Get it on Google Play
Download on the App Store

भूताची टेकडी

पश्चिम घाटांत पुष्कळ लहान लहान टेकडया आहेत. त्यांतील एका टेकडीचे नांव भुताची टेकडी असे पडले आहे. धनगर, गुराखी आपली जनावरें आजूबाजूच्या टेकड्यांवर नेत असत. परंतु या टेकडीवर कोणास हि जाऊन देत नसत. कारण जो कोणी त्यावर जात असे तो कवीं परतून येत नसे. त्या भुताटकीच्या टेकडीवर एक मोठा गाईचा कळप राहात असे. सकाळी सूर्योदय होतांच त्या गाई गोठ्यांतून बाहेर येऊन चरत असत व संध्याकाळ होतांच गुराख्याने वळवल्याप्रमाणे घराकडे परतत असत. त्यांच्या पाठीमागे कधी कोणी गुराखी दिसत नसे. त्या गाईंना चारा पाणी कोण देतो शेणगोठा कोण करतो, दूध कोण काढतो, खाचा कोणाला काहीच पत्ता नव्हता. भुताटकीच्या टेकडीवर जेथे गोठा होता.

तेथे जवळच एक झोपडी होती. रोज संध्याकाळी त्या झोपडीतून धूर निघत असे. ते पाहून तेथे कोणी तरी असले पाहिजे, असा दाट संशय येई. परंतु त्या ठिकाणी कधी कोणाला मनुष्याचे दर्शन झाले नाही. सत्यपाल गुराखी होता. नवीनच तो स्था गांवांत आला होता. लोकांच्या तोंडून त्याने त्या टेकडीची कहाणी ऐकली आणि रोज ऐकत होता. त्याने स्वतः त्या टेकडीचे वारंवार निरीक्षण केले होते. तेथे चरणाऱ्या गाईना हि तो न्याहाळून पाहात असे. त्या टेकडीवर काय आहे हे स्वतः जाऊन पाहाण्याची त्याला फार उत्सुकता बाई लागली. तो मुलगा साहसी असल्यामुळे टेकडीची पाहाणी करण्याचा त्याचा उत्साह रोजच्या रोज वाढत गेला.

त्याच्या मित्रांनी त्याला पुष्कळ समजावून सांगितले, म्हणाले "अरे कशाला प्राण धोक्यात घालतोस ? त्यांतून तुला जायचंच असेल तर डोंगरावर जा. पण त्या गोठ्यांत किंवा त्या झोपडीत जाऊ नकोस. तेथपर्यंत पोहोचलेल्यांची गति काय होते माहीत आहे ना?"

सत्यपाल खंबीर मनाचा होता. त्याने तेथे जाण्याचा निश्चय केला. आणि शेवटी गेला हि तो त्या डोंगरावर. त्याला तेथे विशेष असें कांहीच दिसले नाही. काही कसलें हि भयंकर दृश्य दिसले नाहीं की अक्राळ विक्राळ आरोळ्या ऐकू आल्या नाहीत.

तो सरळ झोपडीच्या रोखाने गेला. अगदी झोपडीजवळ जाईपर्यंत त्याला कोणी अडविलें नाही. झोपडीच्या दाराजवळ जाऊन त्याने आंत डोकावून पाहिले. आंतील सामान पाहून तेथे कोणी तरी राहात असावेसे त्याला वाटले. त्याने दार ठोठावलें. कोणी आले नाही. म्हणून त्याने हाका मारल्या

"आंत कोण आहे?" त्याने विचारले.

दोनदा तीनदा हाका मारून पाहिल्या. परंतु आंतून कोणी न आल्याने तो आंत शिरला. तेथे एका बाजूला भांड्यांच्या उतरंडी होत्या. काही भांडी खाली झांकून ठेविलेली होती. सत्यपालने पाहिले त्यांत अन्न झांकून ठेविलेले होते. दुसऱ्या बाजूस एक खाट होती. त्यावर अंथरूण घातलेले होते. हे पाहून त्याला हायसे वाटला की येथे नक्की कोणी तरी राहाते आहे. बाहेर गेला असेल. कुणीतरी येईल थोड्या वेळाने म्हणून तो त्या खाटेवर आडवा झाला. थोड्याच वेळांत सत्यपालला बाहेर कोणी आल्याची चाहूल लागली. तो उठून पाहाणार तितक्यांत एक मोठा राक्षसासारखा माणूस घाईघाईने आंत शिरला व सरळ अन्नाच्या बाजूला गोला.

