प्रकरण सातवे
गुजरानवाला इथल्या निर्वासितांच्या छावणीतील पंधरा हजार निर्वासितांपैकी तीन हजारांचा पहिला जथा हिंदुस्तानच्या वाटेला लागला होता! हा जथा हिंदुस्तानात पोहोचवून हिंदुस्तानी लष्कर गुजरानवाला इथे परतलं की दुस्ररा जथा निघणार होता! जास्तीत जास्त पंधरा दिवसात निर्वासितांच्या या जथ्याला हिंदुस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात आपण यशस्वी होऊ असा मेजर चौहानांना विश्वास होता.
नियतीच्या मनात काय होतं?
सुरवातीला प्रत्येक जण उत्साहात वाटचाल करत होता. आजपर्यंतचं आयुष्य ज्या देशात, ज्या मातीत घालवलं ती सोडून निघावं लागलं होतं याची खंत असली तरी प्रत्येकाला आता आस होती ती एका नवीन भविष्याची, आपल्या देशाची! आपल्या देशात पोहोचल्यावर प्रत्येकाला आपलं भवितव्य घडवायचं होतं. झाडाची मुळं जमिनीतून उपटून दुसर्या ठिकाणी नुसती ती फेकली तरी ती पुन्हा आपोआप मातीत रुजतातच ना!
गुजरानवाला शहर मागे टाकून जथा दक्षिणेच्या दिशेने सहा मैल पुढे आला! होते. ज्यांना रोजची किमान थोडीफार चालण्याची सवय होती, त्यांना फारसा त्रास झाला नाही. परंतु कित्येक स्त्री - पुरुषांनी आयुष्यात प्रथमच एवढी मोठी वाटचाल केली होती. चालून - चालून त्यांचे पाय दुखत होते. कित्येकांचे पाय आकडी आल्यागत आंबले होते. काहींच्या पायाला फोडही आले होते! आताशी कुठे हिंदुस्तानच्या दिशेने वाटचाल सुरु झाली होती! अद्याप पहीला मुक्कामही आला नव्हता तो ही अवस्था होती! वाघा सीमेवरुन हिंदुस्तानात प्रवेश करेपर्यंत काय हाल होणार होते भगवान श्रीकृष्णालाच ठाऊक!
जथ्याचा पहिला मुक्काम पडला तो 'अटावा' या गावी.
छावणीतून निघालेली पहिली तुकडी चार - साडेचार तासात आपल्या पहिल्या मुक्कामावर येऊन पोहोचली. गावाबाहेरचं मोकळं माळरान हेच मुक्कामाचं ठिकाण!
पहिल्या तुकडीला इथे येऊन पोहोचताना सुदैवाने कोणताही प्रतिकार झाला नाही. ग्रँड ट्रंक रोड या महामार्गावरुनच त्यांची ही पदयात्रा झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग साचलेले होते. हा कचरा कुजलेला असल्याने त्याचा वास डोक्यात जात होता. कचर्याच्या जोडीलाच अनेक ठिकाणी जुनाट मळकट कपडे पडलेले आढळून आले! काही ठिकाणी तर बर्यापैकी सुस्थितीतले कपडे आढळून आले! काही ठिकाणी तर कपड्यांची बोचकी, पत्र्याचा भरलेल्या ट्रंकादेखील आढळल्या!
याच मार्गावरुन एखादा निर्वासितांचा जथा पुढे गेला असावा. या सर्व वस्तू बहुधा त्यांच्याच असाव्यात. ज्या अर्थी या वस्तू रस्त्यावरच टाकून दिलेल्या होत्या, त्या अर्थी पुढे गेलेल्या जथ्यावर हल्ला झाला असावा असा अंदाज बांधता येत होता. अर्थात हा हल्ला फार मोठा किंवा गंभीर स्वरुपाचा नसावा. रस्त्यावर एकाही ठिकाणावर रक्ताचे डाग आढळून आलेले नव्हते, त्यावरुन हल्लेखोरांची संख्या थोडीशीच असावी असा तर्क करता येत होता.
एकामागून एक तुकड्या अटावा इथे येऊन पोहोचत होत्या. माळरानावर पथार्या पसरु लागल्या. लष्कराचे जवान तुकडीतील लोकांना रात्रीच्या मुक्कामासाठी मार्गदर्शन करु लागले. प्रत्येकाची अंथरूणं - सतरंज्या, चादरी, चिरगुटं माळरानावर पसरली. काही वेळातच त्या माळरानावर मोकळी जमीन म्हणून दिसेना! सुदैवाने आसपास पाण्याच्या विहीरी होत्या, त्यामुळे तो प्रश्न नव्हता. माळरानाच्या आजूबाजूला शेतं पसरलेली असल्याने देहधर्म उरकण्यासाठी आडोसा शोधावा लागणार नव्हता.
जथ्यातील सर्व तुकड्या अटावा इथे येऊन पोहोचल्या तोपर्यंत दुपार टळून गेली होती. संध्याकाळचे चार वाजत आले होते. मिर्झा सिकंदरअली खान आणि आसिफ इथपर्यंत जथ्यासोबत आले होते. गुजरानवाला इथे आपल्या घरी सुरक्षीत पोहोचायचं असल्यास त्यांना आता परत फिरावं लागणार होतं.
