Get it on Google Play
Download on the App Store

०१ त्रिकोण १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

शोभा मुकुंद व संगीता यांचे एक आदर्श त्रिकोणी कुटुंब होते .संगीताचा जन्म झाल्यावर म्हणजेच मुलीचे नाव संगीता ठेवल्यावर , दोघांनीही आपल्याला आणखी मूल नको असे ठरविले होते.आपल्या मर्यादित उत्पन्नात आपल्या मुलाला शक्य तेवढ्या जास्त सुखसोयी देता याव्यात अशी दोघांचीही इच्छा होती . प्रत्येक आई वडिलांना आपल्याला जे जे मिळाले नाही ते ते सर्व आपल्या मुलांना मिळावे असे वाटते.किंबहुना आईवडील आपल्या मुलांच्या मार्फत पुन्हा जगत असतात .संगीता आई वडिलांची दोघांचीही लाडकी होती .लाडे लाडे मूल बिघडे असा एक वाक्प्रचार आहे.तो आपल्या बाबतीत खरा ठरू नये अशी दोघांचीही इच्छा होती .मुलांचे लाड करावेत परंतु मुले जे जे मागतील ते ते सर्व त्यांना देऊ नये असे दोघांचेही मत होते .नकार ऐकण्याची सवय मुलांना असणे नेहमीच आवश्यक व हितकर असते .आयुष्यात प्रत्येकाला नेहमी तो ज्याची इच्छा करील ते मिळेलच असे नाही.नकार ऐकण्याची सवय आयुष्यात नेहमीच उपयोगी पडते .थोडक्यात संगीताला दोघांनीही त्यांच्या आदर्शांच्या कल्पनेप्रमाणे वाढविले होते .

शोभा व मुकुंद दोघांचेही आई वडील संगीताला एक भावंड पाहिजे ते केव्हा येणार तुमचे प्लॅनिंग काय आहे म्हणून विचारीत असत .दोघेही एका मुलामध्ये आम्ही खूष आहोत. आणखी विचार नाही. असे हसत हसत सांगत असत. प्रत्येकाला किंवा प्रत्येकीला भाऊ किंवा बहिण काही तरी पाहिजे .खेळायला, भांडायला, एकमेकांच्या मदतीला धावून यायला ,भावंड पाहिजे असे दोघांचेही आई वडील आवर्जून सांगत .प्रत्येकाला निदान दोन तरी मुले पाहिजेत .त्यामुळे नात्यांचीही मुलाना ओळख होते.सर्व आपल्यालाच न ठेवता विभागून घेण्याची चांगली सवय लागते.  हल्ली सर्व एकांडे शिलेदार .त्यामुळे  प्रेम आपुलकी जिव्हाळा कमी होतो.असे त्याना दोन्ही बाजूनी सांगितलेही जात असे .दोघेही तत्त्व मान्य ,तपशील अमान्य, असे म्हणत .

संगीता दोघांच्याही गळ्यातील ताईत होती .संगीताला भाऊ किंवा बहिण मिळाली नाही .जेव्हा जेव्हा मुकुंद आमचा त्रिकोण ठीक आहे असे म्हणे,तेव्हा तेव्हा शोभा आवर्जून त्रिकोण नव्हे तर पंचकोन आहे असे लक्षात आणून देई.त्यावर मुकुंदचे आईवडील शोभाला सांगत मुकुंदचे बोलणे योग्यच आहे.आम्ही काय आज आहो उद्या नाही.तुमचा त्रिकोण हाच खरा.

संगीताला आजी आजोबांचे सुख फार काळ लाभले नाही.संगीताच्या जन्मानंतर कांही वर्षात दोघांनीही एका मागून एक जगाचा निरोप घेतला .आता त्रिकोणच राहिला .शोभा व मुकुंदा दोघेही नोकरी करीत असत.आजी आजोबा होते तोपर्यंत संगीताला सांभाळण्याचा प्रश्न आला नाही.

