Get it on Google Play
Download on the App Store

७ अनपेक्षित

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )  

संगीताच्या घरी संगीता व समीर दोघेही समोरासमोर बसली होती.दोघांची प्रेमकहाणी जवळजवळ गेली तीन चार वर्षे चालू होती.महाविद्यालयातील शेवटची दोन वर्षे दोघेही बरोबर फिरत होती.संगीता हुषार होती तर समीर अभ्यासाच्या बाबतीत अनेक धावपटू पैकी एक(अाल्सो रॅन,सामान्य) होता.समीर विषमज्वराने जवळजवळ एक महिना आजारी होता.तो महाविद्यालयात व्याख्यानांना येवू शकला नव्हता.संगीता हुषार तर होतीच पण ती नोट्सही मुद्देसूद   काढीत असे.द्वितीय वर्षाची परीक्षा जवळ आली होती.त्याने संगीताला भेटून त्याची अडचण सांगितली होती. संगीताने त्याला तिच्या नोट्स द्याव्यात तो त्याच्या झेरॉक्स काढून लगेच दोन दिवसांत देणार होता.तिने काढलेल्या नोट्सवर समीर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.

ही ओळख पुढे टिकून राहिली. वाढतच गेली.समीर हुषार होता परंतु त्याचे अभ्यासबाह्य गोष्टींकडे जास्त लक्ष असे.त्याने संगीताच्या नोट्स घ्यायच्या आणि त्यावर अभ्यास करून उत्तीर्ण व्हायचे हा पायंडा पुढे चालू राहिला.एकाच ऑफिसात दोघानाही नोकरी लागली.अर्ज मुलाखत नेमणूक सर्व गोष्टी हातात हात घालून झाल्या.ऑफिसमधील कामातही दोघे परस्परांना मदत करीत असत.

दोघांचे आकडे जुळले होते.दोघांनाही निदान संगीताला  आपण एकमेकांसाठीच( मेड फॉर इच अदर) आहोत असे वाटत होते.दोघेही लग्नबंधनात लवकरच अडकणार असे सर्वांना वाटत होते.दोघे ही गोष्ट केव्हा जाहीर करतात तेच सर्व पाहत होते.दोघांकडूनही काहीही हालचाल दिसत नव्हती.गाडी कुठे अडली होते ते कुणालाच माहीत नव्हते.दोघे ऑफिसात बरोबरच येत.कॅन्टीनमध्ये एकत्र डबा खात.सिनेमागृहांत  नाटकगृहात एकत्र दिसत असत.

समीरला कुणीतरी लग्नाबद्दल विचारले की तो म्हणे मला कांही दिवस राहू द्याना एकटे.करू द्या ना मला मुक्त विहार.मला बेडीत अडकवण्याची तुम्हाला इतकी घाई कां झाली आहे?संगीताला लग्नाबद्दल विचारले की ती फक्त हसून तो विषय टाळीत  असे.

संगीताला लग्न  करण्याबद्दल आई वडिलांकडून विचारणा होत असे.समीरला आम्ही विचारू का म्हणूनही ते विचारीत असत.त्यावर नको मीच त्याला विचारीन असे संगीता उत्तर देत असे. तुम्ही नुसते मित्र आहात का? दुसरा मुलगा आम्ही बघू का म्हणूनही त्यानी विचारले होते.त्यावर ती फक्त दृढ निश्चयपूर्वक नकार देत असे.आई वडिलांना हतबुद्ध होऊन गप्प बसण्याशिवाय दुसरा उपाय नसे.

दिवस असेच चालले होते  .त्यांच्या नात्याला अपेक्षित आकार येत नव्हता.कुठे काय बिनसत होते काही कळत नव्हते.प्रत्यक्षात समीरचा लग्न करावे की न करावे याचा निश्चय होत नव्हता.संगीताला समीरने आपल्याला लग्नाविषयी विचारावे असे वाटत होते.स्त्री पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी स्त्रीला नेहमी पुरुषानेच पुढाकार घ्यावा असे वाटत असते.अर्थात हा सर्वसाधारण नियम झाला.नियमाला सन्माननीय अपवाद असतातच.पुरुषांनी आपल्याला प्रपोज करावे आणि आपण उदार होऊन (प्रेमभावनेने) होकार देऊन  त्याला कृतार्थ करावे, असा बहुधा स्त्रियांचा विचार असावा,असा माझा अंदाज आहे.असो. पण समीर विचारीत नव्हता आणि संगीता तो आपल्याला आज ना उद्या विचारील  म्हणून अपेक्षेने आतुरतेने  वाट पहात होती.

संगीताच्या पाठीमागे तिच्या आईवडिलांचा लग्नासाठी सतत ससेमिरा सुरू होता.जसजसे दिवस जात होते तसतसे समीरच्या मनात नक्की काय आहे ते संगीताला कळत नव्हते.शेवटी तिने तिची सुरवातीची भूमिका बाजूला ठेवून समीरला स्पष्टच विचारायचे ठरविले.नेहमीप्रमाणे फिरून आल्यावर समीर तिला तिच्या घरी सोडण्यासाठी आला होता.तिचे आईवडील गावाला गेले होते.संगीता घरात एकटीच होती.संगीताने समीरला कॉफी घेण्यासाठी घरात बोलाविले.  

कॉफी पिता पिता ती म्हणाली समीर मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे.

त्यावर हसत हसत समीर   म्हणाला माझ्याशी बोलण्यासाठी तुला प्रस्तावनेची गरज केव्हापासून भासू लागली ?

त्यावर संगीता म्हणाली तसेच काही खास बोलायचे आहे.

समीर म्हणाला प्रस्तावना पुरे आता चटकन् तुझ्या मनात काय आहे ते बोलून टाक.

संगीताने बोलण्याला सुरवात केली :समीर आज चार वर्षे आपली ओळख आहे.आपण या चार वर्षांत एकमेकांच्या इतके जवळ आलो आहोत की लपवण्यासारखे आपल्यामध्ये कांही शिल्लक नाही.मला माझे आईवडील हल्ली लग्न केव्हा करणार म्हणून विचारीत असतात.तू आणि मी एकत्र येऊ असा त्यांचा अंदाज आहे. माझे  लग्न झाल्याशिवाय त्याना चैन पडणार नाही.तू लग्नाबद्दल मला आज विचारशील उद्या विचारशील म्हणून मी आज कित्येक दिवस वाट पाहत आहे.परंतु तुझा तसा काही विचार दिसत नाही.शेवटी मलाच पुढाकार घ्यावा लागला.मी तुला लग्नासाठी प्रपोज करीत आहे.

एवढे बोलून ती थांबली.प्रश्नार्थक मुद्रेने ती उत्तराच्या अपेक्षेने समीरकडे पाहत होती.

समीर म्हणाला आपण उत्तम मित्र आहोत.मी तुझ्याकडे नेहमी मित्र म्हणूनच पाहिले.लग्नाचा विचार माझ्या मनात सुद्धा आला नाही.तुझ्याकडे कधी मी त्या दृष्टीने पाहिलेच नाही.तरी मला माफ कर.माझ्याबद्दल अपेक्षा ठेवू नकोस.मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.हे बोलताना तो आपल्यापासून काहीतरी लपवीत आहे असे संगीताला वाटले.  

समीरचा  होकार येईल याची संगीताला शंभर टक्के खात्री वाटत होती .मी तुझ्याकडे त्या दृष्टीने पाहिले नाही असे शब्द कानावर पडल्याबरोबर तिच्या अंगावर वीज कोसळल्यासारखे तिला वाटले.

त्यावर संगीता रागारागाने एवढेच म्हणाली,तुझ्याकडून मी ही अपेक्षा ठेवली नव्हती.तुझ्या बोलण्यातून दृष्टीतून मी तुला पत्नी म्हणून प्रिय आहे असे मला वाटत होते.जर तुला माझ्याशी लग्न करायचे नसेल तर तू माझ्या जीवनातून यापुढे नाहीसा झालेलाच बरा.ही आपली शेवटचीच भेट. यापुढे तू मला भेटत जाऊ नकोस .संगीताचा चेहरा निराशेने ग्रासला होता.तिला समीरच्या बोलण्याचा मोठा धक्का पोहोचला होता.

ठीक आहे तुझ्या जीवनातून मी कायमचा  निघून जात आहे.पुन्हा मी तुला कधीही भेटणार नाही  असे म्हणून समीरने दरवाजा रागारागाने ओढून घेतला.आणि तो तिथून निघून गेला.

दुसर्‍या दिवशी तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला.ती मैत्रीण जिथे समीर रहात होता त्याच सोसायटीमध्ये रहात होती.समीरने रात्री आत्महत्या केल्याचे तिने कळविले.समीर एकटाच रहात होता.सकाळी दुधवाला आल्यानंतर त्याने दरवाजा उघडला नाही.दरवाजा पुन्हा  पुन्हा वाजवूनही तो दरवाजा उघडत नव्हता.शेवटी दरवाजा तोडण्यात आला.समीर शांतपणे निद्राधीन झाला असे वाटत होता.त्याचे शरीर थंडगार होते.शरीर विशेषतः ओठ काळे निळे पडले होते.त्याने कुठले तरी विष घेतले होते.पोलीस आले. पंचनामा झाला. त्याचे शरीर शवविच्छेदनासाठी पाठविले आहे,इत्यादी सर्व हकिगत तिच्या मैत्रिणीने सांगितली.त्याने एक चिठ्ठी ठेवली होती.त्यात एवढेच शब्द होते."मला जीवनात रस वाटत नाही.मी स्वखुषीने स्वेच्छेने माझे जीवन संपवीत आहे.माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये."

कालपर्यंत हसत खेळत बोलत असलेल्या उत्साही वाटणार्‍या समीरने  आपल्या जीवनाचा शेवट कां केला असेल हे एक गूढच होते.

चार दिवसांनी पोस्टमनने तिच्या घरात एक पत्र टाकले.हल्ली लोक स्मार्टफोनवरून नेटच्या साहाय्याने संदेश पाठवितात.पत्र हा प्रकार जवळजवळ नाहीसा झाला आहे.

संगीताला पत्र पाहून जरा आश्चर्यच वाटले.तिने पत्र उलटसुलट करून पाहिले.हस्ताक्षरावरून तिला कांही अंदाज लागत नव्हता.तिने पत्र उघडले.पत्र समीरने पाठविले होते.तिचे हस्ताक्षर समीरने पाहिले होते.तिच्या नोट्स समीर वाचत होता. झेरॉक्स काढून घेत होता.त्याचे हस्ताक्षर पाहण्याचा संगीताला कधी योगच आला नव्हता.पत्र पुढीलप्रमाणे होते.

प्रिय संगीता,

तुझ्याशी लग्न करावे असे मला मनापासून वाटत होते.तुझी भेट झाल्यापासून,तुझी ओळख झाल्यापासून,आपण जास्त जवळ आल्यापासून,मी तुझ्याकडे माझी सहचरी म्हणूनच पाहिले होते.एक वर्षापूर्वीच मी तुला प्रपोज करणार होतो.त्यावेळी माझी प्रकृती बरी नसल्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो. मला तपासल्यावर  त्यांनी मला जे सांगितले त्याने मला प्रचंड धक्का बसला.मी असाध्य रोगाने ग्रासलेला होतो.गेले वर्षभर डॉक्टरी उपचार चालू होते.कधी मी बरा होत आहे असे वाटे तर कधी प्रकृती खालावत असे.गेल्या वर्षभरात आपल्या भेटी थोडय़ा कमी होत गेल्या.मी ऑफिसातून रजा मोठ्या प्रमाणात घेत होतो.कदाचित ही गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल.टेबल टेनिस बॅडमिंटन रनिंग इ. गोष्टींमधील माझा सहभाग गेल्या वर्षात क्रमशः कमी होत गेला.ही गोष्ट कदाचित  तुझ्या  लक्षात आली असेल.माझे प्रकृती अस्वास्थ्य हे एकमेव कारण त्यामागे होते.वरवर मी जरी चांगला दिसत असलो तरी आतून पोखरला जात होतो.

माझे वैद्यकीय रिपोर्ट मला कालच मिळाले.काल मी डॉक्टरांना भेटलो.वरवर जरी ते मला धीर देत असले तरी त्यांच्या बोलण्यातून मला कोणतीही आशा दिसली नाही.असेच रोगग्रस्त जीवन जगत, शेवटी मृत्यूला मिठी मारण्यापेक्षा आपणहूनच मृत्यूला  मिठी मारणे मला जास्त आनंददायी वाटले.

मला माफ कर.पुढील जन्मी आपली भेट होईल अशी आशा करणारा 

.                            तुझा

समीर    

* संगीताच्या मनातील किल्मिष दूर झाले.

त्याची जागा प्रचंड निराशा व अंध:कार यांनी घेतली.

तिच्याही मनात जीवनाचा शेवट करावा असे आले.*

*परंतु जीवन हे जगण्यासाठी असते.*

*साथीदारांने साथ सोडली तरी वाटचाल शेवटपर्यंत सोडायची नसते.*

*यावर संगीताचा प्रगाढ विश्वास होता.किंबहुना ते तिचे जीवन सूत्र होते.*

* तिने तसा कांही अविचार  केला नाही.*   

५/१२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन