Get it on Google Play
Download on the App Store

सूड

वज्रगिरीचा राजा विक्रम सिंह ह्याला पद्ममुखी नांवाची एक मुलगी होती. ती फार सुंदर होती. म्हणून तिच्याशी लग्न करण्यासाठी दूर दूर देशांच्या राजकुमारांनी प्रयत्न केला. त्यांत रत्नगिरीच्या इंद्रवर्माला विक्रमसिंहाने पसंत केले. पद्ममुखीला हि तोच राजकुमार आवडला. संगपुरचा राजा कालकेतु याच्या मनातून सुद्धा पद्ममुखीशी लग्न करावयाचें होते. त्याच्या आईने त्याला सुचविलें की तू विक्रमसिंहाला जाऊन भेट, बहुतेक तो तुझे म्हणणे कबूल करील. आईच्या म्हणण्याप्रमाणे कालकेतु विक्रमसिंहाला भेटला. आपली इच्छा व्यक्त केली. परंतु विक्रमसिंहाने त्याला होकार दिला नाही. बिचारा उलट्या पावली परतला. तो परतल्यावर विक्रमसिंहाने इंद्रवर्माला बोलावून त्याच्याशी पद्ममुखीचे लग्न ठरविले.

तो आनंदाने रत्नगिरीस आला व लग्नाची तयारी करूं लागला. त्याच वेळी डोंगरी लोकांच्या टोळीने रत्नगिरीवर हल्ला केला. इंद्रवर्मानें वज्रगिरीच्या विक्रमसिंहाजवळ मदत मागितली. जावयाचा निरोप कळतांच राजा व त्याचा मुलगा शक्तिसिंह दोघे हि निघाले. ही बातमी शृंगपुरला पोहोचली.

तेव्हां कालकेतूची आई त्याला म्हणाली, “आचा वज्रगिरीला कोणी नाही, तूं सैन्य पद्ममुखीला पळवून आण. येथे तुम्हा दोघांचे लग्न लावू. तसे केलेस तरच विक्रमसिंहाचे डोळे उघडतील. मग बसेल तो पश्चात्ताप करीत."

आईच्या आज्ञेप्रमाणे त्याने पदमुखीला कैद करून आणलें. रत्नगिरीच्या युद्धांत विक्रमसिंह मारला गेला. इन्द्रवर्माला पदच्युत केल्यामुळे तो राज्य सोडून निघून गेला होता. ही सर्व बातमी पोहोचावयास मुळीच वेळ लागला नाही. इंद्रवर्माची अशी स्थिति झालेली ऐकून सर्वाना वाईट वाटले. त्यांनी विचार केला की पद्ममुखी आता कालकेतुशी लग्न करील. पण तिने नकार दिला.

“माझ्या वडिलांनी ज्यांना मला देण्याचे ठरविले आहे त्यांच्याशीच मी लग्न करीन, दुसऱ्या कोणाला हि वरण्यास मी तयार नाही." पद्ममुखीने निक्षून सांगितल.

कालकेतूच्या आईने पद्ममुखीच्या इच्छे विरुद्धच तिच्याशी लग्न करण्यास सांगितले. परंतु तो हि स्वाभिमानी होता.

कालकेतू म्हणाला, "जेव्हा तिला वाटेल तेव्हांच मी लग्न करीन. पाहूं या किती दिवस अशी राहते ती."

कालकेतूच्या आईनें पद्ममुखीची समजूत घालण्यासाठी रागावून, धाक दाखवून सर्व तऱ्हेचे प्रयत्न करून पाहिले. पण पद्ममुखीनें आपला निश्चय बदलला नाही.

कालकेतूची आई पद्ममुखीला म्हणाली, “मला वाटले होते की तूं माझ्या मुलाशी लग्न करून माझी सून होऊन माझा मान राखशील. पण तुझे डोळे अजून उघडले नाहीत. ठीक आहे. रहा येथे कैदी म्हणून."

तिने आपल्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच तिच्याकडून नोकरांची कामे करून घेण्यास सुरवात केली. भांडी घासणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, राजवाडा झाडणे वगैरे कामें तिला करावी लागत. रात्री कोठे तरी ती एका कोपऱ्यांत आडवी होई. आपल्या आईचे हे काम कालकेतू व त्याची बहीण दोघांना हि आवडले नाही.

