Get it on Google Play
Download on the App Store

संघ भाग १ला 11

“भर्गदेशांत शिशुमारगिर या ठिकाणीं भगवान् बुद्ध रहात होते. तेथें त्यावेळीं नकुलपिता नांवाचा गृहस्थ फार आजारी होता. त्याचा मरणकाळ समीप आहे असें सर्वांस वाटत होतें. तेव्हां त्याची पत्नी त्याला ह्मणाली. – हे गृहपति प्रपंचासक्त होऊन तूं मरतां कामा नये. अशाप्रकाराचें सापेक्ष (प्रपंचाच्या तळमळीनें आलेलें) मरण दु:खकारक आहे, असें भगवंतांनीं सांगितलें आहे. हे गृहपति, कदाचित् तुझ्या मनांत अशी शंका येईल कीं, ‘मी मेल्यावर, नकुलमाता मुलांचें पालन करूं शकणार नाहीं, प्रपंचाचा गाडा हाकूं शकणार नाहीं. परंतु गृहपति अशी शंका तूं मनामध्यें आणूं नकोस. कारण मला कापसाचें सूत काढण्याची कला महित आहे, व मला लोंकर तयार करितां येत आहे. ह्या कलेनें मी तुझ्या मरणानंतर मुलांचें पोषण करूं शकेन. ह्मणून हे गृहपति, प्रपंचाची तळमळ मनामध्यें ठेवून तुला मरण येऊं नये, असें माझें ह्मणणें आहे. हे गृहपति, दुसरी तुला अशी शंका येण्याचा संभव आहे, कीं ‘नकुलमाता माझ्या पाठीमागें पुनर्विवाह करील,’ परंतु ही शंका तूं सोडून दे. मी आज सोळा वर्षें गृहस्थब्रह्मचर्य (उपोसथव्रत) पाळीत आहें हें तुला ठाऊकच आहे. मग मी तुझ्या मृत्यूनंतर पुनर्विवाह कसा करीन? हे गृहपति, तुझ्या मरणानंतर मी बुद्धभगवंताचा आणि भिक्षुसंघाचा धर्मोपदेश श्रवण करण्यास जाणार नाहीं, अशी तुला शंका येण्याचा संभव आहे; पण तुझ्या मागें पूर्वींप्रमाणेंच बुद्धोपदेश ऐकण्याच्या कामीं माझा आदर राहील, अशी तुझी पक्की खात्री असूं दे; आणि ह्मणून तळमळीवांचून तुला मरण येऊंदे. हे गृहपति, तुझ्या पाठीमागें मी बुद्धपदिष्ट शीलाचें यथासांग पालन करणार नाहीं अशी तुला शंका येण्याचा संभव आहे. पण ज्या उत्तम शीलावती बुद्धोपासिका आहेत, त्यांपैकीं मीहि एक आहें, हें तूं खात्रीनें समज; आणि ह्मणून तळमळीवांचून तुला मरण येऊंदे. हे गृहपति, मला समाधिलाभ झाला नाहीं-अतएव तुझ्या मरणानें मी फार दु:खी होईन- असें तूं समजूं नकोस. ज्या कोणी बुद्धोपासिका समाधिलाभिनी असतील, त्यांपैकीं मी एक आहें असें तूं समज, आणि मनाची तळमळ सोडून दे. हे गृहपति, बोद्धधर्माचें तत्त्व मला अद्यापि समजलें नाहीं अशीहि तुला कदाचित् शंका येईल. परंतु ज्या कोणी तत्वज्ञ उपासिका असतील त्यांपैकींच मी एक आहें, हें तूं पक्कें ध्यानांत ठेव, आणि मनाची तळमळ टाक.” ह्या  नकुलमातेच्या उपदेशानें नकुलपित्याच्या मनाचें समाधान झालें, आणि त्याचा तो आजार लवकरच शमला. आजारांतून बरा झाल्यावर तो बुद्धदर्शनास गेला. तेथें बुद्धांनीं त्यास ह्मटलें- “हे गृहपति तूं मोठा पुण्यवान् आहेस; नकुलमातेसारखी उपदेश करणारी आणि तुझ्यावर प्रेम करणारी पत्नी तुला मिळाली आहे. हे गृहपति उत्तम शीलवति अशा ज्या कांहीं उपासिका आहेत, त्यांपैकीं ही एक आहे. अशी पत्नी तुला सांपडली हें तुझें भाग्य होय।”

ह्या एका उदाहरणावरून बुद्धभगवंतांना स्त्रियांची योग्यता किती वाटत होती हें आपणास समजून येणार आहे. आणखीहि कांहीं उदाहरणें त्रिपिटक ग्रंथांतून दाखवितां येण्यासारखीं आहेत. परंतु अवकाश नसल्यामुळें एवढ्यानेंच समाधान मानणें भाग आहे.

स्त्रीस्वातंत्र्य जर बुद्धांनां पसंत होतें, तर भिक्षुणींसाठीं त्यांनीं कडक नियम केले हें कसें ? याचें उत्तर थोडक्यांत द्यावयाचें ह्मटलें ह्मणजे, त्या कालच्या समाजपरिस्थित्यनुरूप हे नियम बुद्धांना करावे लागले हें होय. उदाहरणार्थ भिक्षुणीनें एकटें राहूं नये असा बुध्दांनीं नियम केला. असा निर्बंध भिक्षुंस नव्हता. अर्थांत हा नियम स्त्रीस्वातंत्र्यविघातक आहे, असें सकृद्दर्शनीं कोणालाहि वाटण्याचा संभव आहे. पण त्या कालच्या समाजरचनेकडे लक्ष दिलें असतां हा नियम योग्य होता असेंच ह्मणावें लागेल. हें शुभा नांवाच्या भिक्षुणीच्या पुढील गोष्टीवरून स्पष्टपणें संमजून येण्यासारखें आहे.

बुद्ध व बुद्धधर्म

धर्मानंद कोसंबी
Chapters
बुद्ध व बुद्धधर्म 1 बुद्ध व बुद्धधर्म 2 बुद्ध 1 बुद्ध 2 बुद्ध 3 बुद्ध 4 बुद्ध 5 बुद्ध 6 बुद्ध 7 बुद्ध 8 बुद्ध 9 बुद्ध 10 बुद्ध 11 बुद्ध 12 बुद्ध 13 धर्म 1 धर्म 2 धर्म 3 धर्म 4 धर्म 5 धर्म 6 धर्म 7 धर्म 8 धर्म 9 धर्म 10 धर्म 11 धर्म 12 धर्म 13 धर्म 14 धर्म 15 धर्म 16 संघ भाग १ला 1 संघ भाग १ला 2 संघ भाग १ला 3 संघ भाग १ला 4 संघ भाग १ला 5 संघ भाग १ला 6 संघ भाग १ला 7 संघ भाग १ला 8 संघ भाग १ला 9 संघ भाग १ला 10 संघ भाग १ला 11 संघ भाग १ला 12 संघ भाग १ला 13 संघ भाग २ रा 1 संघ भाग २ रा 2 संघ भाग २ रा 3 संघ भाग २ रा 4 संघ भाग २ रा 5 संघ भाग २ रा 6 परिशिष्ट १ 1 परिशिष्ट १ 2 परिशिष्ट १ 3 परिशिष्ट १ 4 परिशिष्ट २ 1 परिशिष्ट २ 2 परिशिष्ट ३ 1 परिशिष्ट ३ 2 परिशिष्ट ३ 3 परिशिष्ट ४ 1 परिशिष्ट ४ 2