प्रकरण नववे
जथा पुढे निघाला होता! मागे राहीलेल्यांना कायमचे मागे ठेवून.
पूर्वीचा उत्साह आता नावालाही शिल्लक नव्हता. वास्तविक मुरीदके इथल्या छावणीत त्यांना दोन दिवस पूर्ण विश्रांती मिळाली होती, परंतु छावणीवर झालेल्या हल्ल्यामुळे जो मानसिक धक्का बसला होता आणि जे आप्तेष्ट गमवावे लागले होते, त्याची कसर कोणत्याही उपायाने भरुन निघणारी नव्हती. आला तो दिवस आपला म्हणत हिंदुस्तानच्या सीमेकडे चालत राहायचं एवढं एकमेव लक्ष्यं प्रत्येकासमोर उरलं होतं. एखाद्या गोळीवर, एखाद्या तलवारीवर आपलं नाव असलं तर मुकाट बळी पडावं, नाहीतर उरलेले भोग भोगत पुढे जात राहवं इतकंच हातात होतं.
मेजरसाहेब जथ्यात चैतन्य आणण्याचा, त्यांचा उत्साह वाढवण्याचा सतत प्रयत्न करत होते. पहिल्या तुकडीपासून ते शेवटच्या दहाव्या तुकडीपर्यंत जीपने फिरुन ते सर्वांना धीर देत होते,
"चला चला! लवकर पावलं उचला! आपल्याला लवकरात लवकर हिंदुस्तानात पोहोचायचं आहे! चलो दिल्ली! नेताजी सुभाषचंद्र बोसकी याद करो! कदम कदम बढाये जा!"
मेजर साहेबांच्या या आवाहनाचा काहीही उपयोग मात्रं होत नव्हता. जथा रेंगाळतच चालला होता. छावणीत झालेल्या हल्ल्यात अनेक लोक जखमी आणि जायबंदी झालेले होते. शक्यं तितक्या गंभीर जखमींना आणि ज्यांना हालचाल करणं अगदीच अशक्यं आहे अशा लोकांना आधीच भरलेल्या लष्कराच्या ट्रकमध्ये कसंबसं चढवण्यात आलं होतं, परंतु तरीही अनेक जखमी लोक पायीच चालत होते. त्यांना भराभर वाटचाल करणं केवळ अशक्यंच होतं. आधीच औषधांच्या तुटवड्यामुळे अपुरे उपचार आणि त्यात ही पदयात्रा. त्यांच्या हालास पारावार उरला नव्हता. कशाबशा बांधलेल्या जखमा पुन्हा उघड्या पडत होत्या. वेदनेने सुरु असलेला त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. अशा अवस्थेतही पाय ओढत पुढे जाण्याला पर्याय नव्हता!
त्या दिवसाचा मुक्काम होता तो हकीमपुरा या गावी.
मुरीदके छावणीपासूनचं इथपर्यंतचं अंतर सहा मैल होतं. परंतु हे अंतर तोडण्यास तब्बल सहा तास लागले होते. रस्त्याला लागून असलेल्या शेतात, उघड्या आभाळाखालीच सर्वांनी पथार्या पसरल्या. कित्येकांना आपली बोचकी सोडून त्यातली अंथरूणं - पांघरुणं काढण्याचेही श्रम नकोसे झाले होते. ते तसेच मातीमध्ये आडवे झाले. अंथरण्यास जमीनीची चटई आणि पांघरण्यासाठी खुल्या आकाशाची गोधडी! आणखीन काय हवं? दोन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यामुळे सर्वजणच धास्तावलेले होते. पुन्हा तसाच हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अशा अवस्थेत झोप तरी कशी लागणार?
दुसर्या दिवशी सकाळी पुढची वाटचाल सुरु झाली!
इच्छा असो वा नसो, शरीर साथ देवो वा न देवो, पुढे चालत राहण्याला दुसरा पर्याय नव्हता. या नरकवासातून लवकरात लवकर सुटका व्हावी आणि हिंदुस्तानच्या सीमेवर पोहोचावं या एकमेव ध्यासाने सर्वजण पाय ओढत होते. मेजर चौहान आणि त्यांचे सहकारी सर्वांना शक्य तितक्या जलदीने पुढे चलण्यासाठी प्रोत्साहन देत होते, पण जथ्याचा वेग चांगलाच मंदावला होता.
काही ठिकाणी पाण्याची तळी साठलेली आढळून येत होती. या तळ्यांत म्हशी डुंबत असलेल्या नजरेस पडत होत्या. रस्त्याला लागूनच असलेल्या शिवारात मधूनच विहीरी आढळत होत्या. काही विहीरींवर इराणी पद्धतीचे रहाट बसवलेले होते. स्थानिक मुस्लीम स्त्रिया पाणी भरताना मधूनच दिसत. रहाटाची कुरकूर कानावर येत होती. वाटेत अनेक फळांनी भरलेल्या बागा लागल्या. झाडं फळांनी लगडलेली होती, परंतु फळं उतरवताना मात्रं कोणीही दिसून आलं नाही. गावाकडची ताजी, शुद्ध हवा सुखकारक वाटत होती, परंतु त्याचा आस्वाद घेण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हतं.
चौधरी महेंद्रनाथ यांची तुकडी पाचव्या क्रमांकावर होती. चौधरी, कमलादेवी, सरिता, रुक्सानाबानू आणि तिचे कुटुंबिय, पत्नी आणि मुलासह गुरकीरत सिंग, डॉ. सेन, चारुलता, केशवराव, आदित्य, रजनी, प्रा. सिन्हा आणि चित्रा सर्वजण जवळपास एकत्रच चालत होते. रजनी आणि सरितेच्या गप्पा रंगात आल्या होत्या. आईच्या आठणीने व्याकूळ झालेल्या आपल्या मैत्रिणीला सरिता आपल्या परिने सावरण्याचा प्रयत्न करत होती. हकीमपुरा सोडल्याला आता तीन तास होऊन गेले होते. आजचा मुक्काम फिरोजावाला या गावी करायचा होता. जवळपास अर्धी वाटचाल झाली होती. अजून साडेतीन मैलांचं अंतर बाकी होतं. हळूहळू रडत ऱखडत जथा पुढे चालला होता. अचानक -
थाड! थाड! थाड!
मशीनगन मधून गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला!
सर्वांची पाचावर धारण बसली. मेजर चौहान आणि त्यांचे अधिकारी आणि सैनिक बंदुका सरसावून प्रतिकाराला सज्ज झाले. एकच गोंधळ उडाला. लष्कराचे जवान मोठ्याने ओरडून सर्वांना सूचना देत होत.
"बैठ जाव, नीचे बैठ जाव!"
"कोई भी खडा मत रहो! चुपचाप बैठो!"
"डरकर इधर-उधर मत भागो!"
"हमलावरोंसे मुकाबला हम फौजी करेंगे!"
