मर्डर वेपन प्रकरण ३
मर्डर वेपनप्रकरण ३
“ एक मिनिट, तुला नक्की पोलिसांना बोलवायचं आहे?” पाणिनीनं विचारलं
“ का नाही बोलवायचं? तुम्ही....” ती ओरडली.
“ तू माझ्या ऑफिसात तुझी हँड बॅग विसरून आलीस त्यात अशा काही वस्तू होत्या की पोलिसांनी त्या पहिल्या तर तू अडचणीत येऊ शकतेस. त्या तुझ्या असोत किंवा नसोत, तुला त्याचा खुलासा पोलिसांना द्यावाच लागेल.”
तिने फोन खाली ठेवला. पाणिनी पटवर्धन ने तो उचलून पुन्हा तिच्या हातात दिला. “ कर फोन.” तो म्हणाला. ती अडखळली.
“ तुम्ही सर्व काही संग मला.” ती म्हणाली.
“ सुरुवात तुम्ही करायला हवी,मिसेस रायबागी.तुम्ही माझ्या ऑफिसातून मला न भेटता निघून जाणे, किल्ल्या, ड्रायव्हिंग लायसेन्स आणि महत्वाच्या वस्तू असलेली बॅग मुद्दाम विसरून जाणे या सर्वामुळे मला तुमची काळजी वाटत होती. विशेषतः त्यातल्या एका वस्तूमुळे.” पाणिनी म्हणाला.
“ कोणती वस्तू?”
“ जी वस्तू शोधण्यासाठी तुम्ही बेडरूम मधे पळत जाण्याचा आणि ड्रॉवर मधे ती न दिसल्यामुळे घाबरल्याचा अभिनय केलात ती वस्तू.” पाणिनी म्हणाला.
ती ऐकत राहिली.
“ तसाच अस्खलित अभिनय तुम्ही कोर्टात न्यायाधीशांसमोर करू शकाल ना? ” पाणिनीने तिला उद्युक्त करत विचारलं.
“ तुमचेकडे खरच माझी बॅग आहे?” तिने विचारलं.
पाणिनी ने मन डोलावली.
“ तुम्हाला कशी मिळाली ती?”
“ तुम्ही आज दुपारी आला होतात माझ्या ऑफिसात आणि नंतर अचानक निघून गेलात. बरोबर हँडबॅग न घेता.” पाणिनी म्हणाला.
“ पाणिनी पटवर्धन हे नाव मी ऐकलंय.मी आणि माझा नवरा काही काळ चैत्रापूर ला राहिलोय.तिथल्या पेपरात तुम्ही केसेस जिंकल्याच्या बातम्या वाचल्यात.पण तुमच्या ऑफिसात मी कधीच आले नाही. ”
“ तुमची बॅग?” पाणिनीनं विचारलं
“ काल माझ्या गाडीतून माझी बॅग चोरीला गेली.मी चैत्रापूर ला होते. गाडीतून उतरून मी मॉल मधे काही छोट्या मोठ्या वस्तू आणण्यासाठी गेले.परत आले तर माझी हँड बॅग गाडीत नव्हती.अर्थात ती गेल्याचे मला नंतरच लक्षात आलं.”
“ पोलिसांना हे सर्व कळवण्यासाठी तुझी मानसिकता झाली असती तर न्यायाधीशांना पटवण्यासाठी तुला वेगळी गोष्ट सांगायला लागली नसती.” पाणिनी म्हणाला.
“ कोर्टाचा काय संबंध याच्याशी? आणि खोटी कथा रचण्याची मला गरज काय?” तिनं विचारलं.
“ याचा अर्थ तू पोलिसांना कळवलं नाहीस बॅग गेल्याचं.”
“ पटवर्धन, या सगळ्याशी तुमचा काय संबंध येतो?”
“ पोलिसात तक्रार का नाही केलीस याचा खुलासा का करू शकत नाहीस?” पाणिनीनं विचारलं
“ याचं कारण पटवर्धन, मला ती गेल्याचं समजलंच नव्हतं, मी चैत्रापूर ला घरी परत येई पर्यंत.म्हणजे मी फ़्लॅट ची किल्ली बॅग मधे ठेवली होती ती काढायला गेले तेव्हा बॅग नसल्याचं लक्षात आलं.”
“ हे तुला मॉल मधून खरेदी केलेल्या वस्तू गाडीतल्या बॅग मधे ठेवतानाच लक्षात यायला हवं होत तुला गाडी उघडतानाच ” पाणिनी म्हणाला.