"खाटेवर निजलेल्याच्यासाठी सुद्धा स्वयंपाक केलेला आहे का ?" सत्यपाल जोराने ओरडला.

भूत सत्यपालाजवळ येऊन म्हणाले, “चल, जेवावयास ऊठ." 

सत्यपाल भुताला पाहून दुसरा कोणी घाबरायचा. परंतु सत्यपाल धीराचा होता.

सत्यपाल म्हणाला, "मेहनत करणाराने खावें. मी कांहीं मेहनत केलेली नाही."

ह्यावर काही हि न बोलतां भुताने अन्न वाढून घेतले व क्षणार्धात ते खाऊन चट्ट केले. नंतर भुताने कुदळ फावडं.

सत्यपालच्या हातांत देऊन “माझ्याबरोबर त्या दुमजली वाडयात चल” म्हणून सांगितले.

"मी तेथून काही हि घेऊन आलेलों नाही तर मी कशाला काही घेऊन चलं?" सत्यपाल म्हणाला.

स्वतःच कुदळ फावडे हातात घेऊन भूत म्हणाले "चल माझ्या बरोबर."

“तूं पुढे हो. मी पाठोपाठ येतो." सत्यपाल म्हणाला.

ते दोघे हि वाडयाच्या पहिल्या मजल्यावर गेले.

एके ठिकाणी जागा दाखवून “येथे खण" म्हणून भुताने सांगितले.

"मी तेथे काही सुद्धां पुरून ठेवले नाही. मग मला खणण्याची तरी काय गरज...!" सत्यपाल म्हणाला.

भुताने स्वतःच तेथे खणले. तेव्हा त्यांना एक मोठा हंडा दिसला. 

“काढ वर हा हंडा." भुतानें आज्ञा दिली.

"मी जर हा हंडा खळ्यांत पुरला असता तर उचलुन बाहेर काढला असता. मी तो पुरला नाही. म्हणून मी बाहेर हि काढणार नाही." सत्यपाल धिटाईनें म्हणाला.

भुतानेच तो उचलून वर काढून जमिनीवर आपटला. "हे झाकण उघड, भूत म्हणाले...!"

“मी नाही लावले ते झांकण. मग मी कां काढीन ?" सत्यपालने विचारले.

झांकण हि भुतानेच काढले. त्यांत सोन्याच्या मोहोरा भरलेल्या होत्या. भुताने त्या सर्व जमिनीवर ओतून त्याचे तीन ढीग केले.

सत्यपालाला म्हणाला, "सांग, यांतला कोणता ढीग तुझा? बरोबर सांगितलेस तर तुझा फायदा होईल आणि मी पण शापमुक्त होईन. जर बरोबर सांगितले नाहीस तर तुझें भस्म करून टाकीन आणि पुन्हां असाच कोणी येईपर्यंत तिष्ठत रखडत राहीन. जर मी शाप मुक्त झालों तर ह्यांतील एक हिस्सा तुझा. दुसरा गरीब लोकांचा. तिसरा मी मारलेल्या गुराख्यांच्या मुलाबाळांचा. असे हे तीन वांटे आहेत."

तिन्ही ढिगांच्या भोवती हात पसरून सत्यपाल म्हणाला "ह्यांतील एक वांटा माझा आहे."

सत्यपालाच्या तोंडून शब्द बाहेर पडतांच एकदम वीज चमकल्यासारखे झाले आणि समोरून भूत नाहीसे होऊन त्या जागी एक सुंदर मनुष्य उभा असलेला दिसला.

तो पुरुष म्हणाला, "तुझ्यामुळे मी शापमुक्त झालो आहे. मी आता जातो. हा डोंगर, या गाई, हें धन, हे सर्व आतां तुझें आहे.” असे म्हणत तो पुरुष निघुन गेला.

सत्यपाल घरी गेला. त्याला भुताच्या डोंगरावरून जिवंत घरी परत आलेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. मग त्याने डोंगरावर घडलेली सर्व हकीकत बाकीच्या गुराख्यांना वर्णन करून सांगितली. त्या नंतर सत्यपालने, भुताने सांगितल्या प्रमाणे धनाची व्यवस्था केली व आपण सुखानें त्या डोंगरावर राहू लागला. तेव्हां पासून त्या टेकडीला लोक भुताची टेकडी न म्हणतां 'सत्याची टेकडी' म्हणू लागले.

भूताची टेकडी

कथाकार
Chapters
भूताची टेकडी