूझर मोटारसायकलवरून आला होता.मी ती मोटारसायकल केव्हाही बघितल्याबरोबर लगेच ओळखीन. मोटरसायकलचा लाल रंग उठून दिसत होता .त्या मोटारसायकलचा नंबरही त्याने सांगितला .हल्लीची लहान मुले स्मार्ट असतात.लांबून मोटार किंवा मोटारसायकल पाहून ते लगेच त्याचा प्रकार कंपनी सांगू शकतात.नंबर लक्षात ठेवण्याची त्यांची हातोटीही विलक्षण असते .

मुलाचा त्यांनी जबाब घेतला. त्यावर त्याची सहीही घेतली. ठसेतज्ञाला  बोलवून त्यांनी पाकीट व कार्डवरचे ठसे घेण्यास सांगितले.कार्डवर फक्त सुधाकरांचे  ठसे होते .याचा अर्थ कार्ड पाठविणाऱ्याने हातमोजे घालून,ते कार्ड व्यवस्थित पुसून नंतर पाकिटात टाकले होते.आपले ठसे मिळू नयेत याबाबत तो सावध होता .

पाकिटावर मात्र बरेच ठसे होते .सुधाकर, पोलीस,मुलगा यांचे ठसे  आणि आणखी एक अज्ञात ठसा होता .

*आठ दिवसांपूर्वी आलेल्या पाकिटावरील व आंतील कागदावरील ठसे त्यावेळी घेऊन इन्स्पेक्टरनी जतन केले होते.*

*संशयित गुन्हेगार सापडल्यास त्याची ओळख पटविण्यासाठी या ठशांची अनमोल मदत होणार होती.*

(क्रमशः)

३१/५/२०२०©प्रभाकर  पटवर्धन