भाग १
राजेश त्याच्या खोलीत एकटा बेडवर बसला होता कारण त्याचे खोलीतील दोन्ही मित्र दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. रात्रीचे अंधारलेले क्षण खोलीत पसरले होते कारण लाईट गेलेले होते. त्याला एकटेपण सहन होत नव्हते. तो फक्त घड्याळाची टिकटिक ऐकत होता.
झोप येत नव्हती आणि बाहेर वादळ आणि ढगांचा गडगडाट होत होता. काही वेळानंतर एक जोरात वीज चमकली. "कुणीतरी माझ्या सोबतीला असते तर किती बरे झाले असते. दोन्ही मित्र असते तर त्यांच्यासोबत एखादा खेळ खेळलो असतो. पण त्यांना येणे शक्य नाही", असे त्याला एकसारखे वाटत होते. मनातल्या मनात हाच विचार तो अनेक वेळा करत होता. मोबाइल तरी किती वेळ पाहणार? कॉलेज मध्ये शिकवून संपले होते आणि आता फक्त परीक्षेसाठी अभ्यासाची सुटी होती. आजचा अभ्यासही झाला होता. रात्रीचे जेवण सुद्धा झालेले होते. पण त्याला झोप येत नव्हती.
अचानक, खिडकी आपोआप उघडली आणि खिडकीतून थंड गार हवा वाहू लागली. सगळी खोली थंडगार झाली. त्याने खिडकी बंद करण्याचा प्रयत्न केला पण वाऱ्याचा जोर इतका होतो की खिडकी बंदच होत नव्हती. त्याने खिडकी बंद करण्याचा नाद सोडून दिला.
थोड्या वेळानंतर पावसाचा जोर कमी झाला त्यामुळे राजेशने खिडकी बंद करून टाकली. मात्र खिडकी जवळचा बराचसा भाग ओला झाला होता.
आता रूम मध्ये भयाण शांतता पसरली.
अचानक राजेशला काहीतरी हालचाल झाल्याचा आवाज आला. जणू काही, एखादा टणक पुतळा जीवंत झाल्यासारखा पण झोपलेल्या अवस्थेत हळूहळू जमिनीवरून सरकत आहे किंवा रांगतो आहे. आता तो आवाज खूप जोराने यायला लागला. क्षणभर असे वाटत होते की कुणी एखादी जमीन खोडण्याची कुऱ्हाड जमिनीवर दाबून सरकवत आहे.
राजेशने नजर फिरवली, पण खोलीत कुणीच नव्हतं. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला.
अचानक तो आवाज बंद झाला आणि खोलीत शांतता पसरली. हायसे वाटून तो दोन घोट पाणी प्यायला.
त्याचे लक्ष उशाशी ठेवलेल्या एका गोष्टीच्या पुस्तकाकडे गेले आणि ते त्याने उचललं. लाईट असते तर हे पुस्तक वाचले असते असा तो विचार करत होता आणि अचानक त्याच्या हातातून ते पुस्तक खाली पडले. ते पुस्तक उचलायला तो खाली वाकला तर त्याला अंधूक प्रकाशात बेडखाली कसलातरी मोठा आकार हालताना दिसला. तो आकार वेगळीच हालचाल करत सरकत सरकत राजेश कडे येऊ लागला होता.