Get it on Google Play
Download on the App Store

१२ पाषाणहृदयी (युवराज कथा) २-२

(ही कथा काल्पनिक आहे वास्तवाशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा ) 

युवराजांनी सांगितल्याप्रमाणे संदेशने राणे कुटुंबीयांची सर्व माहिती आणली .रामराव व लक्ष्मणराव हे दोघे सख्खे भाऊ .त्यांचे वडील दशरथपंत यांचा मृत्यू झाल्यानंतर  इस्टेटीच्या दोघांमध्ये (रामराव व लक्ष्मणराव) वाटण्या झाल्या .प्रथेप्रमाणे दोन मुले असतील तर स्थावर मालमत्तेची वाटणी पुढीलप्रमाणे होते. मोठ्या मुलाकडे स्थावर संपत्तीचा दक्षिणेकडचा भाग जातो.उत्तरेकडचा भाग लहान मुलाकडे जातो.रामराव मोठे असल्यामुळे त्यांच्याकडे दक्षिणेचा भाग जाणार होता .उत्तरेचा भाग लक्ष्मणरावांकडे जाणार होता. डोंगरापासून नदी किनाऱ्यापर्यंत दशरथरावांची इस्टेट पसरलेली होती.लक्ष्मणरावाना अशी वाटणी मंजूर नव्हती.त्यांच्या म्हणण्यानुसार दक्षिणेकडचा भाग  सुपीक होता .जमिनीच्या प्रत्येक तुकड्यांमध्ये त्यांना अर्धा भाग हवा होता .अशी स्थावर मालमत्तेची वाटणी केली असती तर प्रत्येक प्रकारच्या जमिनीच्या तुकडय़ाचे दोन भाग करावे लागले असते .अशा प्रकारच्या  वाटणीमुळे सर्वांनाच जमीन कसताना वापर करताना त्रास होईल  असे रामरावाना वाटत होते .

तेव्हा त्यांनी लक्ष्मणरावांसमोर एक वेगळीच योजना मांडली.प्रथा मोडून उत्तरेकडचा भाग मी घेतो व दक्षिणेकडचा भाग तू घे असे रामरावांनी सुचविले . अशी वाटणी केली तर लक्ष्मणरावांना सुपीक भाग जाईल रामरावांकडे तुलनात्मक निकृष्ट भाग येईल.प्रत्येक प्रकारच्या जमिनीच्या तुकडय़ामध्ये दोन भाग केल्यामुळे जी अडचण व त्रास दोघांनाही होणार होता तो होणार नाही .लक्ष्मणरावानी ही योजना लगेच मान्य केली .त्यांना आता सुपीक भाग मिळणार होता .तलाठ्यांमार्फत जमिनीचे दोन भाग करण्यात आले.सातबारा उतार्‍याला नाव वगैरे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.रामरावांची दोन मुले लव व कुश हे खेडेगावात न राहाता शहरात आले.रामरावांच्या मृत्यूनंतर ती जमीन लव व कुश या मुलांकडे आली . लव व कुश यांनी वाटणी न करता ती जमीन एकत्रितच ठेवली .जेव्हा योग्य भाव येईल त्यावेळी ती जमीन विकू व पैसे समान वाटून घेवू असे लव व कुश या दोघांनीही ठरविले होते .लव व कुश दोघेही शिकले शहरात नोकरीला लागले .

लक्ष्मणरावही आपल्या मुलाबरोबर शहरात राहायला आले. लक्ष्मणरावांना एकच मुलगा राहुल तो एमएस्सी पीएचडी झाला आणि औषधी कंपनीत नोकरीला लागला .संशोधन व उत्पादन विभागाचा तो प्रमुख आहे .लवकुश आणि राहुल व लक्ष्मणराव यांचे संबंध विशेष प्रेमाचे नाहीत .नातेवाईक असल्यामुळे एकमेकांकडे कारणाकारणाने क्वचित  येणे जाणे होते. सहा सहा महिन्यांमध्ये एकमेकांकडे जाणे होत नाही . लक्ष्मणरावांच्या विचित्र स्वभावामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये  प्रेमसंबंध मुळीच नाहीत .अर्थात वैरही नाही .

