Get it on Google Play
Download on the App Store

०४ पहिले चुंबन २-२

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग  समजावा.)

आईला माझ्या लग्नाची घाई झाली होती.जसे वय वाढेल तसे मनासारखे स्थळ मिळणे कठीण होईल.आपल्याला मनासारखा जावई निवडता येणार नाही.असे ती आवर्जून बाबांना सांगत असे.

माझे मित्र पुष्कळ आहेत.मॅरेज मटेरियल ज्याच्यात आहे असा मुलगा अजून मला मिळाला नाही.असे मी दोघांनाही स्पष्टपणे सांगितले.आईने म्हणजे काय असे मला विचारले. 

ज्याच्याबद्दल त्या विशिष्ट प्रकारची आंतरिक ओढ वाटेल असा मित्र अजून मला मिळाला नाही.मी स्पष्टीकरण दिले.

आईने मला तुझे नाव मॅरेज ब्युरो मध्ये विवाह मंडळात घालणार आहे असे सांगितले.तुझी कांही हरकत आहे का असेही विचारले.मी तिला नाव घालायला हरकत नाही.अंतिम निर्णय माझाच असेल असे ठामपणे सांगितले. प्रेमोत्तर विवाह किंवा विवाहोत्तर प्रेम   यातील मला कांहीही चालेल परंतु ज्याच्याशी मी लग्न करीन त्याच्याबद्दल मला आंतरिक ओढ वाटली पाहिजे याबद्दल मी ठाम होते.व्यावहारिक गोष्टी तुम्ही पाहा भावनात्मक गोष्टी मी पाहणार,असे मी तिला सांगितले.

त्यावर ती म्हणाली ते तर आहेच तुझ्या मर्जीविरूद्ध आम्ही कसे काय काही करू?आणि पुढे मिस्कीलपणे ती म्हणाली आम्ही लाख करू तू आम्हाला थोडीच कांही करू देणार आहेस?

पुढे तो विषय तिथेच संपला.आईने विवाह मंडळात नाव नोंदवले.अपेक्षा काय तेही तिनेच ठरवून त्याप्रमाणे अपेक्षा दिल्या.एकदा तिने मला ते सर्व दाखविले.मी तिने दिलेल्या माहितीमध्ये कांही सुधारणा सुचवली.असेच दिवस व महिने चालले होते.आई मला कांही स्थळे दाखवत होती.मी तिच्याबरोबर साईट्वर ती पाहतही होते.मला एक प्रकारची गंमत वाटत होती.मी तिने आणलेले प्रत्येक स्थळ नाकारत होते. तिने दाखवलेल्या एकाबद्दलही मला आंतरिक ओढ वाटत नव्हती. मला प्रेमविवाह करावा असेही वाटत नव्हते.पारंपरिक पध्दतीने जुळवून लग्न करायचे असेही वाटत नव्हते.प्रेमोत्तर विवाह की विवाहोत्तर प्रेम असे द्वंद्व माझ्या मनात नव्हते.

मी थोडीशी दैववादी आहे.थोडीशी कां बरीचशी आहे.जे जेव्हां होणार असेल ते तेव्हां होईल असे माझे मत होते.त्यामुळे मी निश्चिंत होते.या सगळ्याकडे मी दूरस्थ भावनेने थोड्या बहुत अलिप्तपणे पाहात होते.

