Get it on Google Play
Download on the App Store

विष्णुसेन

कुंतीभोज वैरंत्य नगराचा राजा होता. त्याला दोन बहिणी होत्या. एकीचे नांव सुदर्शना होते. ती काशी राजाची राणी होती. दुसरी सुचेतना. तिला सौवीर राजाला दिले होते. सुदर्शनाला वाटले की आपल्याला एक फार तेजस्वी पुत्र व्हावा. म्हणून तिनें कुन्ती प्रमाणेच मंत्रोच्चाराने अग्नीदेवाचा साक्षात्कार करून घेतला. त्याच्या कृपेने तिला पुत्र प्राप्त झाला. पण तिला भीति वाटू लागली की जर हे काशी राजाला समजले तर तो क्षमा करणार नाही, म्हणून तिने आपल्या मुलाला सुचेतनाकडे पाठवून दिले. कारण ह्याच सुमारास तिला हि एक मुलगा झाला होता. पण तो लगेच मरून गेला होता. तिने आपल्या बहिणीच्या मुलाला ठेवून घेतले.

सौवीर राजाला संतान प्राप्तीची कल्पना होती. परंतु पुत्र मरण पावल्याची बातमी नव्हती. त्यामुळे त्याला हे सर्व कळले नाही. सुचेतनानें हि त्या मुलाचे पालन पोषण अगदी स्वत:च्या मुलाप्रमाणेच केले. त्याचे नांव तिने विष्णुसेन असे ठेविलें. विष्णुसेन अग्नितेजाने वाहू लागला.

लहानपणापासून त्याचे दैवी गुण दृष्टीस पडू लागले. तो सहा वर्षांचा असेल, एक राक्षस लांडग्याच्या रूपाने येऊन मुलांना फार त्रास देऊ लागला. विष्णुसेनाने त्याला ओळखले आणि त्याने त्याचा संहार केला. तेव्हापासून सर्व त्याला अविमारक म्हणू लागले. त्याचा अर्थ लांडग्याला मारणारा असा होतो.

एकदा सौवीर राजा जंगलांत शिकार खेळावयास गेला. तेथे वाटेत चंडमारक मुनीचा आश्रम होता.

राजाला ते मुनी म्हणाले, "माझ्या शिष्यांना वाघांचा व सिंहाचा त्रास होत आहे. जंगली प्राण्यांपासून आश्रमवासियांचे रक्षण करणे राजाचे काम आहे. मग तूं आपले कर्तव्य पालन नीटपणे का नाहीं करीत?"

मुनीचे हे उद्धटपणाचे बोलणे राजाला आवडले नाही. त्याला राग आला.

तो मुनीला म्हणाला, "तूं मुनीचा वेश करून बसलेला कोणी चांडाळ माणूस दिसतो आहेस."

मुनीनें क्षणाचा हि विलंब न लावता शाप दिला.

मुनी म्हणाला, "तूं आपल्या बायको मुलासह चांडाल होशील."

हे ऐकतांच राजा गयावया करूं लागला. त्याने मुनीचे पाय पकडून क्षमा मागितली. मुनीने शांत होऊन सांगितले की त्याच्या शापाचा प्रभाव फक्त एक वर्षभर राहील. सौवीर राजा आपल्या गावी गेला. आपले राज्य मंत्र्यांच्या स्वाधीन करून आपल्या बायको व मुलाला घेऊन तो अज्ञातवासासाठी निघाला. जाता जाता तो वैरंत्य नगरीजवळ जाऊन पोहोचला.