महाराष्ट्र शासनाने समृद्धी महामार्गाची योजना सुरू केल्यानंतर रस्त्याची आखणी करताना संभाव्य  रस्ता रामरावांच्या म्हणजेच लव व कुश यांच्या जागेतून जातो .ती जमीन शासनाला विकून शासनाकडून चार कोटी रुपये मिळाले.एवढे पैसे एकदम मिळाल्यामुळे लक्ष्मणराव बिथरले .त्यांच्या मानण्यानुसार ती जमीन खरे म्हणजे लक्ष्मणरावांची होती.वाटणी मध्ये ती जमीन  रामरावांकडे गेली . तेव्हां जमीन विकून आलेल्या पैशातील दोन कोटी रुपये लक्ष्मणरावांना पाहिजेत.

लव व कुश हे पैसे द्यायला तयार नाहीत. प्रथेप्रमाणे तो भाग लक्ष्मणरावांकडे राहिला असता. त्यांनी हट्टाने त्यावेळी  रामरावांच्या वाटणीचा भाग उचलला. लक्ष्मणरावानी त्यावेळी त्यांचा उत्तरेकडचा भाग स्वीकारला असता तर त्यांना आज चार कोटी रुपये मिळाले असते. कागदोपत्री कायदेशीररित्या विभागणी झालेली आहे .जर रस्ता लक्ष्मणरावांच्या जमिनीतून जाता आणि त्यांना पैसे मिळाले असते तरी ते आम्ही मागितले नसते .हा ज्याच्या त्याच्या दैवाचा भाग आहे .त्यावेळी लक्ष्मणरावानीच हट्टाने दक्षिणेकडचा भाग आपल्याकडे घेतला होता .

अश्या प्रकारे चार कोटी रुपयांवरून लक्ष्मणराव निष्कारण लव व कुश या आपल्या पुतण्यांना त्रास देत होते .लव व कुश यांच्या परस्पर फोनवरील बोलण्यातून आणि त्यांचे लक्ष्मण रावांबरोबर जे फोनवर बोलणे झाले त्यातून वरील सर्व गोष्टी उलगडल्या गेल्या .

अशा परिस्थितीत लक्ष्मणरावांनी काही वेडे वाकडे पाऊल उचलले नसेलच असे सांगता येत नाही .लक्ष्मणरावांकडे निश्चितपणे संशयाचे बोट जाते.लक्ष्मणरावांच्या विचित्र स्वभावामुळे त्यांच्यावर संशय जातो.दोन्ही पुतण्यांवरील रागामुळे त्यांनी काही  भले बुरे केले नसेलच असे सांगता येत नाही .

जर रामरावांचा निर्वंश  झाला तर अर्थातच सर्व इस्टेट त्यानी मृत्यूपत्र केले नसेल तर लक्ष्मणरावांकडे जाईल. तेव्हा सर्व इस्टेट बळकाविण्यासाठी लक्ष्मणरावांनी असे वेडेवाकडे पाऊल उचलले नसेलच असे सांगता येत नाही .

ही सर्व हकिगत ऐकून युवराजांना लक्ष्मणराव दोषी असू शकतील याची कल्पना आली.परंतु एखादा मनुष्य एवढा क्रूर,उलट्या काळजाचा असू शकतो का ?असा  प्रश्न निर्माण झाला .जर लक्ष्मणरावांनी हे आठ खून केले असतील तर त्यांनी ते कसे केले? असा प्रश्न निर्माण होतो.एखाद्यावर आरोप करणे आणि तो आरोप निर्विवाद सिद्ध करणे यात फार फरक आहे .

ज्याचे नाव सांगता येत नाही असे विष त्यांनी कुठून मिळविले आणि त्याचा वापर कसा केला या गोष्टी सिद्ध करता आल्या पाहिजेत .या दृष्टीने युवराजांचे विचारचक्र सुरू झाले .

मृत्यू विषामुळे( दिल्यामुळे किंवा घेतल्यामुळे)  झाला हे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले होते .खून करण्याचे कारण मत्सर,खून लक्ष्मणरावांनी केला,असे जरी गृहीत धरले तरी त्यांनी विष कुठून मिळविले आणि ते लवकुश यांच्या घरात जावून त्यांनी ते त्यांना कसे दिले या गोष्टी स्पष्ट होणे आवश्यक होते .

