Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण चौथे

१८३६ मध्ये पीटर वॉरन डीसने नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर प्रस्थान ठेवलं. डीसच्या मोहीमेत एकूण १२ जणांचा समावेश होता. मॅकेंझी नदीच्या मुखापासून पश्चिमेला पॉईंट बॅरो आणि पूर्वेला हडसनच्या उपसागरापर्यंत किनार्‍याने प्रवास करण्याची डीसची योजना होती. फोर्ट चिपेव्यॅन गाठून त्यांनी हिवाळ्यासाठी मुक्काम केला.

१ जून १८३७ ला डीसने फोर्ट चिपेव्यॅन सोडलं आणि महिन्याभरात ग्रेट बेअर सरोवर गाठलं. तिथून निघाल्यावर ९ जुलैला त्यांनी मॅकेंझी नदीच्या मुखाने आर्क्टीकचा किनारा गाठला. तिथून पश्चिमेला वाटचाल करत त्यांनी जॉन फ्रँकलीनचा टर्न अगेन पॉईंट ओलांडला, परंतु पॉईंट बॅरोच्या पूर्वेला ५० मैलांवर गोठलेल्या बर्फामुळे त्यांना बोटीने पुढे जाणं अशक्यं झालं होतं. बोट तिथेच सोडून पायपीट करत त्यांनी ४ ऑगस्टला पॉईंट बॅरो गाठलं. २५ सप्टेंबरला ग्रेट बेअर सरोवराच्या पूर्व टोकाला डीस नदीच्या मुखाशी असलेल्या फोर्ट कॉन्फीडन्समध्ये त्यांनी हिवाळ्यासाठी मुक्काम ठोकला.

१८३८ च्या सुरवातीला थॉमस सिम्प्सन कॉपरमाईन नदीच्या शोधात गेला होता. उन्हाळा सुरु झाल्यावर त्यांनी कॉपरमाईन नदी गाठली. कॉपरमाईन नदीतून प्रवास करत त्यांनी आर्क्टीकचा किनारा गाठला. परंतु अद्यापही आर्क्टीकचं पाणी गोठलेलंच होतं. दोन आठवड्यांनी पुरेसा बर्फ मोकळा झाल्यावर त्यांनी पूर्वेकडे प्रस्थान ठेवलं. २० ऑगस्टला ते फ्रँकलीनच्या पूर्वेकडील पॉईंटला पोहोचले. डीस मागे थांबला आणि सिम्प्सनने पुढे पायपीट सुरु केली. १०० मैलांची वाटचाल केल्यावर सिंप्सनने अलेक्झांडर पॉईंट गाठला. उत्तरेला त्याला व्हिक्टोरीया लँड दृष्टीस पडली. मागे फिरुन त्याने डीसला गाठलं आणि कॉपरमाईन नदीतून वाट काढत ते हिवाळ्यासाठी फोर्ट कॉन्फीडन्सला परतले.

१८३९ च्या उन्हाळ्यात त्यांनी पुन्हा पूर्वेची वाट पकडली. अलेक्झांडर पॉईंट मागे टाकून त्यांनी डीसची सामुद्रधुनी ओलांडली आणि क्वीन मॉड आखातातून मार्ग काढत त्यांनी सिंप्सन सामुद्रधुनी गाठली. या सामुद्र्धुनीतून प्रवास करत १६ ऑगस्टला डीस आणि थॉमस सिंप्सन चँट्री खाडीत असलेल्या माँट्रीयाल बेटावर पोहोचले. १८३३-३५ च्या मोहीमेत जॉर्ज बेकने ग्रेट फिश नदीतून हे बेट गाठलं होतं. फिशने मागे ठेवलेली बरीच साधनसामग्री डीस आणि सिम्प्सनला इथे आढळून आली. मागे फिरुन त्यांनी फोर्ट कॉन्फीडन्स गाठला.

नॉर्थवेस्ट पॅसेज अद्यापही अजिंक्य होता!

सर जॉन बॅरो हा ब्रिटीश नौदलाचा एक द्रष्टा अधिकारी होता. इंग्रजांच्या नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याच्या बहुतेक सर्व मोहीमा याच्याच प्रेरणेने आखण्यात आलेल्या होत्या. जॉन रॉस, विल्यम पेरी, जॉन फ्रँकलीन, फ्रेड्रीक बीची, जॉर्ज बेक, पीटर डीस यांच्या सर्व मोहीमा बॅरोच्याच सुपीक मेंदूतून बाहेर पडल्या होत्या. या सर्व मोहीमांचं फलीत म्हणजे आर्क्टीक महासागराचा तीनशे मैलांचा भाग वगळता नॉर्थवेस्ट पॅसेजच्या बहुतेक सर्व भागाचा शोध लागला होता. कॅनडाच्या उत्तर किनार्‍याने असलेला हा तीनशे मैलांचा पट्टाच तेवढा अज्ञात होता.

डीसच्या मोहीमेनंतर बॅरोने या तीनशे मैलांच्या किनार्‍याच्या संशोधनासाठी नवीन मोहीम आखली. लँकेस्टर खाडीतून हडसनचा उपसागर पार करुन कॅनडाच्या उत्तर किनार्‍याने आर्क्टीक मधून पॉईंट बॅरो गाठण्याची बॅरोची योजना होती.

या मोहीमेचा प्रमुख म्हणून बॅरोने पेरीची निवड केली होती. परंतु चार मोहीमांत भाग घेतल्यावर पुन्हा आर्क्टीकमध्ये जाण्यास पेरीने नकार दिला. जेम्स क्लार्क रॉसनेही आर्क्टीकमध्ये जाण्यास नकार दिला. जेम्स फिट्झजेम्सला अनुभवाची कमतरता असल्याने नौदलाने त्याच्या नावावर काट मारली. बॅरोने जॉर्ज बेकचाही विचार केला, परंतु बेकच्या सडेतोड स्वभावाला मुरड घालणं अशक्यंच होतं. फ्रान्सिस क्रोझीयरकडे नेतृत्व सोपवण्यास तो जन्माने आयरीश असल्याने नौदलाने नकार दिला! अखेर बॅरोपुढे एकच पर्याय शिल्लक राहीला.

जॉन फ्रँकलीन!

या मोहीमेसाठी टेरर आणि इरेबस ही दोन जहाजं नेण्यात येणार होती. जॉर्ज बेकच्या १८३६-३७ च्या मोहीमेत टेरर जवळपास बुडण्याच्या स्थितीत आयर्लंडच्या किनार्‍यावर परतलं होतं. त्यानंतर या जहाजाची पूर्ण दुरुस्ती करण्यात आली. इरेबसच्या जोडीने टेरर जेम्स क्लार्क रॉसच्या १८४०-४३ च्या मोहीमेत अंटार्क्टीकाची यशस्वी सफर करुन परतलं होतं.

नॉर्थवेस्टच्या सफरीच्या दृष्टीने या दोन्ही जहाजांत अनेक नवीन सुधारणा करण्यात आल्या. नेहमीच्या इंजिनांवर अवलंबून न राहता जास्त क्षमतेची रेल्वेची इंजिने दोन्ही जहाजांमध्ये बसवण्यात आली! इरेबसचं इंजिन ग्रीनविच रेल्वेकडून तर टेररचं इंजिन लंडन-बर्मिंगहॅम रेल्वेकडून घेण्यात आलं होतं! जहाजाच्या पुढच्या भागात लोखंडी पट्ट्या बसवण्यात आल्या. बर्फावर आदळण्यापासून वाचण्यासाठी जहाजाचे प्रोपेलर्स आतमध्ये ओढून घेण्याची व्यवस्था करण्यात आली. जहाजावरील लायब्ररीत सुमारे हजारेक पुस्तकं आणि संदर्भ ग्रंथ होते! तीन वर्ष पुरेल इतका हवाबंद अन्नाचा साठा जहाजांवर चढवण्यात आला होता.

इरेबसचा कॅप्टन म्हणून फ्रिट्झजेम्सची नेमणूक करण्यात आली. टेररचा कॅप्टन म्हणून फ्रान्सिस क्रोझीयरला निवडण्यात आलं. दोघांवर प्रमुख म्हणून अर्थातच जॉन फ्रँकलीन होता. त्यांच्याव्यतिरिक्त आणखीन २१ अधिकारी आणि ११० खलाशांचा मोहीमेत समावेश होता. बहुतेक सर्व खलाशी इंग्रज असले तरी त्यांच्या स्कॉटीश आणि आयरीश खलाशांचाही समावेश होता.

फ्रँकलीनची ही मोहीम यशस्वी होणार याबद्दल प्रत्येकाला खात्री होती!
अवघ्या तीनशे मैलांच्या प्रदेशाचंच संशोधन झालेलं नव्हतं. फ्रँकलीन, क्रोझीयर यांच्यासारखे आर्क्टीक मध्ये पूर्वीही मोहीमा राबवलेले अनुभवी अधिकारी असल्यावर मोहीम यशस्वी झाल्यातच जमा होती.

.... पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं!

१९ मे १८४५ ला फ्रँकलीनच्या मोहीमेने इंग्लंडचा किनारा सोड्ला!

ओर्कनी बेटांवरील स्ट्रॉमेन्स बंदरात एक दिवस थांबून टेरर आणि इरेबस यांनी ग्रीनलंडचा किनारा गाठला. नौदलाचं रॅटलर हे जहाज आणि बॅरेटो ज्युनियर हे मालवाहतूक करणारं जहाज त्यांच्याबरोबर इथपर्यंत आलं होतं.

ग्रीनलंडच्या पश्चिम किनार्‍यावर असलेल्या डिस्कोच्या उपसागरातील व्हाईटफिश बेटावर आल्यावर बॅरेटो ज्युनियरवरुन आणण्यात आलेल्या दहा बैलांची इथे हत्या करण्यात आली. या बैलांचं ताज मांस टेरर आणि इरेबसवर चढवण्यात आलं. फ्रँकलीनच्या तुकडीपैकी पाच खलाशांची इथून परत पाठवणी करण्यात आली! रॅटलर आणि बॅरेटो ज्युनियरने परतीची वाट धरली. १२९ माणसांसह टेरर आणि इरेबसने बॅफीनच्या उपसागराच्या दिशेने कूच केलं.


डिस्कोचा उपसागर

जुलैमध्ये व्हेल्सच्या शिकारीसाठी आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्स जहाजाचा कॅप्टन डॅनेट आणि एन्टरप्राईझचा कॅप्टन रॉबर्ट मार्टीन यांची टेरर आणि इरेबस यांच्याशी गाठ पडली. लँकेस्टर खाडीत प्रवेश करण्यापूर्वी अनुकूल हवामानाची वाट पाहत फ्रँकलीन तुकडी बॅफीनच्या उपसागरात थांबलेली होती.

टेरर आणि इरेबस या जहाजांचं हे शेवटचं दर्शन!

१८३६-३९ च्या मोहीमेत थॉमस सिंप्सनने कॅनडाच्या आर्क्टीक किनार्‍याचा बराचसा भाग पिंजून काढला होता. परंतु हडसनच्या उपसागरापासून सिंप्सन जिथे पोहोचला होता तो प्रदेश अद्यापही अज्ञात होता. या मोहीमेसाठी जॉन रे याची निवड करण्यात आली. जमिनीवरुन मार्ग काढण्यात रे वाकबगार होता. परंतु रेड रिव्हर वसाहत गाठून आर्क्टीकमध्ये वास्तव्याचं आणि उपलब्धं साधनांचा योग्य वापर करुन घेण्याचं कौशल्यं आत्मसात करण्याचा त्याला सल्ला देण्यात आला.


जॉन रे

९ ऑगस्ट १८४४ ला ला रे ने रेड रिव्हर वसाहत गाठली, परंतु त्याला प्रशिक्षण देणारा अधिकारी गंभीर आजारी पडला होता! दुर्दैवाने हा अधिकारी लवकरच मरण पावला. रे ने स्लेजवरुन १२०० मैलाचा प्रवास करुन सुपीरीयर सरोवराचा उत्तरेचा किनारा गाठला. सर जॉर्ज थॉमसनच्या सल्ल्यानुसार सॉल्ट सेंट मेरी सोडून रे ने टोरांटो गाठलं. सॉल्ट सेंट मेरी इथे परतल्यावर रे ने विनिपेग सरोवरातून ८ ऑक्टोबरला यॉर्क फॅक्टरी गाठली. १८४४ चा हिवाळा तिथेच मुक्काम करण्याची त्याची योजना होती.

१२ जून १८४५ ला रे ने यॉर्क फॅक्टरी सोडली आणि दोन बोटींतून रिपल्सचा उपसागर गाठला! तिथल्या एस्कीमोंनी रिपल्स उपसागराच्या उत्तर-पूर्व दिशेला महासागर असल्याचं त्याला खात्रीपूर्वक सांगितल्यावर रिपल्स उपसागराच्या परिसरात मुख्य तळ ठेवून आर्क्टीकचा किनारा गाठण्याची योजना आखली.


यॉर्क फॅक्टरी वसाहत

२६ जुलैला बर्फावरुन एक बोट ओढत रे बुथिया आखाताच्या उत्तर-पश्चिमेला सुमारे चाळीस मैलांवर पोहोचला. तिथल्या एस्कीमोंकडून बुथिया आखात हे जमिनीने वेढलेलं असून ज्या ठिकाणाहून सिम्प्सन परत फिरला होता तिथे जाण्यासाठी जमिनीवरुन प्रवास करावा लागेल हे त्याला कळून आलं. बुथिया आखाताच्या पूर्वेच्या किनार्‍याने रे ने उत्तरेचा मार्ग धरला, परंतु हिवाळा जवळ येत असल्याने परत फिरुन त्याने हिवाळ्यासाठी रिपल्सच्या उपसागराकिनारी मुक्काम ठोकला.

त्या हिवाळ्यात रे ने थंड प्रदेशात वावरण्याची अनेक कौशल्यं एस्कीमोंकडून आत्मसात केली. तंबू वापरण्यापेक्षा इग्लू हे जास्तं उबदार आहे हे त्याच्या ध्यानात आलं.

५ एप्रिल १८४६ ला रे आपल्या दुसर्‍या मोहीमेवर निघाला. कमिटी उपसागर गाठून त्याच्या पूर्वेच्या किनार्‍याने जात त्याने पेली उपसागर गाठला. पेलीच्या उपसागराला पूर्ण वळसा घालून त्यातील अनेक बेटांचा त्याने शोध लावला. १८२९-३३ च्या मोहीमेत जिथे जॉन रॉसचं जहाज अडकलं होतं त्या भागाचं त्याला दुरुन दर्शन झालं. परतून त्याने रिपल्सच्या उपसागरात हिवाळ्यासाठी तळ ठोकला.


रिपल्स उपसागर

१८४७ मध्ये तिसर्‍या मोहीमेत रे ने पुन्हा कमिटी उपसागर गाठला. पूर्वेच्या किनार्‍याने प्रवास करत १८२२ मधील पेरीच्या माणसांनी गाठलेल्या फुरी-हेक्ला सामुद्रधुनीच्या शोधात तो उत्तरेला गेला, परंतु खराब हवामानामुळे त्याला परत फिरावं लागलं. उत्तरेकडील ज्या भागातून तो परतला त्याला त्याने केप क्रॉझीयर असं नाव दिलं. त्याच्या अंदाजानुसार फुरी-हेक्ला सामुद्रधुनी तिथून उत्तरेला २५-३० मैलांवर होती. नोव्हेंबरमध्ये रे इंग्लंडला परतला.


बुथिया आखात

१८४५ ला नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर गेलेल्या जॉन फ्रँकलीनच्या मोहीमेकडून दोन वर्षात काहीही ऐकू आलेलं नव्हतं! इंग्लंडमधील जनता, पार्लमेंटचे सभासद आणि लेडी फ्रँकलीन यांच्या दबावापुढे झुकून नौदलाने फ्रँकलीन मोहीमेच्या शोधार्थ सुटकापथक पाठवण्याची तिहेरी योजना आखली.