“ पटवर्धन, मी खूप घाईत होते माझ्या नवऱ्याने मला लौकर घरी बोलावलं होत.तो वेळेच्या बाबतीत खूप जागरूक आहे.त्यामुळे मी गाडी उघडल्यावर खरेदी कलेल्या वस्तू बॅगेत भरत बसले नाही तशाच मागच्या सीट वर टाकल्या आणि निघाले. ”
“ घरी आल्यावर का नाही केलीस पोलिसात तक्रार? ” पाणिनीनं विचारलं
“ माझा नवरा म्हणाला, त्यात विनाकारण वेळ वाया जाईल. आम्ही दोघे वेगळे झालोय, आणि आम्ही त्यानंतरही रात्री एका घरात एकत्र राहिलो हे त्याला कुणाला कळून द्यायचं नव्हतं. ” ती म्हणाली.
“ हे कारण होतं की त्या बॅग मधे अशी एखादी वस्तू होती की जी शोधायला अत्ता आत पळत गेलीस आणि ती वस्तू बॅग मधे होती हे तुला कळू द्यायचं नव्हतं? ” पाणिनीनं विचारलं
“ रिव्हॉल्व्हर? ” तिनं विचारलं
“ अर्थात.” पाणिनी म्हणाला.
“ माझं रिव्हॉल्व्हर बॅगेत नव्हत पटवर्धन.ते माझ्या बेडरूम मध्येच कपाटातल्या ड्रॉवर मधे होतं. ज्या कोणी बॅग चोरली त्यानेच घरी येऊन रिव्हॉल्व्हर चोरलं असणार माझ्या फ़्लॅट वर येऊन कारण बॅग चोरल्यावर त्यात ठेवलेल्या फ़्लॅटच्या किल्ल्याही त्या व्यक्तीला मिळाल्या असतील.” ती म्हणाली.
पाणिनी तिचा युक्तिवाद ऐकत राहिला.
“ आणि पटवर्धन, तुम्ही आता आलाय तुमच्या जवळच्या माझ्या किल्लीने माझ्या परवानगी शिवाय माझा फ़्लॅट उघडलाय तुम्ही. तुम्हीच तुमची कथा एकदा तपासून बघा ”
“ तू खरच तुझ्या बरोबर रिव्हॉल्व्हर घेतली नव्हतीस?” पाणिनीनं विचारलं
“ बिलकुल नाही.मी अत्ताच पंधरा मिनिटांपूर्वी इथे पोचले.आल्यावर अंघोळ करत होते, तेवढ्यात बाहेर तुमचा आवाज ऐकला.तर आता मिस्टर पटवर्धन, आता मला माझी बॅग परत कराल का? ”
“ त्या आधी मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुला.” पाणिनीनं विचारलं
“ काही अधिकार नाहीये तुम्हाला मला प्रश्न विचारायचा.काहीही अधिकार नव्हता तुम्हाला माझ्या घरात घुसण्याचा. ”
अचानक पाणिनी पटवर्धन ने पूर्ण व्यावसाईक पद्धतीने आक्रमक होत प्रश्न विचारला, “ तू आणि तुझा नवरा वेगळे राहता तर त्याला आज का भेटायचं होतं तुला?”
“ माझा घरगुती मामला आहे हा.”
“ तुमच्या प्रॉपर्टी बाबत बोलणी करायची होती?” पाणिनीनं विचारलं
“ तुमचा काही संबंध नाहीये.”
“ कालची रात्र तुम्ही कुठे घालवलीत?”
“ खरं तर तुमचा ह्याच्याशी काहीही संबंध नाहीये पण तरीही सांगते, कालची रात्र मी इथेच माझ्या घरी होते. ”
“ मिसेस रती रायबागी, तू जी बॅग माझ्या ऑफिसात ठेऊन आलीस त्यात ठेवलेल्या रिव्हॉल्व्हर मधून दोन गोळ्या उडवल्या गेल्या आहेत.” पाणिनी ने शेवटी बॉम्ब टाकला आणि तो लागू पडला.
“ का ssss य !! ” ती किंचाळली.
“ तू एक चांगली अभिनेत्री आहेस.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही.... प्लीज... बसा ना ! ” रती म्हणाली.
पाणिनीने सौंम्याकडे पाहिलं.दोघेही खुर्चीत बसले.
“ पटवर्धन, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्येत. मला आता तुमची बाजू ऐकायची आहे.”