"महेंदरभाई, अब वापस लौटेंगे! रात होनेसे पहले घर पहुंचना होगा! अपनी तकदीरमें जो लिखा है उसे भुगतने के सिवा हम कुछ नहीं कर सकते. खुदा की कसम, एक दिन ऐसा भी आएगा कभी सोचा भी नहीं था!" मिर्झांचे डोळे पाण्याने भरुन आले होते.
"बिलकूल ठीक बोललास तू सिकंदर! आपल्या नशिबात जे काही लिहीलेलं आहे ते आपल्याला भोगावंच लागणार! भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन! आपला फक्तं कर्मावर आधिकार असतो. बाकी सगळं परमेश्वराच्या हाती! तो नाचवेल तसं आपण नाचायचं! लहानपणापासून आपण एकत्र वाढलो, एकमेकाच्या सुखदु:खात सहभागी झालो, कितीतरी वर्ष एकत्रं गुजरली, अगदी सख्ख्या भावाप्रमाणे राहीलो.. पण तो काळ आता मागे पडला! एक सुंदर स्वप्नं होतं ते, जे असं अचानक भंग पावलं. आपला ऋणानुबंध इथवरच होता..."
चौधरींना पुढे बोलवेना. मिर्झांनी आवेगाने त्यांना आलिंगन दिलं. हयातभराच्या मैत्रीच्या अनेक आठवणी दोघांच्याही मनात दाटून आल्या. परंतु आता मात्रं दोघांची कायमची ताटातूट होणार होती.
भावनावेग आवरल्यावर मिर्झांनी कमलादेवींचा निरोप घेतला,
"भाभीजी, अपनी उमरमें ये बटवारेका पागलपन शायद कोई सुधार ना सके. पर येही उम्मीद है की हमारी आनेवाली पुश्ते इस गलतीको हमेशा के लिए सुधार देगी. महज कागज के नक्शेपर एक लकीर खीच देनेसे दिलोंमें जो जझबात है वो मिटाए नहीं जा सकते! हम हमेशासे एक थे और एक ही रहेंगे!"
"आपण तशी उम्मीद ठेवू या भाईसाब!" कमलादेवी उत्तरल्या.
"यह जो पाकीस्तान है, मुझे नहीं लगता यह ज्यादा दिनोंतक टिक पाएगा! अगर रहा भी, तो भी हालात आज से और बिगड जाएंगे! खैर, देखते है खुदा क्या दिन दिखाता है!"
मिर्झा सिकंदरअली आणि आसिफ यांनी आपल्यासोबत सायकली आणल्या होत्या. सर्वांचा निरोप घेऊन ते सायकलींवरुन गुजरानवालाच्या दिशेने परत फिरले. ते दिसेनासे झाले तरी किती तरी वेळ चौधरी ते गेलेल्या दिशेला पाहत होते.
देशाबरोबरच मैत्रीच्या एका सुंदर नात्याचीही फाळणी झाली होती!
अटावा इथे येऊन पोहोचलेल्या जथ्यातील बर्याच लोकांची या पहिल्याच पदयात्रेने दमछाक झाली होती. जथ्यातील अनेक वयस्कर स्त्री-पुरुषांना एकदम एवढ्या वाटचालीमुळे कमालीचा थकवा जाणवत होता. काहींचे पाय सुजले होते. काहींना चालण्याच्या श्रमांमुळे ताप भरला होता. चालताना उडालेली धूळ नाकातोंडात जाऊन अनेकजण सर्दी - खोकल्याने बेजार झाले होते. पाय तर जवळपास सर्वांचेच दुखत होते.
या सगळ्याच्या परिणामामुळे अटावा इथला मुक्काम एक दिवसाने वाढवावा लागला. रात्रीपुरता मुक्काम करुन दुसर्या दिवशी लगेच पुढे कूच करण्याच्या मेजरसाहेबांच्या योजनेला पहिल्याच मुक्कामावर असा सुरुंग लागला. कोणत्याही क्षणी गुंडांचा हल्ला होईल या भितीने सर्वांनी जवळपास सर्व रात्रं जागून काढली होती. त्यामुळे ही दिवसभराची विश्रांती सर्वांच्या पथ्यावरच पडली.
दिवसभराच्या विश्रांतीनंतर प्रत्येकजण बर्यापैकी सावरला होता. सकाळी लवकरच मेजरसाहेबांनी निघण्याचा हुकूम दिला. उन्हाचा कडाका वाढण्यापूर्वी शक्यं तेवढं अंतर पार करण्याची त्यांची योजना होती.
जथ्याचा दुसरा मुक्काम पडला तो 'कमोक' या गावी.
अटावापासून हे अंतर सुमारे साडेसात - आठ मैलांचं होतं. पहिली तुकडी इथे पोहोचली तेव्हा दुपारचे दोन वाजून गेले होते. आजची वाटचालही सुदैवाने कोणताही विरोध न होता झाली. अशीच निर्धोक वाटचाल हिंदुस्तानच्या सीमेपर्यंत करता आली तर आणखीन काय पाहिजे होतं?
अटावाप्रमाणेच गावाबाहेरच्या माळरानातच सर्वांनी आसरा घेतला. माळरानाच्या चहूबाजूला शेतं पसरली होती. शेतात काम करणार्यांचा मागमूसही दिसत नव्हता. फाळणीच्या अंदाधुंदीत कसलीच शाश्वती नव्हती तर शेताकडे कोण लक्षं देणार? पिकं करपून गेली होती, नीट मशागत न झाल्याने जमिनीला अर्धवट भेगा पडल्या होत्या, उभं शिवार उजाड झालं होतं.
