Get it on Google Play
Download on the App Store

सावध प्रकरण 8



 

प्रकरण ८
 मायरा कपाडिया ने आपली गाडी एकदम थांबवली आणि दार उघडून घाबरून उडी मारून बाहेर आली.
 “काय आहे हे?” पाणिनी कडे बघून ती उद्गारली.
“एक माणूस आडवा पडलाय एक तर तो झोपलेला असावा किंवा पिऊन पडला असावा किंवा मेलेला असावा.” पाणिनी सावधपणे म्हणाला. “चल बघूया ”
“पुढे होऊन पाणिनीने गॅरेज चे दार सताड उघडलं. त्याबरोबर गाडीच्या हेडलाईटचा झोत त्या माणसाच्या संपूर्ण शरीरावर पडला पाणिनीने खाली वाकून तपासलं तर त्या माणसाच्या डोक्याला रिव्हॉल्व्हरच्या गोळीच्या आकाराचे एक भोक पडलं होतं. “सकृत दर्शनी तो मेला आहे असं दिसतय”
मायरा कपाडिया अडखळत एक पाऊल पुढे आली. तिच्या घाबरलेल्या श्वासाचा स्पष्ट आवाज पाणिनीला ऐकू आला.
“काय आहे हे? पटवर्धन, कशात अडकवायला बघताय मला? तुम्ही काय घडवून आणलंय हे?” तार स्वरात किंचाळून मायरा म्हणाली.
“आपण हा प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीने विचारू. कुठल्या पद्धतीच्या सापळ्यात तू मला अडकवायला बघते आहेस मायरा?”
 
“आता मला कळलं पटवर्धन, की माझी गाडी रस्त्यात दिसली तेव्हा मी ती गॅरेजमध्ये आणून ठेवावी असं तुम्ही का सुचवलं होतं.”
“मी तुला गाडी गॅरेज मध्ये आणायला सुचवलं नव्हतं. मी तुला विचारलं होतं की काय करायचं? गाडी किल्ली काढून इथेच ठेवायची आहे की रस्त्यात? तूच स्वतः म्हणाली होतीस की गाडी आपण गॅरेज मध्ये ठेवू.”
पाणिनी म्हणाला आणि पुढे मायरा काय बोलेल याची वाट न बघता खाली वाकून त्या प्रेताची तपासणी करू लागला. ते प्रेत जयद्रथ परब याचं होतं म्हणजे मायरा कपाडियाचा  पहिला नवरा.
एव्हाना मायरा ने सुद्धा ते ओळखलं होतं “अरे देवा माझ्या...” असं काहीतरी पुटपुटत तिने एकदम पाणिनीचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून स्वतःला शांत करायचा प्रयत्न केला.
“मायरा ही गोष्ट तुला पोलिसाला कळवावीच लागणार आहे. आता जेव्हा तू ही गोष्ट पोलिसांना सांगशील तेव्हा मला तू ही गोष्ट ज्या पद्धतीने कळवलीस त्यापेक्षा पोलिसांना जरा चांगल्या पद्धतीने तुला सांगावी लागेल.” पाणिनी म्हणाला
“काय म्हणायचंय काय तुम्हाला?”—मायरा
“पोलिसांच्या दृष्टिकोनातून आपण विचार करू. हा आता जो माणूस इथे मरून पडला आहे गॅरेजमध्ये, तो माणूस म्हणजे तुला हव्या असलेल्या सर्व सुखाच्या आड येणारी व्यक्ती होती. तुला परितोष हिराळकर शी लग्न करायची संधी होती आणि हा माणूस म्हणजे परब
 जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत तुला ती संधी मिळायची शक्यता नव्हती त्याचा मृत्यू होणं म्हणजे तुला ती संधी मिळणं असाच त्याचा अर्थ होतो.”
“असं आडून आडून का सुचवताय पटवर्धन? तुम्ही माझ्यावर अप्रत्यक्षपणे खुनाचा आरोप करत आहात.”
“मी करत नाहीये मायरा, पोलीस काय करतील ते तुला सांगतोय.”
“ओ ! पटवर्धन सर, हे का घडायचं होतं माझ्या आयुष्यात नेमकं?”
हमसून हमसून घाबरून रडत मायरा म्हणाली.
“तुला अजून काही झालं नाहीये. जे झालंय ते परब ला झालंय आता ही गाडी आहे तिथेच राहू दे. आपण पोलिसांना कळवू. तू तुझ्या गाडीचे हेडलाइट्स बंद कर आणि आत ज्या गोष्टी जिथे होत्या तशाच ठेव. आपण पोलिसांना फोन करू. मी पोलिसांना फोन करत असताना तुला माझ्याबरोबर राहायचं आहे की नाही?”
“ मी नाही तिथे थांबू शकणार  -मायरा”
“पण मला पोलिसांना हे सांगावं लागेल की जेव्हा आम्हाला ते प्रेत सापडलं तेव्हा तू माझ्याबरोबर होतीस म्हणून.”