“ मी तुला जे सांगणार आहे ते प्रत्यक्ष माझ्या समोर घडलेले नाही, माझी रिसेप्शनिस्ट गती म्हणून आहे, तिने सांगितल्यानुसार तू ऑफिसात आलीस. मी आणि सौंम्या, जेवायला बाहेर गेलो असतांना म्हणजे साधारण १२.२० च्या सुमाराला.आमची वाट बघत थांबली होतीस.थोड्या वेळाने तू गती विलासपूर सांगितलंस की तुला जरा बाहेर जाऊन यायचंय,म्हणून तू बाहेर गेलीस आणि परत आलीच नाहीस. आम्ही आल्यावर गती ने आम्हाला हे सर्व सांगितलं.तू बसली होतीस त्या खुर्चीवर एक हँड बॅग होती. अर्थात ती तुझी आहे की आणखी कोणाची हे कळायला मार्ग नव्हता.मग आम्ही त्यातल्या वस्तू बाहेर काढून लिहून काढल्या. ” पाणिनी म्हणाला.
“ त्यातली नाण्यांची पर्स तुम्ही उघडलीत?” रती ने विचारलं.पाणिनी ने मान डोलावली.
“ किती पैसे होते त्यात?” तिने पुन्हा विचारलं.
पाणिनीने सौंम्याकडे पाहिलं.सौंम्या ने आपली छोटी वही काढली “ तीन हजार एकशे रुपये आणि सत्रा रुपयांची नाणी.”
“ आणि रिव्हॉल्व्हर पण होतं?” रती ने विचारलं.
“ हो.”
“ अत्ता कुठे आहे ते?”
“ माझ्या ऑफिसात. अगदी सुरक्षितपणे.” पाणिनी म्हणाला.
“ आणि इतर वस्तू?”
“ त्या अत्ता माझ्याकडे आहेत.”
“ तुम्हीच पाणिनी पटवर्धन आहात हे सिद्ध करता येईल तुम्हाला? ” रती ने विचारलं.
पाणिनी ने आपले आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसेन्स तिला दाखवलं.
“ ठीक आहे. तुम्हीच पाणिनी पटवर्धन आहात याची पटली मला खात्री. आता मला माझी हँड बॅग द्या.”
“ तुला देईन मी पण तूच रती रायबागी किंवा मिसेस पद्मराग रायबागी असल्याची मला खात्री पटवायला हवीस तू.”
“ पण तुम्हाला पटवण्यासाठी जी कागदपत्रे लागतील ती सर्व बॅग मधे आहेत.”
“ पण मी ती तुझ्या ताब्यात देणार नाही, जो पर्यंत मला तुझी ओळख पटत नाही तो पर्यंत.” पाणिनी म्हणाला.
“ त्यात माझं ड्रायव्हिंग लायसेन्स आहे.त्यावर माझा फोटो आहे.”
पाणिनी ने विचार केला लायसेन्स वरील फोटो पहिला रती च्या चेहऱ्याचं निरीक्षण केलं. “ ठीक आहे रती.हे घे सर्व तुझ्या ताब्यात.रिव्हॉल्व्हर सोडून सर्व आहे यात. ती मी नाझ्याच ताब्यात ठेवणार आहे.तो पुरावा असू शकतो.” पाणिनी म्हणाला.
“ कसला?”
“ खुनाचा.”
तिच्या चेहेऱ्यावर भीती पसरली.
“ तुझ्याकडे रिव्हॉल्व्हर कुठून आलं?” पाणिनीनं विचारलं
“ माझ्या नवऱ्याने दिलंय मला.”
“ कशासाठी? आणि त्याच्याकडे कस आलं ते?”
“ त्याने ते विकत घेतलं. मला रात्री गाडी चालवायची सवय आहे.माझ्या संरक्षणासाठी त्याने मला देऊन ठेवलं होतं.”
“ काल रात्री काय झालं तुमच्यात? प्रॉपर्टी बाबत काही तडजोड? ” पाणिनीनं विचारलं
“ हो.”
“ भोपटकर नावाच्या वकीलाला ओळखता?”
“ चांगलंच ओळखते.माझ्या नवऱ्याचा वकील आहे तो.त्याच्यामुळेच आमचं लग्न तुटलं.”
“मला आज दुपारी भोपटकर शी बोलायची वेळ आली.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही का फोन केलात त्याला?” रती ने विचारलं.
“ मी नाही,त्याने माझ्याशी संपर्क केला.तो म्हणाला की तू त्याला फोन करून सांगितलंस की तुझ्या नवऱ्याशी तडजोड करण्याचं काम तू माझ्यावर सोपवणार आहेस ” पाणिनी म्हणाला.