चौधरीनी कमलादेवींचा हात पकडून रस्त्यावर बसकण मारली. त्याचवेळी सरिता आपल्या शेजारी नसल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. त्यांनी मागे वळून पाहील्यावर ती रजनी आणि आदित्यबरोबर असल्याचं दिसताच त्यांच्या जीवात जीव आला. आदित्यच्या हातात कॅ. वकाराने भेट दिलेला लांब पात्याचा सुरा होता. आपल्यावर हल्ला झालाच तर मरण्यापूर्वी किमान एक-दोघांना तरी खलास करायचं असा त्याचा निश्चय होता. डॉ. सेन आणि चारु, प्रा. सिन्हा आणि चित्रा, आपल्या कुटुंबासह रुक्सानाबानू, गुरकीरत सर्वजण कोंडाळं करुन बसले होते. जथ्याच्या पुढच्या दिशेने गोळीबाराचे आवाज येत होते. आरडा-ओरडा चालला होता. मधूनच दीन दीन दीन, अल्ला हो अकबर अशा घोषणा ऐकू येत होत्या. त्या घोषणा कानावर पडल्या की स्त्रियांचा थरकाप उडत असे. मुसलमान गुंड हे सर्वप्रथम स्त्रियांना लक्ष्यं करतात, त्यांच्या अब्रूवर घाला घालतात हे सर्वांनाच ठाऊक होतं.
प्रत्येक तुकडीला काही ठरावीक सैनिक संरक्षणासाठी नेमलेले होते. त्यांनी त्या तुकडीचं संरक्षण करावं अशी मेजरसाहेबांची योजना होती. सर्वजण रस्त्यावरच बसले होते. मध्येच एक जीप त्यांच्या बाजूने पुढे गेली. जीपवरील अधिकारी ओरडून सर्वांना सूचना देत होता,
"चुपचाप नीचे बैठ जाव! बैठ जाव! खडा मत रहो!"
अचानक जथ्याच्या पुढच्या बाजूला असलेल्या तुकडीच्या उजव्या बाजूने नवा कोलाहल ऐकू आला. त्या बाजूला बर्याच फळबागा दिसत होत्या. त्या बागांच्या पलीकडे काय आहे हे मात्रं दिसू शकत नव्हतं. कोलाहलाचा आवाज बागांपलीकडच्या त्या भागातूनच येत होता. स्त्री-पुरुषांच्या किंकाळ्या कानावर आदळत होत्या. बंदुकीच्य गोळ्यांचे आवाज सतत येत होते. काय घडतं आहे कोणालाच काही कळत नव्हतं!
सर्वजण देवाचा धावा करत होते. चौधरी महेंद्रनाथ भग्वदगीतेतील श्लोक मनात म्हणत होते.
धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रे समवेत: युयुत्सवः!
मामकः पांडवाश्र्चैव किंमकुर्वत संजया!
रुक्सानाबानू वैष्णोदेवीची प्रार्थना करत होती. आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं रक्षण वैष्णोदेवीच करु शकेल अशी तिची दृढ श्रद्धा होती. गुरकीरत आपल्या गुरुमहाराजांची प्रार्थना करत होता. रजनी मनात संकटनाशन स्तोत्र म्हणत राहिली.
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् !
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये||
सुमारे दीड-दोन तास सर्वजण रस्त्यावरच बसून होते. अखेर एकदाचा गोळीबार आणि गोंधळ थांबला! सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. ज्यांचे नातेवाईक ट्रकमध्ये होते, ते त्या दिशेने धावले. चौधरींनी शेजारीच असलेल्या सैनिकाजवळ चौकशी केली,
"सुभेदार साब, क्या हुवा?"
"हमें कुछ पता नही! आप शांती रखो!"
अखेरीस एकदाचा तो जथा पुन्हा हलू लागला! सैनिकांच्या सूचनेप्रमाणे सर्वांनी पुढे चालण्यास सुरवात केली. चौधरी महेंद्रनाथ आणि त्यांच्या तुकडीतील सर्व लोक सुदैवाने सुरक्षीत होते. मुरीदके इथल्या छावणीतील हल्ल्यात त्यांच्या तुकडीतील पन्नासच्या सुमाराला माणसं कमी झाली होती! मात्रं या हल्ल्यातून सर्वजण सुखरुप बचावले होते.
पुन्हा एकदा वाटचाल सुरु झाली. पुढे गेल्यावर त्यांना अनेक चित्र - विचित्र वस्तू रस्त्यावर पडलेल्या आढळून आल्या. पुरुषांचे फेटे, स्त्रियांच्या ओढण्या, पादत्राणं, सामानाची अनेक बोचकी आणि गाठोडी, काही सायकली सर्व काही रस्त्याच्या एकाच बाजूला पडलेलं आढळून आलं! जणू काही एखादी समुद्राची लाटच डावीकडून उजवीकडे वाहून गेली होती आणि सर्वकाही धुतलं गेलं होतं! चारही बाजूला पाणी शिंपल्यागत रक्ताचा सडा पडला होता. एखादी घनघोर लढाई व्हावी तसा प्रेतांचा खच पडला होता. अवघ्या दोन-तीन तासांपूर्वीची ही चालती-बोलती माणसं, आता त्यांची प्रेतंच शिल्लक राहीली होती. कित्येकांचे नातेवाईक तिथे मारले गेले होते. त्यांचा आकांत ऐकवत नव्हता. मृतांचे अंत्यविधी आणि क्रियाकर्म करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
जथ्यातील आबालवृद्ध वाटेत पडलेल्या मृतदेहांना ओलांडून पुढे जात होते. जणू काही ती कुत्र्या-मांजराची आणि गुराढोरांची मढी होती. प्रेतांची अवस्था पाहून कित्येकांना मळमळत होतं. मान खाली घालून एक शब्दही न बोलता सर्वजण पावलं टाकत होते. स्त्रियांनी ओढण्यांनी आणि साडीच्या पदराने आपले चेहरे झाकून घेतले. लहान मुलांना ते भीषण दृष्य दिसू नये म्हणून बहुतेकांनी त्यांच्या डोळ्यावर हात धरले होते. काही प्रेतांवरील वस्त्रं फाटून त्याच्या चिरफाळ्या उडाल्या होत्या. काही स्त्रियांची वक्षस्थळं उघडी पडली होती. स्तनपान करणारी त्यांची तान्ही बालकं त्यांच्याशेजारी मृतावस्थेत आढळून आली. मेलेल्या नजरेने आणि कसाबसा मनावर ताबा ठेवत प्रत्येकजण पुढे पावलं टाकत होता. ज्यांचे नातेवाईक मरण पावले होते त्यांनाही शोक आवरुन पुढची वाट सुधरण्याव्यतिरिक्त दुसरा मार्ग नव्हता!
कसाबसा उरलेला रस्ता कापून जथा फिरोजावाला इथे येऊन पोहोचला. रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या शाळेच्या इमारतीत आणि मैदानत सर्वांनी मुक्काम टाकला.
फिरोजावाला इथे पोहोचल्यावर सर्वाना हल्ल्याची कल्पना आली. पहिल्या दोन तुकड्या फळबागा ओलांडून आधीच पुढे गेल्या होत्या. जथ्याची शेवटची तुकडी हकीमपुरा इथून जेमतेम निघालेली होती. तिसर्या आणि चौथ्या तुकडीवर हल्ला झाला होता.
तिसर्या तुकडीच्या पुढील बाजूला असलेल्या सैनिकांना घोड्यावरुन येणारे हल्लेखोर दिसले. त्यांच्या जोरजोराने आरोळ्या सुरुच होत्या. लष्कराने त्यांना प्रतिकार करण्यास सुरवात केली होती. परंत तुकडीतील लोक हल्ल्यामुळे बिथरले होते. त्यांच्यात घबराट उडाली. लोक सैरावैरा पळत सुटले. हा हल्ला मुद्दाम डाव्या बाजूने करण्यात आला होता. साहजिकच लोक उजव्या दिशेला असलेल्या फळबागांच्या दिशेने पळत सुटले. हल्लेखोरांचा तोच हेतू होता. त्या बाजूने लोकांनी पळावं याच हेतूने हल्ला करण्यात आला होता.
फळबागांच्या परिसरात मोठ्या संख्येने हल्लेखोर जमा झालेले होते. प्रत्येकाच्या हातात तलवार, बंदूक, लोखंडी कांबी, सळ्या-गज असली शस्त्रं होती. जथ्याला भिडताच त्यांनी सपासप तलवारीचे घाव घालण्यास सुरवात केली. लांडगेतोड सुरु झाली. निशस्त्रांवर सशस्त्रांचा हल्ला! कोणताही प्रतिकार अशक्यं होता. हल्लेखोर आणि निर्वासित एकमेकांत मिसळले होते, त्यामुळे सैनिक हतबल झाले होते. तरीही सैनिकांनी काही हल्लेखोरांना गोळ्या घालून ठार केलं. परंतु हल्लेखोर संख्येने बरेच जास्तं होते. कित्येक स्त्री - पुरुष प्राणाला मुकले. अनेक स्त्रियांना आणि तरुणींना हल्लेखोरांनी घोड्यावर घालून पळवून नेलं. मनसोक्त हैदोस घालून हल्लेखोर पसार झाले.
सर्व तुकड्या फिरोजावाला इथे येऊन पोहोचल्यावर तीन आणि चार क्रमांकाच्या तुकड्या मिळून सुमारे दोन-अडीचशे माणसं मृत अथवा अपहृत झाल्याचं आढळून आलं! मुक्कामावर पोहोचल्यावर भोजनासाठी सर्वजण तीन धोंडे मांडत होते. परंतु अनेक कुटुंबांच्या चुली पेटल्याच नाहीत. त्यांनी आपले नातेवाईक गमावले होते, त्यांना भुकेची पर्वा नव्हती. ते रिकाम्या पोटीच आडवे झाले.
सकाळी पुन्हा एकदा बोचक्यांची बांधाबांध झाली. जथा पुढे निघाला!
आदल्या दिवशीच्या झालेल्या हल्ल्याने सर्वजण भेदरलेले होते. पुन्हा असा हल्ला कधीही होऊ शकतो ही भीती सर्वांच्या मनात घर करुन होती. जीव मुठीत धरुन आणि मनातल्या मनात ईश्वराची प्रार्थना करतच सर्वजण पुढे चालले होते. कित्येकांची अवस्था दयनीय झालेली होती. आपली ही वाटचाल कधी संपणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. हिंदुस्तानात पोहोचण्यात आपण यशस्वी होऊ का तापूर्वीच आपला बळी पडेल याची कोणालाच शाश्वती राहीलेली नव्हती.
दिवसभर रडत-रखडत त्यांची पदयात्रा सुरु राहीली. दुपार कलल्यानंतर काही अंतरावर असलेला एका मोठा किल्ला पहिल्या तुकडीच्या नजरेस पडला! थोडं पुढे गेल्यावर किल्ल्याच्या शेजारीच असलेली निर्वासितांची मोठी छावणी आणि त्यातील तंबूही दृष्टीस पडत होते. या छावणीतच त्यांचा काही दिवस मुक्काम राहणार होता! किल्ल्याच्या मागे पसरलेल्या शहरातील अनेक इमारती दुरुनही नजरेत भरत होत्या.
लाहोर!
पंजाब प्रांताचं आणि पंजाबी संस्कृतीचं सर्वात मोठं केंद्र!
प्राचीन काळी श्री रामचंद्राचा पुत्र लव याने या शहराची स्थापना केली असं
सांगितलं जातं. टॉलेमीने आपल्या ग्रंथात सिंधु नदीच्या खोर्यातून
पाटलीपुत्र (पटना) शहराकडे जाणार्या मार्गावर असलेल्या लाबोकला या शहराचं
वर्णन केलं होतं. इरावती नदीच्या काठी हे शहर वसलेलं होतं. ही इरावती नदी
म्हणजेच आजची रावी नदी. या शहराने अनेक स्थित्यंतरं पाहीली होती, अनुभवली
होती. मुघलांच्या काळात शहराची चांगली भरभराट झाली. अनेक ऐतिहासिक घटनांचं
हे शहर साक्षीदार होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केल्याची खबर औरंगजेबाला इथेच मिळाली होती!
सायमन कमिशनला काळे झेंडे दाखवताना लाला लाजपतराय इथेच लाठीहल्ल्यात जखमी झाले होत!
इथेच भगतसिंग आणि राजगुरुंनी साँडर्सला गोळ्या घातल्या होत्या!
इथल्या तुरुंगातच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव मातृभूमीसाठी हसत हसत फासावर गेले होते.
सिरील रॅडक्लीफ यांच्य सीमा-समितीपुढे अमृतसर आणि लाहोर या दोन्ही शहरांचा समावेश हिंदुस्तानात करावा का पाकीस्तानात असा यक्षप्रश्न उभा ठाकला होता. समितीतील दोन्ही बाजूचे प्रतिनिधी दोन्ही शहरं आपापल्या देशातच आली पाहीजेत यावर ठाम होते! कोणाचीही माघार घेण्याची तयारी नव्हती! अखेर वैतागलेल्या रॅडक्लीफ साहेबानी अमृतसरचा समावेश हिंदुस्तानात केला तर लाहोर पा़कीस्तानला देऊन टाकलं! लाहोरमध्ये ५०% हिंदु आणि शीख होते तर अमृतसरमध्ये ५०% मुसलमान!
आज मात्रं हे शहर उभं पेटलं होतं. वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या एकत्र राहीलेले हिंदू, आणि शीख आज आपली घरंदारं सोडून शहराबाहेरील छावणीच्या आश्रयाला आले होते. जे अद्याप शहरात मागे राहीले होते त्यांना वेचून बाहेर काढलं जात होतं. जबरद्स्तीने धर्मांतर केलं जात होतं! त्यांच्या आया-बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात होते. कारण... देश स्वतंत्र झाला होता! देशाची फाळणी झाली होती!
लाहोरच्या छावणीत येऊन पोहोचताच सर्वांनी प्रथम मिळतील ते तंबू ताब्यात घेतले. चौधरी महेंद्रनाथ, कमलादेवी, सरिता आणि डॉ.सेन - चारुलता यांनी एका तंबूत आश्रय घेतला. केशवराव, आदित्य. रजनी आणि सिन्हा पती-पत्नी दुसर्या तंबूत स्थिरावले. गुरकीरत, जसवीर, सतनाम आणि रुक्सानाबानू, सुखदेव, चंदा आणि प्रिती यांनी तिसरा तंबू ताब्यात घेतला.
गुजरानवाला शहर आता पंचेचाळीस मैल मागे राहीलं होतं. पुन्हा त्याचं आयुष्यात कधीही दर्शन होणार नव्हतं. तिथे मागे राहीलेलं घरदार, मित्रंमंडळी, इथपर्यंत पोहोचताना गमावलेले आप्तेष्ट पुन्ह कधीही दिसणार नव्हते. इथून हिंदुस्तानची सीमा पंधरा-सोळा मैलांवर होती. जास्तीत जास्त दोन किंवा तीन दिवसाचा प्रवास. परंतु तत्पूर्वी लाहोरच्या छावणीत काही दिवस काढावे लागणार होते.
लाहोरच्या छावणीत आल्यावर दुसर्या दिवशी रात्री जेवण आटपून आदित्य आणि प्रा. सिन्हा पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडले होते. दिवसभर नुस्रतं बसून राहून दोघांनाही कंटाळा आला होता. त्यांच्या तंबूपासून काही अंतरावरच छावणीचं कुंपण होतं. त्याच्या पलीकडे झाडी पसरलेली होती. या कुंपणापाशीच एक सैनिक दक्षपणे पाहरा करत उभा होता. आदित्यने त्याला लगेच ओळखलं. गुजरानवाला इथून निघाल्यापासून चौधरींच्या तुकडीच्या संरक्षणासाठी नेमणूक झालेल्यांपैकीच तो एक सैनिक होता. या दोघांना आपल्या दिशेने येताना पाहून त्यालाही बरंच वाटलं. शेवटी तो देखील माणूसच! कोणीतरी गप्पा मारायला मिळाल्यामुळे त्याला बरं वाटलं. लष्करी सैनिकांना अनेक बातम्या असतात याची प्रा. सिन्हांना कल्पना होतीच!
"काय सुभेदार, कसं काय चाललं आहे?" आदित्यने त्याला विचारलं.
"रोजचंच पाहर्याचं काम भैय्या!" सुभेदार लखनसिंग उत्तरला, "आज
एक भयंकर बातमी ऐकली! लाहोर स्टेशनवर गुंडांनी सुमारे चार-साडेचारशे हिंदु
आणि शीखांची सुर्यांनी भोसकून हत्या केली! ते लोक याला जिहाद - धर्मयुद्ध
म्हणतात!"
"धर्मयुद्ध? हे कसलं धर्मयुद्ध?" आदित्यचा स्वर चढला.
"हे
तर काहीच नाही. गेल्या आठवड्यात चार-पाच दिवस या लाहोर शहरात सूर्यदर्शनच
झालं नाही! शहरातल्या काना-कोपर्यातली घरं, मुहल्ले पेटवले गेले. त्याचा
धूर आकाशात इतका पसरला होता, की सूर्यप्रकाश असा दिसलाच नाही!"
"म्हणजेच हिंदूंचे आणि शीखांचे मोहल्ले पेटवले होते असंच ना?"
"तुम्ही म्हणता ते खरं आहे भैय्या!"
"आंणि पोलीस? ते काय करत होते? का ते पण गुंडांना सामील होते?"
"पोलीस
पाकीस्तानी! ते पण गुंडांच्याच बाजूचे! ते कशाला हिंदूंची घरं वाचवतील हो?
प्रेतं स्मशानात नेण्यासाठी रिलीफ ट्रक पाठवले जात होते. अर्धा ट्रक भरुन
प्रेतं होईपर्यंत ट्रक स्मशानात नेऊ नयेत असं पोलीसांनी फर्मान काढलं होतं
म्हणे!"
"अमानुषतेचा कळस आहे हा!" प्रा. सिन्हा विषादाने उत्तरले.
दुसर्या दिवशी रात्री आदित्य आणि प्रा. सिन्हा पुन्हा सुभेदार लखनसिंगपाशी आले. आपलं पहार्याचं काम सांभाळत लखनसिंग गप्पा मारु लागला.
"आज कळलेली बातमी तर फार भयंकर आहे! रावळपिंडी जिल्ह्यातील अनेक
गावातल्या गुंडांनी एकत्र येऊन टोळ्या बनवल्या होत्या. गावागावात जाऊन हे
गुंड लुटालूट - जाळपोळ करत होते. हल्ला करण्यापूर्वी ते मोठा ओरडाआरडा करत
घोषणा देत गावावर चाल करुन येत. अशाच एका गावात गुंडांची एक टोळी पोहोचली.
गावातली वस्ती बहुसंख्य शीखांची. आपल्या गावावर चाल करुन येणार्या
गुंडांचा हैदोस त्यांच्या कानावर पडताच त्यांनी सर्व स्त्रिया तसेच मुलांना
एका घरात एकत्रं येण्याची सूचना दिली. सर्वजण एकत्र येताच पुढे जे झालं ते
फार भयंकर होतं!"
"काय झालं सुभेदार?" प्रा सिन्हांनी हलकेच विचारलं.
"सर्व
स्त्रिया आणि मुलं तिथे जमताच त्यांनी बाहेरून घराला कडी घातली आणि ते घर
पेटवून दिलं! आपल्या हाताने आपल्या बायका-मुलांचा होम केला! मग कृपाण हातात
घेऊन ते गुंडांशी मुकाबला करण्यास बाहेर पडले!"
"स्त्रिया आणि मुलांची विटंबना टाळण्यासाठीच त्यांनी हे पाऊल उचललं असणार!"
"अर्थातच!" लखनसिंग उत्तरला, "जोहार! आमच्या राजस्थानच्या इतिहासात असे अनेक जोहार झाले आहेत!"
आपल्या तंबूकडे परत येताना प्रा. सिन्हा म्हणाले,
"फाळणीचे परिणाम काय होतील याचा विचार न करता फाळणीला मान्यता देणार्या आपल्या पुढार्यांना या हकीकती कळायला हव्यात!"
"खरं आहे सर! पण हे सारं फक्तं इथे पाकीस्तानातच होत असेल? का हिंदुस्तानातही?"
"मला
खात्री आहे, हिंदुस्तानात जिथे मुसलमान अल्पसंख्यांक आहेत तिथे त्यांनाही
याच अत्याचारांना सामोरं जावं लागत असावं! शेवटी ही प्रवृत्ती आहे
आदित्यबाबू! इतिहासातही धर्मप्रसाराला तलवारीची जोड दिलेली आढळून येईल.
पोर्तुगीजांनी व्यापाराच्या मिषाने हिंदुस्तानात येऊन धर्मप्रसारच केला.
ख्रिश्चन आणि मुस्लीमांची धर्मयुद्ध - क्रूसेड्स इतिहासात कुप्रसिद्धच
आहेत!"
लाहोरच्या छावणीतून पुढे निघण्यास सर्वजण आता आतूर झाले होते. कधी एकदा हिंदुस्तानात पोहोचतो असं प्रत्येकाला झालं होतं. परंतु पाकीस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी काही ना काही सबबी सांगू लागले. अद्याप मार्गावरची परिस्थिती निवळलेली नाही, हिंदुस्तान सरकारशी वाटाघाटी सुरु आहेत, तिकडून येणार्या निर्वासितांचा जथा आल्याशिवाय तुम्हाला निघता येणार नाही अशा एक ना दोन सबबी ते सांगू लागले. मेजर चौहान रोज पाकीस्तानी अधिकार्यांकडे विचारणा करत होते, परंतु त्यांना धड उत्तर मिळत नव्हते.
लाहोर शहराबाहेरच्या छावणीत हजारो हिंदू आणि शीख निर्वासित आलेले पाहताच शहरातील गुंड-पुंडांचं माथं भडकलं. एवढ्या मोठ्या संख्येने असलेले काफीर त्यांच्या डोळ्यात सलत होते. त्यांच्या वखवखलेल्या नजरा हिंदू आणि शी़ख स्त्रियांना न्याहाळत होत्या. या बायका आम्हाला मिळायला हव्यात! पण बाकीची ही घाण आमच्या शहरात कशासाठी आली आहे? पाकीस्तानात यांचं काय काम? यांचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहीजे! कायमचा! द्वेषभावनेनं पुन्हा उचल खाल्ली! एक भयंकर कट शिजू लागला!
आणि ती रात्रं उगवली!
अमावस्येची रात्रं!
कृष्णकृत्त्यांसाठी अगदी अनुकूल अशी!
प्रा. सिन्हांची प्रकृती बरी नसल्याने आदित्य एकटाच बाहेर पडला. नेहमीच्या जागी सुभेदार लखनसिंग ऐवजी कोणीतरी वेगळाच सैनिक उभा असल्याचं त्याला आढळलं. आदित्यशी संभाषणात त्याला फारसा रस नसावा. आता काय करावं? आदित्यपुढे प्रश्न उभा राहीला. परतून तंबूत झोपी जावं का एक अशीच चक्कर मारावी? जेमतेम साडेआठ वाजले होते. इतक्यात झोप येणं शक्यंच नव्हतं. तो द्विधा मनस्थितीत असतानाच त्याच्या कानावर हाक आली,
"आदित्य!" तो मागे वळला. सरिता त्याच्या पाठीशी येऊन उभी होती.
"तू?"
"तुमच्या तंबूत गेले होते! रजनीकडून तू इथे असशील कळलं, म्हणून इथे आले!"
आदित्य क्षणभर काहीच बोलला नाही, मग म्हणाला,
"चल थोडं फिरुन येऊ!"
"चल!"
दोघं चालत छावणीच्या दुसर्या टोकाकडे निघाले. आज कितीतरी दिवसांनी दोघांना एकमेकांशी निवांत बोलायला वेळ मिळाला होता. छावणीच्या या बाजूला तारेचं कुंपण नव्हतं केवळ दगडी कठडा होता. पलीकडे सुमारे अर्ध्या मैल अंतरावर दाट झाडी होती. त्याच्यापलीकडे रावी नदीचं पात्रं पसरलेलं होतं. आदित्य आणि सरिता या कुंपणाच्या दगडी भींतीवर बसले. छावणीतील दिव्यांचा प्रकाश इथे फारसा पोहोचत नव्हता.
"आपलं पुढे काय होईल आदित्य?" सरितेने विचारलं.
"पुढे? म्हणजे नेमकं कधी?"
"पुढे म्हणजे... हिंदुस्तानात गेल्यावर!"
"खरं
सांगू? मी अद्याप पुढचा काहीही विचार केलेला नाही! अद्याप आपण पाकीस्तानात
आहोत. इथे लाहोरच्या या छावणीत. इथून हिंदुस्तान पंधरा-वीस मैलांवर.
गुजरानवाला सोडून इथे येताना आपले जे काही हाल झाले, ते पाहता इतका पुढचा
विचार न करणंच श्रेयस्कर!"
"असं कसं म्हणतोस तू? समजा पुढे
कोणतंही विघ्नं न येता आपण हिंदुस्तानात पोहोचलो तर मग पुढे काय करायचं
याचा विचार करायला नको? तू, रजनी आणि चाचाजी मुंबईला जाणार. आम्ही कुठे जाऊ
काही ठिकाणा नाही. मग आपली पुन्हा भेट...." सरितेला त्या विचाराने पुढे बोलवेना.
"असा काही विचार करु नकोस!" तिला जवळ घेत तो म्हणाला, "आपण हिंदुस्तानात पोहोचलो की मी नानांना चाचाजींकडे शब्द टाकण्यास सागेन! मला खात्री आहे चाचाजी नाही म्ह्णणार नाहीत!"
सरिता काहीच बोलली नाही. त्याच्या खांद्यावर मस्तक टेकून तिने डोळे मिटले. कितीतरी वेळ दोघं नि:शब्दपणे तसेच बसून होते. बर्याच वेळाने तिने डोळे उघडले
"चल, परत जाऊयात!" ती म्हणाली. दोघं उठले.
त्याचवेळी -
छावणीच्या पुढच्या बाजूने - दक्षिणेच्या दिशेने बंदूकीच्या गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकू आले!
पाठोपाठ घोषणा!
"नारा ए तकब्बीर!"
"अल्ला हो अकबर!"
काय होतं आहे हे सर्वांना एका क्षणात कळून चुकलं!
छावणीवर हल्ला झाला होता!
आदित्य आणि सरिता आपल्या तंबूच्या दिशेने धावत सुटले. काही क्षणातच छावणीच्या पूर्व - पश्चिम दिशेलाही घोषणा ऐकू येऊ लागल्या! घासलेटच्या दिव्यांच्या प्रकाशात तारेच्या कुंपणापलीकडे छावणीत घुसण्याच्या प्रयत्नात असलेले शस्त्रसज्ज गुंड दिसून येताच सर्वांची एकच धावपळ उडाली! छावणी तीन बाजूंनी वेढण्यात आली होती!
हा प्रकार ध्यानात येताच आदित्य गपकन थांबला. सरितेसह तो पुन्हा त्या दगडी भिंतीपाशी आला. त्या बाजूला सुदैवाने हल्लेखोरांचा मागमूस नव्हता. तिथे पोहोचल्यावर त्याने मागे नजर टाकली. छावणीत प्रचंड गोंधळ माजला होता. कोणत्याही क्षणी हल्लेखोरांची नजर त्यांच्यावर पडण्याची शक्यता होती. 'तसं झालं तर संपलंच सगळं!' आदित्यच्या मनात आलं, 'आपलं काय व्हायचं ते होईल, पण सरिता... तिच्यावर ते अनन्वीत अत्याचार करतील! नाही! काय वाटेल ते झालं तरी ती गुंडांच्या हातात पडता कामा नये!'
आदित्यने त्या दगडी भिंतीवर चढून तिला वर ओढून घेतलं, दोघांनी बाहेर उडी टाकली आणि समोर असलेल्या झाडीच्या दिशेने धाव घेतली.
छावणीत हलकल्लोळ माजला होता. मुरीदकेची पुनरावृत्ती! सर्वजण प्राणभयाने सैरावैरा पळत होते. आबालवृद्धांची बेसुमार कत्तल सुरु होती. मेजरसाहेब आणि त्यांचे सैनिक जमेल तसा हल्लेखोरांना प्रतिकार करत होते. परंतु हल्लेखोरांची संख्या बरीच जास्तं होती. त्यातच एका हिंदुस्तानी लेफ्टनंटला छावणीच्या फाटकापाशी पाकीस्तान लष्कराची जीप नजरेस पडली! याचा अर्थ उघड होता. हल्लेखोरांना पाकीस्तानी लष्करी अधिकार्यांची फूस होती! याच कारणासाठी त्यांनी छावणी सोडून हिंदुस्तानकडे कूच करण्यापासून जथा रोखून धरला होता!
"मारो! काटो!"
"एक भी बचना नही चाहीए!"
"उठा लो!"
"या अली!"
आदित्य आणि सरिता समोरच्या जंगलात घुसले. शक्यं तितक्या वेगाने धावत दोघं आत-आत जात होते. छावणीपासून जमेल तेवढं दूर जाणं हे एकच लक्ष्यं त्यांच्यापुढे होतं. दाट झाडीत सुमारे अर्धा-पाऊण मैल आत शिरल्यावर मात्रं सरितेला पुढे धावणं अशक्यं झालं. तिने आदित्यला थांबवलं. दोघं तिथेच खाली बसले.
"आता काय होणार?" तिने थरथरत विचारलं.
"बघू! जे होईल ते होईल!"
"बाकी सर्वजण कुठे असतील? पिताजी? मां? चाचाजी? रजनी? कसे असतील? ठीक असतील ना? की...."
"आता कसलाही विचार करु नकोस! त्याचा काही उपयोग नाही! परत गेल्यावर बघू काय ते!"
कोणतीही हालचाल न करता दोघे तिथे बसून राहीले सरिता त्याला घट्ट बिलगली होती. तो तिला धीर देत, थोपटत राहीला. रात्रीची वेळ आणि कराव्या लागलेल्या या धावपळीमुळे तिला चांगलाच थकवा जाणवत होता. त्याच्या खांद्यावर मान टाकून तिने डोळे मिटले. काही वेळातच तिला झोप लागली. आदित्य सावधपणे आजूबाजूचा कानोसा घेत होता. गार वार्यामुळे त्याच्याही डोळ्यांवर पेंग येत होती. तरीही तो प्रयत्नपूर्वक तो जागं राहण्याचा प्रयत्न करत होता. परंतु अखेर तो देखील झोपेच्या अधीन झाला.
किती तास दोघं झोपले होते कोणास ठाऊक! मध्येच कधीतरी सरितेला जाग आली. क्षणभर आपण कुठे आहोत हे तिला कळेचना! मग तिला एकेक घटना आठवू लागल्या. आपल्या छावणीवर हल्ला झाला आणि आपण आदित्यबरोबर इथे आलो हे तिला आठवलं. तिने आदित्यकडे नजर टाकली. तो गाढ झोपेत होता. क्षणभर आपण पुन्हा झोपावं असा तिला मोह झाला. तिने डोळे मिटलेदेखील, पण दुसर्याच क्षणी तिची झोप खाडकन उतरली. आपण इथे आहोत, पण मां आणि पिताजींच काय? हा विचार मनात येताच तिने आदित्यला हलवून जागं केलं. तो काही क्षणांत उठून बसला. काही वेळाने अंधाराला नजर सरावल्यावर दोघं छावणीच्या दिशेने निघाले.
"आदित्य, अद्याप ते लोक छावणीत असले तर?" सरितेने विचारलं. तिच्या आवाजात भीती होती.
"काही कल्पना नाही! चल!"
दोघं जंगलातून मार्ग काढत छावणीच्या दिशेने निघाले. रात्री आपण नेमक्या कोणत्या दिशेने आलो होतो हे दोघांना समजेना. बराच वेळ दोघं चालत राहीले, पण छावणी काही दिसेना. काही वेळाने दोघं जंगलातून बाहेर पडले आणि पाहतच राहीले...
समोर रावी संथपणे वाहत होती!
आपण वाट चुकल्याचं दोघांच्या ध्यानात आलं. छावणीच्या दिथेने जाण्याऐवजी ते बरोबर विरुद्ध दिशेला नदीकिनार्याच्या दिशेला आले होते.
काठावर जाऊन दोघांनी तोंडावर थंडगार पाण्याचे हबकारे मारले. दोघांनाही बरं वाटलं. पोटभर पाणी पिऊन दोघं काही वेळ तिथेच बसून राहीले. छावणीतील परिस्थिती काय असेल याची काहीही कल्पना करता येत नव्हती. कदाचित सर्वजण सुखरुप असतील.. कदाचित कोणीच वाचलं नसेल.. जे काही आपल्या नशिबात असेल ते होईल. सुदैवाने आपण इकडे आल्यामुळे अद्यापतरी वाचलो आहोत!
दोघं उठले आणि नदीकडे पाठ करुन पुन्हा जंगलात शिरले. मैल-दीड मैल जंगल तुडवल्यावर दोघं बाहेर पडले तो समोरच छावणी दिसत होती. आदित्यचा हात आपसूकच कंबरेकडे गेला. वकारने दिलेला तो सुरा सुदैवाने या धावपळीही कुठे पडला नव्हता. त्याने तो उपसून हातात घेतला. सरितेचा हात धरुन तो सावधपणे पावलं टाकत छावणीकडे निघाला.
काही वेळातच दोघं त्या दगडी भिंतीपाशी आले. एव्हाना पूर्वेला तांबडं फुटायला सुरवात झाली होती. आपला कार्यभाग साधून हल्लेखोर रात्रीच निघून गेले असावेत. छावणीत सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. पुरूष, स्त्रिया, लहान मुलांचे मृतदेह अस्ताव्यस्त पडलेले होते. जवळपास प्रत्येक तंबूतून आक्रोश कानावर येत होता. काही स्त्रिया वेड्यापिशा झाल्यागत छावणीभर हिंडत होत्या. रात्रीच्या अफरा-तफरीत हल्लेखोरांनी त्यांच्यावर सामुहीक बलात्कार केला होता!
आदित्य आणि सरिता आपल्या तंबूपाशी आले. कमलादेवी तंबूच्या एका कोपर्यात हुंदके देत बसल्या होत्या. चारु त्यांचं सांत्वन करत होती. रुक्सानाबानूची नात प्रिती चित्राजवळ होती.
"चाचीजी! सरिता आ गई!" आदित्य आणि सरितेला पाहून चारु उद्गारली.
कमलादेवीं तीरासारख्या उठल्या आणि सरितेकडे धावल्या. सरितेला उराशी कवटाळून त्या पुन्हा रडू लागल्या, पण आता हे अश्रू आनंदाचे होते. मुलगा तर गमावलाच होता. निदान मुलगी तरी सुखरुप हाती लागली होती! सरितेने आईला सावरुन खाली बसवलं. ती आणि आदित्य सुखरुप परत आल्याने चारू आणि चित्रालाही हायसं वाटलं.
"चारुदिदी, रजनी?" आदित्यने चारुला विचारलं.
"रजनी ठीक आहे! ती, चाचाजी, सिन्हासाहेब आणि रुक्सानाचाची मेजरसाहेबांकडे गेली आहेत!"
"मी जातो तिकडे!"
आदित्य बाहेर पडला. सरिता त्याच्यामागे धावली. दोघं मेजरसाहेबांच्या तंबूपाशी पोहोचले. चौधरी महेंद्रनाथ, रजनी आणि प्रा. सिन्हा मेजरसाहेबांच्या मेजाशी उभे होते. रुक्सानाबानू मात्रं बाहेरच जमिनीवर बसून हुंदके देत होती. सरितेला पाहताच तर तिचा आकांत अधिकच वाढला.
आदित्यशी नजरानजर होताच रजनीने बाहेर धाव घेतली. तिला सावरत, हलकेच तिच्या पाठीवरुन हात फिरवत तो तिला शांत करु लागला. मात्रं रजनीचं हुंदके देणं सुरुच होतं. चौधरी आणि प्रा. सिन्हाही धावत बाहेर आले. सरिता सुखरुप परतल्याचं पाहून चौधरींचा आनंद गगनात मावेना! प्रा. सिन्हांनाही दोघं सुखरुप असल्याचं पाहून बरं वाटलं.
"दादा! नाना..." रजनीला रडू आवरत नव्हतं.
"नाना? काय झालं रजनी? नाना कुठे आहेत? चाचाजी? सिन्हासर?"
"आदित्य बेटा!" चौधरी त्याच्या खांद्यावर हात ठेवत उद्गारले, "मन घट्ट कर! केशवजी..."
आदित्य जागच्या जागी पुतळ्यासारखा स्तब्धं झाला. रजनी त्याच्या गळ्यात पडून रडत होती. सरिता सुन्न झाली. रजनीला सावरण्याचंही तिला भान राहीलं नव्हतं. चौधरी आदित्यकडे पाहत होते. त्याला जबरदस्तं मानसिक धक्का बसल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. पुढे होत त्यांनी त्याचे दोन्ही खांदे पकडून गदागदा हलवलं. आदित्य भानावर आला. त्याच्या डोळ्यांतून अश्रूधार लागली.
"आदित्य वेटा! आपले भोग आहेत हे! भोगलेच पाहीजेत! त्या शिवाय सुटका नाही! केशवजींची वेळ आली! ते गेले! रजनीला आता तुझ्याविना कोणीही नाही. दोघांनी सांभाळा स्वत:ला!"
आदित्यने रजनीकडे पाहिलं. तिची फार केविलवाणी अवस्था झाली होती. त्याने रजनीला कसंबसं शांत केलं आणि सरितेबरोबर तिला तंबूकडे परत पाठवलं. त्याचवेळी त्याची नजर रुक्सानाबानूकडे गेली. ती अद्यापही रडत होती.
"चाचाजी, काल रात्री नेमकं झालं तरी काय?"
"हमला झाला तेव्हा मागच्या खेपेप्रमाणेच आम्ही मेजरसाहेबांकडे धावलो," महेंद्रनाथ सांगू लागले, "केशवजी
आमच्याबरोबरच होते. डॉक्टर आणि चारुपण आमच्याबरोबर तिकडे आले. गुरकिरत,
जसवीर आणि सतनामही तिकडेच होते. सिन्हासाहेब, चित्राभाभी आणि रजनीचा मात्रं
काही पत्ता नव्हता. तू आणि सरितादेखील गायब होतात. केशवजींना तुझी आणि
रजनीची सतत काळजी लागली होती. 'माझी पोरं बाहेर संकटात असताना मी इथे काय
करु? त्यांना काही झालं तर मी कोणासाठी जगायचं?' असं त्यांच सतत चाललेलं
होतं. तुम्हाला शोधायला ते त्या झटापटीत बाहेर पडले! आम्ही सगळ्यांनी
त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही!"
आदित्यचे डोळे पाण्याने भरुन आले, पण आता व्हायचं ते होऊन गेलं होतं. तो आणि रजनी दोघंही सुखरुप बचावले होते, परंतु केशवरावांनाच मृत्यूने गाठलं होतं.
"आम्हीदेखील सुदैवानेच बचावलो" प्रा. सिन्हा आपली हकीकत सांगू लागले, "मी, चित्रा आणि रजनी मेजरसाहेबांच्या तंबूकडे निघालो असतानाच हल्लेखोरांची एक टोळी आमच्या मागे लागली. आम्हाला त्यांनी जवळपास गाठलंच होतं, इतक्यात सुखदेव त्यांना आडवा आला! त्याला लाठीचे चार हात येत होते. त्याने काही जणांना लाठीचा प्रसाद दिला, पण तो एकटा किती वेळ लढणार? त्यांनी त्याचा कोथळा काढला. या भानगडीत आमच्याकडे मात्रं त्यांचं दुर्लक्षं झालं. आम्ही नदीच्या बाजूच्या जंगलात पळालो. तिथून आम्हाला छावणीतला गोंधळ दिसत होता. हल्लेखोर निघून गेल्यावर मध्यरात्रीनंतर कधीतरी आम्ही परत आलो!"
आपण आणि सरिता ज्या जंगलात लपलो होतो तिथेच ते तिघं लपल्याचं आदित्यच्या ध्यानात आलं. तेवढ्यात त्याचं रुक्सानाबानूकडे लक्षं गेलं. तिच्या दोन्ही हातापायावर जखमा होत्या. केस अस्ताव्यस्त झाले होते. उर बडवून ती रडत होती. आदित्यचं तिच्याकडे लक्षं गेलेलं पाहूच चौधरीच म्हणाले,
"रुक्सानाबहन तर फारच दुर्दैवी ठरली! चंदाबेटी पाणी आणण्यासाठी नळावर गेली होती. हल्लेखोरांनी तिला उचलली आणि आपल्या घोड्यावर घातली! तिला पळवून नेण्याचा त्यांचा इरादा होता. तिची किंकाळी ऐकून रुक्सानाबानू तिकडे धावली. ती त्या हल्लेखोरांच्या विनवण्या करु लागली. माझ्या सुनेला सोडा! हवं तर मला घेऊन चला! मी तुमच्याबरोबर येते! माझं काय ते करा. पण माझ्या सुनेला सोडा! परंतु त्या हल्लेखोरांनी तिला दोन लाथा घातल्या आणि चंदाला पळवून नेलं! एवढ्यावरच भागलं नाही! हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीमुळे ती बेशुद्ध होऊन पडली. शुद्धीवर आली तेव्हा आठ-दहा गुंडांनी ..." चौधरींना कसं बोलावं समजेना,
आदित्य काय ते समजून चुकला! रुक्सानाबानूवर सामुहीक बलात्कार झाला होता! हे ऐकून तर तो सुन्नच झाला. पन्नाशी ओलांडलेली ती वृद्धा, तिच्यावर अत्याचार करताना सैतानाला सुद्धा लाज वाटली असती! पण इथे तर माणसांनी... छे, माणसं कसली, गिधाडंच ती! धर्मयुद्धाच्या नावाखाली हा नंगानाच मांडला होता!
छावणीवर हल्ला करणार्यांना पाकीस्तानी लष्कराची फूस होती हे उघड होतं. पाकीस्तान लष्कराच्या जीपमधूनच काही हल्लेखोर आलेले हिंदुस्तानी सैनिकांनी पाहीले होते. पाकीस्तानी सैनिकही हल्लेखोरांबरोबर छावणीत घुसले असावेत याबद्दल मेजर चौहानना खात्री झाली होती. हल्ल्यानंतर दोन दिवसांनी कर्नल हुसेन इब्राहीम मानभावीपणे छावणीची पाहणी करण्यासाठी आणि जखमींची विचारपूस करण्यासाठी आला होता.
"कर्नलसाहेब, चौकशीचं हे नाटक बस झालं!" संतापाने धुमसत असलेल्या मेजर चौहाननी त्याला सुनावलं, "तुमच्या पाकीस्तान आर्मीचे सैनिकच हल्लेखोरांना सामील होते! ज्यांनी संरक्षण करायचं त्यांनीच निर्वासितांवर शस्त्रं चालवली आणि आता तुम्ही आमच्या दु:खावर डागण्या द्यायला आला आहात?"
"आपका ये इल्जाम बेबुनियाद और बचकाना है मेजर चौहान!" कर्नल इब्राहीम थंडपणे उत्तरला, "हमारी फौज का एक भी सिपाही हमले में शामिल नही था! हम तो उन्हे रोकने की कोशिश कर रहे थे!"
"चुकीचा आरोप?" मेजर चौहान खवळले, "पाकीस्तान लष्कराचे जे सैनिक मला हल्लेखोरात दिसलेत त्यांना मी स्वतः गोळ्या घातल्या आहेत. त्यांची प्रेतं छावणीत पड्ली आहेत! हवं तर बाहेर चला आणि खात्री करुन घ्या!"
"वह पाकीस्तानी सिपाही नही हो सकते मेजर!" कर्नल इब्राहीम पूर्वीच्याच थंडपणे म्हणाला, "हमे शक है की पाकीस्तानी फौज को बदनाम करनेकी ये आपकी साजिश है! आपनेही अपने लोगोंको मारकर उन्हे हमारी फौजके कपडे पहना दिये है! एक बात जहन में रखो मेजर, यह पाकीस्तान है, आपका हिन्दुस्तान नहीं! जो हम चाहेंगे, यहांपर वही होगा! अपने बाकी बचे काफीरोंको लेकर आप अपना रस्ता नांप लो! क्या पता, कल उतने भी बचे या नहीं! जो भी करना है हिंदुस्तान जाकर कर लेना!"
मेजर चौहानांच्या डोळ्यात आग पेटली होती. आता या क्षणी या कर्नल इब्राहीमला गोळ्या घालाव्यात असा त्यांना संताप आला होता. गुजरानवालाचा दिलदार कॅ. वकार सईद कुठे आणि हा हरामखोर कर्नल इब्राहीम कुठे! महत्प्रयासाने त्यांनी आपला राग आवरला. तणतणतच ते बाहेर पडले. आपल्या सर्व अधिकारी आणि सैनिकांना बोलवून त्यांनी दुसर्या दिवशी हिंदुस्तानच्या सीमेकडे निघण्याची तयारी करण्याचा आदेश दिला.
पाकीस्तानी वरिष्ठ लष्करी अधिकारी मैत्रीच्या पोकळ गप्पा मारत होते. 'आम्ही पाकीस्तानातील अल्पसंख्यांकांचं रक्षण करण्यासा बांधील आहोत! हल्लेखोरांना आम्ही शोधून काढू! काही हल्लेखोर आम्ही प़कडले आहेत! त्यांच्याकडे चौकशी चालू आहे! छावणीत जे लोक प्राणाला मुकले आणि जे अत्याचार झाले त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत! अपहरण झालेल्या स्त्रियांचा शोध घेण्यासाठी हिंदुस्तानी लष्कराशी सहकार्य करण्यास आम्ही आनंदाने तयार आहोत! आम्हाला भारताशी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध राखायचे आहेत!'
पण त्यांच्या उक्तीत आणि कृतीत जमिन-आसमानाचा फरक होता. ज्या हल्लेखोरांना अटक करण्यात आलं होतं, ते अगदीच मामुली गुंड होते. खरे गुन्हेगार आणि त्यांना सामिल असणारे कर्नल इब्राहीमसारखे लोक मोकाटच होते.
आदित्यने केशवरावांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. चौधरी महेंद्रनाथ, प्रा. सिन्हा आणि डॉ. सेन यांनी त्याला शक्य ती सर्व मदत केली. त्यांच्याबरोबरच, त्याच चितेवर सुखदेवचंही दहन झालं! यथा काष्ठं चं काष्ठं च!
छावणीत पुन्हा सामानाची बांधाबांध सुरु झाली. केशवरावांच्या आठवणींनी रजनीचे डोळे वारंवार भरुन येत होते. आदित्यलाही हा आघात पचवणं असह्यं झालं होतं, परंतु रजनीची जबाबदारी आता फक्त आपल्यावरच आहे या जाणिवेने तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. रुक्सानाबानूच्या डोळ्यातील पाणी आटत नव्हतं. द्त्तक घेतलेला असला तरी सुखदेववर तिने सख्ख्या मुलापेक्षा जास्तं प्रेम केलं होतं. चंदा तर सून नसून तिची मुलगीच होती जणू! चंदाच्या आठवणीने तर ती कासाविस होत होती. तिच्या नशिबी कोणते भोग होते खुदा जाने! दोघांची मुलगी प्रिती तेवढी मागे राहीली होती. आपली आजी सतत का रडते आहे हे तिला कळत नव्हतं.
"दादी, तुम क्यों रो रही हो? मां कहां गई? बाबा कब आएंगे?"
चिमुकल्या प्रितीच्या या प्रश्नांना काय उत्तर देणार? तिचे निरागस बोल ऐकून रुक्सानाबानूच्या हृदयात कालवाकालव झाली. प्रितीला पोटाशी धरुन ति नि:शब्द पणे काही वेळ बसून राहीली. त्या निरागस जीवासाठी तिला जगावंच लागणार होतं!
दुसर्या दिवशी सकाळी जथा पुन्हा एकदा पुढच्या मार्गाला लागला.
गेलेल्यांच्या स्मृती मनाच्या एका कोपर्यात ठेवत, उराशी वेदना बाळगत पुढचा प्रवास सुरु झाला!