परिसरातील एकमेव विहीरीवर सर्वांची पाण्यासाठी झुंबड उडाली. आजूबाजूला दुसरी विहीर दृष्टीस पडत नव्हती. थोड्याशा दूर अंतरावर एखादी विहीर असेलही, पण तिथे जाऊन शोध घेण्याचा धोका पत्करण्यात काही अर्थ नव्हता. अचानक गुंडांचा हल्ला झाला तर लपण्यासाठी एखादा नावापुरताही आडोसा मिळणार नव्हता!
दुसर्या दिवशी जथा पुन्हा पुढे निघाला. आतापर्यंत पंधरा मैलांची वाटचाल कोणतंही विघ्नं न येता पार पडली होती. पुढची पदयात्राही अशीच निर्विघ्नपडे पार पडावी यासाठी सर्वजण देवाची प्रार्थना करत होते.
चौधरी महेंद्रनाथ एका तुकडीचे प्रमुख असल्याने त्यांना कमलादेवी आणि सरिता यांच्याबरोबर सतत चालता येत नव्हते. आपल्या तुकडीतील प्रत्येकावर त्यांना लक्षं ठेवावं लागत होतं. त्यांच्या तुकडीत बर्याच सुखवस्तू लोकांचा भरणा होता. आजपर्यंतच्या आयुष्यात कष्टाची फारशी सवय नसल्याने ही पदयात्रा त्यांना असह्य झाली होती. परंतु पुढे जात राहण्याला पर्याय नव्हता! ओठ घट्ट आवळून, पाय ओढत त्यांची वाटचाल सुरु होती. चौधरी सतत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते.
"चला लवकर लवकर! वाटेत थांबू नका! कुठेही बसू नका! अगदीच दम लागला तर उभ्या-उभ्याच विश्रांती घ्या! जितक्या जलदीने आपण मुक्कामावर पोहोचू, तेवढा जास्तं आराम मिळेल! आपल्याला लवकरात लवकर हिंदुस्तानात पोहोचायचं आहे!"
त्या दिवशीचा मुक्काम 'साधोक' या गावी पडला होता.
गावाबाहेरच्या एका शेतातच सगळ्यांचा मुक्काम पडला. पूर्वीप्रमाणेच सैनिकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी आपापल्या पथार्या पसरल्या. पहिली तुकडी इथे पोहोचण्यापूर्वी पावसाची सर येऊन गेली असावी. पावसामुळे जमीन ओलसर लागत होती. भिजलेल्या मातीचा सुगंध सर्वत्रं पसरला होता. त्या परिस्थितीतही तो सुखकारक वाटत होता.
या गावी जथ्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याची मेजर चौहानना खबर मिळाली होती. त्यामुळे मेजरसाहेब आणि इतर अधिकारी आणि जवान डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. हल्ला झाला तर तो कोणत्या बाजूने आणि कसा होईल याचा कोणालाच काही अंदाज येत नव्हता, 'दीन दीन दीन' 'अल्ला हो अकबर' अशा घोषणा कुठे ऐकू येतात का याकडे प्रत्येकाचे लक्षं लागलेले होते.
जथ्यातील लोकांना मात्रं याची काहीच कल्पना नव्हती. उगाच घबराट टाळण्यासाठी मेजरसाहेबांनी हल्ल्याची बातमी लष्करी अधिकारी आणि सैनिकांपर्यंतच ठेवली होती. पदयात्रेने दमले-भागलेले सर्वजण कधीच निद्राधीन झाले होते. सुदैवाने रात्रं निर्विघ्नपणे पार पडली!
गुजरानवाला शहर आता वीस मैल मागे राहीलं होतं. या जथ्याचा शहराशी असलेला संबंध पार तुटला होता. पिढ्यान पिढ्यांचे जुने स्नेहबंध पार तुटले होते. जुन्या गावाला कायमची सोडचिठ्ठी देऊन प्रत्येकजण एका नव्या प्रदेशात आपला नवा गाव शोधायला निघाला होता. मनात उरल्या होत्या त्या फक्त गुजरानवाला इथल्या अनेक आठवणी!
सकाळ होताच साधोक गाव सोडून जथा पुढे निघाला. खरंतर आणखीन एखादा दिवस तरी आराम मिळावा असं प्रत्येकाला वाटत होतं. आजच्या वाटचालीनंतर जथा मुरिदके इथल्या छावणीत पोहोचणार होता.मुरीदके इथे जथ्यात आणखीन भर पड्णार होती. तिथे किमान दोन-तीन दिवस मुक्काम राहणार असल्याने सर्वांना अत्यावश्यक असलेली विश्रांती मिळणार होती. त्या आशेनेच सर्वजण पाय ओढत कसेबसे पुढे चालले होते.
गुजरानवाला इथल्या छावणीतून निघाल्यापासून लष्कराचे अधिकारी वाटेत लागणार्या प्रत्येक गावात जाऊन तिथल्या हिंदू आणि शीखांना जथ्यात येण्याचं आव्हान करत होते. पण बहुतेक गावांत सगळीकडे मुसलमानच दिसून येत होते! औषधापुरतेही हिंदू आणि शीख शिल्लक राहीले नव्ह्ते! जीवाच्या भितीने ते आधीच परागंदा झाले असावेत. उरलेल्यांना गुंडांनी निपटून काढलं होतं. त्यांची प्रार्थनास्थळं भग्नावस्थेत एकाकी पडली होती. जथ्यात येण्याचं आवाहन करणार्या लष्कराच्या अधिकार्यांना गावातले लोक शिवीगाळ करत त्यांची हुर्यो उडवत होते.