“ तो असं कसं काय बोलू शकतो? मी त्याला मुळीच फोन केलेला नाही.मला गरजच काय एखादा वकील नेमण्याची ? आम्ही दोघांनी व्यवस्थित समझोता केलाय एकमेकात.फक्त एका मिळकतीच्या बाबत एकमत होणे बाकी आहे.” रती म्हणाली.
“ त्याचा अधिकार भोपटकर कडे असल्याचं मला त्याने सांगितलंय.” पाणिनी म्हणाला.
“ मी पद्मराग लाच फोन करून विचारते.” रती म्हणाली आणि तिने नवऱ्याला फोन लावला.बराच वेळ झाला. पलीकडून काहीच प्रतिसाद आला नाही. “फोन व्होईस मेल वर जातोय.”
“ ऑफिस मधे तुझ्या बॅग मधे सापडलेल्या वस्तूंची यादी करायचं काम करत असतांना मी सुद्धा त्याला फोन केला होता.तो पण व्होईस मेल वर गेला.” पाणिनी म्हणाला.
“ मला खरोखरच कळत नाहीये की पद्मराग ने भोपटकर ला फोन करून हे का नाही सांगितलं?” रती उद्गारली.
“ हे तो कधी सांगणार होता? आज सकाळी?” पाणिनी म्हणाला.
“ हो.”
“ आज सकाळी तू तिथे नव्हतीस ?”
“ मला दुसरीकडे जायचं होतं.”
“ तू अत्ता थोड्या वेळापूर्वीच आल्येस इथे.चैत्रापूर वरून इथे यायला अख्खा दिवस लागत नाही.”
“ इतरही कामं होती मला.”
“ काय कामं होती?” पाणिनीनं विचारलं
“ मला तुम्हाला काहीही सांगायचं नाहीये.”
“ ठीक आहे मला एवढंच सांग, तू आणि तुझ्या नवऱ्याने एकत्र रात्र घालवलीत?” पाणिनीनं विचारलं “ आणि प्रॉपर्टी बाबत तडजोड ही केलीत?, त्यानुसार तुमच्या नवऱ्याने आज सकाळीच अॅडव्होकेट भोपटकर ला फोन करून तुमच्यात झालेल्या तडजोडीनुसार आवश्यक पेपर सही करता तयार ठेव असं सांगण अपेक्षित होतं.बरोबर ना?”
“ हो.”
“ अॅडव्होकेट भोपटकर ला तुझ्या नवऱ्याकडून अद्याप काहीही कळवण्यात आलं नाहीये.तुझी हँड बॅग काल पळवली गेली.ती माझ्या ऑफिसात दुपारी ठेवली गेली.त्या बॅगेत पॉइंट अडतीस व्यासाचं रिव्हॉल्व्हर होतं. मोठा गॉगल घालूनआपला चेहेरा लपवण्याचा प्रयत्न करणारी एक मुलगी माझ्या ऑफिसात येते, आपल्याला मोठा धोका आहे, मला तातडीने भेटायचं म्हणून सांगते आणि ही रिव्हॉल्व्हर असलेली हँड बॅग ठेऊन जाते. ज्या रिव्हॉल्व्हर मधून दोन गोळ्या झाडण्यात आल्याचं दिसतंय, दोन मिनिटात खाली जाऊन येते म्हणून सांगून, बॅग तिथेच ठेऊन निघून जाते ती परत येतच नाही. तुझा नवरा कुठे आहे पत्ता नाही,त्याने ज्या गोष्टी आज सकाळी करायला हव्या होत्या त्या केल्या नाहीत या सगळ्याचा अर्थ काय निघतो माहिती आहे?” पाणिनीनं विचारलं
रती गप्प बसली.पाणिनी पुढे म्हणाला,
“ असं गृहीत धर रती, की एका बाईने तुझी हँड बॅग चोरली. तू घरातून बाहेर पडल्यावर ती तुझ्या नवऱ्याच्या घरी गेली,त्याच्यावर तिने दोन गोळ्या झाडल्या, नवरा तिथेच मारून पडलाय, हे सर्व घडल असेल तर ते तुला कुठे घेऊन जाईल? ” पाणिनीनं विचारलं
एकाच क्षण ती विचलित झाली. पण लगेच तिच्या डोळ्यात लकाकी आली. “ तर असा तुमचा डाव आहे तर मिस्टर पटवर्धन ! ”
“ कसला डाव?”
“ तुमच्याच कुठल्यातरी अशिलाने तुम्ही म्हणताय त्याच पद्धतीने माझ्या रिव्हॉल्व्हर ने माझ्या नवऱ्याला मारलाय.आणि मला तुम्ही बळीचा बकरा बनवताय!”
“ म्हणजे तू तुझ्या नवऱ्याला भेटण्यापूर्वी माझ्या अशिलाने तुझी बॅग चोरली?” पाणिनीनं विचारलं
“ हो.”
“ तुझी बॅग चोरली गेल्याचं तू तुझ्या नवऱ्याला बोललीस?”
“ अर्थातच.” –रती.
“ काल रात्री तू एकटीच होतीस तुझ्या नवऱ्या बरोबर?”
“ होय.”
“ आणि तुझ्याकडे पैसे नव्हते?” पाणिनीनं विचारलं
“ मी जेव्हा आले तेव्हा नव्हते.त्यानेच मला काही रकम दिली त्यातूनच मी नवीन हँड बॅग आणि छोटी पर्स घेतली.”
“ तुझ ड्रायव्हिंग लायसेन्स हरवल्याची तक्रार तू पोलिसात नाही केलीस?”
“ आज संध्याकाळीच मी करणार होते.”—रती
“ तुझं रिव्हॉल्व्हर हरवल्याची पण तक्रार करणार होतीस?”
“ मला माहितीच नव्हत बॅग मधे रिव्हॉल्व्हर होतं म्हणून.”
“ मी तुला सुचवतोय एक गोष्ट.तू माझ्या बरोबर पुन्हा चैत्रापूर ला चल.तिथे तुझ्या घरी जा नीट तपास कर. तुझ्या नवऱ्याने एखादी सेक्रेटरी नेमल्ये का? त्याच्या अपॉइंटमेंट ठरवायला वगैरे?” पाणिनीनं विचारलं
“ नाही. गरज लागली तरच तो तिला निरोप देतो.म्हणजे रोज ती त्याच्या ऑफिसला येत नाही.”
“ आज त्याच्या काही अपॉइंटमेंट होत्या?”
“ मला कल्पना नाही. पण त्याचा मॅनेजर आहे एक अंगिरस खासनीस. नावाचा त्याला फोन करून विचारू शकते मी ” –रती
“ खूप जवळचा आहे तो तुझ्या नवऱ्याच्या? म्हणजे भोपटकर पेक्षा?” पाणिनीनं विचारलं
“ भोपटकर कसला! ” ती तुच्छतेनं म्हणाली. “ एक नंबरचा स्वार्थी आणि संधीसाधू ! पण पद्मराग वर त्याने फार मोहिनी घातली ना! पण अंगिरस खासनीस.” पुढे त्याच काही चाललं नाही कधीच.”
“ तुझ्याकडे त्याचा नंबर आहे?” पाणिनीनं विचारलं
“ अर्थातच.पटवर्धन, मी पद्मराग शी लग्न करण्यापूर्वी त्याची सेक्रेटरी होते. माझ्याकडे सगळ्यांचे नंबर्स आहेत.” रती म्हणाली आणि तिने अंगिरस चा नंबर लावला.
“ हॅलो अंगिरस, ” फोन लागताच ती एकदम उत्तेजित होऊन म्हणाली. “ हो,हो, विलासपूर मधेच आहे.......काल चैत्रापूर ला होते... नाही ना त्यालाच लावत होते.... नाही ना, रिंग येते पण नंतर.......आश्चर्य आहे... तो असं करत नाही...... हो न अरे तेच मला जाणून घ्यायचय की त्याच आणि भोपटकर च आज बोलण झालं का नाही. ...... तुला काही कल्पना..... बरं..... मी करतेच आहे प्रयत्न पण तुझा झाला तर त्याला सांग......ओके,ओके.....हे बघ तुला माहित्ये मी हाव करत नाहीये पण मी माझं करियर सोडलंय ना रे पद्मराग साठी ! मग मी थोडी आर्थिक अपेक्षा ठेवली तर..... खरं सांगू का पद्मराग आणि माझ्यात व्यवस्थित समझोता झाला काल रात्री पण तो भोपटकर, स्वत:चं महत्व..... बरोब्बर बोललास तू. बर तर ठेवते फोन. बाय..... ”
फोन बंद करून ती पाणिनी कडे वळून म्हणाली, “ संपूर्ण दिवस पद्मराग ऑफिसात नव्हता.हे न पटणारं आहे. अंगिरस म्हणाला की आज पद्मराग ला काही अपॉइंटमेंट नव्हत्या पण काही महत्वाचा पत्रव्यवहार पुरा करायचा होता त्याला.उद्या दहा वाजता मात्र त्याची महत्वाची अपॉइंटमेंट आहे,त्यासाठी त्याला यावच लागेल.” –रती म्हणाली.
“ त्याला त्या अपॉइंटमेंटस् पाळायच्या असतील तर.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही वकील लोक फारच नकारात्मक आणि खडूस बोलता. तुम्ही मला हेच ठसवण्याचा प्रयत्न करत आहात की माझा नवरा रिव्हॉल्व्हर ची गोळी लागून मरून पडलाय.”
“ आता तर मला त्याची खात्रीच वाटायला लागल्ये. मी पुन्हा सांगतो, तू माझ्या बरोबर चैत्रापूर ला चल.घरी जा आणि सगळं ठीक आहे ना ते बघ.” पाणिनी म्हणाला.
“ आणि ठीक ठाक नसेल तर?” रती ने विचारलं
“ तर पोलिसांना कळव.”
“ वा! पटवर्धन, मी असं सांगू का पोलिसांना की मला अचानक साक्षात्कार झाला की इथे चैत्रापूर मधे घरात काहीतरी घडलं असावं म्हणून मी विलासपूर मधून तातडीने इकडे आले म्हणून? ”
“ मी तुझ्या बरोबर येतो घरी.आपण एकत्रितच तपासणी करू.” पाणिनी म्हणाला.
“ पटवर्धन, माझा नवरा जर घरी असेल आणि काही गडबड नसेल झाली तर केवढा तमाशा करेल तुम्हाला कल्पना आहे? त्यामुळे आमच्यातली जुळून आलेली प्रॉपर्टी विषयक तडजोड फिसकटू शकते. माझ्या वस्तू मला परत केल्याबद्दल आभार,पटवर्धन.मला वाटत की माझ्या नवऱ्यात आणि माझ्यात वाटणी बाबत जे काही ठरलंय,त्यानुसार अॅडव्होकेट भोपटकर ने कराराचा मसुदा केल्यानंतर तुम्हाला मी वाचायला देईन.कारण त्या भोपटकर वर माझा काडीचाही विश्वास नाही. ”
“ आणि रिव्हॉल्व्हर ?” पाणिनीनं विचारलं
“ तुम्हाला खात्री आहे की त्यातून दोन गोळ्या झाडल्या गेल्या आहेत?” रती ने विचारलं.
“ हो.”
“मी कायमच रिव्हॉल्व्हर मधे गोळ्या भरून ठेवते.”
“ आणि ते पळवलं गेलं?” पाणिनीनं विचारलं
“ हो.सांगितलं की मी तुम्हाला आधीच.”
“ तर मग तू आमच्या बरोबर येत नाहीयेस?” पाणिनीनं विचारलं
“ मला वाटतंय पटवर्धन, तुम्ही माझ्या विषयात फार रस घेऊ नये.मला वाटलं तर मी स्वत:हून फोन करीन. ” –रती म्हणाली आणि तिने पाणिनी पटवर्धन ला निरोप दिला.
चैत्रापूर ला येताच पाणिनीने कनक ला फोन लावला.
“ मृगा गोमेद आणि उत्क्रांत उद्गीकर यांची माहिती मिळाली कनक?” पाणिनीनं विचारलं
“मृगा गोमेद, ही बाई, ६२५ सुरुची मार्ग, विलासपूर ला राहते.२८ वय आहे.दिसायला सुंदर आहे. घटस्फोटिता आहे. तिचं विलासपूर मधे एक गिफ्ट शॉप आहे. तिच्या दुकानात अधून मधून एक बाई खरेदीला येते. नेहेमी खरेदीला येते.तिला उत्पन्नाचं दुसरं एखादं साधन असावं.बहुदा पोटगी.तिचा पूर्वाश्रमीचा नवरा मोठा मालदार माणूस आहे.दुसरा उद्गीकर हा पन्नास पंचावन वयाचा माणूस आहे.प्लॉट खरेदी,त्यावर घर बांधणी,विक्री
असा धंदा आहे. ”
“ तात्पुरते आपण त्याला विसरून जाऊ.मृगा ची जास्त माहिती पुढील काळात लागेल.तिच्या बद्दल माहिती काढत रहा. ”
( प्रकरण ३ समाप्त.)