मायरा काही बोलली नाही आणि पाणिनी पासून दूर निघून गेली. पाणिनीने प्रथम सौम्या सोहोनी ला फोन लावला.
“सौम्या कीर्तीकर तिथे बसला आहे आपल्या ऑफिसमध्ये अजून?”
“तो फोन करायला म्हणून बाहेर पडला तो अजून परत आलेला नाही.”
“किती वेळ झाला बाहेर पडून?”
“साधारण पाच मिनिटं”
“जेव्हा तू आपल्या ऑफिसमध्ये आलीस त्यावेळेला तू कीर्तीकर ची गाडी आणि त्याचा तो ड्रायव्हर यांना बघितलं होतंस?”  पाणिनी ने विचारलं.
“हो”
“किती वेळापूर्वी?”
“पाच वाजल्यानंतरच. म्हणजे साधारण एक तास झाला असेल”- सौम्या म्हणाली.
“तुला हे कसं कळलं की ती गाडी कीर्तीकर ची होती ? ”
सौम्या हसली. “मी त्या गाडीचा नंबर पाहिलाय यापूर्वी. मी कीर्तीकर ची गाडी बघितली तेव्हा त्याचा नंबर माझ्या लक्षात होता.”
“आत्ता पाच मिनिटां पूर्वी बाहेर जाण्याआधी कीर्तीकर आपल्याच ऑफिसमध्ये होता?”  पाणिनी ने विचारलं.
“हो. तो खाली गेला आणि त्यांनी त्याच्या ड्रायव्हरला जायला सांगितलं आणि ते सांगून तो इथे येऊन बसला.”
“ ड्रायव्हरला जा म्हणून सांगायला तो खाली गेला तेव्हा किती वेळ खाली होता?”
“फार नाही, दोन मिनिटात असेल दोन मिनिटापेक्षा जास्त नाही. का हो सर?”—सौम्या
“मी तुला ते नंतर सांगतो सौम्या, कीर्तीकर पुन्हा जेव्हा वर परत येईल आत्ता, तेव्हा त्याला सांग की मी काही एवढ्यात परत येऊ शकणार नाहीये. म्हणजे मला यायला रात्रच होईल तेव्हा तू जा.”
“अहो पण सर मला वाटलं होतं की तुम्हाला त्याला भेटायचं होतं.”
“भेटायचं होतं हे बरोबर आहे पण आता नाही. आता मी फार काही तुला तपशील सांगत नाही पण तू मात्र ऑफिसला बसून रहा मी येईपर्यंत.”
“ठीक आहे. आणखी काही?”-सौम्या
“बाकी काही नाही एवढंच..” बंद करतो फोन असं म्हणून पाणिनीने फोन बंद केला.आपली इतर काही कामे आवरून पाणिनी ऑफिस ला आला तेव्हा सौम्या वाटच बघत होती त्याची.
“काय झालंय काय सर? कसली गडबड आहे इतकी?” पाणिनी ऑफिसमध्ये आल्यानंतर सौम्यानं विचारलं
“कीर्तीकर कुठे आहे आता? तू त्याला कटवलस का?”  पाणिनी ने विचारलं.
“त्याला कटवायची वेळच आली नाही. तो फोन करायला म्हणून बाहेर गेला आणि तो परत आलाच नाही.”
“सौम्या, नीट ऐक, त्या ड्रायव्हरचं नाव जयद्रथ परब असं आहे आणि आता असं लक्षात आलंय की तो मायरा कपाडिया चा पूर्वीचा नवरा आहे. सात आठ वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. नंतर ती दुसऱ्या एका माणसाबरोबर पळून गेली आणि तिने परबला घटस्फोट दिला., आता एक लक्षात घे ज्या वेळेला आपल्या ऑफिस मधून कीर्तीकर बाहेर पडला आणि त्याने  ड्रायव्हरला, म्हणजे परब ला जायला सांगितलं तेव्हा परब तिथून मायरा च्या घरी गेला असावा.म्हणजे, मी तेव्हा कीर्तीकरच्या घरात होतो आणि त्या वेळेला परब, मायरा कपाडिया च्या घरी गेला. त्याचं प्रेत आता या क्षणी मायरा कपाडिया च्या गॅरेज मध्ये आहे. त्याच्या कपाळात कोणीतरी गोळी घातली जिथे त्याला गोळी घातली तिथेच तो पडला.”
“सर आता तुम्ही मायरा कपाडिया चं वकीलपत्र घेणार असाल ना?”
“.आयुष्यात पहिल्यांदा मी पोलिसांसोबत अत्यंत मोकळेपणाने बोलणारे आणि माझी कार्ड टेबलावर ठेवणारे. मायरा माझं अश्लील नाहीये पण मी तिला पोलिसांना सगळं काही खरं तेच सांगायचा सल्ला दिलाय. आणि मी सुद्धा स्वतः पोलिसांना सगळं सत्यच सांगणारे”-पाणिनी म्हणाला
“म्हणजे त्या किल्ली बद्दल? तुम्ही काय शोधलं त्याबद्दल सर्व?”