आठ मैलांची पदयात्रा करुन तो जथा एकदचा मुरीदके इथल्या छावणीत येऊन पोहोचला!
मुरीदकेची ही छावणी शहराबाहेरील एका मोकळ्या मैदानात उभारलेली होती. एका शेजारी एक असे दाटीदाटीने अनेक तंबू तिथे ठोकलेले होते. आसपासच्या खेड्यातील अनेक निर्वासित छावणीत मुक्काम करुन होते. सर्वजण भीतीच्या छायेत होते. कोणत्याही क्षणी मुरीदके मधील गुंड आपल्या छावणीवर चाल करुन येतील अशी धास्ती त्यांना वाटत होती. गुजरानवाला इथून येणार्या जथ्याची ते आतुरतेने वाट पाहत होते.
मुरीदके इथल्या छावणीत पोहोचल्यावर जथ्यातील लोकांनी सुटकेचा श्वास टाकला! आतापर्यंत कोणतंही विघ्नं न येता त्यांनी अठ्ठावीस मैलांची मजल मारली होती. मात्रं आतापर्यंत सर्वांचीच चांगली दमछाक झाली होती. पुढे कूच करण्यापूर्वी थकलेल्या गात्रांना विश्रांतीची नितांत आवश्यकता होती. इथे छावणीत दोन-तीन दिवस मुक्काम असल्यामुळे सर्वांना आराम मिळू शकणार होता.
छावणीत पोहोचल्यावर प्रत्येकजण आपल्याला सोईस्कर तंबू मिळवण्याच्या मागे लागला. इथे तंबूंची संख्या मर्यादीत असल्याने एका तंबूत दोन-तीन कुटुंबाना दाटीवाटीने आश्रय घेण्यापलीकडे पर्याय नव्हता. गुजरानवालाची छावणी सोडल्यापासून आतापर्यंत उघड्या आकाशाखालीच सर्वांना मुक्काम करावा लागला होता. त्यामुळे अडचणीत का होईना पण तंबूत राहणं सुखावह वाटत होतं.
चौधरी महेंद्रनाथनी छावणीत पोहोचताच आपल्याला सोईस्कर तंबू ताब्यात घेतले. स्वत: चौधरी, कमलादेवी, सरिता आणि डॉ.सेन - चारुलता हे पती-पत्नी एका तंबूत होते. सरदार कर्तारसिंग आणि रुक्सानाबानू यांचे परिवार एका तंबूत दाटीवाटीने सामावले होते. पटवर्धन कुटुंबिय, प्रा.सिन्हा आणि चित्रा यांनी तिसर्या तंबूत आश्रय घेतला होता. आप-परभाव असा फारसा राहीलाच नव्हता. सगळे एकाच वाटेवरचे प्रवासी!
दुसर्या दिवशी दुपारचं जेवण आटपून केशवराव, आदित्य, रजनी आणि प्रा. सिन्हा आपल्या तंबूबाहेर गप्पा मारत बसले होते. मालतीबाई आणि चित्रा तंबूत सतरंजीवर पडल्या-पडल्या भूतकाळातील जुन्या आठवणी रमल्या होत्या. चारुही त्यांच्यात सामील झाली होती. रजनीला भेटण्यासाठी आलेली सरिताही या मंडळींत सामील झाली. रजनीला भेटणं हे अर्थात केवळ एक निमीत्त होतं! छावणीतील लोकांवर शकयं ते उपचार करुन डॉ. सेनही त्यांच्याजवळ येऊन बसले. वेळ घालवण्यासाठी गप्पा मारणे किंवा झोप काढणे याशिवाय काही उपायही नव्हताच!
गप्पांचा ओघ फाळणीच्या निमित्ताने सुरु असलेला हिंसाचार आणि सध्याच्या परिस्थितीवर आला असताना डॉ. सेन म्हणाले,
"इकडे पंजाब आणि तिकडे बंगाल आणि आसाम! दोन्ही पेटलं आहे! कोणाचं काय होईल काही सांगता येत नाही!"
"खरं आहे तुमचं!" केशवरावांनी दुजोरा दिला, "त्यातल्यात्यात
आपण इथपर्यंत तरी सुखरुप येऊन पोहोचलो. पुढे काय होईल माहीत नाही. पण एकदा
हिंदुस्तानात पोहोचल्यावर तरी निदान सगळं स्थिरस्थावर होईल अशी आशा आहे.
तिकडे असलेल्या आपल्या नातेवाईकांच्या आधाराने काहीतरी हात-पाय हलवता
येतील!"
"अहो केशवजी, ज्यांचे नातेवाईक हिंदुस्तानात आहेत त्यांचं ठीक आहे हो, पण बाकीच्यांना कोणाचा आधार आहे?" प्रा. सिन्हांनी प्रश्न केला.
"आमची परिस्थिती आणखीनच शोचनीय आहे!" डॉ. सेन विषादने म्हणाले, "आम्ही
मूळचे बंगालचे. माझे आई-वडील आणि नातेवाईक ढाक्क्याला. एकुलती एक बहीण
सोनग्रामात. चारुचं माहेर चितगावला! आता हे सगळं त्या पूर्व पाकीस्तानात
जाणार. त्यात आम्ही दोघं इथे! कोणी कोणाची काळजी करायची?
