Get it on Google Play
Download on the App Store

६ वांझोटी १-२

(ही कथा व पात्रे काल्पनिक आहेत साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

रामनगर येथील प्रसूतिगृह चार मजली होते .रात्रीचे दोन वाजले होते .कॉरिडॉरमधून एक नर्स भरभर चालत होती . चालता चालता ती एका खोलीमध्ये शिरली.ही खोली दिवसा त्या बाईने अगोदरच हेरून ठेवली होती. चार दिवसांची बाळंतीण तिथे गाढ झोपली होती .तिचे बाळ पाळण्यात झोपले होते.सर्व गाढ झोपले होते .रिसेप्शनिस्ट गुरखा सर्व पेंगत होते .नर्सने बाळाला हातात घेतले व ती कॉरिडॉरमध्ये आली.इकडे तिकडे पाहात तिने चटकन कॉरिडार ओलांडला व ती लिफ्टमध्ये शिरली .तळमजल्यावरही गुरखा पेंगत होता .बाळाला घेऊन ती हॉस्पिटलच्या  बाहेर पडली.जरी कुणी अर्धवट झोपेत किंवा जागृत अवस्थेत तिला पाहिले असते तरी कुणीतरी नर्स आहे असे समजून  तिकडे दुर्लक्ष केले असते.म्हणूनच तिने नर्सचा पोशाख केला होता .

हॉस्पिटल बाहेर पडल्यावर ती तेथील एका झाडाखाली आली .झाडाच्या सावलीत  एक तीस वर्षांची बाई उभी  होती.काहीही न बोलता तिने ते चार दिवसांचे बाळ तिच्या हवाली केले.त्या बाईने दिलेले पाच हजार रुपये तिने मुकाट्याने घेतले.आणि काहीही न बोलता ती निघून गेली.जवळच एक टॅक्सी उभी होती .बाळ घेवून ती बाई त्या टॅक्सीत बसली.टॅक्सी जवळच असलेल्या गावाच्या दिशेने निघाली .

टॅक्सीतून जाताना त्या  बाईला सर्व भूतकाळ आठवू लागला.सात वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले त्यावेळी ती किती आनंदात होती .त्यावेळी ती नुकतीच बी कॉम झाली होती .दिसायलाही ती बऱ्यापैकी देखणी होती .तिला पहिल्यांदाच दाखविली आणि लगेच ती पसंत पडली .तिचे सासर बऱ्यापैकी श्रीमंत होते .नवरा सरकारी ऑफिसमध्ये वरच्या पोस्टला होता.स्वत:चा बंगला होता.प्रेमळ सासू सासरे भरभरून प्रेम करणारा नवरा स्त्रीला आणखी काय हवे असते ?तिला केव्हा केव्हा आपले  शिक्षण फुकट चालले आहे असे वाटत असे.एक दोनदा तिने मी कुठे नोकरी करू का असे विचारून पाहिले .त्याला विशेष असा अनुकूल प्रतिसाद कुणी दिला नाही .नंतर तीही ती गोष्ट विसरून गेली.

असे सर्व काही गोड गोड छान छान चालले  चालले असताना एक वर्ष केव्हा निघून गेले तेही कळले नाही.एक दिवस सासूने तिला विचारले की अजून तुला दिवस कसे राहिले नाहीत?ते कंट्रोल बिंट्रोल तुम्ही करता का ?आता पुरे करा पहिले मूल लवकर झाले म्हणजे सर्व दृष्टींनी बरे असते .त्यावर तिने हसून फक्त होय आई असे म्हटले होते.

रात्री नवरा खोलीत आल्यावर तिने त्याला त्याच्या आईने काय म्हटले ते सांगितले .त्यावर नवऱ्याने हेच मजा करण्याचे दिवस आहेत. नंतर चूल मूल रांधा वाढा  उष्टी काढा आहेच असे म्हणत तिचे बोलणे उडवून लावले .असेच आणखी एक वर्ष गेले .आता मात्र सासूने दोघांनाही सुनावले .दोघांनाही आता आपल्याला मूल झाले पाहिजे असे मनापासून वाटू लागले होते .

अशीच वर्षांमागून वर्षे चालली होती .नियंत्रण वगैरे केव्हाच थांबविले होते .

सासूची शेजार्‍यांची  नातेवाईकांची लागट खोचक बोलणी ऐकावी लागत होती .

आज ना उद्या दिवस राहतील म्हणून सर्व वाट पाहात होते .

फॅमिली डॉक्टर स्त्री स्पेशालिस्ट अंगारे धुपारे नवस सर्व काही चालले होते.

