Get it on Google Play
Download on the App Store

बी पॉझीटिव्ह

एखादी दुखापत झाली किंवा जखम झाली तर शरीर आपल्या पद्धतीने उपचार करते आणि दुखापत झालेल्या व्यक्तीला कळतही नाही. त्याचप्रमाणे जर काटा किंवा तीक्ष्ण वस्तू आपल्या पायाला टोचली तर आपण ती लगेच काढून टाकण्याचा विचार करतो. पण जेव्हा एखादा आपल्याशी कटू शब्दात बोलतो किंवा वागतो तेव्हा मन इतके दुःखी का होते? आपण ते मनातून का काढू शकत नाही? उलट आपण नकारात्मक विचार करून आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती आणखीनच डळमळीत होते. तुम्हाला माहीत आहे का की समर्थ आणि शुभ संकल्पा करून तुम्ही शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवू शकता.

समोरच्या व्यक्तीकडून आपण सर्वच जण सहसा खूप जास्त अपेक्षा ठेवतो. आणि जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा विचार नकारात्मक होतात. या मनात आलेल्या नकारात्मकतेमुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो आणि  रोगांना आमंत्रण मिळते.

माणूस इच्छा असून देखील आनंदी राहू शकत नाही, पण जेव्हा आपण आपली विचारसरणी सकारात्मक बनवतो, जीवनात प्रेम आणि आनंदाचा समावेश करतो, मनात क्षमाशीलतेची भावना आणतो, निसर्गाशी नाते जोडतो, शरीराप्रमाणेच मनालाही चांगल्या विचारांचे खाद्य देतो, तेव्हा  शरीरातील सर्व रोग स्वतःच दूर पळून जाऊ लागतात.

भूतकाळातील घटनांचा, इतर माणसांच्या कटू बोलण्याचा निरर्थक विचार केला तर मन त्यातच अडकून राहते, उदास राहते, अस्वस्थ राहते,सरतेशेवटी नैराश्याने ग्रासले जाते. अशा वेळेस जर आपण परिस्थिती आणि लोकांचा स्वीकार करून त्यांना माफ करायला शिकलो  तर मानसिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहू शकतो.

जुन्या गोष्टीं विसरणे आणि क्षमा करणे हे प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तींचे वैशिष्ट्य आहे. जर आपल्याला स्वतःला निरोगी बनवायचे असेल तर सर्वप्रथम आपण लोकांचे कटू शब्द आपल्या हृदयात साठवून ठेवणे बंद केले पाहिजे.

आपल्याला भूतकाळ विसरायला हवा. आपण भूतकाळात काहीच बदल करू शकत नाही,  तो आहे तसा स्वीकारणे आणि नवी सुरुवात करण्यासाठी स्वतःला प्रेरित करणे शहाणपणाचे लक्षण आहे. जेव्हा आपण आपले मन दुखावणाऱ्या व्यक्तीला क्षमा करतो तेव्हा आपल्याला सर्वात जास्त फायदा होतो. कारण ही सकारात्मकता आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण करते.

मंत्रोच्चारण केल्याने, चांगले संगीत ऐकल्याने, एखाद्या कलात्मक कार्यात सहभागी झाल्याने मनाला शांती मिळते, हे एका संशोधनात सिद्ध झाले आहे. सकारात्मक संकल्पांमुळे मानसिक, भावनिक आणि शारीरिक शक्ती मजबूत होते, दीर्घायुष्य लाभते,नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढतो, दुःखी झालेले जीवन पुन्हा आनंदाने भरून जाते आणि आत्मिक समाधानाची अनुभूती प्राप्त होते.

जेव्हा जेव्हा तुम्ही गोंधळलेल्या मन:स्थितीत असाल तेव्हा स्वतःच्या मनाशी संवाद साधा, आयुष्यातील चांगले क्षण आठवण्याचा प्रयत्न करा, जीवनातील अधिकाधिक सकारात्मक गोष्टी वाचा किंवा पहा,  मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी करा, जीवनात असे बदल नक्कीच चांगले आरोग्य देतील. तुमचे शारीरिक आणि मानसिक आयुष्य निरोगी राहावे या इच्छेने आमचा हा छोटासा प्रयत्न. सकारात्मक विचारांनी आपल्या शरीरावर उपचार करा.पॉझीटिव्ह राहण्यासाठी तुम्ही काय करता ते कमेंट मध्ये नक्की सांगा. 

बी पॉझीटिव्ह

ललित
Chapters
बी पॉझीटिव्ह