जॉन रिचर्डसन आणि जॉन रे यांनी अमेरीकेच्या मुख्य भूभागावरुन मॅकेंझी आणि कॉपरमाईन नद्यांच्या परिसरात शोध घेत व्हिक्टोरीया लँडच्या परिसरात शोध घ्यावा, त्याचवेळी जेम्स क्लार्क रॉसने लँकेस्टर खाडीतून पूर्वेच्या दिशेने मॅकेंझी नदीपर्यंत शोध घ्यावा आणि थॉमर मूर आणि हेनरी केलेट यांनी बेरींगच्या सामुद्रधुनीतून अलास्काच्या उत्तर किनार्‍यावरुन कॉपरमाईन नदीपर्यंत शोध घ्यावा अशी ही योजना होती. या तीनही मोहीमांची आर्क्टीक सर्कलमध्ये परस्परांशी गाठ पडेल अशी नौदलाला अपेक्षा होती.

१८४८

२५ मार्चला रिचर्डसन आणि रे यांनी लिव्हरपूल सोडलं. १८४७ च्या नोव्हेंबरमध्ये आर्क्टीकहून परतल्यावर अवघ्या चार महिन्यात रे पुन्हा आर्क्टीकमधे निघाला होता! त्यांच्या मोहीमेसाठी आवश्यक असणारी सामग्री १८४७ मध्येच हडसनच्या उपसागराच्या वाटेवर निघाली होती.

१० एप्रिलला रिचर्डसन आणि रे न्यूयॉर्कला पोहोचले. तिथून चार दिवसात त्यांनी माँट्रीयाल गाठलं. सॅक्स्टच्वेन नदीतून प्रवास करत आणि जमिनीवरुन बोटी ओढत त्यांनी २८ जूनला मेथी पोर्टेज इथे आघाडीवर निघालेल्या पथकाला गाठलं. स्लेव नदीतून प्रवास करत रिचर्डसन आणि रे १७ जुलैला ग्रेट स्लेव्ह सरोवराच्या काठी असलेल्या फोर्ट रिझोल्युशन इथे पोहोचले.


सॅक्स्टच्वेन नदी

२ ऑगस्टला त्यांनी जिथे वृक्ष उगवतात असा शेवटचा भूभाग ओलांडून उत्तरेची दिशा धरली. वाटेत त्यांना एस्कीमोंच्या अनेक टोळ्या भेटल्या, परंतु फ्रँकलीनच्या तुकडीतील एकाचीही त्यांच्याशी गाठ पडलेली नव्हती! फ्रँकलीनचा उपसागर आणि केप पेरी ओलांडून ते पुढे सरकले, पण झपाट्याने बिघडत चाललेलं हवामान आणि गोठलेल्या बर्फामुळे त्यांची प्रगती मंदावली होती. ऑगस्ट अखेरीस त्यांना कॉपरमाईन नदीकडे जाणारा मार्ग सापडला, परंतु गोठलेल्या बर्फामुळे खाडीतून प्रवास करणं अशक्यं झालं होतं. ५ सप्टेंबरला लहानशा कॅनोए मधून त्यांनी रिचर्डसन नदी ओलांडली आणि १५ सप्टेंबरला फोर्ट कॉन्फीडन्स गाठून हिवाळ्यासाठी मुक्काम ठोकला.

कॅप्टन थॉमस मूरने प्लॉव्हर या जहाजातून इंग्लंड सोडलं. पॅसिफीक मध्ये असलेल्या हेनरी केलेटच्या हेराल्ड जहाजाची गाठ घेऊन बेरींगच्या सामुद्रधुनीतून पॉईंट बॅरो मार्गे पूर्वेला कॉपरमाईन नदीपर्यंत फ्रँकलीनचा शोध घ्यावा अशी मूरची योजना होती. मात्रं १८४८ मध्ये प्लॉव्हर आणि हेराल्ड यांची गाठ पडलीच नाही! प्लॉव्हरने रशियाच्या दक्षिण किनार्‍यावर असलेल्या प्रॉव्हीडन्स उपसागरात हॅरॉल्डची वाट पाहत हिवाळ्यासाठी मुक्काम ठोकला, तर हेराल्ड अलास्काच्या उत्तरेला असलेल्या कॉट्झ्ब्ये खाडीत प्लॉव्हरची वाट पाहून २९ सप्टेंबरला दक्षिणेची वाट धरली!

जेम्स क्लार्क रॉसच्या मोहीमेने १८४८ मध्येच इंग्लंडचा किनारा सोडला. फ्रँकलीनच्या मोहीमेत समावेश असलेला फ्रान्सिस क्रोझीयर रॉसचा जिगरी दोस्त होता, त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी रॉस आतूर झाला होता.