कालकेतू नेहमी आईला म्हणे, "ती एका मोठ्या राज्याची राजकुमारी आहे. तिला मानानें वागवण्यांतच आपला मोठेपणा आहे."

“आला आहे मोठा शहाणा. तिला वठणीवर आणायला हाच उपाय आहे. बघते कशी नाहीं कबूल होत तें. तुझ्याशी तिचे लग्न लावूनच मी प्राण सोडीन." आईच्या ह्या हेकेखोर बोलण्यावर कालकेतू काहींच बोलू शकला नाही.

तीन वर्षे गेली. काळजीने, दुःखाने आणि कामाच्या भारानें पद्ममुखी अगदी अशक्त झाली. एक दिवस नित्याप्रमाणे पद्ममुखी कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. तिने नदीच्या पैल तिरावर एक नाव डुलत असलेली पाहिली. कपडे धुता धुतां ती नावेकडे सारखी पाहात होती. नाव हळू हळू जवळ येत होती. थोडी जवळ आल्यावर तिला त्यांत दोन माणसें दिसली. नाव आणखी जवळ आल्यावर तिने त्या दोघां व्यक्तींना ओळखलें.

एक तिचा भाऊ शक्तिसिंह होता व दुसरा मनाने वरलेला पति इन्द्रवर्मा. तिला खूप आश्चर्य वाटलें व आनंद हि झाला. जर तिने त्यांना ओळखले नसते तर कदाचित त्यांची भेट झाली नसती. कारण ते तिला ओळखू शकले नव्हते.

"शृंगपूर हेच का? ह्या देशाच्या राजाचंच नांव कालकेतू नाही काय?" शक्तिसिंहानें पद्ममुखीला विचारले.

पद्ममुखीने 'हो' म्हणून सांगतांच त्याने विचारले की “कालकेतूनें वज्रगिरीच्या राजकुमारीला पळवून आणले होते ती जिवंत आहे काय..?"

"तिला कालकेतूची राणी होणे पसंत नसल्याने ती राजकुटुंबाचे कपडे धुण्याचे काम सध्या करते आहे. गुलामच आहे त्यांच्या घरची." असे सांगतांना तिला गहिवरून आले.

पद्ममुखी म्हणाली, “शक्ति, मला ओखळलें नाहींस का रे?”

आपल्या बहिणीला अशा त-हेनें कष्ट करीत असतांना पाहून त्याला फार वाईट वाटले. इन्द्रवर्माच्या हि डोळ्यांना पाणी आले.

"तुझी भेट झाली फार चांगले झाले. रत्नगिरीच्या राजाने डोंगरी लोकांच्या राजाचा पराभव करून पुन्हा आपले राज्य मिळविलें आहे. इन्द्रवर्माच त्याचा राजा आहे. परंतु तुझा पत्ता लागल्याशिवाय तो राज्याभिषेक करून घ्यावयास तयार नाही. आम्ही तेव्हां पासून तुझ्या शोधासाठी सारखें हिंडत आहोत." शक्तिसिंह म्हणाला.

“आपण आत्तांच हिला आपल्या नावेंत घालून घेऊन जाऊ.” इन्द्रवर्मा म्हणाला.

“पण त्याला मी असा सोडणार नाही...! ज्याने माझ्या बहिणीला पकडून आणून इतका त्रास दिला आहे. त्याला असें नुसते सोडीन होय…! ते काही नाही. उद्या सकाळी अचानकपणे, आपण किल्ल्यावर हल्ला चढवू या. इतक्या दिवस घालविलेस तसाच आजचा एक दिवस घालव. उद्या सकाळी तुझी सुटका करून घेऊन जातो."

एवढे सांगून शक्तिसिंह नाव घेऊन निघून गेला. “मी आतां एका राजपुत्राची बहीण आहे. एका राजाची बायको होणार आहे. मी आतां कपडे कशाला धुवू?" असे समजून पदामुखीने सारे कपडे नदी कांठींच टाकून दिले व घरी परतली.

पद्ममुखीला घरी येण्यास उशीर झाला होता. अर्थातच म्हातारीच पित्त खवळले.

ती एकदम गर्जना करून म्हणाली, "नदीवर ऐवढा वेळ लावलास तर बाकी काम केव्हां करणार...? मला वाटतं तुझी एकदां चांगलीच कानउघाडणी केली पाहिजे."

