Get it on Google Play
Download on the App Store

भिक

दिवाणी कोर्टाच्या समोरच्या चहाच्या टपरीवर हेडक्लार्क पाटील साहेब आणि ज्युनियर लिपिक तावडे एक कटिंग वन बाय टू करून पीत होते. इतक्यात एक फटका लहान मुलगा पाटील साहेबांना भूक लागल्याची खुण करून काहीतरी खायला द्या अशी विनवणी करु लागला.

पाटील साहेब संतापले, “ हा पाच वर्षाचा शेंबडा पोरगा भीक मागतो? आई-वडिलच भिक मागायची सवय लावतात? अशा भिकाऱ्यांना मी कधीच भिक देत नाही.” 

“नाहीतर काय, आई-वडील आहेत कि कसाई काय कळत नाही.. आणि साहेब तसंपन, आपनच भिक देऊन त्यांना बिघडवलय.”  तावडे

“ए चल निघ काही नाही मिळणार चल” तावडेने त्या पोराला हुसकावून लावलं

“अन्ना..दोन छोटा गोल्डफ्लेक... अरे तावडे यांना ओरडून पण फायदा नाही..हे काय सुधारणार नाहीत...” पाटील

“ बरोबर आहे साहेब....यांना नुसती माल फुकायची सवय लागल्ये. आणि फुकटच पाहिजे सगळं...” तावडे

इतक्यात अण्णाच्या टपरीवर काम करणारा थोराड दिसणारा बालमजूर दोन सिगारेटी घेऊन धावत पुढे आला

“ आता शिग्रेट पेटवायला गारगोटी घासू व्ह्य रे? जा जा माचीस आन..”  तावडे

“ भिक मागायची म्हणजे वाईट गोष्ट आहे. अपमान होतो तरी पुनःपुन्हा मागतात.” पाटील 

पोराने माचीस आणून दिली. सायबांनी काडी ओढून सिगरेटी पेटवल्या.

“ बरोबर बोललात सर..” तावडे

“आज वर्मा साहेबाचा वाढदिवस आहे. चला एक मस्त बुके विकत घेऊया. बघूया साहेब प्रमोशनच बघतील कायतरी...” पाटील साहेब सिगरेटचा धूर नाकातून सोडत म्हणाले.

“ होय सर, एकदम करेक्ट टाईम आहे काही मागायचं असेल तर. मोठा माणूस आहे. खुशीने काय न काय देतील नक्की.” तावडे

“ असं काही नाही काही..कधी कधी ते ओरडतात पण विनाकारण...” पाटील

“मग काय झालं. आधीचे अग्रवाल साहेब ते पण वरडायचे कि...पण आपन घाबरून मागायचं सोडायचं नाही. ते देतील नाही देतील आपण मागत रहायचं..” तावडे.   

“त्या अग्रवालने तर मला प्रमोशन नाही दिलं. हे वर्मा साहेब देतील का नाही बघू.” पाटील

“पण माझे वडील बोलतात आपन आपलं काम करत राहायचं. दिलं तर ठीक नाही दिलं तरी भी ठीक..” तावडे.

“बरोबर बोलताय तावडे. मागण्यात काहीच चूक नाहीये.” चहाचा कप हाताने चुरगळून फेकत पाटील साहेबांनी सिगरेटचे थोटूक पायाखाली दाबून विझवले.

“साहेब पहले का पकडके तुमचे ६५० रुपये बनतात.” अण्णा

“अण्णा... आम्ही कुठे पळून जातो काय रे मद्राषा..मांडून ठेव हा...पुढच्या महिन्यात बघू...”

असं म्हणून दोघे पुन्हा त्यांच्या ऑफिसात चालते झाले.

भिक

ललित
Chapters
भिक