"आपल्या पुढार्यांनी फाळणीला मान्यता देण्यापूर्वी याचा विचार का केला नाही हे खरोखरच कोडं आहे!" आदित्यने आपला नेहमीचा मुद्दा मांडला.
"खरं आहे!" प्रा. सिन्हा मान डोलवत म्हणाले, "विशेषतः
दुसर्या महायुद्धाच्या दरम्यानच फाळणीची शक्यता मूळ धरु लागली असताना हे
ब्रिटीशांच्या आणि आपल्या पुढार्यांच्या ध्यानात कसं आलं नाही कळत नाही!"
"दुसर्या महायुद्धाचा आणि फाळणीचा काय संबंध सर?" आश्चर्याने रजनीने विचारलं.
"फार
जवळचा संबंध आहे! मुस्लीम लीग आणि जिन्हांनी कितीही आकांडतांडव केलं तरी
ब्रिटीश सरकार त्यांना फारसं महत्वं देत नव्हतं. स्वातंत्र्यासंबधीच्या
वाटाघाटी या काँग्रेसशीच करण्याला सरकारची पसंती होती. परंतु दुसर्या
महायुद्धाच्या दरम्यान हिंदुस्तानात अशा काही घटना घडल्या की त्याचं
पर्यावसन आजच्या परिस्थितीत झालं!"
"असं नेमकं काय झालं सिन्हासाहेब?" केशवरावांनी विचारलं.
"१९४१
पर्यंत जर्मन हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलरने संपूर्ण युरोप पादाक्रांत केला
होता. फ्रेंच किनार्यावरील विमानतळांवरुन इंग्लंडची राजधानी असलेल्या
लंडनवर सतत बाँबवर्षाव सुरु होता. जर्मन पाणबुड्यांनीही इंग्लिश खाडीतील
बोटींवर हल्ला करण्यास सुरवात केली होती. १९४० च्या सप्टेंबरमध्ये
जर्मनी-इटली आणि जपान यांनी त्रिमीतीय करारावर सह्या केल्या होत्या. अक्ष
राष्ट्र करार या नावाने ओळखल्या जाणार्या या करारान्वये कोणत्याही देशाने
तीनपैकी एका देशाशी युद्ध पुकारल्यास इतर दोन्ही देश त्याच्याविरुद्ध
युद्धास उभे ठाकणार होते! अमेरीका अद्यापही युद्धापासून दूरच होती.
सर्वसामान्य अमेरीकन जनमत युद्धाच्या विरोधातच होतं!
७ डिसेंबर
१९४१ ला जपानने पर्ल हार्बर इथे केलेल्या हल्ल्यामुळे अमेरीका युद्धात
ओढली गेली. युद्धामुळे इंग्लंडची अर्थव्यवस्था पार खिळखिळी झाली होती.
त्यातच जपानने आशिया खंडातील इंग्लंडच्या साम्राज्यावर आक्रमण केल्यामुळे
तिकडून मिळणारी रसद तर बंद झाली होतीच, उलट हे साम्राज्यं वाचवण्यासाठीच
इंग्लंडला धडपड करावी लागणार होती! १९४२ मध्ये आशिया खंडातील ब्रिटीशांचं
साम्राज्य पादाक्रांत करत जपान हिंदुस्तानच्या पूर्व दरवाज्यावर येऊन धडकला
होता!
इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चील यांचा
हिंदुस्तानला स्वातंत्र्य देण्याला पराकोटीचा विरोध होता. हिंदुस्तानी लोक
हे राज्यकर्ते म्हणून नालायक आहेत असं चर्चीलचं ठाम मत होतं! परंतु चर्चील
मंत्रीमंडळातील उदारमतवादी सदस्यांनी आणि विशेषतः अमेरीकेने चर्चील
यांच्यावर मोठाच दबाव आणला. ब्रिटीश युद्धप्रयत्नांना हिंदुस्तानातून
सैन्याची आणि साधनसामग्रीची मदत हवी होती, त्यामुळे हिंदुस्तानला
स्वातंत्र्य देण्याबाबत काहीतरी हालचाल करणं त्यांनी चर्चीलना भाग पाडलं."
सर्वजण लक्षपूर्वक प्रा. सिन्हांचं बोलणं ऐकत होते. सिन्हांनी पुढे बोलायला सुरवात केली,
"चर्चीलनी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना दिल्लीला पाठवलं. या
क्रिप्ससाहेबांचे आपल्या काँग्रेस पुढार्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते.
त्यांच्याबरोबर चर्चीलनी हिंदुस्तानला काही सवलती देणारी एक योजना दिल्लीला
पाठवली होती."
"कोणती योजना सर?" आदित्यने मध्येच विचारलं,
"चर्चीलसाहेबांची
ही योजना म्हणजे आवळा देऊन भोपळा काढणारी होती! जपानचा पराभव करण्यासाठी
हिंदुस्तानने इंग्लंडच्या युद्धप्रयत्नांना मनुष्यबळाची आणि साधनसामग्रीची
मदत केल्यास जपानचा पराभव झाल्यावर हिंदुस्तानला वसाहतीचे स्वातंत्र्य
देण्यास चर्चील तयार होते!"
