Get it on Google Play
Download on the App Store

जकातीच्या नाक्याचे रहस्य !

"कोणिकडे जाशी स्वारा, दिसशी का घाईत ?"

"जकातिचे नाके आहे त्या आंबेराईत !"

बिजलीपरि चमकुन गेला ---घोडेस्वार

नवल अहो, हां हां म्हणता झाला नजरेपार !

जकातिचे नाके आहे त्या आंबेराईत

बहारास आली होती दो जीवांची प्रीत

ऐका तर गोष्टीला त्या झालि वर्षे वीस

स्वार अजुनि तेथे दिसतो अवकाळ्या रात्रीस

जकातिचे नाके जळके आज दिसे ओसाड

घोटाळुनि वारा घुमवी काय बरे पडसाद !

म्हातारा नाकेवाला मल्हारी शेलार

त्याची ती उपवर कन्या कल्याणी सुकुमार !

मोहिमेस निघता तेथे स्वार करी मुक्काम

कल्याणी झाली त्याच्या जीवाचे आराम !

मोहरली अंबेराई, सरता झाला माघ

बहारास आला त्यांच्या प्रीतीचा फुलबाग

"मनहरणी, शीतळ तुझिया स्वरुपाचा आल्हाद

अमृताचा धारा ढाळी जणु पुनवेचा चांद

आंब्याचा मोहर तैशी कांति तुझ्या देहास

जाईचे फूल तसा तव मंद सुगंधी श्वास

कल्याणी, पाहुनि तुजला फुलतो माझा प्राण

दे हाती हात तुझा तो, कर माझे कल्याण !

या आंबेराईची तु वनराणी सुकुमार

कल्याणी, सांग कधी ग तू माझी होणार ?"

"आणभाक वाहुनि कथिते, तुम्हि माझे सरदार

प्रीत तुम्हांवरिती जडली, तुम्हि भारी दिलदार

नाहि जरी बाबांच्या हे मर्जीला येणार

म्हणतातच, ’पेंढार्‍याची बाइल का होणार ?’

पंचकुळी देशमुखांचे तुमचे हो घरदार

नाहि परी बाबांच्या हे मर्जीला येणार !"

कोण बरे फेकित आला घोडा हा भरधाव ?

जकातिच्या नाक्यापुढले दचकुन गेले राव !

"चैतपुनव खंडोबाची, ऐका हो शेलार

ध्यानि धरा लुटुनी तुमची जकात मी नेणार"

आंब्याच्या खोडामध्ये घुसला तो खंजीर

बेलगाम निघुनी गेला---गेला तो हंबीर !

पुनव करी राईवरती चांदीची खैरात

जकातिच्या नाक्याकडली लख्ख उजळली वाट

सोंग जसे लळितामधले यावे उडवित राळ

धुरोळ्यात भडकुन उठला तो टेंभ्यांचा जाळ

ओरडला गढिवरला तो टेहेळ्या झुंझार

’सावध व्हा, पेंढार्‍यांचा आला हो सरदार !’

वाघापरि गर्जत आला, "येळकोट-मल्हार !

रामराम अमुचा घ्या हो मल्हारी शेलार !

पारखून घ्या तर आता हिरा आणखी काच ! "

आणि सुरु झाला नंग्या समशेरींचा नाच

"कल्याणी पेंढार्‍याची बाइल का होणार !"

काय असे डोळे फाडुनि बघता हो शेलार ?

"कल्याणी नेली’ एकच झाला हाहाकार

पाठलाग होऊन सुटले स्वारामागे स्वार

स्वाराच्या पाठित घुसला अवचित तो खंजीर

विव्हळला; परि नाही तो अडखळला खंबीर !

तसाच तो दौडत गेला विजयाच्या धुंदीत

तसाच तो दौडत गेला मृत्यूच्या खिंडीत

"जकात ही लुटिली ज्याने प्रीतीची बिनमोल

जीवाचे द्यावे लागे मोल," बोलला बोल

’कल्याणी जातो !’ सोडी शेवटला हुंकार

कोसळला घोडयावरुनी धरणीवरती स्वार !