हो सौम्या सगळं काही. आपल्या जाहिरातीला उत्तर म्हणून जी काही पत्र आली आहेत ती सगळी काढ बाजूला. आणि त्या पत्रासोबत आलेल्या किल्ल्या सुद्धा. मी पोलिसांना आज आलेल्या फोन बद्दल त्या वहीत लिहिलेल्या गाडीच्या नंबर बद्दल” सगळं काही सांगणारे ते नाही केलं तर मी या सगळ्या प्रकरणात कुठेतरी अडकणारे. असा अडकणारे की बाहेर पडणे ही मला अवघड होणारे.”
“पोलीस कधी येतील इकडे? म्हणजे किती वेळानी येतील?”-सौम्या
“ते एका गोष्टीवर अवलंबून आहे”.
“कुठल्या?”
“ते मायरा ला  किती प्रश्न विचारतात यावर. बरं सौम्या, आता हा विषय तात्पुरता बाजूला ठेवू. आपण मस्तपैकी बाहेर जेवायला जाऊ. आल्यावर आपण स्वतःहून पोलिसांची वाट बघत बसू. तोपर्यंत मी कनक ला थोडं कामाला लावणारे”
“कसल्या कामाला जुंपणार आहात त्याला?”
“कळेलच तुला” पाणिनी म्हणाला आणि बोलता बोलता त्याने कनक ओजस चा नंबर लावला
“कनक तुझ्यासाठी एक तातडीचं काम आहे. तुला एका पिस्तुलाचा नंबर देतो 38 कॅलिबरचं हे रिव्हॉल्वर आहे त्याचा नंबर आहे एस ६५०८८ या पिस्तुलाचा सगळा इतिहास मला हवाय म्हणजे ते कधी विकलं गेलं होतं ? कुणी ते खरेदी केलं? जे, जे काही तुला सापडेल ते सर्व. “मला आणखीन एका माणसाची माहिती हवी आहे. मी सध्याचे प्रकरण हाताळतोय त्यातल्या कीर्तीकर चा ड्रायव्हर त्याचं नाव आहे जयद्रथ परब”
“ठीक आहे पाणिनी. लागतो मी कामाला पण त्या रिव्हॉल्व्हरबद्दल एवढी कशाला माहिती हवी आहे तुला?” कनक नं विचारलं.
“याचं कारण असं आहे मित्रा, कोणीतरी, तुझा जिगरी मित्र पाणिनी पटवर्धन याला अडकवायचा प्रयत्न केलाय”
“आणि तुला या प्रकरणात चक्क अडकायचं नाहीये? हे तुझ्या नेहमीच्या स्वभावापेक्षा वेगळच दिसतंय पाणिनी.” कनक तिरकसपणे म्हणाला
“मला नवीन प्रकरण माझ्या मर्जीनुसार घ्यायला आवडतं. दुसऱ्याने लादलेले प्रकरण घ्यायला आवडत नाही. मी सांगितलेली माहिती काढ लवकरात लवकर आणि मला दे. मी आणि सौम्या जेवायला बाहेर जातोय आम्ही परत येऊ तेव्हा मी पोलिसांबरोबर बोलत असेन कदाचित.”
“मी पोलिसांना हे सांगणं आवश्यक आहे का?” कनक ने विचारलं.
“नाही. तू याच्यापासून दूर राहिलेलाच बरा. ठीक आहे तर कनक,  लाग आता कामाला”
“मी लागतो कामाला आणि तू तुझ्या चिकण्या सेक्रेटरीला घेऊन मस्त जेवायला जा.”
पाणिनीचा फोन बंद झाल्यावर सौम्यानं त्याला विचारलं, “ कुठे जाऊया जेवायला?”
“फार लांब पण नको आणि फार जवळ पण नको. आपण नेहमी जिथे जेवायला जातो ती ठिकाण सोडून दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ. जेणेकरून आपण जेवत असताना पोलीस आपल्याला मध्येच धरायला नकोत.”
सौम्याला घेऊन पाणिनी ऑफिसच्या इमारतीच्या खाली उतरला.
“माझी गाडी नको घ्यायला म्हणजे पोलिसांना ती गाडी आपल्या पार्किंग मध्ये दिसली की त्यांना वाटेल की आपण फार काही लांब गेलेले नाही. जवळपास कुठेतरी असू. म्हणजे त्यांची एवढी धावपळ व्हायला नको.”
बाहेर आल्यावर टॅक्सी करून ते साधारण दोन किलोमीटर अंतरावरच्या एका टुमदार हॉटेलमध्ये गेले जवळजवळ तासभर त्यांनी आनंदानं आणि शांतपणाने जेवणात घालवला.
“कसं वाटतंय आता सर? पोलिसांना तोंड द्यायच्या दृष्टीने तयारी झाली?” जेवणानंतर कॉफी पिता पिता सौम्यानं पाणिनी ला विचारलं.
“आता कशालाही तोंड द्यायची तयारी झाल्ये माझी. चला निघूया” पाणिनी म्हणाला
( प्रकरण ८ समाप्त.)