Get it on Google Play
Download on the App Store

२ खजिन्याचा शोध २-२

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

टेकडीकडे येत असताना त्यांनी समुद्र किनारी एक विश्रांतिस्थान रिसॉर्ट पाहिले होते.तिथे जाऊन आज वस्ती करण्याचे त्यांनी ठरविले .

समुद्र किनाऱ्यावर वाळूत दोघेही एक दोन तास आराम करीत होते .काहीही न बोलता समुद्र व अस्ताला जाणारा सूर्य याकडे दोघेही स्तब्धपणे पाहत होते.क्षणोक्षणी पालटणारे आकाशाचे रंग, मावळतीला जाणाऱ्या सूर्याचे क्षणोक्षणी  बदलणारे रूप,समुद्रात लहान मोठ्या ठिपक्याप्रमाणे दिसणाऱ्या होडय़ा व जहाजे हे सर्व पाहाताना, त्या सर्व सौंदर्याचा आस्वाद घेताना त्यांची समाधी लागली होती .

सूर्य अस्ताला गेल्यावर ,संपूर्ण श्रमपरिहार झाल्यावर ,रात्र गहिरी झाल्यावर दोघेही  भानावर आले व विश्रांतिस्थानाच्या दिशेने चालू लागले.त्यांनी त्यांची मोटार तिथेच ठेवली होती .

पौर्णिमा होती.स्वच्छ चंद्रप्रकाश पडला होता.

विश्रामस्थळाकडे जाताना त्यांनी चांदण्यात न्हाऊन निघालेल्या टेकडीकडे एकदा वळून पाहिले.

उद्या ती टेकडी कदाचित त्यांच्यासमोर रत्नभांडार मोकळी करणार होती.

सुदैवाने त्यांना समुद्राच्या बाजूची खोली मिळाली होती .खोलीला अर्थातच समुद्राच्या बाजूला एक गॅलरी होती.जेवण झाल्यावर दोघेही गॅलरीत टाकलेल्या खुर्च्यांवर काही काळ  सागराकडे  पहात बसले होते.त्या समुद्रकिनाऱ्याला आणखी काही हॉटेल्स रिसॉर्ट्स होती.पर्यटक चंद्रप्रकाशात वाळूवर फिरत होते.खेळत होते .कांही जण तर त्या गारव्यात समुद्रस्नान करीत होते. आपणही त्यांच्यात सामील  व्हावे असे दोघांनाही वाटत होते.पौर्णिमेची भरती होती .क्रमशः एकाहून एक मोठ्या लाटा समुद्र किनाऱ्याकडे येत होत्या .लाटांना असणारी रुपेरी किनार फारच आकर्षक दिसत होती.लाटा बघता बघता आणखी एक लाट आणखी एक लाट असे करत ते गॅलरीतच बसले होते .दोघेही दोन दिवस प्रवास करून व आज टेकडीभोवती फिरून दमून गेले होते .उद्याचे होणारे भरपूर श्रम लक्षात घेता त्यांनी समुद्रावर जाण्याचा बेत रद्द केला .मोठ्या निग्रहाने आत येऊन दोघेही निद्राधीन झाले .  

सकाळी दोघेही भक्कम नाष्टा करून, बरोबर काही फूड पॅकेट्स घेऊन टेकडीवर जाण्यासाठी निघाले .टेकडीवर पोचल्यावर त्यांनी पद्धतशीरपणे टेकडी पालथी घालण्याला सुरुवात केली.प्रथम त्यांना एक पाण्याचे कुंड दिसले .कुंडासभोवार काही माणसे होती.चौकशी करता  या कुंडाचे पाणी गरम आहे असे लक्षात आले.पाणी काही दिवस प्याल्यावर  त्याच्या पाण्याने स्नान केल्यावर संधीवाताला आराम मिळतो असे सांगण्यात आले .कुंडाजवळ  स्नान करण्यासाठी बंदिस्त नहाणी बांधलेल्या होत्या.त्याचे पाणी बाटलीत भरून सतीशने घेतले तो त्याचे गुणधर्म पाहणार होता .