हळूहळू इतरांच्या वर्तणुकीत फरक पडू लागला .तिला कुणीही डोहाळे जेवण बारसे वाढदिवस याला बोलवीत नाहीसे झाले .तिच्या तोंडावर व पाठीमागे तिला वांझोटी म्हणून सर्वजण म्हणू लागले.कुणी जवळची मैत्रीण शेजारीण किंवा नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बाळंत झाल्यावर जर ती भेटण्यासाठी गेली तर तिथे सर्व जण नाक मुरडत असत .कुणीही तिला बाळाचा चेहरा दाखवत नसे .स्वागत तर दूरच परंतु ही कशाला येथे आली असा सर्वजण चेहरा करीत असत .

तिच्याकडून सणासमारंभात वाढदिवसाच्या दिवशी कुणी ओवळूनही घ्यायला तयार नसे.तिला ओवाळण्यासाठी कुणी बोलवीतही नसे.तिच्या हातात ओवाळण्यासाठी समारंभात कुणी तबकही देत नसे.

ती अपशकुनी आहे असा समज पसरला होता .

लहान बाळाला तिची दृष्ट लागते असाहि समज सर्वत्र पसरला .  

तिनेही कुत्सित नजरा टाळण्यासाठी, लागट बोलणी ऐकावी लागू नयेत म्हणून, अशा कुठल्याही  समारंभाला जाणे बंद केले .

ती अकस्मात कुणाच्या घरी गेली आणि जर तिथे एखादी बाई आपल्या बाळाला पाजत असेल तर ती लगेच तिच्याकडे पाठ करीत असे .

जणू काही ती मुले खाणारी लावसट आहे अशा दृष्टीने तिच्याकडे सर्व बायका पाहात असत.

हळूहळू सासूच्या वागणुकीत बदल होऊ लागला .जी सासू तिचे कौतुक करीत असे तीच आता तिला कुजके नासके हृदयाला घरे पाडणारे बोलू लागली .आवडतीची ती आता नावडती झाली . तिला नवरा हाच एक आधार होता. तो तिच्या पाठीमागे भक्कमपणे उभा होता.

अशीच दोन तीन वर्षे गेली .आमचा मुलगा एकुलता एक आहे. एवढी इस्टेट कुणाच्या घशात घालायची. आम्हाला एक वारस पाहिजे.वंशाला दिवा निदान पणती तरी पाहिजे असे उद्गार घरात वारंवार निघू लागले.

नंतर तिच्या नवऱ्यावर हिला घटस्फोट दे आणि पुन्हा लग्न कर असा दबाव येऊ लागला.

या सगळ्या दबावाखाली ती खंगू लागली.एक दिवस सासूने तिला बाजूला घेऊन विचारले की तशी काही गडबड आहे का ?कमी जास्त काही खावेसे वाटते का ?हे ऐकून तिच्या डोक्यात एक कल्पना आली .

तिने लाजत लाजत हो म्हणून सांगितले .

खोटे खोटे लाजताना तिच्या काळजाचा थरकाप होत होता . 

तिने दिवस गेल्याचे नाटक सुरू केले.

चिंचा बोरे खावीशी  वाटतात असे ती सांगू लागली.

खोट्या खोट्या ओकाऱ्या काढू लागली .

अमुक हवे अमुक नको म्हणून सांगू लागली .

केव्हा केव्हा भूक असतानासुद्धा भरल्या ताटावरून नमस्कार करून ताट बाजूला सारून उठून जाऊ लागली .

उशिरा का होईना तिला दिवस गेल्याची सर्वांची खात्री पटली .हे सर्व नाटक तिने नवऱ्याला सर्वकाही सांगून सुरू केले होते.

सासूने तिला दिवस गेल्याची खात्री करण्यासाठी व त्याचप्रमाणे योग्य औषध योजना करण्यासाठी एका स्त्री स्पेशालिस्टकडे जाण्याचे सुचविले .एवढेच नव्हे तर ती तिला घेऊन स्त्री डॉक्टरकडे गेली.

आता तिची परीक्षा होती .तिथे पितळ लगेच उघडे पडले असते.परंतु तशी ती हुषार होती .

*डॉक्टर तपासत असताना तिने त्यांना मला तुम्हाला काही खासगी सांगायचे आहे असे सांगितले.*

*सासू अर्थातच बाहेर बसली होती .तिने थोडक्यात सर्व काही सांगितले .*

*तुम्ही सासूला मला दिवस गेले आहेत असे सांगा व काही टॉनिक लिहून द्या अशी विनवणी केली.*

(क्रमशः)

१७/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन