Get it on Google Play
Download on the App Store

०७ शह व मात २-२

( हीकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

त्यांना कधीही पत्नीचा संशय आला नव्हता.

ती आपल्याशी प्रामाणिक आहे असे त्याना वाटत होते.

आजही ते दिल्लीला गेले असते तर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नसती.

दिल्लीचे त्यांचे जाणे रद्द झाले  .ते तडक घरी आले.त्यानी पत्नीला तसे अगोदर कळवलेही नाही.

त्याना पत्नीला सरप्राइज द्यायचे होते.पत्नीला सरप्राइज देण्याऐवजी त्यांनाच तिच्याकडून हे असे सरप्राइज मिळाले.

पत्नीला वेगळ्या पध्दतीने त्यांच्या मृत्यूनंतर सरप्राइज मिळणार होते तो भाग वेगळा.  

मृत्युपत्रातील बदल त्यांनी अत्यंत गुप्त ठेवला होता.त्यांच्या सॉलिसिटरला फक्त तो माहीत होता.त्यांनी मृत्युपत्र बदलले ही गोष्ट पत्नीला माहीत नव्हती  , नलिनीचे विवाहबाह्य संबंध आपल्या   लक्षात आले आहेत याची जाणीवही त्यांनी नलिनीला दिली नाही.

नलिनीही हुषार होती.रावसाहेब शहरात असताना कधीही तिने कुणाशीही गैर संबंध,अनैतिक, आक्षेपार्ह संबंध ठेवले नाहीत.  

एखाद्याला रावसाहेबांची वर्तणूक अयोग्य वाटण्याचा संभव आहे . जर नलिनी व्यभिचारी होती तर त्यांनी तिला सोडचिठ्ठी द्यायला हवी होती.असे त्याचे म्हणणे असू शकते.एकाच घटनेचे विविध परिणाम विविध व्यक्तींवर त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार होतात. प्रत्येकाच्या प्रतिक्रियाही निरनिराळ्या असतात.  ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.वरील परिस्थितीत एखाद्याने नलिनीचा खून केला असता.एखाद्याने नलिनीला नाक कान कापूनही शिक्षा दिली असती.एखाद्याने ती ज्याच्याशी संबंध ठेवीत होती त्या गृहस्थाचा खून केला असता.एखाद्याने दोघांचाही खून केला असता.एखाद्याने स्वतःचे जीवन संपविले असते.एखाद्याने मृत्युपत्र आहे तसेच ठेवले असते. त्याने काहीच वेगळी गोष्ट केली नसती.काही झालेच नाही. काही समजलेच नाही.असा त्याचा एकूण व्यवहार असता.एखाद्याने आणखी काही वेगळेच केले असते.घटना एकच, आघात एकच, परंतु तो आघात ज्याच्यावर होतो त्याच्या त्याच्या स्वभावानुसार प्रतिक्रिया प्रतिसाद भिन्न भिन्न असू शकतो.

रावसाहेबानी फक्त मृत्युपत्र बदलले.नलिनीला सर्व इस्टेटीतून बेदखल केले.त्यांची वर्तणूक नलिनीशी पूर्वीप्रमाणेच राहिली.

अशीच दहा वर्षे गेली.रावसाहेबांना काहीही कळले नाही अशा गोड भ्रमात नलिनी होती. तिने रावसाहेबांना लवकर मृत्यू यावा, आपल्या ताब्यात सर्व इस्टेट लवकर यावी, यासाठीही कांही प्रयत्न केले नाहीत.ती कदाचित आपल्यावर विष प्रयोग करील अशी रावसाहेबांना शंका होती.त्या दृष्टीने ते योग्य ती काळजी घेत होते.

रावसाहेब आता पंच्याहत्तर वर्षांचे झाले होते.त्यांचे शरीर जन्मभर भागदौड़ करून आता थकले होते.अर्थात काही जण पंच्याहत्तरीतही भर उमेदीत असतात तो भाग वेगळा .त्यांना हृदयविकाराचा झटका आला.ते हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते.त्यांना स्टेंट टाकण्याचे ठरले होते.तत्पूर्वी त्यांना आणखी एक हृदयविकाराचा झटका आला .हा झटका प्राणघातक ठरला.त्यांची जीवनज्योत मालवली.

नलिनीला एका बाजूने आनंद झाला तर दुसर्‍या  बाजूने ती थोडीबहुत दु:खी झाली .नाही म्हटले तरी त्यांचा पंधरा वर्षांचा सहवास होता.आता सर्व मालमत्तेची ती मालकीण होती.ज्या मुख्य कारणासाठी तिने रावसाहेबांबरोबर विवाह केला होता ,ती गोष्ट आता साध्य झाली होती.रावसाहेबांना फसवून, त्यांच्यापासून लपवून,चोरटे अनैतिक संबंध ठेवण्याचा तिला कंटाळा आला होता.आपण रावसाहेबांना फसवतो हेही कुठे तरी तिला खात होते.

रावसाहेबांचे दिवसवार झाले.सर्व क्रियाकर्म मोठ्या  पुतण्यानेच केले.आपले दिवसवार झाल्याशिवाय मृत्युपत्राचे वाचन होऊ नये अशी अट रावसाहेबांनी घातली  होती.स्थूलमानाने मृत्युपत्रात काय आहे ते नलिनी  व पुतणे यांनाही माहीत होते.फक्त सविस्तर मृत्युपत्र आता समजेल अशी सर्वांची कल्पना होती.

सॉलीसिटरनी मृत्युपत्राचे वाचन सुरू केले.दोन्ही पुतण्याना पंचवीस पंचवीस टक्के मालमत्तेचे वाटेकरी केलेले आहे.हे ऐकून त्याना साहजिकच आनंद झाला.आपल्याला फक्त दहा टक्के मिळतील असे प्रत्येक पुतण्याला  वाटत होते .नलिनी आपल्याला फक्त पन्नास टक्के मिळणार म्हणून थोडी रंजिस झाली.अर्थात पन्नास टक्के तर पन्नास टक्के त्यातही ती खूष होती.पन्नास टक्क्यांची मालकीण हीहि काही कमी गोष्ट नव्हती.

सॉलिसिटर पुढे म्हणाले, रावसाहेब यांनी एक पत्र माझ्याजवळ दिले आहे. एवढे वाचन झाल्यावर ते तुम्हाला वाचायला द्यावे असे त्यांनी म्हटले आहे.ते पत्र तुम्ही वाचल्यानंतर पुढे मृत्युपत्राचे वाचन व्हावे असे ते म्हणतात.असे म्हणून त्यांनी एक पत्र नलिनीजवळ दिले.लिफाफा सीलबंद होता.लिफाफा उघडून नलिनीने  पत्र वाचण्यास सुरुवात केली. 

प्रिय नलिनी 

तुला हे पत्र लिहिताना प्रिय शब्दाचा वापर करावा की न करावा असा प्रश्न मला पडला आहे. शेवटी प्रिय शब्द वापरावा असे मी ठरविले.गेली पांच वर्षे तुझा आणि माझा सहवास आहे.जरी तू मला फसविले असलेस,जरी तू माझ्याशी प्रामाणिक राहिली नसलीस,जरी तू तुझ्या पत्नी धर्माशी जागली नसलीस,तरीही तुझा आणि माझा गेल्या पांच वर्षांचा सहवास लक्षात घेऊन मी प्रिय शब्दाचा वापर करीत आहे .अजून किती काळ तुझा सहवास मला मिळेल सांगता येत नाही. (प्रत्यक्षात पत्र लिहिल्यानंतर नवीन मृत्युपत्रानंतर दहा वर्षे त्यांना तिचा सहवास मिळाला होता .)  

लग्न झाल्यावर तू खरेच मला प्रिय होतीस.किंबहुना तू मला आवडतेस म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले.तू माझ्यावर प्रेम केले की न केले मला माहीत नाही.माझ्या इस्टेटीवर डोळा ठेवून तू माझ्याशी लग्न केलेस.मलाही त्याची कल्पना होती.आपल्या वयातील पंचवीस वर्षांचे अंतर लक्षात घेता ते थोडेसे स्वाभाविकही होते .एकदा आपले लग्न झाल्यावर तू माझ्याशी प्रामाणिक राहशील अशी माझी कल्पना होती.आपली पांच वर्षे सुखात गेली.

त्या दिवशी मी माझे दिल्लीचे जाणे रद्द झाल्यामुळे अकस्मात घरी आलो नसतो तर नंतरही कित्येक वर्षे मी अंधारात राहिलो असतो.तुझ्या दुर्दैवाने व माझ्या सुदैवाने तसे व्हायचे नव्हते.तुला न कळवता मी घरी अकस्मात आलो.त्यावेळी तू शयनगृहात त्या तुझ्या याराशी गप्पा मारीत होतीस.तुमचे हसणे खिदळणे चालले होते.पुढे हास्य थांबले तरीही तुम्ही बाहेर आला नाही.तुमच्या संबंधांची मला कल्पना आली.मी तसाच बाहेर आलो.बाहेर थांबलो असताना तो तुझा मित्र आला.त्याच वेळी  आपल्या नात्याचा अंत करण्याचा माझा विचार होता.माझ्याकडून शरीरसुखातही तुला काही कमी पडले असेल असे मला वाटत नाही.मग तू असे कां केलेस?    

परंतु मी माझा विचार बदलला.तुला लगेच शिक्षा करण्याऐवजी माझ्या मृत्युनंतर तुला शिक्षा व्हावी असा विचार माझ्या मनात आला.मला जसे काही कळलेच नाही अशी मी वर्तणूक ठेवली.कदाचित तुला माझ्या वर्तनातील तफावत समजली असेल किंवा नसेल.निदान तू तरी तसे कधी दाखविले नाही.

आपल्या लग्नानंतर मी माझे मृत्युपत्र बदलले होते.ते मी तुला दाखवले होते.त्यात बदल करण्याचे मी ठरविले.तुला माझ्या इस्टेटीतील काहीही वाटा न देता पूर्णपणे तुला बेदखल करावे असे मी ठरविले.त्याप्रमाणे नवीन मृत्युपत्र केले.ते मी गुप्त ठेवले.माझे सॉलिसिटर यांनाच फक्त ते माहीत आहे.माझ्या मृत्यूनंतर पंधरा दिवसांनी त्याचे वाचन करावे असे मी त्याना सांगितले होते.त्याप्रमाणे ते वाचन करीत असणार.त्यातील अर्धा भाग वाचून झाल्यावर हे पत्र तुला वाचायला द्यावे असे मी त्यांना सांगितले होते.कळावे  एकेकाळी तुझा असलेला परंतु आता नसलेला

रावसाहेब  

इथेच ते पत्र संपले होते.

रावसाहेबांनी पन्नास टक्के इस्टेट पुतण्यांना दिल्यावर उरलेल्या पन्नास टक्क्यांचा विश्वस्त निधी स्थापन केला होता .सुरुवातीचे विश्वस्त कोण असावेत त्यांचीही नावे दिली होती.नंतर भविष्यकाळात एकेक  विश्वस्त निवृत्त झाल्यावर विश्वस्तांची रचना कशी असावी, त्यांचे अधिकार,त्यांनी पैशाचा विनियोग कसा करावा इत्यादी सर्व गोष्टी लिहिलेल्या होत्या.

मृत्युपत्राच्या शेवटी एकच वाक्य त्यांनी लिहिले होते.माझ्या पुतण्यांना जर वाटले तर त्यांनी त्यांच्या मर्जीनुसार दर महिन्याला काही रक्कम नलिनीला द्यायला हरकत नाही.मात्र या फ्लॅटमध्ये नलिनीला राहता येणार नाही.या फ्लॅटचा उपयोग विश्वस्तांचे ऑफिस म्हणून केला जावा.ऑफिसाला एवढी मोठी जागा बहुधा  लागणार नाही. उरलेल्या भागाचा वापर कसा करावा ते विश्वस्त ठरवतील.

*इथे मृत्युपत्र संपले होते.*

*मृत्युपत्राप्रमाणे  आपण सर्व मालमत्तेतून पूर्णपणे  बेदखल झालो.*

*आपल्याला रावसाहेबानी या गोष्टीचा कांहीही सुगावा लागू दिला नाही.*

*म्हातारपणासाठी आधार, एकंदरीतच आयुष्याला आधार, म्हणून ज्याच्याशी ज्याच्यासाठी लग्न केले ते दोन्ही   आधारच निघून गेले.*

* आपण केलेल्या पापाला,फसवणुकीला  पुरेपूर शिक्षा मिळाली.*

*असा विचार करता करता  बेशुद्ध होऊन नलिनी जागच्या जागीच कोसळली.*   

(समाप्त) 

१६/११/२०२०©प्रभाकर  पटवर्धन