Get it on Google Play
Download on the App Store

पंचकल्याणी

कुशीनर देशांत देवव्रत नावाचा एक क्षत्रिय वीर राहात होता. धनुर्विद्येत फार हुशार होता. त्याच्या जवळ त्याची शस्त्रे आणि पंचकल्याणी नांवाचा घोडा ह्याशिवाय काही हि नव्हते. तो गांवाच्या बाहेर जंगलांत एका किल्ल्यांत राहात असे. मोठ्या कष्टानें तो दिवस कंठीत असे. त्याने आपल्या खर्चासाठी म्हणून एक एक करून सर्व हत्यारे सुद्धा मोडलीन. एक घोडा तेवढा राहिला. तो त्याला जिवापाड जपत असे. साऱ्या कुशीनर नगरांत त्याच्या सारखा चांगला घोडा नव्हता.

जवळच एका राजाला मालावती नांवाची एक मुलगी होती. फार सुरेख होती ती. तिच्याशी लग्न करण्यासाठी बरेच युवक येऊन गेले. पण राजाने त्यांपैकी कोणालाच पसंत केले नाही. त्याच्या मनांतून आपली मुलगी एखाद्या धनाड्याला द्यावी, असें होतें. योगायोग असा की मालावतीची आणि देववर्माची गांठ पडून ओळख झाली होती. हळू हळू त्यांचा परिचय वाढत गेला व त्याचे प्रेमांत रूपांतर झाले होते रात्री साधारण अंधार पडल्यावर देवव्रत मालावतीला भेटण्यासाठी ठरावीक पाऊल वाटेने येत असे व त्याच वाटेने परत जात असे. त्यामुळे ती वाट त्याच्या घोड्याच्या सुद्धा ओळखीची झाली होती. असेच काही दिवस गेल्यावर देवव्रताने विचार केला की विनाकारण असे हे दिवस घालविणे बरे नाही. म्हणून एक दिवस तो निर्धार करून राजा सुप्रतिष्ठाकडे गेला.

देवव्रत म्हणाला, "माझं तुझ्या मुलीवर प्रेम बसलें आहे. म्हणून मी तुझ्याजवळ तिला मागणी घालण्यासाठी आलो आहे. माझी विनंती मान्य करा आणि मालावतीचे माझ्याशी लग्न लावून दे."

सुप्रतिष्ठ मोठ्याने हसून म्हणाला, “कुठला भिकारी आला आहे, म्हणे माज्या मुलीवर तूझे प्रेम आहे. आहे काय तुझ्याजवळ एक त्या गोठ्याशिवाय?"

देवव्रत निराश होवून निघुन गेला. सुप्रतिष्ठाचे म्हणणे काही खोटे नव्हते. काही दिवसांनी तेथे, धनगुप्त नावाचा एक गृहस्थ मालावतीला मागणी घालण्यासाठी आला. धनगुप्त देवव्रतापेक्षा जरा जास्त श्रीमंत होता.

तो म्हणाला, “महाराज, माझ्याजवळ अलोट संपत्ती आहे. जर तुमची आणि माझी दोघांची संपत्ति एकत्र झाली तर आपण नरपूज्य साक्षात श्री कुबेराचेच अवतार होऊ, पण यासाठी मालावतीचे माझ्याशी लग्न लावून दया."

धन लोभी राजा त्याला कबूल झाला. त्याने धनगुप्ताच्या वयाचा विचार सुद्धा केला नाही. सुप्रतिष्ठाने धनगुप्ताला जावई करण्याचे ठरविलें, हे मालावतीला कळले तेव्हां तिला फार वाईट वाटले. पण काय करते बिचारी...! वेळेची वाट पाहात स्वस्थ बसली. राजाच्या या निश्चयावर सर्व लेक हंसू लागले, तरी पण राजाने आपला निश्चय बदलला नाही. लग्नाचा मुहूर्त ठरला. लग्नाची वेळ जवळ आली.