"युद्धासाठी मनुष्यबळ आणि
साधनसामग्रीच्या मोबदल्यात फक्तं वसाहतीचं स्वातंत्र्य? शेवटी स्वार्थी
व्यापारी मनोवृत्तीने डोकं वर काढलंच!" केशवराव उद्गारले.
"या योजनेत आणखीन एक ग्यानबाची मेख होती!"
"ती कोणती?"
"मुस्लिम
लीग आणि जिन्हांच्या मागणीनुसार हिंदुस्तानला वसाहतीचे स्वातंत्र्य
देतानाच स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणीही पूर्ण करण्यात येईल असं या
योजनेत म्हटलेलं होतं!"
"अशी बात आहे तर! म्हणजे तिथेही ब्रिटीशांनी आपलं फोडा आणि राज्य करा हेच धोरण सुरु ठेवलेलं होतं!" डॉ. सेन न राहवून म्हणाले.
"सर
स्टॅफर्ड क्रिप्स भारतात आल्यावर ताबडतोब त्यांनी ही योजना काँग्रेस
पुढार्यांच्या गळी उतरवण्याचा प्रत्यत्न केला. परंतु अवघ्या अठ्ठेचाळीस
तासात गांधीजींनी त्यांच्या योजनेला नकार दिला!
तुमच्या या
योजनेप्रमाणे हिंदुस्तानचे तुकडे होणार आहेत सरसाहेब! गांधीजींनी सुनावलं,
जपानविरुद्धच्या युद्धासाठी तुम्हाला आमचं सहकार्य आता हवं आहे, पण आम्हाला
स्वातंत्र्य मात्रं तुम्ही युद्धसमाप्तीनंतर देण्याचं आश्वासन देत आहात,
तेही देशाची फाळणी करून!"
"वाह! गांधीजींनी चर्चीलचा हेतू बरोबर ओळखला होता तर!" इतका वेळ सगळी चर्चा ऐकणारी सरिता म्हणाली.
"सरसाहेब, युवर प्लान इज अ पोस्ट डेटेड चेक ऑन अ फार्लिंग बँक! बुडीत खात्यात निघालेल्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश!"
"ग्रेट!" डॉ. सेन उद्गारले.
"तुमच्यापाशी
देण्यासारखं आणखीन काही नसेल तर परतीचं विमान पकडून तुम्ही इंग्लंडला परत
जा! गांधीजींनी बेधडकपणे क्रिप्ससाहेबाला ठणकावलं!"
"बाप रे! गांधीजी असं म्हणाले? चांगलीच जिरवली चर्चीलची!" आदित्य आश्चर्यमिश्रीत कौतुकाने उद्गारला.
"पुढे ८ ऑगस्टला गांधीजींनी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावरीळ काँग्रेस अधिवेशनात ब्रिटीशांना निर्वाणीचा इशारा दिला..."
"छोडो भारत!
क्विट इंडीया!" रजनी म्हणाली.
"दुसरा
दिवस उजाडण्यापूर्वीच सर्व प्रमुख काँग्रेस पुढार्यांची सरकारने धरपकड
केली. गांधीजींना पुण्याला आगाखान पॅलेसमध्ये, मौलाना अबुल कलाम आझाद,
पं.नेहरू यांना अहमदनगरच्या किल्यात अटकेत ठेवले. अटकेत असतानाच गांधीजींनी
ठणकावले, "आम्ही यापुढे इंग्रजांची गुलामगिरी आता सहन करणार नाही! आम्हाला
आता स्वातंत्र्यच हवे! करेंगे या मरेंगे!
जयप्रकाश नारायण,
अरुणा असफअली, अच्युतराव पटवर्धन हे काँग्रेसचे तरुण पुढारी मात्र बाहेर
होते. ते ताबडतोब भूमिगत झाले. चले जाव आंदोलन त्यांनी जोराने पुढे चालवलं!
रेल्वे रूळ उखडणं, विजेचे खांब पाडणं, सरकारी तिजोर्या लुटणं या मार्गाने
त्यांनी सरकारला जेरीस आणलं!"
"आमच्या महाराष्ट्रात नाना पाटलांनी तर प्रतिसरकार उभारलं होतं सातारा भागात!" केशवराव म्हणाले, "हातात
सापडलेल्या ब्रिटीशांच्या पायाला ते घोड्याला नाल ठोकावे तसे पत्रे ठोकतात
अशी वदंता होती. त्यामुळे त्यांच्या सरकारला पत्री सरकार म्हणत!"
"चले
जाव आंदोलन सर्वत्र पसरू लागलं होतं. भूमिगत पुढार्यांनी गुप्त ठिकाणाहून
प्रसिद्ध होणार्या आकाशवाणीच्या कार्यक्रमांद्वारे जास्तीत जास्तं
लोकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. पत्रकं छापून घरोघरी वाटली.
काही पत्रंकं तर थेट सरकारी कार्यालयांमध्येच पाठवण्यात आली!
आंदोलन
चिरडण्यासाठी सरकारने पाशवी बळाचा वापर केला. सुमारे लाखभर लोकांना अटक
करण्यात आली. कित्येकांना गोळ्या घालण्यात आल्या. यथावकाश सरकारने काँग्रेस
बेकायदा ठरवून त्यावर बंदीही घातली! मात्रं यामुळे जनतेची सहानुभूती
काँग्रेसलाच मिळाली.