एक दिवस माझा दात एकाएकी ठणकू लागला.हिरडी सुजली.बहुधा खाताना कांहीतरी अडकले असावे.मी ब्रश वगैरे करत अडकलेला पदार्थ काढण्याचा प्रयत्न केला.दाढ आणखीच दुखू लागली.अजूनपर्यंत मला कधीही दंतवैद्याकडे जाण्याची वेळ आली नव्हती.आई बाबा कधी कधी एका दंतवैद्याकडे जात असत.मीही त्यांच्याकडे जायचे ठरवले.मी नंबर लावण्यासाठी फोन केला.फोनला कुणीही उत्तर देत नव्हते.तसे दंतवैद्य खूप होते.आमच्या गल्लीतच एक नवी पाटी एवढ्यातच लागली होती.नवीन दुकानात,नवीन मॉलमध्ये,नवीन पेट्रोल पंपावर, आपण अनमान न करता सहज  पटकन जातो.किंबहुना मुद्दाम जातो  परंतु डॉक्टर मात्र ओळखीचा, कुणीतरी चांगला म्हणून सुचवलेला,विश्वासाचा लागतो.हल्ली फॅमिली फिजिशियन ही प्रथा जवळजवळ बंदच झाली आहे.हल्ली स्पेशलायझेशनचे युग आहे.जिकडे तिकडे स्पेशालिस्ट दिसतात.तरीही आपण ओळखीच्या स्पेशालिस्टकडे जातो.आपल्या खात्रीच्या डॉक्टरने,नातेवाईकाने मित्रमैत्रिणींनी   सुचवलेल्या स्पेशालिस्टकडे जातो.

शेवटी मी त्या पत्त्यावर प्रत्यक्ष गेले.बाहेर पाटी लावली होती.दवाखाना अमुक अमुक तारखेपर्यंत बंदर आहे.

माझी ऑफिसमधील मैत्रीण नुकतीच एका दंतवैद्याकडे जावून ट्रीटमेंट घेऊन आली होती.तिला त्याचे गुणगान करतानाही मी ऐकले होते.मी तिच्याजवळ तो दंतवैद्य कसा आहे अशी चौकशी केली.ती अभय नावाच्या एका दंतवैद्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेऊन आली होती.ती न दमता दवाखाना व तो कोण तो अभय याचे कौतुक करीत सुटली. दवाखाना अतिअद्यावत कसा आहे.त्यात काय काय सुविधा आहेत.लहानसे ऑपरेशन थिएटरही आहे.हा अभय परदेशात जाऊन शिकून आलेला आहे.त्याचा हात हलका कसा आहे.तो दिसायला रुबाबदार कसा आहे.इत्यादी इत्यादी.त्यावर मी तिला हसून म्हटले, बहुधा त्याने इन्जेक्शन दिल्याशिवायच तू बधिर झाली असावीस.आणि त्याने तुझ्या दातावर काम केले असावे.बहुधा तू त्याच्या प्रेमात पडलेली दिसतेस.जरी तुझा दात दुखत नसला तरीही तू त्या बहाण्याने त्याच्याकडे बहुधा  चकरा मारणार असे मला वाटते.त्यावर तुझे आपले कांहीतरीच अशी प्रतिक्रिया तिने दिली.

मी तिच्याकडून नंबर घेतला.फोन (रिसेप्शनिस्टने) स्वागतिकेने घेतला.वेळ दिल्याप्रमाणे मी माझ्या दाताच्या कामासाठी तिथे हजर झाले.माझ्या मैत्रिणीने सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या होत्या.दवाखाना अत्याधुनिक होता.दंतवैद्याकडे आतापर्यंत न पाहिलेल्या अनेक गोष्टी तिथे होत्या.अभयबद्दल तिने सांगितलेल्या सर्व गोष्टी बरोबर होत्या.ती तिळमात्रही अतिशयोक्ती करत नव्हती.अभय फार देखणा नसला तरी रुबाबदार होता.त्याच्या बोलण्यात मार्दव होते.हातात कसब होते. हात हलका होता.दवाखान्याची सजावट व त्याचे बोलणे याने तो अर्धी लढाई जिंकत असे.उरलेली अर्धी लढाई त्याचा हलका हात व कामातील कसब त्याला जिंकून देत असे.

