Get it on Google Play
Download on the App Store

भाग २

लग्नानंतरही सोनाली आणि आदिनाथ त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत राहिले, पण आता त्यांच्या यशात आणि संघर्षात एकमेकांचा आधार होता. त्यांच्या प्रेमाने आणि विश्वासाने त्यांनी एकमेकांच्या स्वप्नांना पंख दिले. बरेचदा सोनाली बाहेर राहायची तर घरी आदिनाथ स्वयंपाक करून ठेवायचा. सुरुवातीला कामवाली बाई परवडत नसल्यामुळे घरातली इतर कामे सुद्धा तो करून ठेवायचा. त्याच्या इतर नातेवाईक त्याला हसायचे नाव ठेवायचे, घरगडी म्हणायचे परंतु त्याने हसून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्याचे इतर चुलत, मावस भाऊ डॉक्टर इंजिनिअर वकील वगैरे होते. तेही त्याने निवडलेल्या क्षेत्राबद्दल त्याचा उपहास करायचे. परंतु सगळ्यांकडे त्याने दुर्लक्ष केले. त्यांच्या सहजीवनाची कहाणी इतर अनेकांना मात्र प्रेरणा देणारी ठरली. आता त्यांनी दोघांनी बँकेकडून कर्ज काढून आदिनाथच्या स्टुडिओच्या जवळच वन बीएचके फ्लॅट विकत घेतला आणि पूर्वीच्या रूमचे रूपांतरसुद्धा स्टुडिओतच केले. आता पूर्वीपेक्षा मोठा स्टुडिओ तयार झाला होता.

सोनाली आणि आदिनाथचं लग्न झाल्यावर काही काळ दोघे खूप आनंदी आणि समर्पित जीवन जगले. सध्या कुटुंब वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला नव्हता. थोडे आणखी स्थिरसावर झाल्यानंतर मग ते याबद्दल निर्णय घेणार होते. पण कालांतराने, त्यांच्या करियरमधील जबाबदाऱ्या आणि त्यांच्या कामाच्या वेळा यामुळे त्यांच्या नात्यात ताण येऊ लागला. 

सोनालीच्या पत्रकारितेच्या कामामुळे ती नेहमीच बाहेर असे, विविध शहरांमध्ये, कधी कधी शहराच्या बाहेरही जाऊन तिला बातम्या कव्हर कराव्या लागत. तिचं काम धाडसी आणि जोखमीचं होतं, त्यामुळे ती सतत व्यस्त असे. दुसरीकडे, आदिनाथ त्याच्या स्टुडिओमध्ये तासनतास घालवत असे, आपली शिल्पकला आणि पेंटिंगमध्ये गुंतलेला असे. त्याचं आयुष्य शांतीत आणि स्थिरतेत असलं तरी, त्याला सोनालीच्या अनुपस्थितीचा अभाव जाणवत असे.

सुरुवातीला, दोघेही त्यांच्या कामाच्या व्यस्ततेनंतरही एकमेकांसाठी वेळ काढायचा प्रयत्न करत होते. रात्रीचं जेवण एकत्र घेणं, विकेंडला एकमेकांसोबत वेळ घालवणं आणि एकमेकांच्या कामात रस दाखवणं हे त्यांचं नेहमीचं होतं. पण जसजसं कामाचं प्रमाण वाढलं, तसतसं हे क्षण कमी होऊ लागले. मुंबईसारख्या शहरात महागाई असल्यामुळे पैसा कमावणे हा महत्त्वाचा घटक होता.

एका संध्याकाळी, सोनाली एका महत्त्वाच्या बातमीसाठी बाहेरगावी गेली होती आणि तिला काही दिवस तिथेच थांबावं लागलं. ती परतल्यावर, तिच्या लक्षात आलं की आदिनाथ तिच्या अनुपस्थितीत निराश झाला आहे. आदिनाथने तिच्यावर आरोप केला की, ती तिच्या कामाला इतकी महत्त्व देते की, त्याला आणि त्यांच्या नात्याला वेळ देत नाही. सोनालीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की, तिचं काम तितकंच महत्त्वाचं आहे आणि ती त्यांच्या नात्याची काळजी घेते, पण आदिनाथच्या मनातली निराशा दूर होऊ शकली नाही. काही महिने त्यांच्यात शारीरिक संबंध सुद्धा होऊ शकले नाहीत. 

आणखी एकदा, सोनालीला एका महत्वाच्या कार्यक्रमाच्या कव्हरेजसाठी रात्री उशिरा बाहेर जावं लागलं. ती परत येईपर्यंत आदिनाथ जागा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. त्याने तिला विचारलं, "तू कधीच घरी वेळेवर येऊ शकत नाहीस का? मला असं एकटं वाटतंय की, आपण खरंच एकत्र आहोत का?" 

सोनालीने थकलेल्या अवस्थेत उत्तर दिलं, "आदिनाथ, हे माझं काम आहे. मला यातून आनंद मिळतो आणि हे माझं कर्तव्य आहे. तू का समजून घेत नाहीस?"

