Get it on Google Play
Download on the App Store

भाग ५

तिच्या ह्या वाक्याचा अर्थ लागताच गुलाब दचकली.. खर तर हे असं काहीही तमाशात तिच्यासमोर झाल नव्हतं.. तमाशा चालू असताना पैसे उडवणारी आणि नंतर येणारे तिने पाहिले होते पण हे.. 

खरतर शेवंता तिला आईच्या ठिकाणी होती. लहानपणी एक जत्रेत तिला शेवंता भेटली होती.. शेवंता तेव्हा ऐन उफाड्यात होती.. तमाशामधे नुकतीच ती बोर्डावर उभी राहत होती.. लोकांच्या नजरा ठरत नव्हत्या. पायात बिजली आणि सावळं पण देखण रुप होतं.. तमाशातल्या लोकांची ती जान होती. आणि अशाच एका गावात जत्रेत तमाशाचा फड होता तेव्हाच जत्रेत तिला ही गुलाब दिसली होती.. तमाशाचा फड हा शेवंताच्या आईचा होता. आजही तिला तो दिवस जसाच्या तसा आठवत होता. मोठ्या फिरत्या पाळण्याजवळ एक बर्फाचा गोळा होता. शेवंता आणि तमाशातली तिची एक मैत्रीण सगुणा दोघी गोळेवाल्याकडे गोळा घ्यायला आल्या होत्या आणि त्याच्याजवळच्या कट्ट्यावर एक लहान मुलगी बसली होती. एकदम निरागस अशी शांतपणे गोळा खात बसली होती. शेवंताच तिच्याकडे लक्ष गेलं.. 

आणि ती तिच्याशी बोलायला लागली..

"काय नाव गं तुझ??,"शेवंताने विचारले. 

"वासंती", त्या मुलीने सहजपणे उत्तर दिले. 

पुढे बराच वेळ शेवंता, वासंती आणि सगुणाची गट्टी जमली होती. पण बराच वेळ होऊन गेला तरी वासंती चे आई बाबा दिसत नव्हते आणि त्यांची परत जायची वेळ पण आली होती म्हणून सगुणाने तिला तिच्या आई वडिलांबद्दल विचारल.. 

"मला काय ठाव?? मला इथ गोळा देऊन ते आलोच म्हनून गेले.." वासंती म्हणाली.

त्या तिघी तिच्या आई बाबांना शोधत जत्राभर फिरल्या पण ते काही सापडले नाहीत. आता घाबरून वासंती रडायला लागली. शेवंताने तिला कडेवर घेतले आणि थोपटून शांत केले आणि ती तिला घेऊन फडावर गेली. 

"एवढा येळ कुठ होतीस शेवंता??" शेवंताच्या आईचा मैनाबाईंचा आवाज कडाडला. "सगुणे तुला भान हाय का नाय?? तरन्याताठ्या पोरींनी अस वखत न बघता फिरन शोबत नाय.. त्यात आपन तमासगीर मानसं... " त्या दोघींवर मैनाबाई ओरडल्या..

"मावशे ,अग ऐक तरी.. हे बघ कोन आलय. आन् जरा हळू बोल.. उठल की पोर. जा गं शेवंता तिला आत ठेव जा." सगुणा म्हणाली.

शेवंता तिला आत नीट झोपवून आली आणि इकडे सगुणाने मैनाबाईला सगळी कर्मकथा सांगितली. तिचे आईवडील हरवले नाहीत तर त्यांनी तिला टाकून दिलय. 

"ठीक हाय. जत्रा संपेपतूर बगूया हिच आई बापाचा काय कळतय का ते.." मैना बाई बोलली..

जत्रा संपेपर्यंत तिच्या आईबापाचा शोध घेतला गेला. फडातला ढोलकीवाला रामाची एका पोलीसा बरोबर ओळख झालेली त्याला सुद्धा सांगून झाले पण तिच्या आई बापाचा काय पत्ता लागला नाही.

इकडे फडात वासंती , सगुणा आणि शेवंताची भलतीच गट्टी जमलेली. तिची अंघोळ, वेणीफणी, जेवण सगळच शेवंता बघायची. रात्री झोपताना सुद्धा वासंती तिला मिठी मारून झोपायची. लाडाने शेवंता तिला "वसू" म्हणायची. 

"हिच्या आई बापाच काय कळना.. आता काय करायचं अक्का हिचं??", ढोलकीवाला राम मैनाबाईला विचारत होता..

"काय करायच म्हंजी?? आपल्या संगट राहिल की ती.. एवढाली पोर ती.. कुट जाईल??" परस्पर शेवंताने उत्तर दिले.

तिच्या ह्या उत्तराने सगळेच चमकले.. पण शेवंताचा निर्णय पक्का होता.. आणि कुठतरी मैनाला पण तिच्या बद्दल माया वाटू लागली होती.. लाघवी होती पोर..

"ठिक हाय. अक्का घेऊया गं ठिवून हिला आपन." मैनाच्या मनात काय चालू आहे हे ओळखून सगुणा म्हणाली..

वासंती फडातच राहिली. ती फडात इतकी रमली की तिचा भूतकाळ सगळाच विसरली. तिला शेवंताने लहानपणी सांगितले होते की तुझे आई बाप तुला थोडे दिवसासाठी आमच्याकडे सोडून गेलेत. एक दिवस ते नक्की येतील तुला न्यायला. 

ह्यावर विश्वास ठेवून ती रमली. शेवंता, सगुणा, चंद्रा, कमल ह्या सगळ्या जणी रोज लावणीचा सराव करायच्या. मैनाबाई स्वतः शिकवायची त्यांना.. एक दिवस वासंती सुद्धा ताल धरायरा लागली. ह्या साऱ्यांसोबत तिचे पण पाय आपोआप थिरकायला लागले ढोलकीच्या तालावर. मैनाबाई मग तिला पण शिकवायला लागली.. पूर्ण तयार झाली. वयात आली आणि मग मैनाबाईने तिला बोर्डावर उभ करायचे ठरवले. 

"वसू, आता पुढच्या बारीला तू पन नाचायच बर का.." मैना म्हणाली.

"पन त्याआधी हिच नाव बदलूय पैला.." चंद्रा हसत म्हनाली..

"हा चंपा ठिवूया.. " सुंदरा म्हनाली. राम ढोलकीवाला आणि कमल ची ही मुलगी. लहानपणापासून तिची आणि वासंतीची जोडी जमलेली.

"गुलाब ठेवूया.." शेवंता म्हणाली. "तस पन गुलाबाच्या फुलागत मुखडा हाये.."

"व्हय बघणाऱ्याच्या नजरेत ही गुलाब पडली का काळजात काट्यागत रूतुन बसत्या.." नाच्या गणपत बोलला..

ह्यावर सगळेच हसले आणि तेव्हापासून वासंतीची गुलाब झाली.. 

शेवंताने जरी तिला बोर्डावर उभं केल असलं तरी घारीसारखी नजर होती तिची गुलाबवर. तिचा जीव अडकून गेला होता ह्या साध्याभोळ्या पोरीत.. तिच्या निरागसपणात ती सगळ विसरायची.

तमाशात वाढली असली तरीसुध्दा ती फार हळवी होती पण दाखवून देत नव्हती. घर संसार ह्यावर तिचा फार विश्वास होता आणि तिने मैनाबाईला आपल्या बापाबद्दल खूप वेळा विचारले होते पण मैनाबाईने तिच्या काळजातल हे रहस्य कोणालाच कळू दिले नव्हते. ढोलकीवाला राम फक्त ते जाणून होता पण तो ही ह्यावर बोलत नव्हता जणू काय ते रहस्य त्या दोघांनी मनात गिळून टाकले होते.. पण तमाशातल्या प्रत्येक माणसाची खडा न् खडा माहिती शेवंता ठेवायची. साऱ्या पोरींवर ती नजर ठेवून होती कारण संसारसुख हे त्यांच्या नशीबात नव्हतं.. 

आता ह्या सोनगावात आल्यावर एका तमाशाला पाटील आला होता आणि त्यात त्याने गुलाबला पाहिले. पाटलाचा दरारा मोठा होता. त्याच्या शब्दाला वजन होते. वरपर्यंत त्याचे हात पोचले होते.. त्याने गुलाबसाठी मागणी केली होती.. तिआ कायमच सोनगावात स्वतः साठी ठेवून घ्यायचा इरादा त्याने बोलून दाखवला होता.. शेवंता अशा काही पेचात होती की तिला काहीच करता येत नव्हते कारण पाटलाने ठरवल तर तमाशाची सारी बारी तो उधळून लावू शकत होता.. 

"अक्का, अगं आज रातीला कुठली लावनी करायची?" , सुंदरा एकदम आत येत म्हणाली.

तिच्या आवाजाने शेवंता भानावर आली. खाली बसलेली गुलाब आणि हरवून गेलेली शेवंता बघून सुंदराला काहीच ठाव लागेना. 

"आज लावनी व्हनार नाय.." , एवढं बोलून शेवंता ताडकन बाहेर आली. 

म्हातारी

सुप्रिया घोडगेरीकर
Chapters
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७