मैत्रिणीपेक्षा जास्तच मी संमोहित (हिप्नॉटाइज) झाले.मी मैत्रिणीला थट्टेने जे म्हटले ते माझ्या बाबतीत खरे ठरण्याचा प्रसंग आला होता. माझ्या दाताच्या कामासाठी मला तीन दिवस त्याच्याकडे जावे लागले.दाताचे काम कधी संपूच नये असे वाटत होते.खरे म्हणजे दंतवैद्याकडे जायला लोक घाबरत असतात.नाईलाजाने लोक त्याच्याकडे जातात.मी रोज त्याच्याकडे उत्साहात जात होते. काम संपले तरी त्याच्याकडे मी आणखी दोन तीन दिवस दात दुखतो अशा सबबीखाली जात होते.ही गोष्ट त्याच्या लक्षात आली.तुमचा दात ठणठणीत बरा झालेला आहे.तुम्हाला इथे यावेसे वाटत असेल तर माझी त्याला कांहीच हरकत नाही.( यू आर ऑलवेज वेलकम) तुमचे नेहमीच स्वागत आहे.दाताच्या सबबीखाली नाही आलात तरी चालेल.असे त्याने सुचविले.मी त्याला भेटण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी,जात होते ते त्याने बरोबर ओळखले होते.एवढेच नव्हे तर माझ्या भावनेचे स्वागतही केले होते.अप्रत्यक्ष रित्या मला प्रोत्साहनही दिले होते.   

मला जे वाटत होते तेच त्यालाही वाटत आहे हे माझ्या लक्षात आले.आमच्या भेटीगाठी वाढत चालल्या.बोलता बोलता बहुवचनावरून आम्ही एकवचनावर केव्हां आलो ते आमचे आम्हालाच कळले नाही. 

रविवार सोडून कारण त्यादिवशी त्याचा दवाखाना बंद असे,रात्री त्याचा दवाखाना बंद होण्याच्या वेळेला मी जात असे.रविवारी आम्ही ठरलेल्या एखाद्या जागी भेटत असू.कधी कधी मी त्याच्या फ्लॅटवर जात असे.त्याच्या आईवडिलांशी त्याने माझी ओळख करून दिली होती.तो अविवाहित आहे याची मी खात्री करून घेतली होती.आम्ही कधी कॉफी हाऊसमध्ये, कधी रेस्टॉरंटमध्ये, कधी पार्कमध्ये, कधी मॉलमध्ये, क्वचित रात्री सिनेमाला जात असू.त्याला नाटकांची आवड आहे.आम्ही नाटकालाही जात असू. 

सुरुवातीला सिनेमाला, नाटकाला,मैत्रिणींबरोबर जाते असे मी घरी सांगत असे.एक दिवस मी त्याची ओळख माझ्या आई बाबांजवळ करून दिली.त्यांना माझी अंतरीची ओढ असलेली व्यक्ती माझ्या जीवनात आल्याचे लक्षात आले.

आम्ही इतके जवळ येवूनही अजून एकमेकांना चुंबन दिले नव्हते.जास्तीत जास्त म्हणजे  हातात हात घालून फिरणे यापलीकडे आलिंगन हीसुद्धा पायरी आम्ही ओलांडली नव्हती. जवळिकीची पायरी ओलांडली तर दुसऱ्याला काय वाटेल असे प्रत्येकाला वाटत होते.आपल्याबद्दल दुसर्‍याचे मत वाईट होवू नये याची प्रत्येक जण काळजी घेत होता.  आम्ही दुसऱ्यापासून जाणीवपूर्वक  सुरक्षित अंतर राखून होतो.

एक दिवस आम्ही त्याच्या क्लिनिकमध्ये गप्पा मारत नेहमीप्रमाणे बसलो होतो.आज बाहेर कुठे जाण्याचा त्याचा मूड दिसत नव्हता.स्वागतिका व इतर स्टाफ निघून गेला होता.आम्ही दोघेच दवाखान्यात होतो. त्याने दवाखान्याचा बाहेरचा दरवाजा बंद करून घेतला.