रॉसच्या मोहीमेत फ्रान्सिस मॅक्क्लिंटॉकचा समावेश होता. एंटरप्राईझ आणि इन्व्हेस्टीगेटर या दोन जहाजातून त्यांनी बॅफीनचा उपसागर गाठला, परंतु गोठलेल्या बर्फामुळे सॉमरसेट बेटापुढे मजल मारणं त्यांना अशक्यं झालं. सॉमरसेट बेटावरील लिओपोल्ड बंदरात बर्फात दोन्ही जहाजं अडकली!


सॉमरसेट बेट

भर हिवाळ्यात रे ने कॉपरमाईन आणि मॅकेंझी नद्यांच्या परिसरात अनेक छोट्या मोहीमा राबवल्या. -५१ अंश सेल्सीयस (-६० अंश फॅरनहीट) इतक्या कमी तापमानातही रे ची भटकंती बिनदिक्कत सुरु होती! मे अखेरीस बर्फ वितळण्यास सुरवात झाली, परंतु रिचर्डसन आणि रे यांच्याजवळील एकच बोट सुस्थितीत असल्याने रिचर्डसनने रे ला पुढे तपास करण्यास पाठवण्याचा निर्णय घेतला.

१८४९

वसंत ऋतूत रॉस आणि मॅक्क्लिंटॉक यांनी स्लेजवरुन सॉमरसेट बेटाचा किनारा पिंजून काढला. मात्रं त्यांना फ्रँकलीनची कोणतीही खूण आढळली नाही. या मोहीमेदरम्यान पीलची खाडी रॉसच्या नजरेस पडली, परंतु खाडीतील गोठलेल्या बर्फामुळे फ्रँकलीनच्या तुकडीला त्यातून पुढे मजल मारणं साध्य झालं नसावं असा त्याने निष्कर्ष काढला.

जेम्स रॉसचा हा अंदाज साफ चुकला होता!
१८४६ च्या उन्हाळ्यात फ्रँकलीनने पील खाडीतूनच आगेकूच केली होती!

थॉमस मूर आणि हेनरी केलेटच्या जोडीला नौदलाने विल्यम पुलेनचीही रवानगी केली. हवाईतील होनोलुलू बंदरात पुलेनने प्लॉव्हरला गाठलं.

१५ जुलैला ला कॉट्झ्ब्ये प्लॉव्हर आणि हेराल्ड दोन्ही जहाजांची गाठ पडली!

पुलेन २ अधिकारी आणि २२ खलाशांसह कॉट्झब्ये खाडीतून पूर्वेचा मार्गाला लागला. पॉईंट बॅरो इथे पोहोचल्यावर बर्फातून मार्ग काढणं बोटींना कठीण जाऊ लागलं. पुलेनने दोन बोटी आणि ११ माणसांची कॉट्झब्ये खाडीत रवानगी केली आणि उरलेल्या १३ माणसांसह पुढे कूच केलं.

२ सप्टेंबरला पुलेन मॅकेंझी नदीच्या मुखाशी पोहोचला!


मॅकेंझी नदी

१८२६ मध्ये फ्रेड्रीक बीची पॉईंट बॅरो इथे पोहोचला होता. १८३७ मध्ये थाँमस सिम्प्सनने मॅकेंझी नदीच्या मुखापासून बोटीतून आणि ५० मैलांची पदयात्रा करुन पॉइंट बॅरो गाठलं होतं, परंतु अलास्काच्या पश्चिमकडील चुकची समुद्रातून मॅकेंझी नदीच्या मुखापर्यंत आर्क्टीकमधून पोहोचणारा पुलेन हा पहिला दर्यावर्दी होता!

७ मे ला रिचर्डसनने फोर्ट कॉन्फीडन्सहून पूर्वेची वाट धरली. ग्रेट बेअर नदी गाठून त्यांनी सामग्री घेऊन येणार्‍या बोटीची वाट पाहत महिनाभर तिथे मुक्काम केला, परंतु गोठलेल्या बर्फामुळे बोट येऊ शकणार नाही हे जूनच्या पहिल्या आठवड्यात स्पष्ट झालं. पदयात्रा करत १४ जूनला ते फोर्ट सिम्प्सन इथे पोहोचले. २५ जूनला त्यांनी फोर्ट सिम्प्सन सोडलं आणि दोन महिन्याच्या पायपिटीनंतर २५ सप्टेंबरला ते सॉल्ट सेंट मेरीला येऊन धडकले. इथून एका बोटीने रिचर्डसनने हुरॉन सरोवर गाठलं.