बागेत सापडलेल्या काचेच्या बाटलीवर कोणतेही लेबल नव्हते.त्याचप्रमाणे त्यावर काही ठसेही मिळाले नाहीत .युवराजांना लव व कुश यांच्या मोबाइलवरील सर्व संभाषण पुन्हा एकदा ऐकले पाहिजे असे लक्षात आले.त्यातून त्या रात्री लक्ष्मणराव लव व कुश यांच्याकडे आले होते का हे कळू शकेल .त्यांनी पुन्हा एकदा मृत्यूपूर्व आठ दिवसातील सर्व रेकॉर्डिंग ऐकले .त्यातून त्यांना पुढील उलगडा झाला .

आठ दिवसांतील संभाषणामध्ये पहिले चार दिवस लक्ष्मणरावांचा भर दोन कोटी रुपये मिळण्यावर होता.

नंतर त्यांची बोलण्याची धाटणी एकदम बदललेली आढळून आली.बोलताना मी तुमचा काका ,तुम्ही माझे पुतणे ,म्हणजे मला मुलासारखेच, राहुल सारखेच ,तेव्हा अापण पूर्वी काय झाले ते विसरून जाऊ या.मला पैसे नकोत.नाते माणसे महत्त्वाची त्यांना जपले पाहिजे .असा सूर त्यांनी लावलेला आढळून आला .आपण एकदा भेटूया मनातील सर्व जळमटे किल्मिषे  काढून टाकूया असा त्यांच्या  बोलण्याचा एकूण रोख होता .

लक्ष्मणरावांचा स्वभाव पाहता त्यांचा एकूण इतिहास लक्षात घेता त्यांचा बदललेला सूर धोकादायक वाटत होता.त्या दिवशी सलोखा करण्याच्या निमित्ताने लक्ष्मणराव लव व कुश यांच्याकडे आले असतील.संधी पाहून त्यांनी विषप्रयोग केला असेल.आणि दरवाजा ओढून घेऊन ते निघून गेले असतील असा एक अंदाज बांधता येत होता .

मृत्यूच्या दुसऱ्या  दिवशी घरातील सर्व ठसे घेण्यात आले होते .लक्ष्मणरावांच्या हाताचे ठसे घेऊन त्यांची तुलना त्या दिवशी गोळा केलेल्या ठशांशी  जर केली तर लक्ष्मणराव लव व कुश यांच्या घरी आले होते हे सिद्ध करता येईल .लक्ष्मणरावांच्या हाताचे ठसे त्याना सांगून घेतले तर ते सावध होतील.त्यांना नकळत ठसे घेण्याचे युवराज यांनी ठरविले .संदेश वार्ताहर बनून लक्ष्मणरावांकडे गेला .त्यांची पुतण्यांच्या मृत्यूसंदर्भात व घराण्यासंदर्भात मुलाखत घेत आहे असा त्याने आव आणला.बोलता बोलता सिगरेट केस त्यांच्या हातात दिली .त्यांनी सिगारेट घेऊन ती परत दिल्यावर रुमालात गुंडाळून खिशात टाकली .त्यावरील ठसे ऑफिसमध्ये आल्यावर संदेशने डेव्हलप केले .

ते ठसे लवकुश यांच्या बंगल्यातील ठश्यांशी जुळले.लक्ष्मणराव लवकुश यांच्याकडे त्या दिवसा अगोदर कित्येक महिन्यात गेले नव्हते .

युवराजानी औषध निर्माण कंपनीमध्ये जाऊन राहुलची भेट घेतली .दुसर्‍या  एका औषध निर्माण कंपनीचे वकील बनून ते तेथे गेले होते.राहुलच्या कंपनीने बनविलेले नवे औषध त्यांच्या कंपनीने अगोदरच बनविलेले आहे . त्याचे पेटंट अगोदरच युवराजांनी घेतलेले आहे.ती औषध निर्मिती राहुलच्या कंपनीने थांबवावी  असा त्यांचा आव होता .बोलता बोलता त्यांनी राहुलच्या कंपनीने एक असे औषध बनविलेले आहे की ज्या औषधाने  लहान प्रमाणात घेतल्यास मानसिक उत्तेजना मिळते . मनोविकार तज्ञ ते वापरतात. मनुष्य डिप्रेशनमधून बाहेर येतो .परंतु जास्त प्रमाणात घेतल्यास मृत्यू होतो .मुळात ते औषध रंग चव वासहीन आहे .वगैरे गोष्टी जाणून घेतल्या.

कंपनीने व्हिजिटबुक ठेवलेले होते .त्यात लक्ष्मणराव येऊन गेल्याची नोंद होती .कंपनीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही ते दिसले .शामरावांमार्फत कंपनीकडून सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यात आले होते.ते औषध मूळ स्वरूपात असताना लक्ष्मणरावांनी मिळविले असले पाहिजे .नंतर दुसर्‍या एका कोऱ्या बाटलीमध्ये भरून ते लवकुश यांना भेटण्यासाठी गेले असावेत . तिथे गोड गोड बोलताना लवकुश यांच्या नकळत त्यांनी ते दुधामध्ये मिसळले असले पाहिजे .सर्वांबरोबर दूध घेण्याचा बहाणा त्यांनी केला असला पाहिजे .ग्लास हातात असताना वॉशबेसिन जवळ जाऊन त्यांनी ते ओतून टाकले असावे .नंतर ते तेथून निघून गेले असावेत .असा एक अंदाज युवराजांनी बांधला .

स्वयंपाक घराच्या खिडकी बाहेरील जागेत लक्ष्मणरावांचा बुटांचे बरेच उलट सुलट  ठसे आढळून आले .दुधात विष टाकल्यावर त्यांनी बाटली अनावधानाने बाहेर फेकली असावी.ती बाटली शोधण्याच्या प्रयत्नात लक्ष्मणरावांच्या बुटांचे उलट सुलट ठसे बागेमध्ये उमटले असावेत असा  अंदाज युवराजानी बांधला.

साखळीतील निरनिराळे दुवे जोडल्यावर पुढील चित्र निर्माण झाले.

लव कुश यांना चार कोटी रुपये मिळाल्यामुळे लक्ष्मणराव मत्सराने जळू लागले .त्यातील दोन कोटी मिळविण्यात ते असफल झाल्यावर त्यांचा राग अनावर झाला .काहीही करून लवकुश कुटुंबाचा संपूर्ण काटा काढण्याचा निश्चय त्यांनी केला .आपल्या मुलाच्या राहुलच्या कारखान्यावर जाऊन त्यांनी विष मिळविले.सलोखा करण्याच्या मिषाने ते रात्री लवकुश यांच्याकडे पोहोचले .संधी साधून त्यांनी ते विष दुधात टाकले .अनवधानाने त्यांनी ती बाटली खिडकीतून बाहेर फेकली .स्वतःचा ग्लास वॉशबेसीनमध्ये  रिकामा केला.त्या बाटलीवरील त्यांचे ठसे त्यांनी अगोदरच पुसून टाकले होते.  परंतु बाटली खिशात न टाकता त्यांनी ती बाहेर फेकली .हे लक्षात आल्यावर ती बाटली ते बाहेर बागेत शोधत होते  .या गडबडीत वॉशबेसीनवर ठेवलेल्या ग्लासावरील ठसे पुसण्यास ते विसरले .त्या विषाचा परिणाम फार हळूहळू होतो त्यामुळे लक्ष्मणराव निघून गेल्यावर झोप येते म्हणून सर्व कुटुंबीय झोपण्यासाठी गेले आणि त्यांचा झोपेतच मृत्यू झाला. 

केवळ मत्सर व क्रूर स्वभाव यांचा हा सगळा परिणाम आहे .आपल्याच सख्ख्या पुतण्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांनी उद्ध्वस्त केले .

शामराव मार्फत पोलीस स्टेशनला लक्ष्मणरावांना बोलविण्यात आले .त्यांच्या विरुद्ध असलेले सर्व पुरावे त्यांच्यासमोर मांडण्यात आले .त्यांना अटक करण्यात आली .अटकेच्या वेळी विष घेऊन आत्महत्या करण्याचा त्यांचा प्रयत्न विफल झाला .

*त्यांच्यावर खटला भरण्यात आला .*

*एकूण आठ खून त्यांनी केले होते .*

*लहान मुले व स्त्रियाही या मृत्यू कांडात बळी पडल्या .*

*लक्ष्मणरावांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली .*

*राणे बळी सत्र म्हणून याचा उल्लेख केला जातो.*    

१०/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन