Get it on Google Play
Download on the App Store

पूजा पद्धती

स्नान इ. दैनंंदिन कर्मे झाल्यावर गुढी उभारली जाते. वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करतात. गुरू, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, अशीही रूढी आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे,असा संंकेत रूढ आहे. संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे जर मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली. तिला पहिले पद मिळाल्याने ती 'प्रतिपदा' म्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला 'युगादी' तिथी असेही म्हणतात.

या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे.:-

"तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यावर्धनम् |
नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ||
करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफ़लमुत्तमम् |
एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानंफलं लभेत्||"

अर्थ - तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते.वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते

चैत्र हा अधिकमास असता, काहींच्या मते अधिकमासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कृत्ये करावीत; तर काहींच्या मते ती शुद्ध किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी, असा मतभेद आहे. याविषयी धर्मसिंधूने निर्णय दिला आहे तो असा- अभ्यंगस्नानादी कृत्ये अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेसच करावी; पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेस कराव्या.

मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिकाऱ्याकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही हा उत्सव संपन्न करीत असे. आता घरोघरी हा उत्सव साजरा होतो.