टपरी
मध्य रेल्वेचे वेळापत्रक रिमझिम पाऊस झाला तरी कोलमडते. या आठवड्यात तर मजबूत पाऊस झालेला त्यामुळे कुर्ल्याजवळ रेल्वे लाईनवर भरपूर पाणी जमा झालेलं. तर त्या दिवशी भरपूर पाऊस पडल्यामुळे आम्ही कॉलेजला सुट्टी घेतली होती.
रात्र झाली तरी पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. घरी वरणभात, भाजीपोळी खाऊन कंटाळा आला होता. जेवण झालं होतं. पावसाळ्याच्या दिवसात पोट भरलं तरी जिभेची तृप्ती काही केल्या होत नसते.
रात्रीचे साधारण दहा साडे दहा वाजले होते. मी आणि माझ्या मित्राने बदलापूरवरून उल्हासनगरला आरकेटी कॉलेज रोडवर स्कुटीने जायचे ठरवले. आम्ही आरकेटी कॉलेज रोडला पोहोचलो तोपर्यंत रात्रीचे पावणे बारा वाजले होते.
तिकडे जवळच रेड लाईट एरिया असल्यामुळे रात्रभर या एरियात जाग असते. जवळच सरदारजीची दाल पकवान, छोले सामोसा, दही भल्ला अशी एक गाडी असते त्यावर रात्रभर खवय्यांची तुफान गर्दी असते. आम्ही सगळं एक एक प्लेट चेपलं. रस्ता क्रॉस केला कि नागोरी डेअरी आहे ती सुद्धा रात्रभर चालू असते. तिकडचा नागोरी चहा आणि बनमस्का यांच्यावर आम्ही ताव मारला.
जेवण झाल्यानंतर सुद्धा असा पोटावर राक्षस उठल्यागत आम्ही चेपलं होतं ते सगळं आमच्या अगदी गळ्यापर्यंत आलं होतं. अशीही आम्हाला दोघांना हे असं ओ येईस्तोवर खाण्याची सवय नव्हतीच. पण खाऊ आजी म्हणायची कधी नव्हे तो बकासुर जागा झाला तर काहीतरी अघटीत घडण्याची ती सूचना असते. तरी घरून निघताना आजी खेकसली होतीच.
“रांडेच्यानो बापाचा पैसा अवदशीच्या बोडक्यावर घालू नका.”
तिच्या मते रात्रीच्या वेळेस जेवणानंतर जिभेवर अवदशी येते जी आपल्या मार्फत तिची रसनातृप्ती करून घेत असते. आमचे वय असल्या गोष्टी गांभीर्याने घेण्याचे नव्हते त्यामुळे आम्ही पोटात सगळं चेप चेप चेपलं होतं.
रात्री साडे बाराच्या सुमारास आम्ही स्कूटरने पुन्हा बदलापूरला घराकडे जायला निघालो. साईबाबा मंदिर क्रॉस करून पुढे अंबरनाथला ऑर्डनन्स जवळ पोचलो आणि इतक्यात जोरदार पाऊस सुरु झाला. ऑर्डनन्सच्या अलीकडच्या गेट जवळ एक सायकलवाला अण्णा होता तिकडे आम्ही थांबलो. अण्णाने मोठं मेणकापड सुंभाच्या दोरीने भिंतीला बांधून त्याच्या चहा, कॉफी, सिगारेट, मावा घेणाऱ्या ग्राहकांसाठी छोटासा आडोसा तयार केला होता. रस्त्याच्या त्या भागात खूप शुकशुकाट होता, दुकाने बंद होती. त्यामुळे बऱ्यापैकी अंधार होता.’
आम्ही स्कुटी कडेला उभी केली आणि अण्णाने बांधलेल्या आडोशामध्ये जाऊन उभे राहिलो. आण्णाने आम्हाला पहिले. आम्ही काहीच खरेदी केले नाही तरी त्याने आम्हाला हटकले नाही. त्याने चहा कॉफी बनवण्यासाठी भिंतीजवळ एक पितळी रॉकेलचा स्टोव्ह पेटवला होता त्याचा काय तो आवाज वातावरणाची शांतता भंग करत होता.
आम्ही ५-१० मिनिटं पाऊस थांबायची वाट पाहत होतो पण पाऊस काही केल्या कमी होईना. लाजेखातर आम्ही अण्णाकडून २ कॉफी मागितल्या. त्याने आमची ऑर्डर ऐकली आणि तो गालातल्या गालात हसला. पाच मिनिटात त्याने कॉफी त्याच्या पितळी डाबरा ग्लास मध्ये ओतली . युज एंड थ्रो च्या जमान्यात हे असले पितळी कप आम्ही प्रथमच पाहत होतो.
माझ्या मित्राला सिगारेट चालायची. त्याने छोटी गोल्डफ्लेक मागितली.
“ साब, सिगरेट कतम हो गया हे. बिडी चलेगा क्या?”
” नाही.. नाही नको” मित्र म्हणाला त्याने आयुष्यात कधी विड्या ओढल्या नव्हत्या.
आम्ही कॉफी प्यायला सुरुवात केली. नागोरी चहा पेक्षा अण्णाची फिल्टर कॉफी एवढी भन्नाट असेल असं वाटलं सुद्धा नव्हतं.
कॉफी पिऊन झाल्यावर मी शर्टाच्या वरच्या खिशातून पन्नास रुपयाची नोट काढली.
“ अरे साब इतना छुटा नही हे मेरे पास. चार आने का कॉफी के लिये पचास का नोट मत दो. पैसा खुला दो.” अण्णाने त्याच्या फळीवर खडूने लिहिलेल्या बोर्डाकडे बोट दाखवलं.
चाय १ आना
कापी २आना
“ इतना सस्ता कॉफी? अरे अण्णा चार आना तो कबका बंद हो गया मार्केटसे अभी मिलता भी नही है...” मित्राने वाद घालायला सुरवात केली.
इतक्यात आमच्या स्कुटीजवळ ठाणे ग्रामीण पोलिसांची गाडी येऊन उभी राहिली.
“ ए ...इकडे काय करताय रे रात्रीचं?” पोलीस
मी धावत पोलिसांकडे गेलो.
“ काही नाही साहेब कॉफी घेत होतो जरा. पण सुटे चार आणे नाहीत म्हणून आण्णा हट्ट करतोय.” मी
“येडा झाला का?” पोलीस
माझा मित्र एकटाच भिंतीकडे तोंड करून वाद घालत होता. आण्णा त्याची सायकल, स्टोव्ह, त्याचा मेण कापडाचा आडोसा सगळं सगळं फटक्यात गायब झालं होतं.
“ साहेब, आम्ही जातो घरी....सॉरी.” मी
मी माझ्या मित्राला जवळपास खेचूनच स्कुटीवर बसवलं आणि स्कुटी काढून आम्ही बदलापूरच्या दिशेने धूम ठोकली.
आजही अनेक वेळा त्या रस्त्यावर टपरी वाला अण्णा दिसतो आणि त्याचे चार आणे वसूल करण्यासाठी हाका मारतो. पण मी कधीच गाडी थांबवत नाही.