क्रांती 87
''मृणालिनी, तुला काही कळत नाही. या लहानशा बाटलीत महाराष्ट्रानं आपला गोड आत्मा पाठवला आहे. आमचे कपडे थोडे आहेत. ही लहानशी गासडी आहे, परंतु त्यात हृदय ओतलेलं आहे असा या बाटलीचा अर्थ आहे. जे द्यायचं त्याच्यावर हृदयातील प्रेम शिंपडून द्यावं म्हणजे ती साधी वस्तू स्वर्गीय होते. सुदामदेवाचे पोहे पृथ्वीमोलाचे होतात. विदुराच्या कण्या अमृताहुन गोड लागतात. एक प्रकारचं लग्नच आहे. महाराष्ट्राचा आत्मा व बंगालचा आत्मा यांचं लग्न लागत आहे. दूरची हृदयं जवळ येत आहेत. लग्न म्हणजे जवळ येणं. लग्न म्हणजे अलग न राहता सलग होणं.'' हेमलता म्हणाली.
''तुमच्या डोळयांना चष्मे आहेत. मला तरी एक द्या म्हणजे मलाही असे अर्थ वाचता येतील.'' मृणालिनी म्हणाली.
''असे चष्मे बाजारात मिळत नाहीत. बाजारात जवळच्या दृष्टीचे, लांबच्या दृष्टीचे चष्मे मिळतात; परंतु अंतर्दृष्टीचे चष्मे मिळत नाहीत. क्ष-किरणांनी शरीराच्या आतील फोटो मिळतात; परंतु अंतरंगाचे फोटो कोण कसे काढणार?'' हेमलता म्हणाली.]
''हा एक कपडा निराळाच का बरे बांधलेला आहे?'' मायाने विचारले.
''थांब मी सोडतो.'' रामदास म्हणाला.
त्यात एक लहान चिठ्ठी वाचली.
एका गिरणी कामगाराजवळ दोनच सदरे होते. त्यातील जो अधिक चांगला होता, तो त्याने दिला आहे. बंगाल उघडा पडला असता, आपण दोन सदरे ठेवणे पाप असं तो म्हणाला. त्याने आपले नाव सांगितले नाही. मी एक मजूर आहे, एवढेच तो म्हणाला.
मायाने तो सदरा मस्तकी धरला. हेमलतेच्या डोळयांत पाणी आले. मृणालिनी गंभीर झाली. हलधर, शशांक, हेमंतकुमार सारे तेथे आले व ती चिठ्ठी वाचून सारे सद्गदित होत.
''बंगाल उघडा पडला आहे म्हणून किती बंगाली लोकांनी एकच सदरा ठेवून बाकीचे पाठवले असतील बरं?'' हेमलता म्हणाली.
''महाराष्ट्रानं महाकाव्यं नसतील लिहिली, हृदयं हलविणार्या रोमांचकारी कादंबर्या नसतील लिहिल्या. 'वंदे मातरम्' चा महान मंत्र नसेल दिला; परंतु वंदे मातरम्चा हा आत्मा महाराष्ट्रातून आला आहे. महाकाव्यं फिकी पडतील असं हे महान काव्य या लहानशा सदर्यात लिहून पाठवलं आहे.'' माया म्हणाली.
महापुराच्या निमित्ताने या भारतवर्षाची लेकरे परस्परांच्या जवळ येत होती. अहंकार गळत होते. समभाव, प्रेमभाव जन्मत होता. स्वयंसेवकांचे काम चालले होते; परंतु बंगालमधील मोठा सण म्हणजे पूजादिवस; ते जवळ आले होते. नवरात्र हा बंगालचा राष्ट्रीय महोत्सव. त्या वेळेस आप्तेष्ट एकमेकांस देणग्या देतात. सर्वत्र समारंभ असतात. घरोघर उत्सव असतात. स्वयंसेवक व सेविका यांना घरी जाण्याची उत्सुकता होती.
''येता का माझ्या घरी?'' जाऊन येऊ चार दिवस.'' माया म्हणाली.
''तुझ्या घरी कोण आहे माझ्या ओळखीचं?'' रामदास म्हणाला.
''एकाची ओळख असली म्हणजे सर्वांची होते. माझ्या घरी तुम्हाला सारी ओळखतात. माझ्या गावातील लोकही ओळखतात. तुमच्या किती तरी गोष्टी मी सांगत असते.'' माया म्हणाली.
''माझी कोणती कारस्थानं सांगत असतेस.'' त्याने विचारले.
''एक बंगाली रत्न महाराष्ट्रात चोरून नेण्याचं कृष्णकारस्थान.'' ती म्हणाली..
''कृष्णकारस्थान म्हणजे रुक्मिणीच्या बाबतीत कृष्णानं केलं तेच की नाही? आणि तू का रत्न? स्वतःलाच दिवे ओवाळून घ्यावे.'' रामदास म्हणाला.
''परंतु मी माझं नाव उच्चारलं का? मी माती आहे. रत्न कोणतं ते तुम्हाला माहीत. मला काय त्याचं नावगाव माहीत ! कानावर मात्र आली आहे कुणकुण म्हणून म्हटलं.'' माया म्हणाली.