पोलिसांकडून छळवाद 5
सरकारी अधिकार्याने लोकांना काही शब्द सांगितले, “प्रजाजन हो, आमच्या कायद्याखाली वागत असलेल्या प्रजाजनांनो, हा बंडखोर, घमेंडखोर राखाल फाशी दिला जात आहे. सरकारचे योग्य हुकूम हा अमान्य करीत आहे, पुन्हा पुन्हा उद्धटपणे ‘अमान्य’ असे सांगत आहे. जे सरकार ईश्वराने तुमच्यावर आणले, त्याचे हुकूम ऐकणे हे तुमचे पहिले कर्तव्य आहे. जो हे कर्तव्य अवमानील, सरकारचा हुकून पायाखाली तुडवील, लोकांस वाईट उदाहरण घालून देईल, कायदेभंग शिकवील, या बंडखोराला, त्या सरकारद्रोह्याला व म्हणूनच समाजद्रोह्याला व हे असे शासन मिळते असते ! सारेजण लक्षात धरा व आज्ञाधारक राहा ; त्यातच सरकारचे व तुमचे हित आहे. कल्याण आहे, शांती आहे. आरोपीला अजूनही माफी मिळू शकेल. जर तो कायद्याप्रमाणे वागायचे कबूल करील... आरोपीला काही सांगावयाचे आहे काय ?”
सारा खिन्न लोकसमुदाय जरा दृष्टी वर करून, अश्रू निमूटपणे पुसून कैद्याकडे पाहू लागला. आपण रडतो म्हणून तर आपणास फाशीची शिक्षा नाही ना होणार ? गोळ्या नाही ना घालणार ? हाही भीतिप्रद विचार अनेकांच्या मनात आला. अश्रू आंतल्या आत दाबू लागले ते. चोरून पुसून टाकू लागले. आरोपी काय म्हणतो आहे ? काही तरी बोलतो आहे ? माफी मागणार काय ? ऐका, ऐका. आरोपी बोलत आहे. समोर त्याच्या फास उभा आहे. तो आरोपी बोलत आहे. त्याचे शब्द, गंभीर शब्द-ऐका.
“ईश्वराच्या चरणाशी जावयास मी अधीर आहे. ज्या हातांनी श्रेष्ठ कलेची मी उपासना केली, ते हात घाणेरड्या कामाला मी लावणार नाही. माझ्या आयाबहिणींनी कातलेले चंद्रकिरणांसारखे सुंदर सूत ते जर या बोटांना विणता येत नसेल, तर मला जगावयाची इच्छा नाही. या राज्यात राहणे हे पाप आहे, कारण माझ्या स्वधर्माची मला पूजा करता येणार नाही. जेथे मला कोणी विरोध करणार नाही, जेथे मनमुराद कलेची उपासना मला करता येईल, तेथेच मला जाऊ दे. माझी बायको व माझा मुलगा यांनाही माझ्या पाठोपाठ पाटवा. त्यांची जगात विटंबना नको. त्यांच्या हातूनही पाप नको. माझ्या पाठोपाठ त्यांना फासावर द्या किंवा गोळ्या घालून ठार करा. माझ्या देवाच्या मानेवर तुम्ही सुरी ठेवली आहे ; तर माझ्या मानेवरही ठेवा, हेच माझे मागणे आहे. माझ्या कलेला फाशी देत आहात तर कलाभक्ताला तरी कशाला जिवंत ठेवता ? त्याला जिवंत राहवणार नाही. ज्याला देव नाहीसा करावयाचा आहे, त्याने भक्त मारावे म्हणजे देव नाहीसा होईल ! भक्तासाठी देव आहे. कलापूजकांसाठी कला आहे. कलापूजक फासावर द्या म्हणजे कला आपोआप मरेल ! ही माझी मान त्या फासाला कवटाळण्यासाठी अधीर आहे. तो कलेचा अमर आत्मा बोलावीत आहे. उशीर नको. बंधूंनो, राम राम. मी देवाकडे चाललो !”
“हरामखोराला फासावर चढवा, चढवा ; त्याचे प्रेत कोल्ह्या-कुत्र्यांसमोर फेकून द्या.” अधिकार्यांचा हुकूम आला. राखालने मधुर स्मित केले. ते मृत्यूला मारते झाले ! राखालचा उभे केले. फासाचे त्याने चुंबन घेतले- हात जोडले. ढकलला गेला- राखालचा देह खाली लोंबकाळला. माती मातीला मिळण्यासाठी खाली येऊ लागली, चैतन्य चैतन्यात उडून गेले, ज्योत ज्योतीत मिळून गेली. कलापूजक कलातीतात मिसळून गेला !