भूपाळी श्रीदत्तप्रभूची
उठीं उठी श्रीदत्तात्रेया । श्रीपादश्रीवल्लभा सदया ।
श्रीनृसिंहसरस्वती गुरुवर्या । दर्शन देई भक्तांसी ॥ध्रु०॥
पंच पंच उषःकाल जाहला । अरुणोदय सप्तपंच धाटिला ।
अष्टपंच प्रातःकाला । उदया पावे रवि पूर्ण ॥१॥
आले अमरेंद्रादि अमर । संत साधु मुनिवर ।
समग्र आले नारीनर । कांकड आरती पहावया ॥२॥
नमितां पूर्ण मनोरथ होती । त्रिविध ताप समूळ हरती ।
पूर्वज समस्त उद्धरती । कांकड आरती देखिलिया ॥३॥
वेगें उठती सद्गुरुमूर्ती । सकळिक पदांबुज वंदिती ।
स्तवनीं ध्यानी ओवाळिती । विश्वव्यापक परमात्मा ॥४॥
गुरुत्रैमूर्ति आश्रम घेऊन । तरुवरीं ब्रीदरक्षणार्थ राहुन ।
स्मरतां तारिसी जन संपूर्ण । रक्षिसी गुरुभक्त सर्वदा ॥५॥