Get it on Google Play
Download on the App Store

भाग ३

दुसऱ्या दिवशी सकाळी नदीवर अंघोळीसाठी सदा निघाला. कालपासून मनात एक विचार घोळत होता की तिने का बरं भाकरी आणून द्यावी? अन् म्हातारी सोबत मला पण का दिली असेल?? ह्या विचारात तो नदीवर पोचला सुद्धा.. नदीत त्याने अंघोळ केली आणि ओल्या धोतराने तो बाहेर आला. आणि थबकला.. काठावर गुलाब आली होती कपडे धुवायला आणि सोबत सुंदरा आणि एक बाप्या होता. आता आली का पंचाईत.. आता कस जायचं.. 

तेवढ्यात त्या बाप्याच लक्ष सदाकडे गेलं.. 

"काय पावणं, अस लागिरल्यागत का उभ हायेसा." 

"ते ते आपलं ते आसचं." सदा चाचरला..

गुलाबने त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि त्या दोघांची नजरानजर झाली. ओळखीचं हसू गुलाबच्या ओठांवर उमटल आणि सदाच्या सुद्धा. 

"काय पावणं कालच जेवन जेवलासा का न्हायी??" 

सुंदराने खट्याळपणे विचारलं.. 

तिच्या ह्या प्रश्नावर गुलाब लाजली आणि ओल्या अंगाने सदाने तिथून काढता पाय घेतला.. 

जाताना तो त्याचं कोरड धोतर तिथेच काठावर विसरून गेला. सुंदराच्या चाणाक्ष नजरेने ते हेरलं आणि गुलाबला ती म्हणाली 

"अगं हे राहिलं की गं.. जा दे जा त्यानला.."

पण तो त्यांच्यासोबत आलेला पोपट मधे आला. त्याने ते धोतर घेतलं आणि तो गेला.

गुलाब हिरमुसली.. 

"आला मधे लगेच मेला.." सुंदरा फिस्कारली.. 

"जाऊ दे बाई. काय आता आपल नशीब अन् आपन.. कशाला काय इचार पाहिजे..अन् आता जायचच आहे इथून दोन दिसांत.. " मान खाली घालून गुलाब म्हणाली. 

"तुझा जीव गमल का ग? इतके वरीस वळखते तुला.. एका पन गड्याला भिक घालत नव्हतीस अन् इथ ह्याच्यात कसा जीव गुतला झालाय??" 

सुंदराने विचारले..

"बाई समोर असून पन न बघनारा खरा मर्द गडी हाय.. मंग का नाय जीव लागनार??" गुलाब बोलून गेली...

"काय होतय का नाही कापडं धुवून? चार लुगडी धुवाय एवढा येळ??"मागून अक्काचा जरबयुक्त आवाज आला आणि दोघी चाचरल्या.. 

अक्काने काही ऐकल असेल तर ह्या विचाराने गुलाबच्या काळजाच पाणी झालं.. कपडे भराभरा आवरून ती पाण्यात खळबळायला आली.. 

इकडे सदाला आठवलं की आपल धोतर तर नदीवर राहिलं.. तो ते आणायला गेला.. धुवायच्या काठावर त्याला फक्त सुंदरा आणि शेवंता दिसली.. 

"कुठं गेली असेल ती??" नकळत त्याला विचार आला.. आणि त्याला च आश्चर्य वाटले.. 

पायरीवर असलेले धोतर घ्यायला तो उतरत गेला तेव्हा त्याला गुलाब दिसली.. नकळत एक उर्मी त्याला नदीतीरावर घेऊन गेली. तीरावर तो तिच्यापासून थोड लांब आणि थोड दिसेल असा उभा राहिला.. सदा हळूच तिच्याकडे बघत होता अगदी चोरुन.. 

साधं फिकट गुलाबी लुगडं. त्यावर पांढरी चोळी.. केसांचा सैलसर अंबाडा.. आणि त्याची एक चुकार बट आणि अगदी निष्पाप निरागस चेहरा.. तिची नजर डाव्या बाजूला वळली आणि तिला सदा दिसला. तो आपल्याकडे बघतोय हे कळताच तिने लाजून मान खाली घातली.. आपली नजरचोरी कळताच सदाने पण नजर हटवली.. 

"काल का तुमी तरास घेतला आमच्यासाठी?" सदाने न राहवून विचारले तिला.

"आपल्या मानसासाठी काय केल तर तो तरास नसतो..",.गुलाब मान न वर करता म्हनाली..

"पर तुमी कुट?आमी कुट? कुनाला कळल तर लोक काय म्हनतील?? परत अस काय करु नगासा" सदा पडल्या चेहऱ्याने म्हणाला.. 

"तमासगिरीणीच्या हातच खायची लाज वाटते का?" गुलाब दुःखी होऊन बोलली.

"न्हाय जी. पन तुमालाच नाव ठेवतील. आमी गरीब..".तिला कस सांगाव हेच त्याला कळत नव्हत..

"जिथ जीव जडतो तिथ अशा गोष्टींना थारा नसतो पावणं.." एवढच बोलून गुलाब तरातर निघून गेली.. 

सदाला ती काय म्हणून गेली हेच समजायला वेळ लागला.. आपल्यावर कुणाचा जीव जडू शकतो हेच त्याला पटत नव्हते.. विचारांच्या तंद्रीत तो पारावर कधी आला त्याच त्यालाच कळाल नाही.. 

पारावर पोचल्यावर पहिला त्याने म्हातारीला सगळ सांगितले.. म्हातारीला सारे समजत होते पण तिला ह्याचे परिणाम कळत नव्हते.. 

©सुप्रिया घोडगेरीकर

म्हातारी

सुप्रिया घोडगेरीकर
Chapters
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७