नवरदेवांची मिरवणूक घोड्यावरून काढावयाची असे ठरले. त्या करता सुंदर घोडा पाहिजे होता. तेव्हां त्याची दृष्टि देवव्रताच्या घोड्यावर गेली. त्याने आपल्या नोकरांना आज्ञा दिली की जंगलांत जाऊन देवव्रताकडून त्याचा घोडा मागून आणा. राजाचे नोकर जंगलांत गेले आणि देवव्रताजवळ घोडा मागितला. तेव्हा त्याला मालावतीच्या लग्नाची गोष्ट कळली. त्याला फार वाईट वाटले. पण तरी सुद्धा त्याने घोडा देण्याचे ठरविले व आपला आवडता घ्प्दा पंचकल्याणी आपल्या प्रेयसीच्या लग्नासाठी पाठवून दिला.

लग्नाच्या आदल्या दिवशीची रात्र होती. पौणिमेचे दुधासारखें स्वच्छ चांदणे पडले होते. अशा रमणीय वेळी धनगुप्ताला मालावती बरोबर फिरावयास जाण्याची उत्कट इच्छा झाली. त्याने राजाला धनगुप्ताने त्याप्रमाणे कळविले. राजाने मालावतीच्या बरोबर आपल्या एका मंत्र्याला पाठवून त्यांना फिरावयास जाण्याची परवानगी दिली. मालावतीची इच्छा नसून सुद्धा तिला धनगुप्ताबरोबर जावे लागले.

तिघे फिरत फिरत बाहेर आले. राजवाड्याच्या द्वाराजवळ तीन घोडे तयार होते. त्यांत एक घोडा देवव्रताचा होता. मालावतीने पंचकल्याणी घोड्यास ओळखले. ती चटकन त्या घोड्याजवळ जाऊन उभी राहिली. त्यानंतर मंत्री व धनगुप्त दुसऱ्या दोन घोड्यांवर बसले. अशा तऱ्हेने तिघे जण फिरावयास निघाले. राजपथावरून तिन्ही घोडे चालले होते. तेव्हां धनगुप्ताला आपले कौशल्य दाखविण्याची दांडगी इच्छा झाली. त्याने आपला घोडा भरधाव सोडला. मंत्री दिवसभराच्या कामाने थकला होता. म्हणून तो डुलक्या देतच घोड्यावरून चालला होता. मंत्र्याचा घोडा हळू हळू राजपथावरून चालला होता. पण पंचकल्याणी मात्र ओळखीची पाऊल वाट लागतांच त्या वाटेने जाऊं लागला व सरळ तो आपल्या मालकाच्या घरा समोर येऊन उभा राहिला.

घोडा थांबताच मालावती भानावर आली. ती थोडी गोंधळली. आपल्याच घोड्यावर बसून आलेल्या मालावतीला पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने जवळ येऊन मालावतीला विचारले,

“मालवती प्रिये, इतक्या अपरात्री ती येथे कशी आलीस??”

देवव्रताला पाहून तिला फार आनंद झाला.

ती म्हणाली, “मी मंत्र्याला बरोबर घेऊन धनगुप्ताबरोबर चांदण्यांत फिरावयाला निघाले होते. वाटेंत त्या दोघांचे घोडे कोठे गेले मला समजले नाही. मी कोठे जात आहे हे सुद्धा मला समजले नाही. पण  मला पंचकल्याणी इथवर घेऊन आला. आता मी येथून परत जाणार नाही."

अनायास चालून आलेली संधि देवव्रताने फुकट घालविली नाही. त्याने तेव्हांच पुरोहिताला बोलावून मालावतीशी आपले लग्न लावून घेतलें. इकडे धनगुप्त परतला. मंत्री परतला. पण मालावलीचा पत्ता नाही. राजाने सर्व शहरांत तिचा शोध केला. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी घोड्याच्या पावलांच्या अनुरोधानें राजाने देवव्रताकडे दूत पाठविले.

तेथे मालावती होती. परंतु तो पर्यंत देवव्रताशी तिचे लग्न झाले होते. देवव्रत गरीब म्हणून आपणच त्याला हंसलों होतो. आता आपल्याला तोच दरिद्री जावई मिळाला म्हणून लोक नावे ठेवणार. म्हणून राजाने आपलें अर्ध राज्य त्याला देऊन मोठया मानमरातबाने आपल्या घरी बोलावून घेतले.

पुढे मालवती व देवव्रत पंचकल्याणी घोड्या बरोबर सुखाने राहू लागले.

पंचकल्याणी

कथाकार
Chapters
पंचकल्याणी