लिंबोळ्या

ग.ह.पाटील
Chapters
समर्पण घाटमाथ्यावर स्वप्न ! मैत्रिणी ! पुनरागमन ! उशीर उशीर ! उत्कंठा ! पुष्पांचा गजरा जकातीच्या नाक्याचे रहस्य ! वेळ नदीच्या पुलावर बालयक्ष आजोळी आजोबा डराव डराव ! मागणे बगळे ! माझी बहीण बाजार मेघांनी वेढलेला सायंतारा मानवीं तृष्णा बहरलेला आकाश-लिंब ! विचारविहग भटक्या कवी ! वेताळ नांगर इंफाळ गस्तवाल्याचा मुलगा रानफुले सोनावळीची फुले प्रचीति दूर दूर कोठे दूर ! हे स्वतंत्र भारता गुरुवर्य बाबूरावजी जगताप यांस अभिवादन अहो, खानदेशस्थ सन्मित्र माझे ! त्रिपुरी पौर्णिमा कागदी नावा ध्येयावर ! प्रतिभा जाईची फुले लिंबोळ्या प्रभो मी करीन स्फूर्तीने कूजन किती तू सुंदर असशील ! विराटस्वरुपा, ब्रम्हाण्डनायका----! लाडावले पोर----! हवा देवराय, धाक तुझा ! उजळेल माझे जीवन-सुवर्ण ! घरातच माझ्या उभी होती सुखे ! तुझी का रे घाई माझ्यामागे ? तुझ्या गावचा मी इमानी पाटील ! देव आसपास आहे तुझ्या ! देवा, माझे पाप नको मानू हीन ! सर्व हे नश्वर, शाश्वत ईश्वर ! अपूर्णच ग्रंथ माझा राहो ! कळो वा न कळो तुझे ते गुपित ! देवा, तूच माझा खरा धन्वंन्तरी ! नका करु मला कोणी उपदेश वाळवंटी आहे बाळ मी खेळत ! चिमुकले बाळ आहे मी अल्लड ! सुरेल वाजीव बन्सी पुन्हा ! कोण माझा घात करणार ? केव्हाची मी तुझी पाहताहे वाट प्रभो, तुझ्या एका मंगल नामात--- कोण मला त्राता तुझ्यावीण ? कृतज्ञ होऊन मान समाधान ! वल्हव वल्हव प्रभो, माझी होडी ! यापुढे मी नाही गाणार गार्‍हाणे आता भीत भीत तुला मी बाहत ! बाळ तुझे गेले भेदरुन भारी ! महात्मा महात्मा महात्मा महात्मा महात्मा महात्मा महात्मा स्वातंत्र्य म्हणजे ईश्‍वराचे दान ! फार मोठी आम्हा लागलीसे भूक ! आक्रोश, किंकाळ्या ऐकल्या मी ! आता हवे बंड करावया ! कोटिकोटि आम्ही उभे अंधारात परदेशातून प्रगट हो चंद्रा ! अरे कुलांगारा, करंटया कारटया ! आपुलेच आहे आता कुरुक्षेत्र ! तोच का आज ये सोन्याचा दिवस ? जगातले समर्थ ! नांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात ! दोस्त हो, तुमची गोड भारी वाचा ! हे फिरस्त्या काळा नका वाहू व्यर्थ संस्कृतीचा गर्व ! असा तू प्रवासी विक्षिप्त रे ! रामराज्य मागे कधी झाले नाही आई मानवते मानवाचा आला पहिला नंबर ! जातीवर गेला मानव आपुल्या ! अभागिनी आई, पुरा झाला घात ! आरंभ उद्यान, शेवट स्मशान आता भोवतात तुमचे ते शाप ! यंत्रयुगात या आमुचे जीवित ! अपूर्वच यंत्रा, तुझी जादुगिरी ! असे आम्ही झालो आमुचे गुलाम ! मार्ग हा निघाला अनंतामधून कोटि ब्रह्माण्डांची माय तू पवित्र जे का हीन दीन त्यांची ही माउली ! जुनेच देईल तुज तांब्यादोरी निसर्ग महात्म्याची वृत्ति आपुल्या पावित्र्ये धन्य नरजन्म देऊनीया मला दूर कोठेतरी माझिया जीवनसृष्टीच्या ऋतूंनो ! क्षितिजावरती झळक झळक ! फार थोडे आहे आता चालायचे ! शिशिराचा मनी मानू नका राग आपुले मन तू मोठे करशील कुणी शिकविले लुटा हो लुटा खरा जो कुणबी चाळीसाव्या वाढदिवशी कुटुंब झाले माझे देव वाटसरू शुद्ध निरामय सहज मी मागे वळून पाहिले होईल साकार स्वप्न एक तरी एकला छेडीत आलो एकतारी तुरी हातावर देऊन पाखरा कोंडुन ठेविशी पिंजर्‍यात मला ! तुझा मी कोणता अपराध केला ? नाटकी मी, नका भुलू माझ्या सोंगा आई, तुझा कैसा होऊ उतराई ? तुमच्या प्रेमाची हवी मला जोड ! नाही मज आशा उद्याच्या जगाची ! काही नाही माझ्या सांत्वनाला उणे ! तिळगूळ आता निरोपाचे बोलणे संपले दुबळ्याचे बळ माझे ते कितीक ! नाहीतर उरी फुटशील ! कुर्‍हाडीच्या दांड्या, सांभाळ सांभाळ ! उमर खय्यामा माझ्या जीवनाचा झालो मी गायक ! कोण तू----?