फिरता फिरता दुपार झाली.सकाळी वारा जमिनीवरून समुद्राकडे वाहत होता .टेकडीवरील वृक्षसंपदा व वारा यामुळे फिरण्याचे श्रम एवढे जाणवत नव्हते.दुपारी तीनच्या सुमारास त्यांना एका गुहेचा शोध लागला .ही गुहा स्थानिकांना माहीत नसावी .नाहीतर येथे पर्यटक दिसले असते .गुहेत शिरताना पूर्ण काळजी घेणे आवश्यक होते.साप किरडू कोल्हा लांडगा बिबट्या इत्यादी प्राणी असण्याची शक्यता होती.सुदैवाने आत कुणीही नव्हते.   

विजेरीच्या प्रकाशात दोघेही आत शिरले.गुहेमध्ये काहीतरी वायूविजन होण्याची व्यवस्था केलेली होती.त्याचप्रमाणे मंद प्रकाशही होता.गुहेचे निरीक्षण केल्यावर गजानन म्हणाला, या गुहेत आत कुठेतरी धन सापडण्याची शक्यता आहे .कमी जास्त उत्खनन करावे लागेल .सरकारी नियमाप्रमाणे आपल्याला खाजगी उत्खनन करता येणार नाही.जरी धनाचा शोध लागला तरी ते अापल्याला घेता येणार नाही.असे धन सरकारचे असते. पुरावा दिल्यावर सरकारी नियमाप्रमाणे त्यातील दहा टक्के तुला मिळतील .उत्खनन करण्यासाठी आमच्या वरिष्ठांकडे सर्व माहिती मला द्यावी लागेल.कदाचित ते जाग्यावर येवून पाहणी करतील .नंतर उत्खननाला परवानगी मिळेल.ही जागा ज्याची असेल त्याचाही त्यावर हक्क राहील.दोघेही घामाघूम होऊन गुहेतून बाहेर आले .टेकडीच्या उतारावर समुद्राकडे पाहात कड्याच्या टोकावर ते बसले.

एकंदरीत त्यांचे मिशन, घालविलेला चार दिवसांचा वेळ  खजिना न सापडल्यामुळे एकाअर्थी फुकट गेला होता.

जमेची बाजू म्हणजे दोघा मित्रांची बरेच दिवसांनी एकमेकांबरोबर  ट्रीप झाली होती.एका सुंदर पर्यटन स्थळाला भेट झाली होती .उत्खनन झाल्यास धन संपत्ती मिळाल्यास सतीशला त्यातील काही वाटा मिळाला असता .

सुंदर सागर किनाऱ्याला भेट व जोडीने घालवलेले चार दिवस ही नक्की जमेची बाजू होती .

एवढ्यात सतीशचे लक्ष समुद्रकिनार्‍यावरील खडकात उभ्या राहिलेल्या कांही मुलींकडे गेले.इतक्या दूरवरून व उंचावरून नीट कांही दिसत नव्हते.त्याने दुर्बिण घेऊन त्या घोळक्याकडे पाहिले. मध्यभागी एक मुलगी बसली होती .तिच्या भोवती काही मुली उभ्या होत्या.बसलेली मुलगी बहुधा  विव्हळत असावी.जवळच बसलेली मुलगी तिचा पाय धरण्याचा प्रयत्न करीत होती आणि ती मुलगी पायाला हात लावू देत नव्हती.बायनोक्युलरमधून बघूनसुद्धा सतीशला तिचा पाय खडकात फिरताना मुरगळला असावा अशी शंका आली .त्याच्यातील फिजिओथेरपिस्ट जागा झाला .तो कड्यावरील पायवाटेने भरभर उतरत त्या घोळक्याकडे जाण्यासाठी निघाला .त्याच्या पाठोपाठ गजाननही निघाला.

त्या मुलींजवळ पोचल्यावर त्याने त्यांना बाजूला व्हायला सांगितले. मी फिजिओथेरपिस्ट आहे. मी काय झाले ते पहातो असे सांगितले .ती मुलगी ओरडणार नको नको म्हणणार एवढ्यात त्याने तिचे पाऊल धरून एका विशिष्ट पद्धतीने ओढले.ती मुलगी एकदाच जोरात ओरडली .दुसऱ्याच क्षणी तिच्या  वेदना खूप कमी झाल्या होत्या.त्या मुली त्याच्याच शहरातील होत्या .पिकनिकसाठी त्या या समुद्र किनाऱ्याला आल्या होत्या. खडकातून फिरताना सुहासचा( त्या मुलीचे नाव) पाय मुरगळला होता.त्या मुलीना तिला उचलून मोटारीपर्यंत नेणे शक्य नव्हते.मैत्रिणींच्या खांद्यावर हात ठेवून एका पायाने लंगडत लंगडत ती मोटारीकडे निघाली होती.मोटार जवळजवळ एक किलोमीटर दूर होती .

एका पायाने लंगडत चालताना तिला खूप त्रास होत होता . मला क्षमा करा एक्सक्यूज मी,असे म्हणत सतीशने तिला सहज उचलले आणि समुद्रकिनार्‍याची वाट तो चालू लागला. सतीशने सुहासला तिच्या मोटारीत अल्लद आणून ठेवले. सुहासने सतीशचे पुन्हा पुन्हा आभार मानले.त्याचे नाव व पत्ता विचारला.नाव विचारताना खुबीने मी आपले कोणत्या नावाने आभार मानू असे विचारले. त्यानेही खुबीने आपले कार्ड तिला दिले .त्यावर त्याच्या क्लिनिकचा पत्ता फोन नंबर सर्व कांही होते.

दुसऱ्या दिवशी उत्सुकतेने तो सुहासची वाट पाहत होता.ती आपल्या क्लिनिकवर पुढील उपचारांसाठी येईल याची त्याला अंतर्यामी खात्री वाटत होती . तरीही थोडासा संदेह होता .

प्रथम ती आर्थोपेडिक  सर्जनकडे गेली होती.फोटो काढल्यावर  कुठेही मोडतोड  नाही असे आढळून आले होते.क्रेप बँडेज, विश्रांती व विशिष्ट  पद्धतीने मसाज आणि आणखी काही ट्रीटमेंट डॉक्टरनी सुचविली  होती. डॉक्टरनी तिला एका फिजिओथेरपिस्टचे नाव सुचविले होते.तिने माझ्या ओळखीचे सतीश पाडगावकर आहेत त्यांच्याकडे जाऊ का म्हणून विचारले होते.त्यावर त्यांनी त्यांच्याकडे जाल तर फारच छान होईल असे सांगितले होते.ही इज बेस्ट इन द फील्ड असेही वर म्हणाले होते.

थोडक्यात ती सतीशकडे आली.आपल्या हाताखालील लोकांकडे तिला न सोपवता त्याने स्वतः तिच्याकडे आपुलकीने लक्ष दिले.

सुहास तर दहा दिवसांत बरी झाली .परंतु दोघांच्या गाठी भेटी बंद झाल्या नाहीत .त्या चालूच राहिल्या .

लवकर लग्न कर. लग्न केव्हा करतो? मला सून केव्हा येणार?या त्याच्या आई वडिलांच्या तक्रारी लवकरच दूर झाल्या.

गजाननच्या शिफारशी वरिष्ठांनी स्वीकारल्या .ती जागा सरकारी होती .टेकडीवरील गुहेत उत्खनन करण्यात आले .तिथे सोन्याच्या प्राचीन कालीन नाण्यांनी भरलेले तीन रांजण सापडले.

त्यातील दहा टक्के अर्थातच सतीशला मिळाले. 

म्हादबाकाकाना विहीर आणखी खोल करावी असे वाटले.

सापडलेला तांब्याचा तुकडा मजुरांपैकी कुणीतरी आपल्या घरी न नेता तो म्हादबाकाकापर्यंत आला.

ते तो ताम्रपट  सतीशपर्यंत घेऊन आले.

सतीशला त्या तुकड्यात रस निर्माण झाला.

सुदैवाने पुरातत्व खात्यातील गजानन त्याचा मित्र होता.

*सुहासच्या मैत्रिणींचा गट  त्या समुद्रकिनाऱ्याला पर्यटनासाठी आला होता त्याच वेळी सतीश व गजानन खजिना संशोधनासाठी तेथे आले.*

*सतीशला दोन खजिन्यांचा लाभ झाला.*

*सर्व योगायोगाच्या गोष्टी होत.* 

*सतीश मात्र सुहासच माझा खरा खजिना असे म्हणत असतो!* 

*सुवर्ण पावलांनी सुहास सतीशच्या आयुष्यात आली असे म्हणता येईल.*

(समाप्त)

१९/९/२०२०©प्रभाकर  प्रभाकर