दोघांच्या वादामुळे त्यांच्या संवादात कटुता वाढली. आदिनाथला वाटलं की, सोनालीच्या कामामुळे त्याचं महत्व कमी होतंय. त्याने एकदाच तिला स्पष्ट शब्दांत सांगितलं, "तू इतकी बाहेर असतेस की, मला तुझ्या सोबत असण्याची इच्छाच उरलेली नाही."

हे ऐकून सोनालीला खूप दुःख झालं. तिला तिचं काम सोडून देणं शक्य नव्हतं, पण तिला आदिनाथसुद्धा तितकाच महत्वाचा होता. तिने आदिनाथला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण दोघांमध्ये अंतर वाढतच गेलं. 

आदिनाथच्या शिल्पकलेमध्येही बदल जाणवू लागला. त्याच्या कलाकृतींमध्ये दुःख आणि तणावाचं प्रतिबिंब दिसू लागलं. त्याच्या चित्रांमध्ये प्रेमाची उणीव आणि एकटेपणाची भावना स्पष्टपणे दिसत होती. ही चित्रे सुद्धा खूप विकली गेली म्हणजे या जगात प्रेमापेक्षा, प्रेमभंग झालेले लोक जास्त होते की काय? 

सोनालीच्या कामाच्या व्यस्ततेमुळे तिला देखील तिच्या कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं कठीण झालं. तिच्या टिव्ही रिपोर्ट्समध्ये तीची आधीची चमक कमी होत होती, कारण तिचं मन घरातल्या समस्यांनी त्रस्त झालं होतं.

एकदा, त्यांच्या वादामुळे आदिनाथने सोनालीला सांगितलं की, "आपल्याला एक ब्रेक घ्यावा लागेल. आपल्या नात्यात ताण येत चाललाय आणि मला वाटते आपण एकमेकांना जास्तच त्रास देतोय."

सोनालीनेही ते मान्य केलं, पण तिच्या मनात खूप दुःख होतं. तिने विचार केला की, "या परिस्थितीत कसा बदल आणता येईल? आपलं प्रेम इतकं कमजोर कसं झालं?" 

तिने एक निर्णय घेतला की, ती आदिनाथसोबत याविषयी मोकळेपणाने बोलेल आणि दोघंही एकत्र येऊन या समस्येचं निराकरण करतील. 

एका रात्री सोनालीने घरी दोघांच्या आवडीचे काही खाद्यपदार्थ मागवले आणि कॅन्डल लाइट डिनर आयोजित केले. स्टुडिओ सजवला. मग दोघांनी एकमेकांसमोर बसून जेवतांना आपापले विचार मांडले. सुरुवात सोनालीने केली. आदिनाथने त्याच्या मनातला तणाव आणि तिच्या अनुपस्थितीमुळे आलेली एकटेपणाची भावना स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. सोनालीने तिच्या कामाच्या महत्वाबद्दल सांगितलं आणि आदिनाथच्या सोबत राहूनही कामाची जबाबदारी निभावण्याची इच्छा व्यक्त केली. ब्रेकप हा कधीही पर्याय नाही हे दोघांना मनोमन पटलं.  

दोघांनी एकत्र मिळून यावर उपाय शोधायचा ठरवलं. सोनालीने ठरवलं की, ती तिच्या कामाच्या वेळा थोड्या कमी करून अधिक वेळ आदिनाथसोबत घालवेल. आदिनाथनेही तिला पाठिंबा दिला आणि तिला तिच्या कामात मदत करण्याचा निर्णय घेतला. तिने अधूनमधून जास्तीच्या सुट्या घेतल्या तर त्याने कामाच्या ऑर्डर्स घेणे थोडे कमी केले. आता, दोघांनी एकमेकांना अधिक समजून घेतलं आणि त्यांचे नातं पुन्हा एकदा नवीन ऊर्जेने भरलं. त्यांनी एकमेकांसाठी वेळ काढायला सुरुवात केली आणि आपल्या नात्याला पुन्हा एकदा नव्या उत्साहाने जगायला लागले. त्यांच्या प्रेमाने आणि धैर्याने त्यांनी सर्व संकटांचा सामना केला आणि आपलं नातं अधिक मजबूत केलं. 

कालांतराने सोनाली फील्डवर जाऊन वार्तांकन करणारी वार्ताहर न राहता स्टुडिओमध्ये बसून "प्राइम टाइम" मध्ये मुख्य बातम्या देणारी, तसेच कोणत्याही एका महत्वाच्या विषयावर संपूर्ण विश्लेषण करणारी मुख्य न्यूज अँकर झाली होती. आता तिने छोटीशी परवडणारी कार विकत घेतली होती. पण अधूनमधून तिला ठीकठिकाणी वार्तांकन करायला जावे लागत असे कारण तिला या कामाचा खूप अनुभव होता, त्यामुळे नवख्या वार्ताहरांना शिकवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी तिला फील्डवर जावे लागे पण प्रमाण कमी झाले होते.  