विष्णूसेन आता यावेळी सुमारे अठरा वर्षांचा झाला असेल. राजाला एक मुलगी होती. तिचे नांव कुरंगी. ती उपवर झाल्यामुळे राजा कुन्तिभोज वरशोधनाच्या मागे लागला होता. एक दिवस कुरंगी एका मंत्र्याबरोबर राजोद्यानांत हवा खाण्यासाठी गेली. कांहीं वेळ हिंडल्या फिरल्यावर ती परत येऊ लागली. इतक्यांत अंजनवारी हत्ती मस्त होऊन गांवांत पळत सुटला असलेला तिने पाहिला. त्याने आपल्या माहुताला हि खाली पाडून टाकला होता. रस्त्यांत सर्वकडे पळापळ सुरू झाली. कुरंगी आपल्या गाडीत बसून घरी जाण्यास निघाली होती. पण मस्त हत्ती तिच्या स्थानाकडेच धावून येत होता. तिने चटदिशी रथांतून उडी मारली व पळत सुटली.

मस्त हत्तीची वार्ता ऐकून अविमारक म्हणजेच विष्णूसेन त्याला पकडण्यासाठी तेथे आला. त्याने हत्तीला डवचून त्याचे चित्त आपल्याकडे वेधून घेतले. ही संधि साधून मंत्र्याने कुरंगीला स्थांत बसवून राजवाड्याकडे पाठवून दिले. परंतु एवढ्या अवधीत राजकुमारीने अविमारकाला पाहिले आणि त्याची हि दृष्टी तिच्यावर पडली. दोघांची दृष्टादृष्ट होतांच मनेंही चंचल झाली. चौकशी अंती राजकुमारीला समजले की अविमारक चांडाळ आहे. कुंतिभोजाच्या मनांतून कुरंगीचें लग्न सौवीर राजाच्या मुलाशी करून द्यावयाचे होते. आणि काही वर्षापूर्वी सौवीर राजाने तशी मागणी घातली हि होती. परंतु तेव्हां कुरंगी लहान असल्याचे कुन्तिभोजानें कळविले होते.

आतां तो सौवीरकडून निरोप येण्याची वाट पाहात होता. परंतु त्याचा कांहींच निरोप आला नाही. सुदर्शनाला दुसरा मुलगा झाला. त्याचे नांव जयवर्मा होते. त्याच्यासाठी सुदर्शनाने कुरंगीला मागणी घातली. परंतु कुंतिभोज अविमारकालाच जांवई करूं, इच्छित होता. याचे दुसरें कारण असे की सौवीर कुरंगीचा मामा होता. कुन्तिभोजानें सौवीर राजाकडे आपले दूत पाठविले. परंतु तेथील मंत्र्यांनी सांगितले की राजा आपल्या बायकोला व मुलाला घेऊन कोठे तरी गेला आहे. कोठे गेला आहे ह्याचा आम्हांला हि पत्ता नाही. कुरंगीने आपल्या दासींना पाठवून त्या युवकाविषयीं चौकशी करून येण्यास सांगितले. दासींनी अविमारकाचा शोध लावला व त्याला रात्री येऊन कुरंगीला भेटून जाण्यास सांगितले.

अविमारकाचे मनसुद्धां चंचल झालेच होते, परंतु जावे किंवा नाही या विचारांत तो होता. इतक्यांत त्याचा एक ब्राह्मण मित्र तेथे आला. त्याने त्याला दुजोरा देऊन जाण्यास सांगितले. त्या दिवशी रात्री तो तलवार आणि दोरखंड घेऊन राजवाड्यांत गेला. कुरंगीच्या दासी त्याची वाट पाहातच होत्या. त्यांच्या मदतीनें तो कुरंगीच्या महालांत जाऊन पोहोचला. तेव्हांच त्या दोघांनी आपला गांधर्व विवाह करून घेतला. तेव्हांपासून तो मधून मधून येऊन कुरंगीला भेटत असे. एकदा असाच तो कुरंगीकडे गेला असतां राजाला समजले की कोणी तरी कुरंगीकडे आला आहे. त्याने चौकशी केली.

अविमारक कसा तरी तेथून निसटला. परंतु तेव्हां पासून राजाने तिच्यावर कडक पाहारा ठेविला. कुरंगीला फार दुःख झाले. पण उपाय नव्हता. इकडे अविमारकाने सुद्धा कुरंगीकडे येण्याचे सोडून दिले. परंतु त्याला तिचा विरह सहन होईना. शेवटी त्याने अग्निप्रवेश करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण अग्निच त्याचा पिता असल्यामुळे त्याला त्यापासून काही इजा झाली नाही. मग तो कड्यावरून उडी मारून जीव देण्यासाठी सिद्ध झाला. परंतु त्याच वेळी कोणी विद्याधर नांवाचा ब्राह्मण आपल्या बायकोसह तेथे आला होता. त्याने त्याला अडविले. विद्याधराने त्याची सर्व हकीकत ऐकून घेतली.

विद्याधर त्याला म्हणाला-"ही जादूची अंगठी तूं आपल्या जवळ ठेव, उजव्या हाताच्या बोटांत घातलीस तर अदृश्य होशील आणि डाव्या हाताच्या बोटांत घालशील तर दिसशील. हिच्या मदतीने तूं आपल्या बायकोची भेट घे.”

आतां अविमारक दिवसाच कुरंगीच्या भेटीला निघाला. उजव्या हाताच्या बोटांत अंगठी घालन तो कुरंगीच्या महालांत गेला. तेथील दृश्य पाहून तो फार घाबरला. कुरंगीला हि विरह वेदना असह्य झाल्यामुळे गळफास लावून घेऊन ती आत्महत्येचा प्रयन करीत होती. अविमारकानें प्रकट होऊन तिला वाचविले. त्याला समोर पाहतांच तिला आनंद झाला. अविमारकाने घडलेले वृत्त वर्णन करून तिला सांगितले. तेव्हा पासून तो नेहमी अदृश्य रूपाने येऊन तिला भेटू लागला. इकड़े जयवर्मा कुरंगीशी लग्न करण्यासाठी आपल्या आजोळी आला.

परंतु कुरंगीच्या आईने सांगितले की जोपर्यंत आपल्या भावाचा मुलगा विष्णुसेन याचा पत्ता लागणार नाही तोपर्यंत कुरंगीचे लग्न करणार नाही. सौवीर शापमुक्त होतांच कुन्तिभोजाकडे आला. त्याला उदास पाहून कुन्तिभोजानें त्याचे कारण विचारले.

तो म्हणाला "कांहीं दिवसांपासून माझा मुलगा कुठे दिसत नाही. कोठे असेल कोण जाणे."

“नारायण, नारायण” करीत तेथें नारद आला.

कुन्तिभोजराजाने त्याचे स्वागत केले. नंतर त्याला विचारले की

“सौवीर राजा, पुत्र विरहाने फार दुःखी झाला आहे. त्याचा मुलगा जिवंत तरी आहे का? तो केव्हां परत येईल?"

"जिवंतच काय, तो तर आपल्या लग्नाच्या गडबडीत आहे." नारद म्हणाला.

"काय म्हणतां..! कोणाच्या मुलीशी त्याने लग्न केले आहे?" कुन्तिभोजानें आश्चर्याने विचारले.

"वैरंत्य नगराच्या कुन्तिभोज राजाच्या कुरंगी नांवाच्या कन्येशी त्याने लग्न केलें आहे." नारदाने सांगितले.

नंतर सविस्तर बातमी कळल्यावर त्याने त्या दोघांचे शास्त्रोक्त विधीने लग्न लावण्याचे ठरविलें. नारदाने सुदर्शनाची समजूत घातली.

नारद म्हणाला, “तुझा जयवर्मा लहान आहे. म्हणून त्याचे लग्न कुरंगीच्या धाकट्या बहिणीशी लावलेले बरें."

सुदर्शनाला ते पटले. कारण तिला माहीत होते की विष्णुसेनसुद्धा तिचाच मुलगा होता. ठरल्याप्रमाणे राजा कुन्तिभोजा याने विष्णुसेन व कुरंगीचे लग्न लावून दिले.

विष्णूसेन

कथाकार
Chapters
विष्णुसेन