संयम नि सहानुभूती 2
कलकत्त्याला डॉ. काटजू गेले तेव्हा त्यांचे स्वागत करतांना बंगाली पुढारी म्हणाले, 'बंगाली संस्कृती निराळी आहे. तिच्या विकासात अडथळे नका आणू.' बंगाली संस्कृती निराळी म्हणजे काय? तुमचे विवेकानंद, रामकृष्ण, विद्यासागर, बंकीम, रवींद्र, शरदबाबू यांनी का असे काही दिले जे इतर प्रांतांत नाही? जे इतर प्रांतांच्या परंपरांहून फार निराळे आहे. आज प्रत्येक प्रांताला असे वाटू लागले आहे की, आपण इतरांहून अगदी वेगळे, निराळे. बाबांनो भाषा जरा निराळी बोलत असाल, परंतु आईच्या दुधाबरोबर एकच संस्कृती भारतीय मुलांना पाजली जात आहे हे विसरू नका.
१९३० मध्ये आम्ही मुंबई प्रांतातले राजबंदी त्रिचनापल्लीला पाठवले गेलो. सायंकाळी प्रार्थना झाल्यावर कोणी काही लिहून वाची. व्यंकटाचलम् म्हणून दक्षिणेतला एक राजबंदी माझा मित्र झाला होता. तो इंग्रजीत काही लिही. मी मराठीत अनुवादून वाची. त्याची भाषा मल्याळी. 'त्याने मलबारकडचा एक दिवस ' म्हणून एक लेख लिहिला. मी त्याचे भाषांतर करून वाचले. 'सकाळी बायका उठतात, चूल सारवतात. सडा, संमार्जन करतात. मग कॉफी होते. आजीबाई भाजी चिरते. आजोबा पूजेला बसतात. सुना तळयावर धुणी घेऊन जातात.' असे ते वर्णन होते. ते ऐकल्यावर महाराष्ट्रीय मित्र म्हणाले, ' आपल्या-कडच्यासारखेच आहे.' मी म्हटले, ' भारताचे हृदय एकच आहे. तेच प्रश्न, त्याच सामाजिक समस्या, हुंडे, स्पृश्या-स्पृश्ये-तेच प्रकार.' म्हणून मी म्हणतो की भारतीय संस्कृती एक आहे. प्रांताप्रांतांच्या संस्कृती विशेष अलग अशा नाहीत.
परंतु एकदा कोठे शुध्दीच्या नावावर हकालपट्टी सुरू झाली म्हणजे ती कोठे थांबेल ते सांगता येणार नाही. मराठीतून उर्दू शब्द हाकला चळवळ सुरू झाली. नाना शब्दांच्या नाना छटा असतात. आकाश शब्द नि अस्मान शब्द आपण एकत्र नाही घालणार; परंतु विवक्षित छटा दाखवायला अस्मान शब्द सुंदर वाटतो. सा-या जगातून घ्यावे, पचवावे नि बलवान व्हावे. इंग्रजी कोशात राजा, सरदार, जंगल इत्यादी शब्द आढळतील. शेकडो ठिकाणचे त्यांनी शब्द घेतले. भाषा-शुध्दीची चळवळ आणि प्रांतशुध्दीची चळवळ! हिंदूंनी मुसलमानांना हाकलावे, मुसलमानांनी हिंदू-शीखांना हाकलावे. एकमेकांची घाण जणू दूर काढावी, असे प्रकार सुरू झाले! परंतु मुसलमानांनी हिंदूशीखांना आणि हिंदूशीखांनी मुसलमानांना हाकलल्यावर पुढे काय ?हाकलायची तर गोडी वाटू लागली.