जीवनाची आशा 3
संघटना बांधली की थोडा तरी अभिर्निवेश येतोच. माझाच पक्ष खरा, माझीच संघटना सत्यावर उभी, असे मग मला वाटते. सत्य तर सुर्यप्रकाशाप्रमाणेच मोकळे हवे, वा-यांप्रमाणे सर्वगामी हवे. तरच ते सतेज, निर्मळ, प्राणमय राहील. संकुचितपणा सत्यास मानवणार नाही. अहंकार मानवणार नाही. राजकीय नेत्यांच्या ठिकाणी असा दैवी गुण भाग्यानेच आढळतो. गांधीजींनी या राष्ट्राला, जगाला दिलेली ती शिकण आहे. आपल्या निर्णयाची सत्यता स्वत:ला पटत असूनही दुस-याविषयी सद्भाव ठेवणे ही अहिंसा. यातच लोकशाहीचा आत्मा. महात्माजींनी आमरण ही गोष्ट कृतीने शिकवली. भारतीय संस्कृतीतच ही गोष्ट आहे.
संघटनेमुळे, पक्षामुळे अंधता येते; जडता म्हणजे मीच खरा ही वृत्ती येते, अभिनिवेश येतो, सत्य गुदमरते, हे सारे खरे, परंतु जगात कार्य करायचे तर काही संघटना लागते. विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, ' जगात कार्य करायचे तर थोडा अहंकारही लागतो. 'परंतु थोडा अहंकार म्हणजे अहंकाराचा पुंज नव्हे. लोकमान्य एकदा म्हणाले की ' स्वराज्य खोटे बोलून येणार असेल तर मी खोटेही बोलेन.' यांतील ' ही ' शब्द महत्त्वाचा आहे. आता अगदी माझ्या खोटे न बोलल्यामुळे अडत असेल तर बोलतो बाबा. म्हणजे तो 'ही' दु:खच दर्शवतो.
खोटे बोलणे वाईटच, परंतु आलीच वेळ तर तेही करीन. परंतु लोक 'ही' विसरून गेले आणि लोकमान्यही म्हणत की स्वराज्यासाठी खोटे बोलले म्हणून काय झाले, राजकारणात हे चालायचेच, असा अर्थ करू लागले ! विवेकानंदांच्या वरील म्हणण्याचाही असा अर्थ कोणी करतील. परंतु विवेकानंद ' थोडा अहंकार ' म्हणतात. आपापले पक्ष करा, संघटना करा. आपण बरोबर आहोत ही श्रध्दा ठेवून, हा थोडा अहंकार ठेवून काम करा. पण अहंकार फाजील झाला की दुस-या पक्षाचे नि:संतान करायला निघाल. म्हणून जपा. गांधीजींनीही संघट-नेचा आश्रय करूनच प्रयोग केले. काँग्रेस संघटनेद्वारा त्यांनी काम केले. इतरही अनेक संस्था त्यांनी काढल्या, परंतु त्यांची स्वत:ची विशिष्ट श्रध्दा असूनही ते मोकळे असत. 'मला पटवा' असे ते म्हणत. सर्वांस ते असेच सांगत.
आपण मानव अपूर्ण आहोत. संपूर्ण सत्य आपणास मिळणे कठीण त्याचप्रमाणे मिळालेल्या श्रध्देनुसार अहंकाररहित होऊन जाणेही कठीण, परंतु प्रयत्न करावा. त्या दिशेने जावे. आपापल्या विचारांचा, कल्पनांचा प्रचार करा, त्या पटवा. त्यासाठी हाणामारीची, तुमच्या शस्त्रास्त्रांची जरूर नाही. सत्य प्राणमय असेल तर जगात विजयी होईल. सत्य जर सत्तेवर अवलंबून असेल, आत्मा ऍटमबाँबवर अव-लंबून असेल, तर सत्ता, ऍटमबाँब म्हणजेच विश्वाचे आदितत्त्व वा अंतिमतत्त्व असे म्हणावे लागेल आणि तसे असेल तर जीवनाला आशा तरी कोणती?
साधना : मे १९४९