या आंदोलनामुळे एक तोटा मात्रं झाला!
सरकारने बंदी घातल्यामुळे राजकीय आखाड्यातून काँग्रेस हद्दपार झाली.
मुस्लीम लीगला मैदान मोकळं मिळालं! लीगने त्याचा फायदा घेतला नसताच तर नवल!
ब्रिटीशांच्या युद्धप्रयत्नांना लीगने शक्यं ती सर्व मदत केली. साहजिकच
ब्रिटीश राज्यकर्त्यांची सहानुभूती लीगला मिळाली.
ब्रिटीशांनी त्याचवेळी ठरवलं असावं, हिंदुस्तानला स्वातंत्र्य देण्याची वेळ
आलीच तर देशाची फाळणी करायची! फाळणी झाल्यामुळे लीगचे पुढारी अर्थातच
ब्रिटीशांचे मिंधे राहणार होते. हिंदुस्तानातून आपला कारभार आटोपता घेताना
ब्रिटीशांनी नेमकं तेच केलं आहे! दोन बाजूंनी हिंदुस्तानचे तुकडे करुनच
त्यांनी पाकीस्तानची निर्मीती केली आहे!"
"चर्चीलसाहेब दीर्घद्वेषीच म्हणायचे!" रजनी उद्गारली.
"चर्चील
असो वा आताचे ब्रिटीश पंतप्रधान अॅटली, हिंदुस्तानची फाळणी करण्याचा
ब्रिटीशांचा निर्णय अगदी पक्का होता. फाळणीची योजना आखूनच माऊंट्बॅटन
हिंदुस्तानात आले होते!"
"शेवटी ब्रिटीशांनी त्यांना हवं ते केलंच आणि आपल्याला या वणव्यात ढकललं!" केशवराव उद्गारले.
काही वेळ कोणीच काही बोललं नाही. प्रा. सिन्हांच्या तोंडून ऐकलेल्या ऐतिहासिक घटनांचा अर्थ लावण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत होता.
"परंतु सिन्हासाहेब, चले जाव आंदोलन फसलं अशी मुस्लीम लीग आणि कम्युनिस्टांनी गांधीजींवर केलेली टीका कितपत योग्य होती?" केशवरावांनी विचारलं.
"ब्रिटीश
सरकारने काँग्रेसवर बंदी घातली होती. बहुतांश काँग्रेस पुढार्यांना अटकेत
ठेवलं होतं. त्यांचा कोणाशीही संपर्क येणार नाही अशी व्यवस्था केली होती!
गांधीजींना
पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्यात आलं होतं. कस्तुरबाही तिथेच होत्या.
त्यांनाही अटक करण्यात आली होती. गांधीजी यावेळी ७४ वर्षांंचे होते.
त्यांची प्रकृती आधीच खालवलेली होती. अशा परिस्थितीतही सरकारच्या सुरु
असलेल्या दडपशाहीच्या विरोधात गांधीजींनी २१ दिवसांचं उपोषण सुरु केलं!
केवळ मोसंबीचा रस ते घेत होते!"
"फक्तं मोसंबीच्या रसावर २१ दिवस!" रजनी थक्कं झाली.
"व्हाईसरॉयने
चर्चीलला पत्रं लिहून ह्या सगळ्या घडामोडी कळवल्या. गांधीजींनी
क्रिप्ससाहेबांची योजना धुड्कावून लावल्याने चर्चील आधीच खवळले होते,
त्यातच चले जाव आंदोलनाची भर! त्यानी दिल्लीला कळवून टाकलं, त्या
म्हातार्याला उपास करुन आत्महत्या करायची असेल तर ठीक आहे! त्याला खुशाल
आत्महत्या करु देत!"
"बाप रे! भयंकर आहे हे!" आदित्य उद्गारला.
"ब्रिटीश
सरकार त्यावेळी चांगलेच कात्रीत सापडलेले होते. गांधीजींचं काही बरंवाईट
झालं तर सारा देश पेटून उठेल या भितीने सरकारने त्यांना दक्षिण आफ्रीकेत
किंवा मध्यपूर्वेतील एखाद्या देशात गुपचूप नेऊन ठेवण्याचाही विचार केला
होता! त्या दृष्टीने एक ब्रिटीश युद्धनौका मुंबई बंदरात दाखलही झाली होती!
दरम्यान गांधीजींना मृत्यू आलाच तर दहनासाठी सरकारने आगाखान पॅलेसमधे
गुपचूप चंदनाचे ओंडके आणून ठेवले होते! अंतिम क्रियाकर्म पार पाडण्यासाठी
दोन ब्राम्हणांनाही आगाखान पॅलेसमध्ये आणून ठेवण्यात आलं होतं!"
"अरे देवा! किती भयंकर माणसं होती ही!" केशवराव उद्वीग्नपणे म्हणाले.
"ब्रिटीश सरकारने हे पूर्वीही केलं आहे नाना!" आदित्य मध्येच म्हणाला, "भगतसिंग,
सुखदेव, राजगुरू यांना २४ मार्च १९३१ या दिवशी सकाळी फाशी देण्याचा निर्णय
झालेला असतानाही त्यांना आदल्या दिवशी, २३ मार्चच्या संध्याकाळीच लाहोर
सेंट्रल जेलमध्ये फासावर चढवण्यात आलं! जेलची भिंत फोडून सरकारने तिघांचे
मृतदेह बाहेर काढले आणि रात्रीच्या अंधारात गंद सिंग वाला इथे गुपचूप
त्यांचा अंत्यविधी उरकला आणि अस्थी रावी नदीत फेकून दिल्या होत्या!"
"तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आदित्यबाबू!" प्रा. सिन्हा म्हणाले, "सुदैवाने या २१ दिवसांच्या उपोषणातून गांधीजी सहीसलामत बाहेर पडले, परंतु एक अत्यंत दुर्दैवी घटना मात्रं घडली.
"कोणती?" सरितेने विचारलं.
"गांधीजींबरोबरच
कस्तुरबाही आगाखान पॅलेसमध्येच अटकेत होत्या. त्यांना अॅक्युट
ब्राँकायटीसने गाठलं होतं. हा आजार तसा जीवघेणाच, परंतु या आजारावर नुकताच
एका नवीन औषधाचा शोध लागला होता! पेनिसिलीन! हे औषध हिंदुस्तानात उपलब्धं
नव्हतं. ब्रिटीश सरकारने खास विमानाने हे औषध भारतात पाठवून आगाखान
पॅलेसमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली. पेनिसिलीन दिल्यावर कस्तुरबांना
खूप आराम पडणार होता. परंतु हे औषध इंजेक्शनने शिरेत द्यावं लागणार होतं!
हे कळताच गांधीजींनी नकार दिला! म्हणाले, काय व्हायचं असेल ते होऊ दे, पण
इंजेक्शन देणं मला नामंजूर आहे!"
"कठीण आहे!" आदित्य उद्गारला.
"औषध
उपलब्धं होतं, उपचार करण्यासाठी डॉक्टर हजर होते, परंतु उपचार झाला मात्रं
नाही! २२ फेब्रुवारी १९४४ ला आगाखान पॅलेसमध्येच कस्तुरबांचं निधन झालं!
गांधीजींच्या उपोषणाच्या वेळेस सरकारने आगाखान पॅलेसमध्ये आणून ठेवलेल्या
चंदनी ओंडक्यांचा वापर करुनच कस्तुरबांची चिता रचली गेली!"
"खरोखर हे दुर्दैवंच!"
"कस्तुरबांच्या
मृत्यूनंतर गांधीजींची प्रकृती पुन्हा खालावली. त्यांची प्रकृती गंभीर
झाली होती. जगभराच्या नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. चर्चीलच्या
आडमुठेपणावर बरीच टीका झाली. अमेरीकेने चर्चीलवर बरंच दडपण आणलं. आगाखान
पॅलेसमध्ये असताना गांधीजींचं बरवाईट झालं तर उसळणार्या क्षोभाला तोंड
देणं आपल्याला अशक्यं होईल या भितीने सरकारने अखेर गांधीजींची मुक्तता
केली!"
"लवकरच शहाणपण आलं म्हणायचं!" डॉ. सेन म्हणाले.
"व्हाईसरॉयने
चर्चीलला पुढील कारवाईची सूचना विचारण्यासाठी चर्चीलला तार केली. चर्चीलने
उलट तार करुन विचारलं, अजून तो म्हातारा जिवंत आहे?"
"बाप रे! उद्धट्पणाचा मूर्तिमंत कळस आहे हा!" रजनी.
"पण
महायुद्धानंतर झालेल्या निवडणूकीत चर्चीलचा साफ पराभव झाला. मजूर पक्षाचे
पुढारी अॅटली पंतप्रधान झाले. पुढे काय झालं ते आपण पाहतोच आहोत.
दुर्दैवाने
काँग्रेस पुढार्यांच्या अटकेनंतरही जोमात सुरु असलेलं चले जाव आंदोलन
१९४५ पर्यंत थंडावलं होतं. या दरम्यान मुस्लीम लीगने आक्रमकपणे पाकीस्तानची
मागणी पुढे रेटण्यास सुरवात केली. काँग्रेस पुढार्यांचा मात्रं फाळणीला
विरोधच होता. बिथरलेल्या जिन्हांनी डायरेक्ट अॅक्शन डे पुकारला आणि
कलकत्त्याची हुगळी नदी रक्तरंजित झाली! पुढे व्हाईसरॉय म्हणून माऊंटबॅटन
हिंदुस्तानात आले. फाळणी मात्रं टळली नाही ती नाहीच!"
मुरीदके इथल्या छावणीतला तिसरा दिवस.
गेल्या दोन दिवसांत सर्वांना भरपूर विश्रांती मिळालेली होती. जथ्यातील बहुतेक जण आता पुढली मजल मारण्याच्या दृष्टीने ताजेतवाने झाले होते. आज रात्रीच्या विश्रांतीनंतर पुढे कूच करण्याच्या दृष्टीने मेजरसाहेबांनी सर्वांना सूचना दिल्या होत्या. त्या दृष्टीने सर्वांची आवरा-आवर सुरु होती. रात्रीचे नऊ वाजले होते. बहुतेकांची जेवणं आटपली होती, दुसर्या दिवशी आगेकूच सुरु होणार असल्याने लवकर पथारी पसरण्याचा सर्वांचा विचार होता.
छावणीच्या फाटकाकडील बाजूला अचानक गोळीबाराचे आवाज आले!
पाठोपाठ मोठ्या आवाजातल्या घोषणा सर्वांना ऐकू आल्या,
"नारा ए तकब्बीर!"
"अल्ला हो अकबर!"