हुरॉन सरोवर

७ जूनला सहा माणसांसह रे ने फोर्ट कॉन्फीडन्स सोडलं आणि कॉपरमाईन नदीची वाट धरली. त्याच्या तुकडीमध्ये दोन क्री इंडीयन्स आणि एका एस्कीमोचा समावेश होता. व्हिक्टोरीया लँडच्या परिसरात फ्रँकलीनच्या तुकडीचा शोध घेण्याचा त्यांचा बेत होता. २१ जूनला त्यांनी केंडल नदी ओलांडली आणि २२ तारखेला कॉपरमाईन नदी गाठली. कॉपरमाईन नदीतील बर्फ वितळण्याची वाट पाहत त्यांनी एक आठवडा तिथे मुक्काम केला. २९ जूनला त्यांनी नदीतून पुढची वाट पकडली. मध्ये गोठलेल्या बर्फावरुन स्लेजचा वापर करत त्यांनी १४ जुलैला मॅकेंझी पॉईंट गाठला. इथे व्हिक्टोरीया लँडवरील वोल्स्टेन भागाचे रहिवासी असलेल्या सात एस्कीमोंशी त्यांची गाठ पडली. या एस्कीमोंकडूनही फ्रँकलीनबद्दल कोणतीही माहीती मिळाली नाही.

१६ जुलैला रे ने बेक खाडी गाठली, पण प्रतिकूल हवामानामुळे त्यांना पुढे वाटचाल करणं अशक्यं झालं. ३० जुलैला रे केप क्रुसेन्स्टर्नला पोहोचला. १९ ऑगस्टला त्यांनी व्हिक्टोरीया लँडची वाट पकडली, परंतु बर्फातून वाट काढणं अशक्यं झालं होतं. २३ ऑगस्टला रे ने परतीचा निर्णय घेतला. परतीच्या वाटेवर एका अपघातात एकुलत्या एका बोटीचं जबरदस्तं नुकसान झाल्याने ती निकामी झाली. रे च्या तुकडीतील एस्कीमो या अपघातात प्राणाला मुकला. स्लेजने प्रवास करत ३१ ऑगस्टला रे फोर्ट कॉन्फीडन्सला परतला.

जॉन रे च्या तुकडीने फोर्ट कॉन्फीडन्सहून पुन्हा कूच केलं. कॉपरमाईन नदीच्या काठाने प्रवास करत सप्टेंबर अखेर रे फोर्ट सिम्प्सनला पोहोचला. रे फोर्ट सिम्प्सनला असतानाच ऑक्टॉबरच्या पहिल्या आठवड्यात चार माणसांची एक तुकडी तिथे येऊन धडकली.

विल्यम पुलेन!

कॉट्झब्ये खाडीतून निघालेल्या पुलेनची अखेर रे शी गाठ पडली होती! आपल्या बाकीच्या सहकार्‍यांना मॅकेंझी नदीवरील फोर्ट मॅक्फर्सन इथे विश्रांतीसाठी सोडून पुलेन फोर्ट सिम्प्सनला पोहोचला होता.

फ्रॅंकलीनच्या शोधात पाठवण्यात आलेल्या तीन मोहीमांपैकी पुलेन आणि रे यांची आर्क्टीक सर्कलमध्ये भेट झाली, परंतु जेम्स क्लार्क रॉसची मात्रं दोघांपैकी एकाशीही गाठ पडली नाही.

जॉन रे च्या मते पुलेन आणि त्याच्या माणसांकडे थंडीपासून बचावाची असलेली साधनं आणि कपडे हे खूपच अपुरे होते. त्यांच्या सुदैवाने हवामान अनुकूल असल्याने थंडीचा तडाखा त्यांना बसला नव्हता!