यामुळे सोनाली आणि आदिनाथच्या आयुष्यात पुन्हा एकदा बदलाचे वारे आले. सोनालीचा सुद्धा घराबाहेर राहण्याचा वेळ कमी झाला!

त्यांच्या लग्नानंतर सहा वर्षांनी, त्यांना एक गोंडस मुलगा झाला – आर्यन!

आर्यनच्या आगमनाने त्यांच्या आयुष्यात आनंदाची नवी उमेद आली. आर्यन मोठा होत होता. आईला टीव्हीवर बघून बघून तो सुद्धा घरातला आदिनाथचा पेंटिंगचा ब्रश उचलून माइक सारखा तोंडासमोर धरत त्यावर आपल्या आईची टीव्हीवर बोलायची नक्कल करायचा. दोघेही हे बघून खूप हसायचे. मग तिघेही एकमेकांना पॅलेटमधले रंग गालावर आणि चेहऱ्यावर लावायचे. आता या कुटुंबाच्या आनंदाला काही मर्यादच नव्हती!

काही वर्षांनंतर, आदिनाथला युरोपमधून पॅरिस आणि रोमसारख्या ठिकाणांहून त्याच्या पेंटिंग आणि शिल्पकला सादर करण्यासाठी आमंत्रणं येऊ लागली कारण सोशल मीडियावर त्याच्या कलाकृतींची म्हणजे पेंटिंग आणि शिल्पे यांचे फोटो टाकल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली होती.

आदिनाथला जवळपास सात-आठ महिने युरोपमध्ये जाऊन राहावं लागलं. त्याच्या जाण्याने सोनालीला आणि आर्यनला एकटं राहावं लागलं. अधूनमधून तिची आई पुण्याहून चारपाच दिवस मुंबईत येऊन राहून जात असे पण ती एक सामाजिक कार्यकर्ती असल्याने जास्त दिवस ती थांबू शकत नसे. सोनालीने एकीकडे आपल्या पत्रकारितेच्या कामात स्वतःला गुंतवलं, पण दुसरीकडे तिला आर्यनचं संगोपन आणि घराची जबाबदारी निभवावी लागली. हे सगळं करताना तिच्यावर ताण येऊ लागला. आदिनाथच्या अनुपस्थितीत सोनालीला एकटेपणाची भावना अधिकच तीव्र झाली. तिला आदिनाथची खूप आठवण येत होती, पण तिला त्याच्या कलात्मक करिअरचं महत्त्वही समजत होतं. आदिनाथलासुद्धा युरोपमध्ये सोनाली आणि आर्यनची खूप आठवण येत होती, पण त्याच्या करिअरच्या संधींमुळे तो परत येऊ शकत नव्हता!

तिथे त्याला कलेची जाणकार व कदर करणारी इसाबेला भेटली. इटलीमधील विविध कलादालनामध्ये आदिनाथची चित्रे आणि शिल्पे निवडली जाण्यात इसाबेलाची खूप मदत झालीं. तिची या क्षेत्रात खूप ओळख होती. आदिनाथला इथे खूप पैसा मिळू शकणार होता कारण आता कुटुंबासाठी जास्त पैसे कमावणे भाग होते. कलेतून सामाजिक संदेश तर देता येणारच होता परंतु कुटुंबासाठी पैसे कमावणे सुद्धा जास्त महत्त्वाचे होते. तिथे त्याने इटालियन इतिहासावरील परिणामकारक चित्रे आणि शिल्पे बनवली. तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये त्याचे काही कार्टून सुद्धा छापून आले. त्याला लक्षात आले की, भारतापेक्षा युरोपमध्ये कलेची जास्त कदर केली जात होती!

आर्यन शाळेत जाऊ लागला होता. न्यूज चॅनेलच्या कार्यालयात सोनाली असेपर्यंत आर्यनसाठी सांभाळायला एक विश्वासू मावशी त्यांनी ठेवली होती. तिचे काम ती प्रामाणिकपणे आणि चोख करत होती. घरातील इतर कामे सुद्धा ती करत होती. 

कालांतराने संपतकुमार जेलमधून सुटला. सुटल्यानंतर त्याने गुन्हेगारी लोकांशी असलेले आपले काही संबंध वापरून सर्वप्रथम एकच काम केले. सोनालीची माहिती काढली. नंतर तिला धडा शिकवण्यासाठी पैसे देऊन एका ट्रकला तिच्या मागावर लावले. रात्री दोन वाजता एका टीव्ही मालिकेच्या निर्मात्याने दिलेल्या पार्टीवरून परत येत असताना तिच्या कारला धडक देऊन तो ट्रक दूर निघून गेला. तिला फक्त इजा झाली पाहिजे परंतु तिची हत्या करायची नाही असं त्यांचा प्लान होता. तिची गाडी एका डिव्हायडरला जाऊन धडकली आणि उलटली. गाडी खाली तिचा हात आला. ज्या हाताने ती माईक धरून बोलायची तोच हात! 

माईक आणि ब्रश

Nimish Navneet Sonar
Chapters
भाग १ भाग २ भाग ३