“जरा तोंड संभाळून बोला.” पद्ममुखीने जरा कठोर स्वरांत म्हटलें.

“हं...! इतकी घमेंड..? थांब तुला चाबकाचे फटकेच हवेत." असें म्हणत आईनें शिपायांना बोलाविलें.

पद्ममुखी म्हणाली, “मी राणी होण्याचा काल निश्चय केलाच आहे. जर माझ्या अंगाला कोणी हात लावाल तर उद्यां चामडीच लोळवीन एकेकाची.”

पद्ममुखीच्या तोंडून ते शब्द ऐकतांच कालकेतूची आई फार खुश झाली. एका क्षणांत तिचा राग कोठल्या कोठे लयास गेला. हे वर्तमान तिनें क्षणाचा हि विलंब न लावतां कालकेतूला कळविले. त्याला हि फार आनंद झाला. शेवटीं पद्ममुखी माझ्यावर प्रसन्न झाली असे वाटून त्याने लग्नाच्या तयारीला सुरवात केली.

दुसरा दिवस उजाडला. पहाटे पासूनच राजवाडयात धावपळ चालली होती. लग्नाच्या तयारीची गडबड चालू होती. इतक्यांत काही सैनिक धापा टाकीत टाकीत राजवाडयात आले.

ते म्हणाले, “वाड्यासमोर फार मोठे युद्ध चालले आहे."

ते पाहून आंतले सर्व सशस्त्र सैनिक तिकडे गेले आहेत. हे ऐकताच अंत:पुरांतील सर्व स्त्रिया भयभीत झाल्या. हळू हळू युद्धाचा कोलाहल जवळ ऐकू येऊ लागला. सैनिक पुन्हा पुन्हा येऊन पराजयाची बातमी देऊन जात होते. शेवटी तर एका सैनिकाने कालकेतू मारला गेल्याची बातमी दिली. तेव्हां मात्र त्याच्या आईचे डोळे पांढरे झाले. चेहेरा फिक्का पडला. ती मटकन तेथेच खाली बसली.. थोड्या वेळाने एक सेनापति आला.

सैनिक म्हणाला, "आपल्यांत पद्ममुखी कोण आहे? महाराज शक्तिसिंहाची आज्ञा आहे की त्या व त्यांच्या दासी यांना सोडून बाकी सर्वांनी मरणास तयार व्हावें."

हें ऐकतांच इंदुमतीने एकदां सेनापतीकडे व एकदां पद्ममुखीकडे पाहून मान खाली घातली. पद्ममुखीने एकदां चारी बाजूस पाहिले. सर्व स्त्रियांच्या चेहे-यावर दुःखाची छाया पसरलेली तिला दिसली.

तत्क्षण ती पुढे होऊन म्हणाली "मीच पद्ममुखी आहे आणि येथील बाकी सर्व स्त्रिया माझ्या दासी आहेत."

ह्यावर सेनापति तिला प्रणाम करून निघून गेला. थोड्या वेळाने आणखी काही शिपाई येऊन राजमातेला व तिच्या दासींना हातकड्या घालन घेऊन गेला. काही दिवसांनी शक्तिसिंहाने आपल्या बहिणीचे व इंद्रवर्माचे मोठ्या थाटानें लग्न लावून दिले व इंद्रवर्माने आपला राज्याभिषेक पण करविला. त्या नंतर पद्ममुखीनें इंदुमतीची आपल्या भावाला ओळख करून दिली.

पद्ममुखी म्हणाली, “या मुलीने मला आपली वहिनी होण्यासाठी पुष्कळ सांगितले. परंतु मला कधी त्रास दिला नाही. उलट माझ्याबद्दल तिला सहानुभूतीच वाटत होती. फार चांगली आहे ही. म्हणून हीच जर माझी वहिनी झाली तर मला फार आनंद होईल."

शक्तिसिंहाने ती गोष्ट मान्य केल्यावरून दोघांचे लग्न झाले. इंदुमति शक्तिसिंहाची राणी झाली, पण राजमाता मात्र जन्मभर पदममुखीची दासी म्हणूनच राहिली. अशा त-हेनें पद्ममुखीने आपल्याला दुःख व कष्ट दिल्याचा सूड उगवला.

सूड

कथाकार
Chapters
सूड