प्रकरण आठवे
**महाराष्ट्र, पृथ्वी १९५८ **
एका अज्ञात ग्रहाच्या कक्षेत निष्कासयानात अजातरिपू आणि हंसरेखा होते. दोघेही बेशुद्ध अवस्थेत होते.
‘‘अजातरिपू अजातरिपू उठ। बघ न आपण कुठे आहोत.’’ हंसरेखा खडबडून जागी होत म्हणाली.
अजातरिपू त्याच्या निष्कासयानाच्या जीपीएस सिस्टम मध्ये पाहत म्हणाला “ अरे आपण नेहपान ग्रहापासून अनेक प्रकाशवर्ष दूर एका ग्रहावर आलो आहोत.”
“नगरनायकाला जेव्हा कळेल कि आपण त्याला गुंगारा देऊन पळून आलोय तर तो आपल्याला शोधण्यासाठी संपूर्ण ब्रम्हांड धुंडाळून काढेल.” हंसरेखा.
“आता ते शक्य नाही. कारण नगरनायकाचा मनसुबा मला चांगला वाटला नाही तेव्हा आदल्याच दिवशी मी माझा आविष्कार वापरून त्याला कैद करून घेतले. होते. खरा नगरनायक यात कैद आहे.” असे म्हणून अजातरिपुने एक चौकोनी ठोकळा तिच्या समोर धरला.
“ हे काय आहे?”
“ नगर नायकाचा पेंडोरा बॉक्स. हां मी तुला घरी पाठवल्यानंतर जनरेट केला आणि रात्रीच त्याचा एक क्लोन बनवून मूळ नगरनायकाला या पेंडोरा बॉक्स मध्ये कैद केले. हा बॉक्स फक्त नगर नायक स्वत: किंवा त्यांचा क्लोन जेलब्रेक करू शकतो. तेही फक्त त्यांच्या आवाजाच्या सहाय्याने.” अजातरिपू.
“ अरे पण त्याचा क्लोनसुद्धा त्याच्या इतकाच क्रूर असेल ना? आणि तो आपला शोध नक्की घेईल.” हंसरेखा.
“ होय नक्की घेईल पण आणखी ३०० वर्षानंतर. कारण आज मी जो क्लोन त्याच्या जागी नेऊन बसवला आहे तो ४८ वर्षाचा आहे. त्यामुळे अजून तू अस्तित्वात आहेस हे त्याला ठाऊक नाही. त्यामुळे त्याची तुझ्यावर वाईट नजर पडायला अजून ३०० वर्ष जावी लागतील आणि हा पेंडोरा बॉक्स जोवर माझ्या जवळ आहे. तोपर्यंत मूळ नगरनायक सुटू शकत नाही.” अजातरिपू
“ म्हणजे आपण म्हातारे झालो कि हा येऊन मला त्रास देणार तर....” हंसरेखा विनाकारण चिंता करत होती.
“ चिंता करू नकोस इतक्यात तो आपला शोध घेऊ शकत नाही. आपण सहस्त्रकोष्टक आकाशगंगेला कधीच मागे सोडले आहे. आपण नेहपान ग्रहापासून ४८४ लक्ष प्रकाशवर्षे दूर आलो आहोत.”
हताश होऊन हंसरेखेने त्यांच्या निष्कासयानात असलेला रेडीओ सुरु केला. न्यूज सुरु झाल्या
“आकाशवाणी बॉम्बे राजेंद्र झेमसे आपल्याला बातम्या देत आहे.
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर देशाने बरीच प्रगती केली आहे. भारताचे विद्यमान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याचं आकाशवाणीच्या २२ व्या वर्धापनदिनी प्रतिपादन.
नवनिर्मित महाराष्ट्रातील कोकण आणि सातारा यांच्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वत रंगामध्ये स्थित कोयना व्याघ्र प्रकल्प हद्दीत येणाऱ्या गोडांबे पाड्यावर आज वन विभागाला पहाटे ४ च्या सुमारास एक अज्ञात प्रकाश दिसून आला. वन्य अधिकारी आणि वैज्ञानिक यांचे म्हणणे आहे कि जंगलामध्ये नैसर्गिकरित्या वणवा पेटल्यामुळे हा प्रकाश दिसून आला असावा.”
हि बातमी ऐकल्यावर दोघांनी त्यांच्या निष्कासयानाच्या बाहेर पाहिलं. अनेक ग्रामस्थ त्या निष्कासयानाच्या बाजूला जमले होते. सर्वजण हात जोडून उभे होते. काहीजण कोंबडा कापायच्या तयारीत होते. त्यांच्यातील एक भगत बोलत होता.
“ आज पहाटेच्या वेळेला आपल्या गावच्या सहाणेजवळ आपले ग्रामदैवत स्वत: मंदिरासहित प्रकट झाले आहेत. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आजपासून सहाणेजवळ आपण दरवर्षी हा उत्सव साजरा करून कोंबडा बळी देऊन देवाला नैवेद्य करणार आहोत.”
यानाच्या आत बसलेले अजातरिपू आणि हंसरेखा हा प्रकार पाहत होते.
“हा ग्रह कोणता आहे आणि हा काय प्रकार आहे?” हंसरेखा
“या ग्रहाचे नाव पृथ्वी आहे. आणि हे लोक आपल्या यानाला मंदिर समजत आहेत आणि आपल्याला देव ” अजातरिपू
“म्हणजे आपण इथून आपल्या घरी कधीच जाऊ शकत नाही का?” हंसरेखा
“नाही असं काही नाही पण आपण सध्या इथेच सुरक्षित आहोत.” अजातरिपुने मनाशी काहीतरी विचार केला आणि हंसरेखेला काही काळ शांत राहण्यास सांगितले.
दोन दिवसात उत्सव संपताच सर्व नागरिक आपापल्या घरी गेले तेव्हा अजातरिपुने जवळपासचे मोठे पाषाण हेरले आणि ते जिकडे उतरले होते त्या स्थानावर हुबेहूब त्याच्या निष्कासयानाची प्रतिकृती तयार केली आणि नगरनायकाचा पेंडोरा बॉक्स त्या प्रतिकृतीच्या पायात पुरून ठेवला. आतमध्ये ग्रामदेवी आणि ग्रामदैवत यांची सुंदर मूर्ती स्थापन केली.
नंतर ते दोघे त्यांच्या परतीच्या प्रवासाला निघून गेले. नेहपान ग्रहावर परत जाताच सुकरात याने नगरनायकाच्या संमतीने अजातरिपू आणि हंसरेखा यांचा विवाह करून दिला. नगरनायक नवकोट नेहपान यांच्या दरबारात अजातरिपू मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहे. आणखी ३०० वर्षानंतर कदाचित नगरनायक हंसरेखेला त्याच्याशी विवाह करण्याची गळ घालू शकेल पण त्या गोष्टीला अजून बराच वेळ आहे.
आता गोडांबे पाड्यावरील ग्रामस्थ त्यांच्या मंदिरात सहाणेजवळ प्रकट झालेल्या दैवतांची नित्यनेमाने पूजा करतात. मूळ नगर नायकाचा पेंडोरा बॉक्स आजही त्या मंदिराच्या पायाखाली दबलेल्या अवस्थेत आहे जो त्याच्या क्लोनच्या हाती लागणे केवळ अशक्य आहे.
--समाप्त-