संगीता आठ वर्षांची होती तेव्हां ती आजी आजोबांपासून कायमची दुरावली .आजी आजोबांच्या मृत्यूनंतर शोभा नोकरी सोडावी असे म्हणत होती.संगीताच्या प्रतिपालनात नोकरीचा अडसर असू नये, हे नोकरी सोडण्यामागे प्रमुख कारण होते .शोभा आता मोठी झाली आहे .तिचे ती स्वतंत्रपणे पाहू शकेल.ती मोठी होत जाईल तसतसे तिचे क्षितीज विस्तारत जाईल . तुला मात्र घरात बसून कंटाळा येईल, तेव्हा नोकरी सोडू नकोस असे मुकुंदने तिला पटवून दिले .शोभाने नोकरी सोडली नाही .वर्षे अशीच जात होती. परंतू दैवाच्या मनात आणखी काही वेगळेच होते.संगीता तेरा वर्षांची होती तेव्हा अपघाताचे निमित्त होऊन तिचे बाबा तिला कायमचे सोडून गेले .त्रिकोणाचा एक बिंदू नाहीसा झाला .

आता संगीता व तिची आई शोभा दोघीच एकमेकांना सांभाळून राहात होत्या. संगीताशिवाय आयुष्य याची कल्पनाच शोभा करू शकत नव्हती.राजकन्येचा जीव पोपटात असे हे जसे लोककथेमध्ये सांगितले जाई तीच उपमा पुढे द्यायची झाल्यास शोभाचा जीव संगीतामध्ये  होता.शोभाचा जीव राजकन्येमध्ये होता.

संगीता मोठी होत होती .तिने तारुण्यात केव्हा पदार्पण केले ते तिच्या किंवा तिच्या आईच्या लक्षातच आले नाही .तिची पावले अस्थिर झाली.डोळे चंचल झाले.तिला नकळत तिचे विभ्रम, लोकांच्या नजरा तिच्याकडे वळवू लागले . संगीता कॉलेजात जावू लागली . तिची ओळख करून घेण्यासाठी मुलांची धडपड सुरू झाली.व्हॉट्सअॅप  फेसबुक इन्स्टाग्रॅम स्मार्टफोन सर्व काही जोरात सुरू होते .

यथावकाश ती पदवीधर झाली.तिच्या आवडीनुसार तिने आर्किटेक्टचा कोर्स घेतला होता.संगीताने एक गोष्ट निश्चित केली होती .आईला आपल्या शिवाय दुसरे कुणी नाही .जन्मभर आई आपल्याजवळ राहणार. प्रेम विवाह होवो किंवा (अॅरेंज्ड मॅरेज)पूर्व निश्चित विवाह होवो.आई आपल्या जवळ राहील ही अट ज्याला मान्य असेल अश्या  तरुणाशीच विवाह करायचा .जर असा एखादा तरुण मिळालाच नाही तर लग्नाशिवाय रहायचे.अशी वेळ आजच्या काळात येणे शक्यच नव्हते.हल्लीची कांही मुले तरी समजूतदार असतात .मुलीवर तिच्या आई वडिलांची जबाबदारी असते हे ते जाणतात .कर्तव्य व प्रेम या दोन्ही गोष्टींनी ही जबाबदारी असते. मुलीबरोबरच तिच्या आई वडिलांचा स्वीकार करायची त्यांची तयारी असते.जर पत्नीच्या आई वडिलांना मुलगा असेल, पत्नीला भाऊ असेल तर मात्र परिस्थिती बदलते.मुलावर सर्व जबाबदारी येते.मुलाइतकीच आई वडिलांची जबाबदारी मुलीने घ्यावी असा काळ अजून यायचा आहे . मुलीच्या आई वडिलांनाही ते पसंत पडणार नाही .   

हल्लींच्या मुलामुलीना पुष्कळ मित्र मैत्रिणी असतात. मुलाला असंख्य मैत्रिणी किंवा मुलीला असंख्य मित्र या वस्तूस्थितीकडे सामान्य नजरेने पाहिले जाते. संगीतालाही अनेक मित्र होते .त्यातीलच कुणाशीतरी विवाह होईल असा सर्वांचा अंदाज होता .तिला कोणत्याच मित्रामध्ये (मॅरेज मटेरिअल)विवाह योग्यता  दिसत नव्हती .अमिताभ कुठल्या तरी पिक्चरमध्ये  म्हणतो त्याप्रमाणे डोक्यात घंटी वाजत नव्हती. 

