क्रांती 100
''बाप मरावा म्हणून मुलाची प्रार्थना चालली आहे..''बाहेर कोणीतरी म्हणाला व बाकीचे हसले.
गोविंदरावांनी प्राण सोडला. प्रेतयात्रेस किती तरी मंडळी.
''नीट रचा रे लाकडे. चिता कोसळली तर स्वर्ग मिळणार नाही.'' लाकडे रचणारे म्हणत होते.
''लक्षाधीशाला स्वर्ग नाही तर का भिकार्याला?'' दुसरा म्हणाला.
''अप्सरा व अमृत, फुलाफळांच्या नंदनवनातील बागा श्रीमंतांनाच मिळणार.'' तिसरा म्हणाला.
''कल्पवृक्षांच्या बागा गरिबांना नसतात. मनात आलं की मिळाले ते श्रीमंतांचंच नशीब. इतरांना दुष्काळ व वाण. श्रीमंतांची बाग नेहमी फुललेली-फळलेली. गोविंदरावांना वाटेल ते मिळत होते. आंब्याचे दिवस नव्हते, तरी त्यांना आली एक करंडी.'' चौथा म्हणाला.
सरण रचून झाले. डोक्याखाली मजबूत लाकूड घातले गेले. रामदास तेथे काही करत होता.
''आता हलवू नका. कोसळेल.'' सर्वांनी सल्ला दिला.
''कोसळणार नाही; मजबूत करतो.'' रामदास म्हणाला. प्रॉमिसरी नोटा, खतपत्रे यांचं ते पुडकं होतं. ते त्यानं येताना आणलं होतं. खादीच्या कपडयात गुंडाळलेलं होतं. रामदासने ते पित्याच्या उशाशी ठेवले.
''खादीची उशी वाटतं?'' कोणी विचारले.
''काय रे आहे त्यात?'' आणखी एकाने प्रश्न केला.
''बापाचे पाप.'' एकाने उत्तर दिले.
रामदास बोलला नाही. अग्नी देण्यात आला. चिता भडकली. चंदन, कापूर, तुळशीची काष्ठं पेटली. चंदनासारखा देह झिजला नसला तरी शेवटी तरी चंदन आले. कापुरासारखे निर्मळ यश जोडले नसले तरी शेवटी कापूर मिळाला. संसारावर जिवंतपणी तुळशीपत्र नसेल ठेवता आले, तथापि मरताना तरी तुळशीकाष्ठ मिळाले.
''खरंच ते कागद होते. ते पहा जळत आहेत.'' पाहणारे म्हणाले.
''रामदास, काय हे केलेस?''लोकांनी विचारले.
''पित्याची इच्छा पूर्ण केली. प्रॉमिसरीची पुडकी त्यांना सारखी दिसत, ती त्यांच्याबरोबर पाठवली.'' रामदास शांतपणे म्हणाला.