फोर्ट सिम्प्सन

पुलेन आणि रे मॅकेंझी नदीतून ग्रेट स्लेव्ह सरोवराच्या मार्गाला लागले. २५ जूनला त्यांना एक जलद गतीने जाणारी पत्रांची वाहतूक करणारी कॅनॉए आढळली. या बोटीतून पुलेन आणि रे दोघांसाठीही इंग्लंडहून संदेश आले होते!

विल्यम पुलेनला कॅप्टनपदावर बढती देण्यात आलेली होती. उत्तर आर्क्टीक सर्कलमध्ये फ्रँकलीनचा शोध घेण्याची त्याला सूचना देण्यात आली होती.

सर जॉर्ज सिम्प्सन, फ्रान्सिस ब्युफोर्ट आणि लेडी फ्रँकलीन यांनी जॉन रे ला आर्क्टीकच्या उत्तर किनार्‍यापर्यंत फ्रँकलीनचा शोध घेण्याची सूचना केली होती. आवश्यक ती साधनसामग्री पोहोचण्याचं सिम्प्सनने आश्वासन दिलं होतं. फ्रँकलीनचा शोध नेमका कोणत्या मार्गाने घ्यावा याचा निर्णय रे वर सोडण्यात आला होता.

हा संदेश मिळताच पुलेन आपल्या माणसांसह उत्तरेच्या दिशेला निघाला. आर्क्टीकचा उत्तर किनारा गाठून त्याने पूर्वेची वाट पकडली, परंतु केप बार्थहर्स्टला पोहोचल्यावर गोठलेल्या बर्फामुळे पुढे जाणं अशक्यं असल्याचं त्याला आढळून आलं. निरुपायाने मागे फिरुन त्याने फोर्ट सिम्प्सन गाठलं आणि हिवाळ्यासाठी मुक्काम ठोकला.

पुलेन निघून गेल्यावर रे ने पूर्वेला मेथी पोर्टेज गाठलं. आपल्याजवळील सीलची कातडी तिथे जमा करुन तो परत फिरला आणि फोर्ट कॉन्फीडन्स गाठून हिवाळ्यासाठी मुक्काम टाकला.

६ नोव्हेंबरला रिचर्डसन लिव्हरपूलला परतला. फ्रँकलीनच्या शोधाची जबाबदारी त्याने रे वर सोपवली होती!

फ्रॅंकलीनच्या शोधासाठी आ़खण्यात आलेली तिहेरी मोहीम अयशस्वी ठरल्याचं १८४९ च्या उत्तरार्धात स्पष्ट झालं होतं. जॉन रिचर्डसन इंग्लंडला परतला होता. जेम्स क्लार्क रॉसला वेलींग्टन खाडीच्या पुढे मजल मारता आली नव्हती. विल्यम पुलेन आणि जॉन रे त्यांच्याकडूनही कोणतीही आशादायक बातमी हाती आलेली नव्हती.

लेडी फ्रँकलीनने आपल्या पतीच्या शोधासाठी नवीन मोहीम उघडावी म्हणून नौदलाचा पाठपुरावा करण्यास सुरवात केली. जॉन फ्रँकलीनचा शोध ही राष्ट्रीय समस्या असल्याचा प्रचार तिने चालू केला. तिच्या भावनिक आव्हानाला अखेर यश आलं. नौदलाच्या अधिकार्‍यांनी नवीन मोहीम आखली!

कॅप्टन रिचर्ड कॉलीन्सन आणि कमांडर रॉबर्ट मॅक्क्युलर यांच्यावर ही मोहीम सोपवण्यात आली. जेम्स क्लार्क रॉसच्या मोहीमेतील एंटरप्राईझ आणि इन्व्हेस्टीगेटर या जहाजांमधून बेरींगच्या सामुद्रधुनीतून पूर्वेकडे प्रवास करत फ्रॅंकलीनच्या मोहीमेचा शोध घ्यावा अशी योजना असली तरी ब्रिटीश नौदलाचा मुख्य हेतू वेगळाच होता.

नॉर्थवेस्ट पॅसेज!

अटलांटीक आणि पॅसिफीक महासागरांना आर्क्टीकमार्गे जोडणारा नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्याचं श्रेय सर्वप्रथम आपल्याला मिळावं अशी ब्रिटीश नौदलाची आकांक्षा होती!