परदेशातून उच्च डॉक्टरी शिक्षण घेऊन सचिन नुकताच आला होता .शोभाचा तो चुलत चुलत पुतण्या होता .संगीता व सचिन यांची फेसबुक मैत्री होती.व्हॉट्सअॅपवर दोघेही नेहमी गप्पा मारीत असत .भारतात आल्यावर सचिनच्या शोभाकडे म्हणजेच पर्यायाने संगीताकडे चकरा चालू झाल्या.सिनेमा थिएटर, नाट्यगृह , बाग, रेस्टॉरंट, क्लब , सर्वत्र दोघेही एकत्र दिसू लागली.थोडक्यात शोभाच्या डोक्यात घंटी वाजली होती .

निसर्गाची काय गंमत आहे कळत नाही .तिचा तो किंवा त्याची ती दिसली, कि अंतर्यामी खूण पटते. दोघांनाही एकमेकांशिवाय चैन पडत नाहीसे होते. म्हणूनच असे म्हटले जाते की  लग्नाच्या गाठी स्वर्गात मारल्या जातात. आपण फक्त इथे त्या गाठीचा (जोडीदाराचा)शोध घेत असतो.  

दोघांनीही विवाह करण्याचे निश्चित केले .संगीताने सुरुवातीलाच सचिनला सांगितले होते की माझ्याशिवाय आईला कुणी नाही .आपल्याजवळ आई राहणार आहे.सचिनला अर्थातच ते मान्य होते.कुठेच काही अडचण दिसत नव्हती .

आणि एक दिवस सचिनने ती विशेष बातमी सांगितली.ही गोष्ट तो अजून संगीताजवळ बोलला नव्हता.त्याने अमेरिकेत जाऊन स्थायिक होण्याचे ठरविले होते .तिथल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली होती .तो दोन वर्षे शिक्षणासाठी अमेरिकेत राहिला होता .तिथल्या (हायफाय) उच्च जीवनमानाची त्याला भुरळ पडली होती.तिथे आपल्या बुद्धीला व शिक्षणाला जास्त वाव आहे असे त्याला वाटत होते . इकडे येण्यापूर्वीच त्याने दोन तीन ठिकाणी  इंटरव्ह्यू दिले होते. निवड झाल्याशिवाय, ऑर्डर हातांत पडल्याशिवाय तो ही बातमी कुणालाही अगदी संगीतालाही  सांगणार नव्हता. त्याला सगळ्यांना (सरप्राइज)आश्चर्य भेट द्यायची होती .ही बातमी ऐकून संगीताला आनंद होईल असा त्याचा अंदाज होता प्रत्यक्षात उलट प्रतिक्रियेला  त्याला तोंड द्यावे लागले .

दोन महिन्यांत त्याला तेथे जावून रुजू व्हायचे होते .लग्न करून तिकडे जावे असा विचार त्याने मांडला.

ही बातमी ऐकून दोघीही अवाक् झाल्या.सचिन इथे कुठेतरी क्लिनिक सुरू करील. हॉस्पिटल जॉईन करील.

थोडा अनुभव मिळाल्यावर स्वतःचे हॉस्पिटल सुरू करील, असा दोघींचाही अंदाज होता .अंदाज कसला खात्रीच होती .

परदेशात कायमचा रहायला जाणार. लग्न करून परदेशात जावे.ही बातमी म्हणजे  अक्षरश: दोघींच्याही पुढ्यात बॉम्ब फुटला होता.

एक दोन दिवस तर दोघीनाही यावर काय बोलावे तेच सुचत नव्हते. 

*सचिनचे आई वडील एका विमान अपघातात वारले होते .त्याला इथे संगीताव्यतिरिक्त कोणतेच पाश नव्हते. *

*यावरून सचिन व संगीता या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले.*

*एवढी महत्त्वाची बातमी सचिनने इतक्या दिवस दडवून ठेवली हे भांडणाचे प्रमुख कारण होते .*

(क्रमशः)

२१/६/२०२०©प्रभाकर  पटवर्धन