Get it on Google Play
Download on the App Store

०२ मी आलो आहे २-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

साजन भूत झाला होता.

असे काही होईल, असे संकट आपल्यावर कोसळेल, अशी कल्पनाही राजनने केली नव्हती.

या संकटातून बाहेर कसे पडावे .साजनला अटकाव कसा करावा याचा विचार राजन करीत होता.रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागला नव्हता.एखाद्या मांत्रिकाला आणून राजनचा बंदोबस्त करावा असा विचार राजन करीत होता.

ज्या रात्री साजन राजनला भेटण्यासाठी आला होता त्याच रात्री तो एका पोलीस इन्स्पेक्टरच्या स्वप्नात गेला .हा पोलिस इन्स्पेक्टर एटीएम पळविण्यात आलेल्या केसचा तपास करीत होता.एटीएम जंगलात कुठे आहे ते त्याला साजनने सांगितले.त्याचबरोबर साजनने त्याचा खून रुग्णवाहिकेखाली  चिरडून राजनने केला हेही सांगितले. 

इन्पेक्टर दचकून जागा झाला .राजन व साजन या दोघांचीही नोंद भुरटे चोर अशी पोलीस दप्तरी होती.या दोघांनी एवढा मोठा डल्ला मारला असेल, एवढे मोठे साहस केले असेल,एवढे मोठे नियोजन केले असेल ,ते यशस्वीपणे राबविले असेल अशी शंकाही कुणाच्या मनात आली नव्हती .

साजन स्वप्नात येतो काय, त्याचाच मित्र राजनने रुग्णवाहिकेखाली चिरडून त्याचा खून केला असे सांगतो काय,एटीएम कुठे आहे, त्याचे प्रेत कुठे आहे हे सांगतो काय, सर्वच अघटित होते.अगम्य होते.सकाळी तो इन्स्पेक्टर बरोबर पोलीस घेऊन जंगलात गेला .त्याला सांगितलेल्या जागी एटीएम मिळाली .जवळच्याच खड्ड्यात  साजनचे प्रेत मिळाले.साजनची बॉडी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आली .राजनला साजनच्या खुनाच्या  संशयावरून ताब्यात घेण्यात आले.मांत्रिकाला आणून साजनचा बंदोबस्त करण्याचा राजनचा मनसुबा त्याच्या मनातच राहिला.   

कॅमेरामन, ठसे तज्ञ, सर्वजण   कामाला लागले. शवविच्छेदन अहवाल, ठसे तज्ञांचा अहवाल, दुसऱ्या दिवशी येणार होता .राजनला सत्य परिस्थिती सांगण्यासाठी, इन्स्पेक्टर पोलिसी उपाय योजत होते .त्यानेच खून केला असे गृहीत धरून चौकशी चालली होती. राजन शेवटी भुरटा चोर होता .बनेल गुंड नव्हता .तरीही तो मी त्यातील नाही. मला उगीच पकडले आहे वगैरे कांगावा करीत होता .पोलिसांच्या दबावाखाली एक दोन दिवसांत तो कोसळला असता 

त्याच रात्री राजन पोलिसी मारामुळे तळमळत होता .त्याचे अंग दुखत होते .मुक्या मारामुळे अंग जागोजागी ठणकत होते .मध्यरात्री बारानंतर राजनला जरा कुठे झोप लागत होती तोच त्याला साजनने उठविले. कोठडीत छताला जाळी बसविलेला एकच दिवा पेटत होता.त्या दिव्यामुळे खोली प्रकाशित होत होती की अंधार जास्त गडद होत होता ते सांगणे मोठे कठीण होते .

साजनच्या शक्ती एक दिवसात जास्त प्रभावित झाल्या होत्या .तो आता राजनला स्पर्श करू शकत होता.एवढेच नव्हे तर त्याला धरून गदगदा हलवू शकत होता साजनने राजनचा दुखरा हात इतक्या जोरात पकडला की राजन दुःखाने विव्हळू लागला . बऱ्या बोलाने सर्व काही कबूल करून टाक. पैसे कुठे दडवले आहेत ते सांग. अन्यथा मला ते माहीत आहे .मी इन्स्पेक्टरला सर्व काही सांगेन. ना तू कायद्याच्या कचाट्यातून सुटशील, ना मी तुला सोडणार आहे .तू आता संपला आहेस .तू फक्त तुझे मृत्यूपूर्व दिवस मोजत राहा .उद्या रात्री मी तुला भेटायला येईनच .माझे तुम्हा सर्वांवर पूर्ण लक्ष आहे. मी तुझ्याजवळ येथे कितीही वेळ थांबू शकतो. मला वाटल्यास तुला पुन्हा पुन्हा भेटू शकतो .तू मला दगा दिला .मी तुझी पूर्ण  वाट लावल्याशिवाय मुक्त होणार नाही .असा दम देऊन साजन अदृश्य झाला. शारीरिक दुःखामुळे व भीतीमुळे राजन रात्रभर झोपेविना तळमळत होता.   

शवविच्छेदनाचा अहवाल आला .गाडीखाली चिरडून मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती .जिथे साजनला (रुग्णवाहिकेखाली) चिरडण्यात आले होते तेथील ठसे घेण्यात आले होते.तिथे सापडलेले रक्त मांस यांचे अवशेष साजनच्या नमुन्याशी जुळले.साजनला(रुग्णवाहिकेखाली) चिरडले गेले, याचा सबळ पुरावा पोलिसांना उपलब्ध झाला .(रुग्णवाहिकेचा)कोणत्या गाडीखाली साजनला चिरडण्यात आले त्याचा  तपास अजून लागायचा होता .साजनला कुणी चिरडले त्याचाही पुरावा मिळणे आवश्यक होते .

पोलीस आपल्यापर्यंत कसे पोहोचले ते आता राजनला स्पष्ट झाले होते .साजन कोणत्या ना कोणत्या मार्गाने इन्स्पेक्टर पर्यंत पोचला असला पाहिजे.त्यानेच गुन्हा कोणी केला, कसा केला, कां केला, हे सांगितले असले पाहिजे.साजन आपल्याला सोडणार नाही याची कल्पना राजनला पूर्णपणे आली होती.   

राजनला पोलीस कस्टडी देण्यात आली होती. राजन अट्टल गुन्हेगार नव्हता. तो भुरटा चोर होता .क्षणिक मोहाला बळी पडून त्याने साजनचा खून केला होता.

जिथे एटीएम बसविले होते तिथल्या सीसीटीव्हीमध्ये  (रुग्णवाहिकेचा) नंबर  मिळाला.तपास करता ती एक रुग्णवाहिका होती.साजनने स्वप्नात सांगितलेली गोष्ट खरी होती . रुग्णवाहिकेच्या चाकाचे ठसे जिथे साजनचा खून झाला होता तेथील ठशांशी जुळले. जिथे राजनची मोटारसायकल ठेवली होती, तिथे जवळच रुग्णवाहिका उभी  केली होती तेही ठसे  सुदैवाने मिळाले .

मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे राजन व साजन यांनी केलेल्या चोरीचा संपूर्ण आराखडा पोलिसांना मिळाला .राजन व साजन यानी एटीएम रग्णवाहिकेत टाकून नेले .एटीएम फोडून भरपूर पैसा मिळाला. राजनला पैशांची हाव निर्माण झाली .त्याने निर्घृणपणे साजनला रुग्णवाहिकेखाली चिरडून ठार मारले.

राजनवर केवळ संशय होता .राजन व साजन दोघेही मित्र होते हा पुरावा होता.दोघेही परस्परांना मदत करून लहान मोठे गुन्हे करीत असल्याचाही पुरावा होता. परंतु या विशिष्ट चोरीमध्ये दोघे एकत्र होते याचा अजून ठोस  पुरावा मिळाला नव्हता .दोघांनीही मास्क घातलेला असल्यामुळे एटीएम त्यांनीच पळविले हे सिद्ध होऊ शकत नव्हते . दोघांनीही हातमोजे घातले असल्यामुळे त्यांचे कुठेही ठसे मिळाले नव्हते.साजन स्वप्नात आला, त्याने सर्व काही सांगितले, हा पुरावा होऊ शकत नव्हता. 

चार दणके दिल्यावर लपविलेला पैसा राजनने काढून दिला .सावकाराकडूनही दिलेले पैसे परत मिळविण्यात आले. एटीएममध्ये असलेले पैसे व राजनने निरनिराळया ठिकाणाहून काढून दिलेले पैसे,यावरून एटीएम राजननेच पळविले हे सिद्ध करता येण्यासारखे होते .परंतु राजनबरोबर साजन होता, राजन रुग्णवाहिका चालवित होता,राजनने साजनला चिरडले हे सिद्ध होत नव्हते.परिस्थितीजन्य पुरावा राजनकडे बोट दर्शवित होता.   

राजनवर कोर्टात केस दाखल करण्यात आली.निरनिराळ्या कलमांखाली चोरी दरोडा खून यासाठी खटला भरण्यात आला. साक्षी पुरावे सुरू झाले.

रोज रात्री साजन कोठडीत हजर होत होता. राजनला झोपू देत नव्हता .पोलिसांनी पकडल्यापासून गेल्या कित्येक रात्री राजन झोपेशिवाय होता.त्याची अवस्था एखाद्या वेड्यासारखी झाली होती .एक दिवस पोलिसांच्या दबावाखाली व राजनच्या रोजच्या त्रासाला कंटाळून ,त्याने स्वतः खून केला हे कबूल केले.खून कसा केला तेही सविस्तर कबूल केले .कोर्टात त्याने तशी साक्ष दिली . 

अजूनही ठोस पुरावा मिळाला नव्हता . राजनची साक्ष हा बिनतोड  पुरावा होऊ शकत नव्हता.आयत्या वेळी त्याने आपला जबाब फिरविला असता .पोलिसी अत्याचाराला कंटाळून त्याने तसा जबाब दिला असे तो व त्याचा वकिल म्हणू शकले असते. राजनला खुनाच्या आरोपाखाली शिक्षा होणे कठीण होते .तो वकिली चातुर्याने त्यातून सुटला असता .फारतर पाच दहा वर्षे सश्रम कारावास झाला असता .साजनचा सूड पूर्ण झाला नसता.

साजनने एक वेगळी योजना आखली.एका रात्री तो राजनच्या कोठडीत हजर झाला.तसा तो रोजच हजर होत होता .त्याला भंडावून सोडत होता .आता साजनच्या शक्ती गेल्या चार महिन्यांत खूपच वाढल्या होत्या.त्याने बाहेर अडकविलेल्या किल्ल्या घेतल्या.राजनच्या कोठडीचा दरवाजा रात्री दोन वाजता उघडला.ड्युटीवरील पोलीस पेंगत होते .राजनला हात धरून कोठडीबाहेर व तुरुंगाबाहेर काढला.राजनला कोठडीतच राहायचे होते . तो साजन बरोबर बाहेर यायला तयार नव्हता.साजनने त्याला जवळजवळ ओढत, फरपटत,बाहेर नेला. राजन आपले भवितव्य समजून चुकला होता .फक्त साजन आपल्याला कसे ठार मारणार त्याची त्याला अर्थातच अजून कल्पना नव्हती .

साजनने त्याला एका पोलीसव्हॅनमध्ये चढविले.साजनने त्याला हातकडीने गाडीला बांधून ठेवले होते.गाडी शहराबाहेर जंगलाच्या रस्त्याने जात होती.जिथे राजनने साजनला चिरडले होते तिथे गाडी आली.मनोमन आपले भवितव्य राजनला आता कळून चुकले .

साजनने राजनला पोलिस गाडीमधून बाहेर काढला.जिथे साजन चिरडला गेला होता तिथेच त्याला उभा केला .साजन मृत्यू भयाने गारठून गेला होता .मी चुकलो .मला क्षमा कर. तुझा मित्र असूनही मी तुझा घात केला .वगैरे नाना प्रकारे तो गयावया करीत होता. साजनने त्याच्या दोन्ही पायात एक बेडी घातली .राजन मनात अाले तरी आता पळून जावू शकत नव्हता .साजनने पोलीस गाडी हळूहळू चालवत राजनपर्यंत आणली .जरा वेळ तेथे थांबून नुसताच अॅक्सिलेटर कमी जास्त केला .त्या आवाजानेच राजन अर्धमेला झाला.त्याला आपण साजनला कसे चिरडले ते स्मरत होते.जशास तसे, जसे करावे तसे भरावे,या न्यायाने साजनने पोलीस गाडी राजनच्या जिवंत शरीरावरून नेली .

*राजनने ज्या प्रकारे आणि जिथे साजनला मारले होते तसेच राजनला साजनने चिरडून मारले.*

*साजनचा प्रतिशोध पुरा झाला होता.*

* दुसऱ्या दिवशी पोलीसगाडी चोरीला गेलेली आढळली .*

*शहराबाहेर जंगलात ती सापडली .*

*रस्त्यावर गाडीखाली  चिरडून मेलेला राजन सापडला .त्याच्या हातापायात बेड्या होत्या. * 

*गाडी चोरीला गेली कशी? राजन पोलिस कस्टडीतून बाहेर आला कसा ?त्याला बेड्या कुणी घातल्या ?राजनला पोलीस गाडीखाली कुणी चिरडले?याचा शोध कधीच लागला नाही .* 

(समाप्त) 

१५/६/२०२०©प्रभाकर  पटवर्धन