आपल्याला बाहेरून येऊन कुणी डिस्टर्ब करू नये म्हणून तो असे करीत असे.त्यामुळे मला त्याचे विशेष काही वाटले नाही.

तो माझ्या जवळ आला.एकाएकी त्याने मला डोळे मिटून घे असे सांगितले.मी कां असा प्रश्न न विचारता त्याने सांगितल्याप्रमाणे पापण्या मिटून घेतल्या.कित्येक दिवस मी ज्याची वाट पाहत होते तेच आता होणार अशी माझी कल्पना होती.माझ्या शरीराला किंचित कंप सुटला होता.ओठ थरथरत होते.तो माझ्या जास्त जवळ आल्याचे मला जाणवले.सेंटमध्ये मिसळलेला त्याच्या शरीराचा गंध जाणवत होता.  त्याचा श्वास माझ्या चेहऱ्यावर गरम लागत होता.इतक्यात अलगदपणे त्याने माझा चेहरा आपल्या ओंजळीत धरला आणि अलगदपणे माझ्या पापण्यांवर आपले ओठ ठेवले.प्रथम त्याने माझ्या डाव्या डोळ्याचे अल्लद चुंबन घेतले.नंतर उजव्या डोळ्याचे चुंबन घेतले.मी पुढील कृतीची वाट पाहत होते.त्याचे हात बाजूला झाल्याचे जाणवले.तो माझ्यापासून दूर गेल्याचे लक्षात आले.मी हळूच डोळे उघडले.मी त्याच्याकडे पाहात होते.कोचाच्या दुसर्‍या टोकाला तो बसला होता.त्याच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते. त्याने दाखविलेले धार्ष्ट्य मला   आवडले कि नाही अशा संभ्रमात तो होता.त्याच्या चेहर्‍यावर किंचित संदेह,किंचित भीती,समाधान आणि   तृप्ती दिसत होती.

माझ्या चेहऱ्यावरून मी अजिबात रागावलेली नाही,उलट सुखावली आहे, हे त्याच्या लगेच लक्षात आले.त्याच्या चेहऱ्यावरील संदेह नाहीसा झाला.केवळ तृप्ती दिसत होती.

त्याने कुठचाही धसमुसळेपणा केला नव्हता.अत्यंत नाजुकपणे त्याने अलगद आपले ओठ माझ्या डोळ्यावर ठेवले होते.त्याची सर्वच कृती मला रुचली होती, आवडली होती.आम्ही दोघांनी जाणीवपूर्वक राखलेली दूरी,नाहीशी   करण्याची त्याची पद्धत मला आवडली होती.  

*आता माझी पाळी होती.मी त्याला त्याचे डोळे मिटून घ्यायला सांगितले.*

*बहुधा त्याला मी त्याने माझ्या घेतलेल्या चुंबनांप्रमाणेच   त्याच्या पापण्यांचे चुंबन घेईन असे वाटत असावे.*  

*प्रथम माझा तसाच विचार होता.परंतु प्रत्यक्षात त्याच्याजवळ जाऊन त्याचा चेहरा माझ्या हातात घेऊन मी अलगद त्याच्या ओठांवर ओठ ठेवले. एकाएकी हे धारिष्ट्य हा विचार माझ्या मनात कसा आला माहीत नाही.*

*त्याच्या ओठांचा माझ्या ओठाना पुसटसा स्पर्श झाला.तो स्पर्श दोघांनाही अमाप सुख देऊन गेला .मी लगेच दूर झाले.*

*दुसऱ्याच क्षणी मी लाजेने चूर होऊन गेले.त्याची प्रतिक्रिया पाहायलासुद्धा मी तिथे थांबले नाही.तो डोळे उघडणार एवढ्यात मी पळून आतल्या खोलीत गेले.*

*आमच्या पहिल्या चुंबनाची स्मृती खोलवर माझ्या स्मृतीमंजुषेत मी जपून ठेवली आहे.*  

(समाप्त)

२१/११/२०२१©प्रभाकर  पटवर्धन